You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे यांची मनसे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही?
- Author, नामदेव अंजना
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असतानाही, निवडणूक लढण्याबाबत महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केलेली नाही.
पक्षाची ताकद विधानसभेत दाखवणार, असं बोलून राज ठाकरे यांच्या पक्षानं लोकसभा निवडणुका लढवल्या नव्हत्या. त्यामुळं विधानसभेत मनसे तयारीनं उतरेल, असा अंदाज होता.
त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या एका ताज्या विधानानं नव्या चर्चेला उधाण आलंय. पवार यांनी काल नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, अशी राज ठाकरेंची भूमिका मांडली होती. पण आम्ही ती भूमिका मान्य नाही."
शरद पवार यांच्या विधानामुळं राज ठाकरेंच्या भूमिकेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, मनसे विधानसभा निवडणुका लढणार की बहिष्कार टाकणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
त्यात राज ठाकरे यांनी मतदानयंत्राबाबत (EVM) शंका उपस्थित केलीय. लोकसभा निवडणुकीआधी आणि नंतरही त्यांनी सातत्यानं EVMविरोधातील आवाज एकवटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज ठाकरे महाराष्ट्र विधानसभेवर बहिष्कार टाकू शकतात का आणि टाकल्यास त्याचा काय परिणाम होतील, याचा कानोसा बीबीसी मराठीनं घेतला.
'मनसे लढण्याची शक्यता कमी दिसतेय'
याविषयी मनसेचे नेते बाळा नांदगावकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंसोबत बैठक झाली. सगळेच सकारात्मक आहेत. मात्र काही मुद्दे आहेत, त्यावर विचार करून निर्णय घेतला जाईल."
मात्र मनसे विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यताच कमी दिसतेय, असं ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य म्हणतात. "'मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा' म्हटल्यानंतर त्यांनी किमान राज्यातल्या सर्व निवडणुका लढवायला पाहिजेत. राजकारणात तुम्ही उतरला आहात, समाजकारणात नाही. त्यामुळं निवडणुकीचं तंत्र-मंत्र आत्मसात करून लढणं, हा एकच पर्याय त्यांच्याकडे उरतो," असं संदीप आचार्य म्हणतात.
आचार्य पुढे म्हणतात, "पण निवडणुकीत ते उतरले नाहीत, तर लोकांसाठी जे काही करायचंय, ते होणार कसं? त्यामुळं राज ठाकरे सध्या वागतायत ते चूक आहे. अशानं त्यांचाच पक्ष खड्ड्यात जाईल."
"पण आता इतका उशीर झालाय की आता लढून पण फायदा नाही. शेवटच्या क्षणाला अभ्यास करून पास होता येत नाही. राज ठाकरे हे लढण्याच्या मनःस्थितीत दिसत नाहीत."
"निवडणूक लढवायची की नाही, हा पुढचा मुद्दा आहे. त्यांना पक्ष तरी चालवायचा आहे की नाही, हाच प्रश्न आहे. महाराष्ट्रात अनेक विषय आले, पण राज ठाकरेंची प्रतिक्रिया नाही, बोलणं-चालणं नाही, फिरणं नाही. पक्ष कार्यालयात त्यांची माणसं दिसत नाहीत," असं संदीप आचार्य म्हणतात.
आचार्य पुढे सांगतात, "प्रश्न असा आहे की, परीक्षेला बसायचं नाही आणि कुणी नापास व्हायचं, हे बाहेर बसून सांगितल्यास तसं कुणी ऐकूनच घेणार नाही. मुंबईत महानगरपालिकेवेळी प्रचार करूनही राज ठाकरेंना अपेक्षित यश मिळलं नव्हतं. लढून प्रतिसाद मिळत नसेल, तर न लढता कसा मिळेल?"
'अजून निर्णय नाही'
मनसे नेते संदीप देशपांडे हे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "विधानसभा लढावायची किंवा लढू नये, याबाबत अद्याप मनसेनं कुठलीच भूमिका जाहीर केली नाहीय. आमची भूमिका राजसाहेब जाहीर करतील, शरद पवार नाही."
"विधानसभा लढवण्यासंदर्भातील आमच्या पक्षातील अनेकांची मतं हा पक्षांतर्गत लोकशाहीचा भाग आहे आणि त्याप्रमाणे आम्ही राजसाहेबांसमोर मतं मांडली. आता त्यावर विचार करून पक्षाच्या हिताचा निर्णय ते घेतील," असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
"राजसाहेब निर्णय काय घेणार, याच उत्सुकता आम्हाला पण आहे. पण अंतिम निर्णयही तेच घेतील. इतरांनी आमच्या संबंधी निर्णय घेण्याची गरज नाही," असंही देशपांडे म्हणाले.
वरिष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी यांनी 'द कझन्स ठाकरे' या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील पहिलं चरित्रपर पुस्तक लिहिलंय. राज ठाकरेंच्या सध्याच्या भूमिकेविषयी बीबीसी मराठीशी बोलताना ते सांगतात, "निवडणूक लढणं महत्त्वाचं आहे, कारण निवडणुकीचं एक चक्र असतं. कार्यकर्त्यांची तळातली फळी कामाला लागते, घरोघरी पोहोचतात. शिवाय, अडीच वर्षांनी महापालिका निवडणुका आहेत. त्यावेळीही फायदा झाला असता."
याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "राज ठाकरे सर्वांनी बहिष्कार टाकण्याचं म्हणत होते. पण आम्हाला बहिष्कार टाकता येणार नाही, अशी आमची भूमिका आहे. आता त्यांच्या लढण्यामुळं किंवा न लढण्यामुळं काय होईल, हे मतदारच ठरवतील."
"लोकशाहीत निवडणूक लढलं पाहिजे. विरोधक लढायला तयार नसतील, तर निवडणूक होण्याची थोडीच थांबणार आहे?" असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला.
"मनसे निवडणूक लढत नसेल तर कार्यकर्ते काय करतील, हेही राज ठाकरेंना ठरवावं लागेल," असंही नवाब मलिक म्हणाले.
यावर बोलताना धवल कुलकर्णी सांगतात, "राज ठाकरेंचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात. संघटना नसली तरी राज ठाकरेंची प्रत्येक वॉर्डात दीड-दोन हजार मतं ठरलीत, पण शिवसेनेसारखं केडर नाही. निवडणुका लढताना कार्यकर्त्यांनाही फायदे असतात, ते मिळत नसतील तर कार्यकर्ते तरी पक्षात का राहतील?"
"राज ठाकरेंचा जास्तीत जास्त मतदार हा तिशीच्या खालचा आहे. हा वर्ग दहा-दहा वर्षं जिंदाबाद करत बसणार नाही. तेवढी सहनशीलता या वर्गाकडे नसते. त्यामुळं मतदार सोबत राहण्यास अडथळे येतील," असंही धवल कुलकर्णी म्हणतात.
मनसेची संघटनाबांधणी नसल्यानं राज ठाकरे लढत नाहीत?
मनसेची विधानसभेसाठी पक्षांतर्गत तयारी नसल्याची चर्चा आहे. पक्षसंघटनेत राज ठाकरे कमी पडले का, असाही प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जातो.
यावर संदीप आचार्य म्हणतात, "मनसेत पक्ष संघटना नावाची गोष्टच राहिली नाहीय. राज ठाकरे हेच मनसे समर्थकांसाठी आकर्षण बिंदू राहिलेले आहेत. त्यांना गर्दी जमवण्याचं तंत्र-मंत्र व्यवस्थित जमतं. संघटना बांधणी हा वेगळा विषय आहे, जी मनसे या पक्षात कधी नीट झालीच नाही. जेव्हा त्यांना मतं मिळत होती, तेव्हाही नव्हती आणि आजही अस्तित्वात नाही."
"मनसेकडे पक्षसंघटना नव्हती आणि आजही नाही. एका नेत्याच्या प्रतिमेभोवती बांधलेला पक्ष आहे. शिवसेनेकडे जशी संघटना आहे, तशी मनसेकडे नाहीय. शेवटी भावना किंवा विचारसरणीवर पक्ष नाही चालवता येत, संघटना लागतेच," असं वरिष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी म्हणतात.
विधानसभा निवडणुकीतील मनसेचा आतापर्यंतची कामगिरी
राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. मराठी भाषा आणि परप्रांतियांचा मुद्दा अजेंड्यावर घेत मनसेने राज्यभर आक्रमक आंदोलनं केली.
अल्पावधीतच महाराष्ट्रभर पक्षा विस्तारल्यानंतर 2009 साली मनसेनं विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. 2009 साली मनसेचे 13 आमदार निवडून आले. मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये मनसेची मतांची टक्केवारीही लक्षणीय होती.
त्यानंतर 2014 सालीही मनसेनं विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. पुण्यातील जुन्नर मतदारसंघातून शरद सोनवणे हे एकमेव मनसेचे आमदार निवडून आले. त्यांनीही काही महिन्यांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळं सध्याच्या घडीला मनसेचा एकही आमदार नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)