सोशल - 'शिवसेना नवऱ्या (भाजप) सोबत रोज भांडणार पण घटस्फोट घेणार नाही'

विभाजनानंतर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरून केंद्र सरकार आणि आंध्र प्रदेशच्या सरकारमध्ये तणावाचे वातावरण होतं. यातून तोडगा निघू न शकल्यानं तेलुगू देसम पार्टीनं (TDP) काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

पण या आघाडीत TDP हा एकमेव पक्ष नाही. NDA मधले बहुतांश घटक पक्ष भाजपवर नाराज आहेत. एकेक करून सगळेच पक्ष बाहेर पडतील, अशी प्रतिक्रिया शिवसेनेनं दिली आहे. TDP ने जे केलं, ते अपेक्षितच होतं, असं शिवसेने खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

याच विधानावर आम्ही बीबीसी वाचकांना त्यांचं मत विचारलं होतं -

"तेलुगू देसम पक्षानं त्यांच्या सत्तेपेक्षा स्थानिक राजकारण आणि त्यांच्या प्रश्नाला महत्त्व दिलं. आपल्याकडे तसं होताना दिसत नाही. सेना नुसती दम देत बसली आहे... आज सोडणार, उद्या सोडणार. पण सत्य हे आहे की त्यांना स्थानिक लोकांपेक्षा त्यांना सत्ता महत्त्वाची आहे," असं ब्रिजेश जोशी म्हटलं आहे.

"प्रादेशिक पक्ष जगणं ही काळाची गरज आहे. विभिन्न संस्कृती असलेल्या खंडप्राय देशात प्रादेशिक प्रश्न राजकीय व्यासपीठावर प्रभावीपणे मांडले गेले तरच राष्ट्रीय पातळीवर त्यांचं गांभीर्य समजू शकेल. अन्यथा केंद्रीय सत्तेकडून हुकूमशाही पद्धतीने निर्णय लादले जाण्याचा धोका आहे. पक्ष सोयीसाठी एकत्र येतील, बाहेर पडतील, हे सुरूच राहील. पण प्रादेशिक पक्षांचे समूळ उच्चाटन करण्याचे प्रयत्न नक्कीच थांबले पाहिजेत," असं मत सचिन पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

"विचार केला तर ते थोडक्यात बरोबर आहे, कारण भाजपने ज्या राज्यात आपली सत्ता नव्हती तिथे प्रादेशिक पक्षांसोबत युती केली आणि तिथे आपली यंत्रणा उभी करून नंतर त्यांच्याच पाठीत लाथ घालून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवल्या. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे शिवसेना," असं शाहू जवानजल सांगतात.

जय कुलकर्णी म्हणतात, "शिवसेनेची गत नवऱ्यासोबत रोज भांडण करणाऱ्या बायकोसारखी झाली आहे. भांडण करणार पण घटस्फोट नाही घेणार."

"प्रादेशिक पक्षाचा शिडी म्हणून उपयोग करायचा आणि काम झालं की शिडी पायाने ढकलून द्यायची, असं भाजपचं आहे. त्यांनी ना राजधर्म पाळला, ना युतीधर्म पाळत आहेत. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, हेच खरं," असं मत दादाराव तायडे यांनी व्यक्त केलं आहे.

तर "शिवसेना हुशार पार्टी आहे. निवडणुकींच्या वेळी वेगळे लढून सरकारविरोधी मत मिळवतात आणि नंतर त्याच सरकारमध्ये शामिल होतात," असं मोनीश जोशी सांगतात.

"लोकांना विकास करायचा असेल तर ते एकत्र राहतील, नाहीतर वेगळे राहतील," असं मत राजेश लोके यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या कुंचल्यातून या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे -

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)