देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला प्रत्युत्तर?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्या `जन आशीर्वाद` यात्रेचा दुसरा टप्पा मराठवाड्यात सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची `महाजनादेश` यात्रा गुरुवारी विदर्भातून सुरू होत आहे.

शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आणलं जात असताना त्याच वेळेस सत्ताधारी युतीतल्या या दोन वेगवेगळ्या यात्रांनी महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापणार आहे.

संपूर्ण ऑगस्ट महिन्यात चार टप्प्यांमध्ये मुख्यमंत्री 32 जिल्ह्यांमधून ही यात्रा करणार आहेत. यादरम्यान ते भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा हिशोब जनतेला देणार असल्याचा दावा भाजपने केला आहे.

अमरावती जिल्ह्यातल्या तुकडोजी महाराजांची कर्मभूमी म्हणून ओळख असलेल्या मोझरीमधून फडणवीसांची `महाजनादेश` यात्रा आरंभ होईल आणि तिचा समारोप 31 ऑगस्टला नाशिकमध्ये होईल.

1 ते 9 ऑगस्ट या पहिल्या टप्प्यात ते 14 जिल्हे आणि 57 विधानसभा मतदारसंघांतून 1,639 किलोमीटरचा प्रवास करतील. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असे वेगवेगळे टप्पे करत एकूण 150 मतदारसंघांमध्ये भाजपची ही यात्रा पोहोचणार आहे.

छोट्या आणि मोठ्या सभा करत प्रत्येक जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन करण्याची भाजपाची तयारी आहे. तर यात्रारंभ तसंच समारोपासाठी भाजपचे सर्व मंत्री हजर राहतील, असं भाजपनं म्हटलं आहे.

अर्थात या यात्रेअगोदर वातावरणनिर्मिती करण्याची भाजपची रणनीती होतीच. म्हणूनच ही 'महाजनादेश यात्रा' सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच फडणवीसांच्या उपस्थितीतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांनी भाजपप्रवेश केला. यात शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक, वैभव पिचड, मधुकरराव पिचड, चित्रा वाघ, कालिदास कोलंबकर अशा आमदार आणि नेत्यांच्या समावेश होता.

चर्चा अशीही आहे की यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर आणखी काही नेते भाजपात येणार आहेत. त्यामुळेच चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन यांच्यासारखे मंत्री अजूनही 'काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक खासदार आपल्या संपर्कात' असल्याची विधानं करत आहेत.

मुख्यमंत्र्याच्या खुर्चीला यात्रेचे पाय

देवेंद्र फडणवीस हे या जनादेश यात्रेद्वारे महाराष्ट्राची निवडणूक पूर्णपणे स्वत:भोवती केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही राजकीय वर्तुळांमध्ये म्हटलं जात आहे.

ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत 'ते विरुद्ध राहुल गांधी' किंवा 'ते विरुद्ध देशातील इतर सर्व नेते' असं चित्र निर्माण केलं होतं, त्याच प्रकारचं चित्र फडणवीस महाराष्ट्रा विधानसभेच्या निवडणुकीसाठी करू पाहतील.

तर विरोधी पक्षांकडे पाहिल्यास मुख्यमंत्रिपदासाठी कुणीच कुणाचंही नाव अद्याप घेतलेलं नाहीये. विरोधी पक्षांमध्ये अनेक जण भाजपकडे किंवा शिवसेनेत जात आहेत. त्याच वेळेस जे नेते आघाडीकडे उरले आहेत, त्यांच्यातही अनेक गट असल्यानं काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतर्फे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता नाही.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार म्हणून भाजपनं यापूर्वीही अनेकदा सांगितलं आहे. नरेंद्र मोदींनी त्यांच्या सभांमध्ये सांगितलंय आणि राज्यातल्या स्थानिक नेत्यांनी सांगितलंय की ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल. ते अधिकृतरीत्या जाहीर झालं तर प्रश्नच नाही, पण जर तसं झालं नाही तरीसुद्धा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला मुख्यमंत्री म्हणून त्यांची उमेदवारी निश्चित असेलच.

मात्र शिवसेना आणि भाजप यांच्यात लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी युती झाल्यानंतरही मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. भाजप अध्यक्ष अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात तेव्हा नेमकं काय ठरलं होतं, हे बाहेर माहीत नसलं तरीसुद्धा भविष्यात कदाचित युतीमध्ये यामुळे बेबनाव होऊ शकतो. त्यामुळेच निवडणुकीअगोदरच मुख्यमंत्रिपदावर दावेदारी सांगण्यासाठी या रथयात्रेचा फायदा भाजपला आणि फडणवीसांना होऊ शकतो.

दुसरीकडे शिवसेनेनेसुद्धा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 'जन आशीर्वाद यात्रा' सुरू केली आहे. "शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळालं तर त्या पदावर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेच असावेत, अशी पक्षासह लोकभावना आहे. ते महाराष्ट्रात सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत," असं संजय राऊत यांनी आधीच म्हणाले आहेत.

त्यामुळे या दोन्ही यात्रांनंतर नेमकं काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

या यात्रेकडे आणखी एका प्रकारे पाहिलं जात आहे, ते म्हणजे भाजपअंतर्गत असलेली स्पर्धा. पाच वर्षं कार्यकाळ पूर्ण करून फडणवीस यांचं एकमुखी नेतृत्व सिद्ध झालेलं असलं तरीसुद्धा पक्षात मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न बाळगणारे सुरुवातीपासूनच राहिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या कालखंडात मुख्यमंत्रिपदासाठी कुणी नवा दावेदार उभा होऊ नये, यासाठीही फडणवीसांसाठी ही जनादेश यात्रा महत्त्वाची ठरेल.

तसं पाहिल्यास यात्रा आणि भाजप हे समीकरण काही नवीन नाही. अगदी लालकृष्ण अडवाणींच्या रामजन्मभूमी आंदोलनाच्या रथयात्रेपासून ते नरेंद्र मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी काढलेल्या यात्रांपर्यंत.

गेल्या वर्षभरात देशातल्या काही झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही तिथल्या मुख्यमंत्र्यांनी अशाच यात्रा काढल्या होत्या. त्यात भाजपाचे तीन मुख्यमंत्री होते - वसुंधरा राजे यांनी राजस्थानमध्ये, शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेशात तर रमणसिंह यांनी छत्तीसगढमध्ये.

मात्र या तीनही ठिकाणी भाजपचा पराभव झाला होता. नुकत्याच पार पडलेल्या आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांनीही राज्यभर पदयात्रा केली होती. त्यानंतर त्यांना मात्र बहुमत मिळालं.

महाराष्ट्रात मात्र चित्र जरा वेगळं आहे. लोकसभेतल्या विजयानंतर विरोधी पक्षांची महाराष्ट्रात सुद्धा झालेली वाताहत, पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सिद्ध झालेलं नेतृत्व आणि त्यासोबतच निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांचे महत्त्वाचे नेते भाजप आणि सेनेत येणं, या पार्श्वभूमीवर या यात्रेच्या आधारे निर्णायक आघाडी घेण्याचा फडणवीसांचा प्रयत्न दिसतोय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)