You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस: नेमकी कुठली लस यशस्वी होईल हे निश्चितपणे सांगता येणार नाही - WHO
"आम्हाला अजूनही शाश्वती नाही की सध्या विकसित होत असलेल्या लसींपैकी कोणतीही एक लस यशस्वी होईलच. जितक्या जास्त वेगवेगळ्या लसींची चाचणी होईल, तितकीच एक सुरक्षित आणि प्रभावी लस सापडण्याची शक्यता वाढेल," असं जागतिक आरोग्य संघटना (WHO)चे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅडहॅनम घेब्रेयेसुस यांनी सोमवारी (21 सप्टेंबर) एका फेसबुक लाईव्हदरम्यान सांगितलं.
कोरोना व्हायरसचे जगभरात 3 कोटींपेक्षा जास्त रुग्ण आणि जवळजवळ 9.65 लाख मृत्यू झालेले असताना कोरोनातून बाहेर पडण्यासाठी काय करण्याची गरज आहे यावर डॉ. टेड्रोस यांनी भाष्य केलं.
संयुक्त राष्ट्रांच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना त्यांनी सुरक्षा परिषदेतील सर्व देशांसाठी तीन मुख्य संदेश दिले.
पहिला म्हणजे या जागतिक आरोग्य संकटामुळे आपण निर्धारित केलेल्या शाश्वत विकासाची उद्दिष्ट गाठण्यापासून दूर जायला नको. उलट, आपण त्या दिशेने आपले प्रयत्न द्विगुणित करायला हवेत.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
दुसरा म्हणजे आपण भविष्यात अशा प्रकारच्या जागतिक आरोग्य संकटासाठी अधिक सक्षमतेने तयार राहायला हवं.
तिसरा म्हणजे आपण रोगनिदान, उपचार आणि लसीकरण समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत.
"आम्ही सर्व राष्ट्रांना आव्हान करतो की, त्यांनी सर्व त्या उपाययोजना करून संसर्ग रोखण्याचे, लोकांचे जीव वाचवण्याचे प्रयत्न करावेत," असं डॉ. डॉ. घेब्रेयेसुस यांनी म्हटलं.
जगभरात लसींच्या कामाला वेग मिळत असून 2021 पर्यंत दोन अब्ज लशी उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.
त्यांनी म्हटलं की, "लस कुणाकुणाला द्यायची, कोणत्या प्राधान्यक्रमाने द्यायची, लसीच्या चाचणींचे नियम काय आणि त्यांचं पालन होत आहे की नाही, या सर्व गोष्टींची मार्गदर्शक तत्त्वं WHOने आधीच तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी COVAX ही एक जागतिक केंद्रीय यंत्रणा स्थापन केली आहे.
"जगभरात लसींवर सुरू असलेलं संशोधन पाहता COVAX मुळे सर्वांना सर्व प्रकारच्या लसी उपलब्ध होऊ शकतील. सर्व देशांना एकाच वेळी योग्य प्रमाणात लस उपलब्ध होईल, हा त्याचा उद्देश आहे. तसंच ज्यांना याची सर्वांत जास्त गरज आहे, उदाहरणार्थ- आरोग्य सेवक आणि अधिकारी, ज्येष्ठ नागरिक यांना लस आधी लस देणं हा उद्देश आहे," असं डॉ. टेड्रोस यांनी म्हटलं.
"पण आम्हाला याची अजूनही शाश्वती नाही की, सध्या विकसित होत असलेल्यांपैकी कोणती एक लस काम करेलच. जितक्या जास्त लसींची चाचणी होईल, तितकीच एक सुरक्षित आणि प्रभावी लस सापडण्याची शक्यता बळावेल," ही बाब त्यांनी ठळकपणे सांगितली.
भारतातील लसींच्या बाबतीतही WHO सकारात्मक असल्याचे मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या. जागतिक लस पुरवठा साखळीत भारत सर्वांत मोलाची भूमिका बजावणार असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
"जगभरात सध्या 200च्या आसपास लस निर्मिती आणि चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहेत. लस संशोधनाचा इतिहास पाहता काही यशस्वी होतील आणि काही नाही हे आपल्याला ठाऊक आहेच," असं डॉ. टेड्रोस यांनी म्हटलं.
"त्यामुळेच COVAX विविध राष्ट्रांना मदत करतेय जेणेकरून ते लसींच्या चाचण्यांचा धोका अधिकाधिक पत्करू शकतील आणि त्यांच्या जनतेला ती लस लवकरात लवकर उपलब्ध होईल," असं डॉ. टेड्रोस यांनी म्हटलं.
त्यांना विविध देशांमधल्या राजकीय नेत्यांना आवाहन केलं की, "या संकटाच्या घडीला शर्यत नाही तर एकत्रित काम करण्याची गरज आहे. त्यांनी यापूर्वीही लस निर्मितीसाठी राष्ट्रवादाचा वापर चुकीचा असल्याचं भाष्य काही देशांच्या भूमिकांवर टीका करताना केलं होतं.
"ही कुठलीही शर्यत नाही. ही एकत्रित काम करण्याची वेळ आहे. ही काही कल्याणकारी योजना नाही, पण प्रत्येक देशाच्या हिताची आहे. त्यामुळे आपण एकतर सगळे एकत्र बुडू किंवा एकत्र पोहू आणि तरू.
"हे आरोग्य संकट संपवण्याचा आणि अर्थचक्र पुन्हा फिरवण्याचा सर्वांत वेगवान मार्ग म्हणजे, सर्व देशांमधल्या काही लोकांपर्यंत लस पोहोचवणे, काही देशांमधल्या सर्व लोकांपर्यंत नाही," असंही डॉ. टेड्रोस यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)