धनंजय मुंडे वि. पंकजा मुंडे: परळी विधानसभा निवडणुकीच्या लढतीत कुणाचं पारडं जड?

    • Author, अमृता कदम
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.

भावाबहिणीच्या लढाईत परळीचा गड राखण्यात कोण यशस्वी होणार, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेच.

पण त्याचबरोबर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकारणावर या निवडणुकीचा कसा परिणाम होऊ शकतो, हे पाहणंही महत्त्वाचं आहे.

'मला कोणतीही धास्ती नाही'

दरम्यान, धनंजय मुंडेंच्या उमेदवारीवर महिला आणि बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ही लढत माझ्यासाठी नवीन नाही. त्यामुळे मला कोणतीही धास्ती वाटत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

या मुलाखतीत बोलताना त्यांनी म्हटलं, "मी इथून निवडून आलेली आमदार आहे. इथे विकासकामं केली आहेत. एक-दोन स्थानिक निवडणुका वगळल्या तर भाजप इथं सातत्यानं विजयी होत आहे. मी इथं विकासकामं केली आहेत. विरोधकांकडे कोणतीही सत्ता नाहीये आणि लोकसभेलाही त्यांचा दारूण पराभव झाला आहे."

"आता इथे राष्ट्रवादीकडे फारसं बळ नाहीये. त्यामुळे माझ्याऐवजी त्यांना धास्ती वाटली असेल," असा टोलाही पंकजा यांनी लगावला.

पण पंकजा मुंडेंनी व्यक्त केलेला विश्वास किती सार्थ आहे? परळीतल्या स्थानिक राजकारणाचं पारडं नेमकं कोणाच्या बाजूनं झुकलंय? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही बीड जिल्ह्याचं राजकारण जवळून अनुभवलेले ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख यांच्याशी संपर्क साधला.

'सध्या तरी पंकजांचं पारडं जड'

विरोधी पक्षनेते म्हणून धनंजय मुंडेचं काम चांगलं असलं तरी सध्याच्या परिस्थितीत पंकजा मुंडे यांची बाजू वरचढ दिसत असल्याचं मत अशोक देशमुख यांनी व्यक्त केलं. "परळीमधला वंजारी समाज हा निर्णायकरीत्या धनंजय मुंडेंच्या पाठीशी नाहीये. गोपीनाथ मुंडेंवर इथल्या वंजारी समाजानं खूप प्रेम केलं आहे. त्यांचा वारसा घेऊन पंकजा आणि प्रीतम मुंडे राजकारणात आला असल्यानं पंकजा आणि प्रीतम यांना वंजारी समाजाचा पाठिंबा आहे. दलित आणि मुस्लिम मतांचीही बऱ्यापैकी मतविभागणी होईल, जी पंकजा यांच्या फायद्याची असेल," ते सांगतात.

अशोक देशमुख यांनी पुढे सांगितलं, की आता जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद बऱ्यापैकी कमी झाली आहे. भाजप केंद्रात बहुमतानं सत्तेत आहे. त्यामुळे आपलं मत कुणाला दिल्यानं काम होऊ शकतात, फायदा होऊ शकतो, याचा विचारही लोक मतदान करताना करतील. त्याचाही फटका धनंजय मुंडेंना बसू शकतो.

'धनंजय मुंडेंची उमेदवारी हे भाजपला दिलेलं उत्तर'

"भाजपनं राष्ट्रवादीला सर्वच बाजूनं कोंडीत पकडलं आहे. शरद पवार भाजपला उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि धनंजय मुंडेंना परळीमधून जाहीर करण्यात आलेली उमेदवारी म्हणजे त्याचाच एक भाग आहे," असं मत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

"खरं तर लोकसभेच्या वेळेस धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांना प्रीतम मुंडेंविरोधात उमेदवारी देण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न करण्यात आले. पण धनंजय मुंडे यांनी ही गोष्ट मान्य केली नाही. यावेळी मात्र त्यांना शरद पवारांना नकार देता आला नसावा," असं नानिनवडेकर यांनी सांगितलं.

धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या राजकारणाला गोपीनाथ मुंडेंच्या रूपानं भावनिक पदर असल्याचंही मृणालिनी नानिवडेकर यांनी सांगितलं. धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर गोपीनाथ मुंडे दुखावले होते. याचा संदर्भ देत पंकजा मतदारांना भावनिक आवाहन करू शकतात. दुसरं असं आहे, की गोपीनाथ मुंडेच्या राजकारणाचा वारसा हा त्यांच्या मुली चालवतात, हा परळीमधील सामान्यांचा समज आहे. आणि कोणत्याही दिग्गज नेत्याची पुण्याई अशी पाच-दहा वर्षांत संपत नसते. साहजिकच आपल्या वडिलांच्या वारशाचा पुरेपूर वापर पंकजा मुंडे करू शकतात, असं नानिवडेकर यांनी म्हटलं.

मृणालिनी नानिवडेकर यांनी पुढे सांगितलं, की "धनंजय मुंडे हे अतिशय उत्तम नेते आहेत. मेहनती आणि अभ्यासू आहेत. त्यांचं मराठा नसणं हेसुद्धा राष्ट्रवादीसाठी फायद्याचं आहे. पण त्यांनी गोपीनाथ मुंडेंसोबत भाजपमध्ये राजकारण सुरू केलं, पण नंतर राष्ट्रवादीमध्ये गेले. मतदारांच्या मनात त्यांच्या या राजकारणाबद्दल काय भावना आहेत, हे निवडणुकीत महत्त्वाचं ठरेल.

"दुसरीकडे पंकजांचं राजकारण काहीसं एकारलेलं आहे. त्यांच्यावर चिक्की घोटाळ्यासारखे आरोपही झाले आहेत. या सगळ्यातून मार्ग काढत त्यांनी स्वतःच्या राजकारणाची एक दिशा ठरवली आहे आणि आतापर्यंत त्यामध्ये त्या यशस्वी झालेल्या दिसतात. भाजपसाठीही महिला नेत्या म्हणून पंकजा मुंडे महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे एकूण या लढतीचा विचार करता ती निश्चितच उत्कंठावर्धक असेल."

लढत चुरशीची

2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेचा 24 हजार मतांनीच पराभव झाला होता. त्यामुळे यावेळीही दोघांमधील लढत चुरशीची होईल, असं मत 'लोकमत'चे पुणे आवृत्तीचे संपादक प्रशांत दीक्षित यांनी व्यक्त केलं.

प्रशांत दीक्षित यांनी पंकजा आणि धनंजय मुंडेंची शक्तिस्थळं विस्तारानं सांगितली. "पंकजा यांना घराण्याचा वारसा आहे. गोपीनाथ मुंडेंबद्दल आस्था असणारा एक मोठा वर्ग आहे, ज्याला मुंडे मुख्यमंत्री बनू शकले नाहीत याची आजही खंत वाटते. त्यामुळे पंकजाला संधी मिळायला हवी, असं या लोकांना वाटतं. पंकजांनीही आपल्या मतदारसंघातील लोकांना जोडून ठेवलं आहे. त्यांचा मतदारसंघात उत्तम लोकसंपर्क आहे. त्या चांगल्या वक्त्याही आहेत. तर दुसरीकडे धनंजय मुंडेही तरुण, तडफदार नेते आहेत. एकीकडे राष्ट्रवादीला गळती लागलेली असताना गेली पाच वर्षे ते पक्षाचा आवाज जवळपास एकहाती सगळीकडे पोहोचवत आहेत. मतदारसंघात त्यांचंही नेटवर्किंग उत्तम आहे. "

पण त्यांच्यामध्ये तुलना केल्यास सध्या परिस्थिती पंकजा मुंडे यांना अनुकूल असल्याचं मतही दीक्षित यांनी नोंदवलं. "राष्ट्रवादीला गळती लागली आहे. दुसरीकडे भाजप मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे मतदार राष्ट्रवादीला मत देताना विचार करतील. दुसरं म्हणजे धनंजय मुंडेंना परळीत उमेदवारी दिल्यानं पक्षाची थोडी अडचणही होऊ शकते. कारण धनंजय मुंडेंना आपली सगळी शक्ती परळीतच लावावी लागेल. इतर ठिकाणी प्रचारामध्ये त्यांचा फारसा उपयोग करून घेता येणार नाही."

'पंकजा-धनंजय मुंडेंमधील संघर्षाचा इतिहास'

एकमेकांसाठी पंकुताई आणि धनुभाऊ असलेले हे भाऊ-बहीण राजकारणाच्या आखाड्यात परस्परांचे कट्टर विरोधक बनले आहेत. गोपीनाथ मुंडे हयात असतानाच दोघांमधील संघर्षाची ठिणगी पडली होती.

गोपीनाथ मुंडे जेव्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हा बीडमधला त्यांचा वारसदार म्हणून त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जण पाहत होते. मुंडे महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत होते तर धनंजय परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण पाहत होते.

2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पण इथूनच सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती.

जानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला.

2013 मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये धनंजय विजयी झाले. मुंडेंच्या निधनानंतर धनंजय विरुद्ध पंकजा असा संघर्ष सुरू झाला.

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यामध्ये पंकजांनी बाजी मारली.

डिसेंबर 2016 मध्ये परळी नगरपालिकेची निवडणूक झाली. मुंडे कुटुंबीयांसाठी ही नगरपालिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. यावेळेस पंकजा विरुद्ध धनंजय असं पुन्हा चित्र होतं.

तेव्हा धनंजय मुंडे यांनी 33 पैकी तब्बल 27 उमेदवार निवडून आणत त्यांनी नगरपालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या निवडणुकीनंतर भावा-बहिणीतली चुरस वाढली.

2017च्या सुरुवातीला लगेचच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा सर्वाधिक जागा मिळवल्या तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती. या जिल्हा परिषद निवडणुकीतच परळी तालुक्यामध्ये भाजपला मोठा फटका बसला.

दरम्यान, यावेळेस पंकजा यांनी राजकीय खेळी खेळत जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता खेचून आणली. मे 2017 मध्ये परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते.

अनेक वर्षं गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात बाजार समिती होती. या बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजय पुन्हा एकदा समोरासमोर उभे होते. दोघांनी आपापल्या दिवंगत वडिलांच्या नावांवर पॅनल उभे केले होते. त्यावेळी पंकजा यांच्या बहीण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी प्रचार केला होता.

मात्र पंकजा मुंडे यांच्या पॅनलला बाजार समिती निवडणूक पराभवाला सामोरं जावं लागलं. धनंजय मुंडे यांच्या पॅनलने समितीवर मोठा विजय मिळवला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)