शिवसेना युती करेल असा प्रशांत किशोर यांनी स्पष्ट संकेत दिला आहे का?

शिवसेना-भाजप युती होईल की नाही, हा सस्पेन्स शिवसेनेने कायम ठेवला असला तरी आज घडलेल्या एका घटनेमुळे युतीची चर्चा कोणत्या दिशेने चालली आहे, याचं उत्तर मिळालं. जनता दल (युनायटेड)चे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि आम्ही NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)चे सदस्य म्हणून लोकसभेत एकत्र लढू, अशा आशयाचं ट्वीट केलं.

प्रशांत किशोर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे, "उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या पाहुणचाराबद्दल मी आभारी आहे. NDAचे सदस्य म्हणून महाराष्ट्रात आम्ही एकत्र लढू, अशी मला आशा आहे. त्यामुळे लोकसभा आणि नंतरच्या निवडणुकांमध्ये आम्हाला विजय मिळेल."

त्याआधी आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केलं होतं, "आज दुपारच्या जेवणासाठी आमच्याकडे विशेष अतिथी होते. त्यांच्यासोबत चांगली चर्चाही झाली,"

प्रशांत किशोर सध्या जदयूमध्ये नितीश कुमार यांच्यानंतर दोन नंबरचे महत्त्वाचे नेते आहेत. प्रशांत हे निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी यापूर्वी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींसाठी काम केलं आहे.

प्रशांत किशोर यांची मध्यस्थी?

प्रशांत किशोर यांच्या ट्वीटवरून असं दिसतंय की ते NDAला भक्कम करण्यासाठी मुंबईत आले होते. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची निवडणुकीआधी युती व्हावी, यासाठी भाजप आग्रही आहे. पण शिवसेना अजूनही स्पष्टपणे होकार देत नसून भाजपवर टीका करत आहे.

त्यामुळे प्रशांत किशोर भाजपच्या वतीने मध्यस्थी करण्यासाठी आले होते का, असा प्रश्न उपस्थित होतो. हा प्रश्न विचारला असता शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, "आम्हाला मध्यस्थीसाठी कुणाची गरज नाही. शिवसेनेची ताकद उद्धव ठाकरे आहेत."

पुढे संजय राऊत असंही म्हणाले की "पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल. देशाचा पंतप्रधान ठरवण्यातही शिवसेनेची महत्त्वाची भूमिका असेल. महाराष्ट्रात शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत होती, यापुढेही राहील."

युती होण्यासाठी शिवसेना अधिक जागांची मागणी करणार, असे स्पष्ट संकेतच संजय राऊत यांनी दिले.

म्हणूनच भाजपने प्रशांत किशोरना पाठवलं असावं का?

याबद्दल बोलताना लोकमतच्या दिल्ली आवृत्तीचे संपादक सुरेश भटेवरा म्हणतात, "प्राथमिक चित्रानुसार भाजपने त्यांना पाठवलेलं असावं. प्रशांत किशोर आता राजकारणात आहेत. ते नितीश कुमार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रात युती व्हावी यासाठी मध्यस्थाची भूमिका निभावत असावेत."

पुढे ते म्हणतात, "शिवसेनेला भाजप काही बोलायला गेल्यास शिवसेना अंगावर येते, असा अनुभव आहे. विधानसभेमध्ये दोघांना समसमान जागा हव्यात, असं शिवसेनेला वाटतं. त्यांच्यासाठी ते महत्त्वाचे आहे. तर भाजपसमोर सेनेला निम्म्या जागा द्यायच्या झाल्यास कोणत्या द्यायच्यात हा प्रश्न आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)