एकनाथ खडसेंनी भाजप सोडल्याचा देवेंद्र फडणवीसांना फायदा होणार की तोटा?

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

यापूर्वी भाजपचा राजीनामा देताना खडसे यांनी म्हटलं, "बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे या माझ्या वक्तव्यानंतर जे घडले ते सगळ्यांनी पाहिलं." यातून त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

आपल्या राजीनाम्यासाठी सर्वस्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असंही खडसे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिलं . ते म्हणाले, "एकनाथ खडसे जे सांगत आहेत, ते अर्धसत्य आहे. त्यावेळी मी आता बोलणार नाही. त्यांच्या माझ्याबद्दल काही तक्रारी होत्या, त्या त्यांनी वरिष्ठांकडे मांडायला हव्या होत्या. असो...अशावेळी कोणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, त्यांनी मला ठरवलं."

गेल्या काही काळात एकनाथ खडसेंनी सातत्याने जाहीरपणे देवेंद्र फडणवीसांवर उघडपणे टीका केली आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला फडणवीसांमुळे पक्ष सोडावा लागला हे चित्र निर्माण करण्यातएकनाथ खडसे यांना यश आल्याचे दिसून येते.

एकनाथ खडसे चार दशकांपासून भाजपमध्ये सक्रीय होते. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांसारख्या नेत्यांसोबत त्यांचे भाजपच्या पक्षवाढीत मोठे योगदान आहे.

सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 पासून एकनाथ खडसेंचे नाराजी सत्र सुरू झाले.

खडसेंनी पक्ष सोडताना देवेंद्र फडणवीसांना यासाठी जबाबदार ठरवल्याने येत्या काळात महाराष्ट्र भाजपमध्ये काही बदल होतील का? विशेषत: राज्याच्या भाजपचा चेहरा असलेल्या फडणवीसांच्या प्रतिमेवर याचा कसा परिणाम होईल? आणि याचा देवेंद्र फडणवीसांना फायदा होईल की तोटा? या सर्व प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत.

खडसेंनी सोचिठ्ठी दिल्याने फडणवीसांना दिलासा?

2014 मध्ये मुख्यमंत्री पदावरून नाराज झालेले एकनाथ खडसे गेल्या काही काळापासून सतत देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका करत आहेत.

यावरून पक्ष त्यांच्यावर कारवाई का करत नाही असेही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

प्रदेश भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकांना महत्त्वाचे स्थान असल्याने केंद्रीय नेतृत्त्वानेही वेळोवेळी खडसेंना डावलल्याचे समोर आले.

पक्षांतर्गत सुरू असलेला कलह एकनाथ खडसेंच्या निमित्ताने बाहेर पडल्याने देवेंद्र फडणवीसांना दिलासा मिळाला आहे का?

याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार संजीव शिवडेकर असं सांगतात, "सतत टीका आणि अन्याय झालाय अशी तक्रार करणारा नेता पक्षातून बाहेर पडतो तेव्हा नेतृत्त्वाचाही मार्ग मोकळा होत असतो. त्याचीटीम अधिक भक्कमपणे उभी करता येते."

एकनाथ खडसे यांच्यासारखी अनेक उदाहरणं महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. एकेकाळी शरद पवार यांनीही काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. तर शिवसेनेसाठी मोठंयोगदान देणारे छगन भूजबळ हे सुद्धा नाराज होऊनच शिवसेनेतून बाहेर पडले होते.

एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर कायम त्यांच्यावर कसा अन्याय झाला याबबात टीका केली आहे. ही निर्णय प्रक्रिया केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या हातात नव्हती. त्यामुळे केंद्रीय नेतृत्त्व खडसे गेल्यामुळेफडणवीसांवर नाराज होईल अशी शक्यता सध्यातरी दिसत नाही.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्याबाबतही पक्षाअंतर्गत नाराजी होती. भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांच्यावर नाराज आहेत असंही चित्र निर्माण झाले होते.

"त्यामुळे जोपर्यंत यश हातात आहे आणि घेतलेले निर्णय योग्य सिद्ध होत आहेत तोपर्यंत फडणवसींना काही धक्का नाही. जोपर्यंत चलती आहे तोपर्यंत सर्वकाही आलबेल असेल." असंही संजीव शिवडेकरसांगतात.

देवेंद्र फडणवीसांसमोर आता मोठी आव्हानं?

आता खडसे पक्षातून गेल्यानंतर फडणवीस विरुद्ध खडसे ही लढाई संपली आहे का? तर याचे उत्तर नाही असे आहे.

महाविकास आघाडी भाजपला अडचणीत आणण्यासाठी वेळोवेळी एकनाथ खडसेंचा वापर करताना दिसेल. खडसेंचा फडणवीसांवर विशेष राग असल्याने बहुतांश टीका ही फडणवीसांवरच होईल यात शंकानाही.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भाजप महाराष्ट्राचा चेहरा आहेत. तसेच ते महाराष्ट्र भाजपचे नेतृत्त्व देखील आहेत.

गेल्या दोन ते तीन वर्षातली पार्श्वभूमी पाहिली तर पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासारखे नेते आपल्यावर अन्याय झाला अशी तक्रार करत आहेत.

येत्या काळात देवेंद्र फडणवीसांसमोर अधिक मोठी आव्हानं असणार आहेत.

देवेंद्र फडणवीसांसमोर सगळ्यांत मोठे आव्हान आहे ते म्हणजे महाराष्ट्र भाजपची प्रतिमा कायम राखण्याचे आणि पुन्हा सत्तेत येण्याचे.

2014 मध्ये अनेक बहुजन नेत्यांना डावलून केंद्रीय नेतृत्त्वाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले.

2019 मध्ये बहुमत असूनही भाजपची सत्ता महाराष्ट्रात येऊ शकली नाही. शिवाय, पंकजा मुंडे, विनोद तावडे, खडसे यांच्यासारखे बहुजन नेते नाराज राहिल्याने पक्षांतर्गत कुरबुरी वाढत गेल्या.

एकनाथ खडसे तब्बल 40 वर्षं भाजपमध्ये कार्यरत होते. त्यांनी भाजपचा चढ-उतार अनुभवला आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र भाजपमध्ये कसे बदल झाले हे सुद्धा त्यांनी जवळून पाहीले आहे.

याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी म्हणतात, "भाजप हा 'शेठजी,भटजी' यांचा पक्ष आहे अशी एक प्रतिमा निर्माण केली गेली. हेच भाजपचे सत्य आहे हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न खडसे करतआहेत."

एकनाथ खडसेंनी पक्ष सोडल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहीजे हे वक्तव्य केल्याने सर्वकाही घडले अशी प्रतिक्रिया दिली आहे.

जातीचे हे राजकारण एकनाथ खडसे उभे करू शकले तर येत्या काळात देवेंद्र फडणवीसांठी अडचणीचे ठरू शकते. "केंद्रीय नेतृत्त्वाचा फडणवीसांवर कितीही विश्वास असला तरी एका नेत्यामुळे एखादा मोठाधोका भाजप पत्करणार नाही. नेतृत्त्व हे सर्वांना पुढे घेऊन जाणारे असावे लागते."

भाजपचे माजी मंत्री आणि नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया देताना भाजपला चिंतन करण्याची गरज आहे असं म्हटलं आहे.

ते म्हणाले, "खडसेंसारख्या नेत्याने पक्ष सोडला हे ऐकून धक्का बसला. त्यांचे मोठे योगदान आहे. हे पक्षासाठी योग्य नाही."

त्यामुळे आपण घेतलेले निर्णय योग्य आहेत हे सिद्ध करण्याची कसोटी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असेल.

उत्तर महाराष्ट्रातही भाजपची संघटनात्मक ताकद कमी होऊ शकते.

जळगाव जिल्ह्यातील लेवा पाटील पट्ट्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलेले नव्हते. एकनाथ खडसेंच्या निमित्ताने राष्ट्रवादीला संघटानात्मक बळ आणि जनाधार मिळू शकतो.

स्थानिक समिकरणं बदलल्यामुळे भाजपला विधानसभा आणि लोकसभा निडवणुकीतही याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तेव्हा उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देवेंद्र फडणवीस आता गिरीश महाजन यांच्याकडे सोपवू शकतात. पण स्थानिक कार्यकर्ते खडसेंना कल देणार की भाजपमध्येच राहणार हा मोठा प्रश्न आहे.

जळगाव जिल्ह्यात युती असतानाही एकनाथ खडसेंनी शिवसेनेला कधीही मदत केली नाही किंबहुना त्रासच दिला असे आरोप शिवसेनेचे स्थानिक आमदार करत असतात.

आता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांसाठी नवी आव्हानं असणार आहेत.

एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमके काय बिनसले?

2014 मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आली. खरं तर कोणत्याही ज्येष्ठ नेत्यासाठी सत्ता येणं ही जमेची बाब. पण खडसेंच्या बाबतीत विपरीत घडले असे म्हणावे लागेल.

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर एकनाथ खडसे शपथविधी सोहळ्याला येण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्री पदासाठी त्यांची दखल न घेतल्याने ते नाराज होते असे समजले जाते.

खडसेंनी शपथविधीला हजेरी लावावी यासाठी त्यांची नाराजी दूर करण्यात आली. ते महसूल मंत्री झाल्यानंतर अगदी दोनच वर्षात त्यांना राजीनामा द्यावा लागला.

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले आणि गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

राजीनाम्यानंतर एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये होत असलेली कोंडी त्यांनी अनेकवेळा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर जाहीर टीका केली होती. ते म्हणाले, "आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का आहे," असा प्रश्न खडसेंनी विचारला होता.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी पहिल्यांदाच खडसेंवर प्रतिक्रिया दिली होती.

ते म्हणाले, "माझ्यामध्ये फार संयम आहे. मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही. खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही."

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना मार्गदर्शक भूमिकेत येण्याचाही सल्ला दिला होता. या वक्तव्यावरही खडसेंनी नाराजी व्यक्त केली होती.

2016 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून द्यावा लागणारा राजीनामा असेल, विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारणे, विधान परिषदेसाठीही डावलणे, मुलगी रोहिणी खडसेंचा विधानसभा निवडणुकीतला पराभव अशा सर्वच कारणांमुळे एकनाथ खडसेभाजपमध्ये एकाकी पडले.

आता येत्या काळात महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंनासोबत घेऊन विरोधकांवर कसा निशाणा साधणार हे पहाणं महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)