कोरोना लस: लशीच्या ह्युमन ट्रायलसाठी प्राण पणाला लावणारा 'हा' भारतीय कोण?

    • Author, सरोज सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मी काय करू शकतो? या प्रश्नाने मला भांडावून सोडलं होतं. मग एक दिवस बसल्या-बसल्या मनात विचार आला की मी माझ्या या शरीराने मदत करू शकतो. माझ्या मित्राने मला सांगितलं की ऑक्सफॉर्डमध्ये ट्रायल सुरू आहेत. त्यासाठी स्वयंसेवकांची गरज आहे आणि अशाप्रकारे मी ट्रायलसाठी नोंदणी केली."

लंडनहून बीबीसीला व्हीडिओ मुलाखत देताना दीपक पालीवाल सांगत होते.

दीपक पालीवाल यांचा जन्म जयपूरमधला. मात्र, सध्या ते लंडनला स्थायिक आहेत. दीपक पालीवाल त्या मोजक्या लोकांपैकी एक आहेत ज्यांनी स्वतःहून लसीच्या चाचणीसाठी नाव नोंदवलं आहे.

कोरोनावरची लस लवकरात लवकर यावी, अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. अमेरिका, ब्रिटन, भारत, चीन अशा सर्वच मोठ्या देशांमध्ये त्यासाठी संशोधनं सुरू आहेत. मात्र, कुठलीही नवीन लस बाजारात येण्याआधी तिची ह्युमन ट्रायल होते.

कोरोना विषाणूवरच्या लसीच्या ह्युमन ट्रायलमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल का? या प्रश्नाचं उत्तर बहुतेक जण 'नाही' असंच देतील.

लसीच्या ट्रायलसाठी माणसं शोधणं डॉक्टर आणि संशोधकांसाठीही अवघड असतं आणि म्हणूनच दीपकसारख्या लोकांची मदत कोरोनावरची लस शोधण्याच्या कार्यात मोलाची ठरते.

निर्णय घेणं किती अवघड होतं?

अनेकदा असं होतं की एखाद्या नाजूक क्षणी आपण निर्णय घेतो. मात्र, पुढे त्यावर ठाम राहू शकत नाही. दीपक यांनी मात्र स्वतःचा निर्णय बदलला नाही. ते ठाम राहिले. ते कसं?

या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात, "एप्रिल महिन्यातली गोष्ट आहे. 16 एप्रिलला मला पहिल्यांदा कळालं की मी या व्हॅक्सिन ट्रायलमध्ये सहभागी होऊ शकतो. मी माझ्या पत्नीला सांगितलं तेव्हा ती माझ्या निर्णयाच्या साफ विरोधात होती. भारतात असलेल्या माझ्या कुटुंबीयांना मी काहीही सांगितलं नाही. कारण ते माझ्या निर्णयाला विरोध करतील, हे तर उघडच होतं. त्यामुळे मी माझ्या जवळच्या मित्रांनाच याबाबत सांगितलं."

"ऑक्सफोर्ड ट्रायल सेंटरकडून मला कळवण्यात आलं की पुढच्या चेकअपसाठी मला त्यांच्या सेंटरमध्ये जावं लागेल. लंडनमध्ये यासाठीचे पाच सेंटर्स आहेत. त्यापैकी एक असलेल्या जॉर्ज हॉस्पिटलमध्ये मी गेलो. 26 एप्रिल रोजी मी तिथे पोहोचलो. माझे सर्व पॅरामीटर्स तपासण्यात आले आणि ते सर्व नॉर्मल होते."

या व्हॅक्सिन ट्रायलसाठी ऑक्सफोर्डला 1000 माणसांची गरज होती. यात अमेरिकी, आफ्रिकी, आशियाई अशा सर्वच वंशाचे लोक हवे होते.

लसीची चाचणी यशस्वी झाली तर संपूर्ण जगभरात ती वापरता यावी, यासाठी हे गरजेचं असतं.

दीपक यांनी सांगितलं की ज्या दिवशी त्यांना लसीचा पहिला शॉर्ट घ्यायला जायचं होतं त्याच दिवशी त्यांना मेसेज आला की ट्रायल दरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे.

दीपक पुढे सांगत होते, "त्यानंतर माझ्या डोक्यात तोच एक विचार सुरू होता. मी हे काय करतोय. ही फेक न्यूज आहे की खरी, कळत नव्हतं. मी योग्य करतोय का, या संभ्रमात होतो. मात्र, शेवटी मी हॉस्पिटलमध्ये जायचा निर्णय घेतला. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यांनी मला बरेच व्हिडियो दाखवले आणि या प्रक्रियेशी संबंधित धोके कोणते असू शकतात, त्याचीही माहिती दिली. हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी सांगितलं की शेवटी लस म्हणजे एक केमिकल कंपाउंड असतं."

"मला सांगण्यात आलं की या लसीमधले 85 टक्के कंपाउंड मिनिंगायटिसवरच्या लसीसारखे आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की मी कोलॅप्स होऊ शकतो. ऑर्गन फेल्युअरचा धोका आहे. जीवही जाऊ शकतो. ताप, थंडीने कुडकुडने अशी लक्षणंही दिसू शकतात. मात्र, या प्रक्रियेत अनेक डॉक्टर्स आणि नर्सेसही स्वतःहून सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे मला धीर मिळाला."

दीपक यांनी सांगितलं की एक क्षण असा होता जेव्हा त्यांच्याही मनात शंका आली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या एका डॉक्टर मैत्रिणीशी ई-मेलवरून संपर्क केला. दीपक सांगतात की हे काम करायला तयार करण्यात त्यांच्या याच मैत्रिणीने मोठी भूमिका बजावली.

ट्रायलमध्ये सहभागी होण्याचे निकष?

कुठल्याही लसीच्या चाचण्यांचे अनेक टप्पे असतात.

सर्वांत शेवटचा टप्पा हा ह्युमन ट्रायलचा असतो. ज्या लसीची चाचणी घ्यायची आहे त्या चाचणीत सहभागी होणाऱ्याला त्या आजाराची लागण असता कामा नये. म्हणजेच कोरोना विषाणूवरच्या लसीची ह्युमन ट्रायल असेल तर चाचणीत सहभागी होणाऱ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग असता कामा नये.

कोरोना विषाणूविरोधातल्या अँटीबॉडीजही शरीरात असता कामा नये. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला आधी कधीतरी कोरोनाचा संसर्ग झालेला असेल आणि त्यातून तो पूर्णपणे बरा झाला असेल तर त्याच्या शरीरात कोरोना विषाणूविरोधातल्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. अशी व्यक्ती ह्युमन ट्रायलमध्ये सहभागी होऊ शकत नाही.

18 ते 55 वर्षापर्यंतची कुठलीही व्यक्ती ह्युमन ट्रायलमध्ये सहभागी होऊ शकते. मात्र, ती व्यक्ती पूर्णपणे सुदृढ असायला हवी.

ह्युमन ट्रायलमध्ये सहभागी होणारे सर्वच एकाच वयाचे आणि एकाच वंशाचे नसावे, याचीही काळजी घेतली जाते. शिवाय, स्त्री आणि पुरूष दोघंही चाचण्यांमध्ये असायला हवे.

ऑक्सफोर्डच्या चाचणीत सहभागी होणाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायला मनाई होती.

दीपक सांगतात की या चाचणीत सहभागी होणाऱ्यांना कुठलेच पैसे देण्यात आले नव्हते. मात्र, सर्वांचा विमा काढण्यात आला होता.

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान चाचणीत सहभागी होणारी व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.

ह्युमन ट्रायलसाठीचे असे सगळे नियम आणि अटी बघता चाचणीत सहभागी होणं सोपं असतं का?

या प्रश्नाचं उत्तर देताना दीपक सांगतात, "ही चाचणी यशस्वी होईल की नाही, मला माहिती नाही. मात्र, मला समाजासाठी काहीतरी करायचं होतं आणि म्हणून मी हे करतोय."

ह्युमन ट्रायलची प्रक्रिया कशी असते?

दीपक सांगतात की पहिल्या दिवशी त्यांच्या दंडात इंजेक्शन देण्यात आलं. त्या दिवशी त्यांना थंडी वाजून ताप आला.

ते म्हणाले, "इंजेक्शन दिलं तिथे थोडी सूजही होती. डॉक्टरांनी सांगितलं की हे नॉर्मल आहे. या व्यतिरिक्त मला रोज अर्धा तास हॉस्पिटलमध्ये थांबायचं होतं."

"मला रोज एक ई-डायरी भरावी लागते. त्यात शरीराचं तापमान, पल्स, वजन, बीपी, इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी आलेला डाग मोजणं, अशी सगळी माहिती भरावी लागते. यासाठी आवश्यक असणारं सर्व सामान हॉस्पिटलकडून मिळतं."

"तुम्ही घराबाहेर पडलात का, कुणा-कुणाला भेटलात, मास्क घालत आहात की नाही, काय जेवता अशी माहितीही द्यावी लागते. 28 दिवस अशी संपूर्ण माहिती ई-डायरीमध्ये भरावी लागते. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान डॉक्टर कायम फोनवरून संपर्कात असतात. नियमित फॉलोअप घेतला जातो. 7 जुलैलाही फॉलोअप झाला. म्हणजेच एप्रिलपासून सुरू झालेली प्रक्रिया जुलैपर्यंत सुरू आहे."

या प्रक्रियेदरम्यान दीपक यांना तीन वेळा ताप येऊन गेला आहे आणि त्यांना भीतीही वाटली.

जीव जाईल यापेक्षा आपल्या माणसांना बघता येणार नाही, याची जास्त भीती वाटत होती, असं दीपक सांगतात.

तीन वर्षांपूर्वी दीपक यांच्या वडिलांचं निधन झालं. मात्र, परदेशात असल्यामुळे दीपक यांना वडिलांचं अंत्यदर्शनही घेता आलं नव्हतं.

दीपक सांगतात, "ट्रायलच्या वेळी त्यांना हीच भीती जास्त वाटत होती की यापुढे मी आई आणि भावंडांना भेटू शकेन की नाही."

कुठल्याही कठीण प्रसंगासाठी हॉस्पिटलकडून एक इमरजेंसी नंबर दिला जातो. मात्र, त्यांना तेव्हाही भीती वाटली होती आणि आजही वाटते.

दीपक यांनी सांगितलं की त्यांना 90 दिवस कुठेही जाता येणार नाहीय. लसीचे केवळ दोन डोज देण्यात आले आहेत. मात्र, फॉलोअपसाठी नियमितपणे हॉस्पिटलमध्ये जावं लागतं.

दीपक पालीवाल कोण आहेत?

42 वर्षांचे दीपक लंडनमधल्या एका फार्मा कंपनीत कन्सल्टंट म्हणून काम करतात.

त्यांचा जन्म भारतातला. भारतातच ते लहानाचे मोठे झाले. त्यांचं कुटुंब आजही जयपूरमध्ये आहे. ते आणि त्यांची पत्नी दोघं लंडनला राहतात. पत्नीदेखील फार्मा कंपनीत आहे.

भावंडांमध्ये ते सर्वांत धाकटे आहेत. लसीचा पहिला डोज घेतल्यानंतरच त्यांनी जयपूरमध्ये आपल्या कुटुंबीयांना या ट्रायलविषयी सांगितलं. दीपक सांगतात की आई आणि भावाला आनंद झाला. पण मोठी बहीण खूप चिडली.

दीपक यांच्या पत्नी पर्ल डिसूजा यांनी सांगितलं की त्यांना दीपक यांचा निर्णय अजिबात आवडला नव्हता. त्या म्हणतात, "मला दीपकसाठी 'हिरो'चा टॅग नको होता." त्या म्हणतात की मी एकदा होकार दिला. पण यापुढे त्यांना असं काहीही करू देणार नाही.

दीपक यांचा ट्रायलचा भाग पूर्ण झाला आहे. मात्र, ऑक्सफोर्डच्या संशोधनात आणखी 10 हजार जणांवर या लसीची चाचणी घेतली जाणार आहे.

संपूर्ण जगाप्रमाणेच दीपक यांचंही सगळं लक्ष ट्रायल यशस्वी होण्याकडे लागून आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)