मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा, 'मुख्यमंत्री आले तर पीक कर्जमाफीचे पैसे देतील ना?'

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

राज्यात एकीकडे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे तर दुसरीकडे लोक कर्जमाफीच्या पैशांची वाट पाहत आहेत. सांगलीमध्ये येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भात महाजनादेश यात्रेत होते. मुख्यमंत्री येणार म्हणून लोक त्यांची वाट पाहत होते. ते लोक त्यांची वाट का पाहत होते?

6 ऑगस्टचा दिवस. सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला होता. सर्व धरणं भरून वाहत होती. पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती. सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती गंभीर दिसत होती. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 35 विधानसभा क्षेत्रात फिरून गडचिरोलीहून यवतमाळला पोहचली होती.

अमरावती जिल्ह्यात गुरूकुंजच्या सभेत मुख्यमंत्री भाषण करत होते. त्याचदरम्यान जवळच असलेल्या तळेगावमध्ये भिमराव मोहोड या शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

महाजनादेश यात्रा ही त्याच दिवशी यवतमाळहून अकोल्याला जाणार होती. ही यात्रा तिथे जाण्याआधी अकोल्यात 6 शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची घटना घडली. यवतमाळमध्ये सकाळी 9 वाजता मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला आम्ही पोहचलो. 9.30 ही वेळ ठरली होती. सव्वा दहा वाजता मुख्यमंत्री आले. पूरस्थितीचा आढावा मी घेतोय. हे सांगत पत्रकार परिषदेला सुरुवात झाली.

"यवतमाळमध्ये कोट्यवधींचा निधी देऊन आपण या 5 वर्षांत खूप विकास केलाय. इकडच्या शेतकऱ्यांना सक्षम केलंय. बळीराजा जनसंजीवनी योजनेतून यवतमाळमध्ये खूप चांगलं काम झालंय," मुख्यमंत्री सांगत होते.

2015 ते 2018 या काळात 12 हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, हे राज्य सरकारचे आकडे आहेत, त्यातून बळीराजा कसा सक्षम झाला आहे? या प्रश्नावर, ते म्हणाले, "पूर्णपणे आत्महत्या थांबल्या आहेत असा दावा मी करणार नाही, पण आघाडी सरकारच्या काळाशी तुलना केली, तर शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण कमी करण्यात आम्हाला यश आलंय.

आम्हीही त्यांच्या कॉनव्हॉयमधून जात होतो. ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेले होर्डिंग लागले होते. बसमधूनच लोकांना हात दाखवत, मधल्यावेळात प्रसारमाध्यमांना मुलाखती देत दारव्हा गावांत पोहचलो. शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांनी भाषणात मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली. मग मुख्यमंत्री बोलायला उभे राहीले. भाषण सुरू झाल्यानंतर 5 मिनिटांनंतर 'नुसती आश्वासनं नको कर्जमाफी करा, पिकविम्याचे पैसे द्या, अशी घोषणाबाजी ऐकू आली.

मुख्यमंत्र्यांनी 'त्याला घेऊन जा, दूध पाजा' असं स्टेजवरून म्हटलं. कॉंग्रेस राष्ट्रवादीकडे घोषणाबाजी करायला जास्त माणसंही उरली नाहीत असं म्हणत त्यांनी राजकीय भाषण आटोपलं. सुरक्षारक्षकांच्या कवचातून एसी बसमध्ये चढले आणि पुढचा प्रवास सुरू झाला. दारव्हा ते कारंजा 41 किलोमीटरचा प्रवास आहे. मुख्यमंत्र्यांच्या कॉनव्हॉयला रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक जमले होते. मुख्यमंत्र्यांबरोबर आम्हीही कारंजाला पोहचलो. लोकांची गर्दी प्रचंड होती. तिथे जमलेल्या लोकांच्या चेहर्‍यावर खूप निरनिराळे भाव दिसत होते.

'कर्जमाफी मिळाली नाही'

"दोनदा - तीनदा पेरण्या केल्या. त्या सूकून गेल्या. दीड लाख रूपयांचं कर्ज आहे. कर्जमाफी केली म्हणतात पण आम्हाला काही मिळाली नाही," निर्मला दळवी सांगत होत्या.

कारंजामधली सभा सुरू होणार होती. ज्या ठिकाणी सभा होणार होती ते पटांगण लोकांनी गच्च भरलेलं होतं. त्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त. निर्मलाबाईंना आत जाता येणार नव्हतं. पण मुख्यमंत्री काय बोलणार हे त्यांना ऐकायचं होतं.

मुख्यमंत्री आले आहेत त्यांच्या सभेला नाही गेलात? निर्मलाबाईंना आम्ही विचारलं. त्यावर त्या म्हणाल्या, "उशीर झाला म्हणून जाता आलं नाही, पण आता काय बोलतात ते ऐकते."

मुख्यमंत्री म्हणतात कर्जमाफी केली आहे. त्यावर निर्मलाबाई म्हणाल्या, "हो का.. मग आता आले आहेत तर देतील वाटतं पैसे!"

मुख्यमंत्री कर्जमाफीचे पैसे देण्यासाठीच आपल्या गावांत आले असल्याची भावना त्यांच्या मनात होती. त्या आशेने मुख्यमंत्र्यांच भाषण ऐकायला थांबल्या.

आम्ही पुढे गेल्यावर आम्हाला टिटवा गावात राहणारे ६० वर्षांचे अरूण मोरे भेटले. आम्ही त्यांनाही तेच प्रश्न विचारले. त्यावर ते म्हणाले, "मुख्यमंत्री नुसतीच आश्वासनं देतात. काय त्यांच रोज ऐकणार? आमची कर्जमाफी अजून झाली नाही. पिकविमा मिळाला नाही. आम्ही जेवढा पिकविमा भरला तेवढा तरी आम्हाला द्या..! किती दिवस आम्ही शेतकर्‍यांनी असच हालाखीत काढायचे?"

सभेत मात्र मुख्यमंत्री आमचं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, असं ओरडून सांगत होते. माईकमधून त्यांचा येणारा आवाज आसपास घुमत होता. सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूराची परिस्थिती गंभीर होत होती. ऐवढा पूर आलाय आणि मुख्यमंत्री राजकीय यात्रा करत फिरतायेत, अशा विरोधकांच्या टीकेच्या बातम्या येत होत्या.

मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा स्थगित केली आणि ते पूरग्रस्त भागात गेले. तुम्हाला इथं येण्यासाठी उशीर का झाला असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावेळी ते म्हणाले, "ज्या दिवशी पूरस्थिती गंभीर आहे हे मला लक्षात आलं तेव्हाच मी हेलिकॉप्टरने सांगलीत येण्याचा प्रयत्न केला पण हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी मला मिळाली नाही म्हणून उशीर झाला."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)