कोरोना लस : ऑक्सफर्ड लशीची UK नंतर भारतातील चाचणी स्थगित, सिरम इनस्टिट्युटने केलं स्पष्ट

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आशेचा किरण म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकडे पाहिलं जात होतं. मात्र अॅस्ट्राझेन्का आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं आपल्या लसीची मानवी चाचणी सध्या थांबवली आहे. भारतातील चाचणीही आता थांबवण्यात आली आहे.

मानवी चाचणीमध्ये सहभागी झालेली एक व्यक्ती आजारी पडल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला.

अॅस्ट्राझेन्काच्या मते ही स्थगिती 'रुटिन' आहे. पण चाचणीत सहभागी व्यक्तीच्या आजारपणाबद्दल अजून काहीही कळले नसल्यामुळे स्थगिती द्यावी लागली आहे.

अॅस्ट्राझेन्कानं यूकेमधली ट्रायल थांबवल्यानंतर सिरम इनस्टिट्युट ऑफ इंडियानंही आता भारतातील ट्रायल थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

आधी भारतातील लशीची ट्रायल सुरूच ठेवणार असल्याचं सिरम इनस्टिट्युटनं स्पष्ट केलं होतं. पण आता मात्र ही ट्रायल थांबवण्यात आली आहे.

अॅस्ट्राझेन्कानं त्यांची ट्रायल सुरू केल्यानंतर भारतात पुन्हा ही ट्रायल सुरू होणार असल्याचं सिरमकडूम सांगण्यात आलं आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीच्या चाचणीकडे सगळ्या जगाचे डोळे लागले आहेत. लसीच्या चाचणीचा पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वीपणे पार पडल्यामुळे ही लस सर्वांत आधी उपलब्ध होईल, असा अंदाज वर्तवला जात होता.

या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी युकेसह अमेरिका, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत जवळपास 30 हजार लोक सहभागी झाले आहेत. कोणत्याही लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये हजारो लोक सहभागी होतात आणि ही चाचणी काही वर्षेही चालू शकते.

या लसीच्या जगभरातील चाचण्या थांबवण्यात आल्या असल्याची माहिती बीबीसीचे मेडिकल एडिटर फर्गस वॉल्श यांनी दिली आहे. सुरक्षा मानकांची तपासणी करण्यासाठी आता स्वतंत्रपणे चौकशी होईल आणि त्यानंतर चाचणी पुन्हा सुरू करायची की नाही याचा निर्णय नियामकांकडून घेतला जाईल, असं वॉल्श यांनी सांगितलं.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या चाचणीत व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता असतेच. मात्र ही गोष्ट काळजीपूर्वक हाताळण्यासाठी स्वतंत्ररित्या पुनर्परीक्षणाची गरज आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीची चाचणी थांबवण्याची ही दुसरी वेळ आहे. लसीच्या चाचण्यांमध्ये असं घडू शकतं. जेव्हा चाचणीमध्ये सहभागी झालेल्या कोणत्याही व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येतं आणि त्याच्या आजाराचं कारण तातडीनं लक्षात येत नाही, तेव्हा चाचणी थांबविण्यात येते.

काही दिवसांत चाचणी पुन्हा सुरू होईल, असं सांगितलं जात आहे.

स्टॅट न्यूज या आरोग्यविषयक वेबसाइटनं पहिल्यांदा ही बातमी दिली. त्यांनी म्हटलं आहे की, युकेमध्ये चाचणीत सहभागी झालेल्यांना जी रिअॅक्शन आली आहे, त्याबद्दल अजून काही कळलं नाही. पण ते लवकरच बरे होतील, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

कोरोनाची लस कोणत्या टप्प्यावर?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं होतं की, अमेरिकेत 3 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या आधी देशात लस उपलब्ध व्हावी अशी आपली इच्छा आहे. पण त्यांच्या या विधानावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. लस मिळवण्याच्या घाईमुळे सुरक्षेपेक्षाही राजकीय फायद्यातोट्याला प्राधान्य दिलं जाईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली.

मंगळवारी (8 सप्टेंबर) कोव्हिड-19 ची लस विकसित करत असलेल्या नऊ जणांना लोकांना सुरक्षिततेची हमी देण्यासाठी 'ऐतिहासिक प्रतिज्ञा' घ्यावी लागली. लस शोधताना आपण शास्त्रीय आणि नैतिक मानकांचं काटेकोर पालन करू असं आश्वासन लस विकसित करणाऱ्यांनी दिलं.

या नऊ कंपन्यांपैकी एक आहे अॅस्ट्राझेन्का. त्यांनी या प्रतिज्ञापत्रावर सही केली आहे. क्लिनिकल चाचणीचे तिन्ही टप्पे पार पडल्यानंतर नियामकांच्या मान्यतेसाठी अप्लाय करू असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनस बायोएनटेक, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन, फिझर, मर्क, मॉडर्ना, सनोफी आणि नोवावॅक्स या दिग्गज कंपन्यांनीही प्रतिज्ञापत्रावर सही केलीये.

लस दिल्या जाणाऱ्या व्यक्तींची सुरक्षा आणि आरोग्य हेच आमचे प्राधान्य असेल, असं या सर्वांनी म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, जगभरात जवळपास 180 जण लशीची चाचणी घेत आहेत, पण त्यांपैकी कोणी अजूनही क्लिनिकल ट्रायलचा टप्पा पूर्ण केला नाहीये.

लशीच्या सुरक्षिततेची चाचणी घेण्यास वेळ लागत असल्यामुळे त्यासंबंधीची कार्यक्षमता आणि सुरक्षेसंबंधीची मार्गदर्शक तत्त्वं या वर्षाखेरीपर्यंत मान्य होतीलच असे नाही, असं WHO नं म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय औषध उत्पादक संघटनेचे महासंचालक थॉमस कुनी यांनीही अशाच प्रकारची भूमिका मांडली आहे. ज्या नऊ कंपन्यानी लशीच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या प्रतिज्ञेवर सही केलीये, त्या कंपन्यांचं प्रतिनिधीत्व ही संघटना करते.

पण तरीही चीन आणि रशियानं काही जणांना देशांतर्गत तयार केलेली लस द्यायला सुरूवात केलीये. मात्र या लशी अजूनही क्लिनिकल ट्रायलच्याच टप्प्यात असल्याचं WHO नं म्हटलं आहे.

अमेरिकेतील नियामक संस्था, फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) नं कोरोना लशीच्या क्लिनिकल ट्रायलचा तिसरा टप्पा पूर्ण होण्याआधीच तिला मान्यता दिली जाईल, असे संकेत दिले होते.

मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी निवडणुकीपूर्वी लस उपलब्ध होईल, असं म्हटलं असलं तरी त्यांचे विरोधक, डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी ट्रंप यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ट्रंप शास्त्रज्ञांचं ऐकतील का आणि लस बाजारात आणण्यासाठी पारदर्शक प्रक्रिया अवलंबली जाईल का, अशी त्यांची शंका आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)