You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : भारताच्या सुधारलेल्या आलेखाचा अर्थ काय?
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कोरोना व्हायरसची साथ पसरून आता सहा महिन्यांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. जेव्हापासून कोरोनाबाबत वाचलं आणि लिहिलं जातं, तेव्हा जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीवर साहजिकच एक नजर मारत असते.
बुधवारी (23 सप्टेंबर) युनिव्हर्सिटीची वेबसाईट उघडली. त्यात भारताचा कोरोना ग्राफ थोडा वेगळा दिसून आला. यामध्ये आलेख खाली येत असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं.
रोज 70-80 हजार रुग्णसंख्या वाढत असताना हा ग्राफ पाहून मला आश्चर्य वाटलं. याचा अर्थ भारताचा कोरोना ग्राफ सुधारतोय का?
पण याचं उत्तर वाटतं तितकं सोपं नाही.
जॉन्स हॉपकिन्सची आकडेवारी गेल्या सात दिवसांची सरासरी दाखवते. या आलेखात गेल्या सात दिवसांतील नवे कोरोना रुग्ण दर्शवण्यात येतात.
कोरोना आलेख खाली जाण्याचा अर्थ काय?
पुण्याच्या सीजी पंडित नॅशनल चेअरशी संबंधित रमण गंगाखेडकर सांगतात, "आलेख खाली येण्याचा अर्थ फक्त नवीन रुग्ण घटणं हा आहे. पण कोरोनाचा धोका कमी झाला, असा याचा अर्थ काढण्यात येऊ नये."
कमी चाचण्या केल्यामुळेसुद्धा रुग्ण कमी आढळून येऊ शकतात. रुग्णांचा शोध योग्य प्रकारे झाला नाही, हेसुद्धा या मागचं कारण असू शकतं.
भारतात 22 सप्टेंबरपर्यंत सुमारे 6 कोटी 62 लाख चाचण्या झाल्या आहेत. ICMR च्या माहितीनुसार, गेल्या एका दिवसात साडेनऊ लाख चाचण्या झाल्या. यामध्ये किती RT-PCR आणि किती अँटीजन टेस्ट आहेत, याचा उल्लेख नाही.
डॉ. गंगाखेडकर यांच्या मते, "किती लोकांची चाचणी झाली यापेक्षाही ती कोणत्या प्रकारे झाली याला महत्त्व आहे. पूर्वी किती रॅपिड टेस्ट होत होत्या आणि आता हा आकडा किती आहे, तेसुद्धा पाहावं लागेल."
चाचणीच्या आधारावर निष्कर्ष काढू नये
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्णाची RT-PCR टेस्ट झाली पाहिजे. विशेषतः लक्षणं दिसून आलेल्या रुग्णांची ही टेस्ट होणं गरजेचं आहे. तरच कोरोनाची परिस्थिती लक्षात येऊ शकेल.
डॉ. गंगाखेडकर यांनी ही गोष्ट उदाहरण देऊन समजावून सांगितली.
समजा, एखाद्या राज्यात 10 टक्के RT-PCR टेस्ट होत आहेत आणि 90 टक्के रॅपिड टेस्ट होत आहे.
नंतर ही संख्या अर्धी होत जाते. पण सगळ्या टेस्ट RT-PCR होत असल्यास ही संख्या कमी असूनही त्यातून अचूक आकडेवारी प्राप्त होईल. त्यामुळे जर RT-PCR चाचण्या कमी होत असतील, तर ती चिंतेची बाब आहे.
RT-PCR टेस्ट हीच कोरोना चाचणीसाठी सर्वाधिक अचूक मानली जाते.
गेल्या दोन आठवड्यातील कोरोना चाचण्यांची आकडेवारी इतकी जास्तसुद्धा कमी झालेली नाही. 16 सप्टेंबरला भारतात सुमारे 10 लाख 9 हजार चाचण्या झाल्या. तर 23 सप्टेंबरला 9 लाख 95 हजार चाचण्या झाल्या आहेत.
कोरोनाचा रिकव्हरी रेट म्हणजे आपलं यश असल्याचं भारत सरकार सांगत आहे. पण चाचणी कमी झाल्यामुळेच रिकव्हरी रेट वाढतो, हे लक्षात घ्यावं लागेल.
मंगळवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबाबतचे सगळे आरोप फेटाळून लावले.
कोरोनाबाबत माहितीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, "केंद्र सरकार चाचण्यांचं दैनिक, साप्ताहिक आणि पाक्षिक विश्लेषण करत आहे. याशिवाय राज्यांच्या आकड्यांवरही आमची नजर असते. यामध्ये चाचण्या कमी झाल्याचं कुठेही आढळून आलं नाही.
भारताचा ग्राफ बिघडवणारी 7 राज्य
भारतात सर्वांत जास्त प्रादुर्भाव झालेल्या सात राज्यांचा विचार केला, तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांत दिल्लीशिवाय इतर राज्यांत चाचण्या कमी झाल्याचं आढळून आलंय.
ग्रामीण भागात कोरोनाचा कहर
सध्या भारतात ग्रामीण भागात कोरोना मोठ्या प्रमाणात पसरत चालला आहे.
पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे डॉ. गिरधर बाबू यांनी याबाबत चिंता व्यक्त केली.
"कोरोनाच्या आलेखात एखाद्या दिवशी घट पाहायला मिळाली, याचा विशेष अर्थ होत नाही. सलग काही दिवस अशीच घट होत असेल, तर आलेख सुधारला असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला चाचण्यांची संख्या वाढवण्यासोबतच पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध योग्य प्रकारे घेणं आवश्यक आहे," असं डॉ. बाबू म्हणाले.
सध्या सरकारला ग्रामीण भागातील परिस्थितीबाबत जास्त काळजी आहे.
नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल सांगतात, "100 पेक्षा जास्त बेडची संख्या असलेल्या जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन महिन्यांच्या इंटर्नशीपला पाठवण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे डॉक्टरांची कमतरता भासणार नाही. शिवाय विद्यार्थ्यांनाही चांगला अनुभव मिळेल."
ग्रामीण भागात कोरोना कशा प्रकारे हातपाय पसरत आहे, याची माहिती आपल्याला सिरो सर्व्हेमधून मिळू शकेल. दुसऱ्या सिरो सर्व्हेचे निकाल लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील, असं सरकारने म्हटलं आहे.
राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या दुसऱ्या सिरो सर्व्हेमध्ये शहरी भागासह ग्रामीण भागातही सर्वेक्षण करण्यात आल्याचं डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितलं.
गेल्या चार दिवसांपासून बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे हे आपलं यशच असल्याचं सरकारने पुन्हा एकदा म्हटलं. तसंच 7 जुलैपर्यंत आपण 1 कोटी चाचण्या केल्या होत्या. त्यानंतर 22 सप्टेंबरपर्यंत 6 कोटींपेक्षाही जास्त चाचण्या भारताने केल्या. म्हणजेच अडीच महिन्यात सहापट जास्त चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सरकारने दिली. ही चांगली कामगिरी असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
दुसरीकडे, येणारा काळ सण-उत्सवांचा आहे. या काळात कोरोना जास्त प्रमाणात पसरू शकतो, त्यामुळे लोकांनी जास्त सावध राहण्याची गरज असल्याचं व्ही. के. पॉल यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)