You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुणे कोरोना: पुण्याच्या ग्रामीण भागात का वाढतोय कोरोना?
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून
राज्यातील पहिला कोरोनाचा रुग्ण हा पुण्यात आढळला होता, त्यानंतर पुण्यातील रुग्णवाढीचा आलेख हा चढताच आहे. लॉकडाऊनच्या काळात पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार फारसा झाला नव्हता.
अनलॉकनंतर आता ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील मंचर या गावात करण्यात आलेल्या आरोग्य सर्वेमध्ये 207 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते.
एकाच दिवसात ग्रामीण भागात दोनशेहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याची ही पहिलीच घटना ठरली होती.
ज्या दिवशी हा सर्वे झाला होता तेव्हा म्हणजेच 9 सप्टेंबरला पुणे ग्रामीण भागात 1152 कोरोनाबाधित आढळले तर 10 सप्टेंबरला 1297 इतके रुग्ण सापडले होते.
पुणे ग्रामीण भागात दररोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.
खालील तक्ता पाहिल्यास आपल्या लक्षात येऊ शकतं की गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्तांची पुणे जिल्ह्यातील संख्या किती आहे.
कोरोनाची भीती राहिली नाही
ग्रामीण भागात वाढणाऱ्या कोरोनाची कारणे शोधताना प्रामुख्याने समोर आलेलं कारण म्हणजे नागरिकांमध्ये कोरोनाबाबत भीती राहिलेली नाही आणि त्यामुळेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांबाबतची उदासीनता असल्याची खंत काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पुण्याजवळील खानापूर गावचे माजी सरपंच शरद जावळकर म्हणतात, ''पूर्वीसारखी नागरिकांमध्ये कोरोनाची भीती राहिलेली नाही. लॉकडाऊन उठवल्यानंतर लोक बिनधास्त बाहेर फिरताना दिसत आहेत. मास्क आणि फिजिकल अंतराबाबत शासनाने सांगितलेल्या सूचनांकडे नागरिकांकडून दुर्लक्ष केलं जात आहे."
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
"त्यातच कोरोनाची लक्षणे दिसत असताना देखील चाचणी करुन न घेणे तसेच याबाबत प्रशासनाला न कळविणे असे प्रकार देखील घडत आहेत. त्यातच ग्रामीण भागाकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष हे कोरोनावाढीचे एक कारण आहे,'' जावळकर सांगतात.
याच कारणाकडे बारामती येथील डॉ. हिमगौरी वडगावकर लक्ष वेधतात, ''अनलॉकनंतर अनेक लोक अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडत आहेत. कोरोना या रोगाकडे पाहिजे तितक्या गांभिर्याने अजूनही पाहिलं जात नाही. मास्क का लावायचा, हेच अनेकांना अजून माहित नाही. एकमेकांशी बोलताना मास्क काढून संवाद साधला जात आहे. तसेच तो योग्य प्रकारे हाताळला देखील जात नाही.
"कोरोना झाल्यानंतर समाज आपल्यावर बहिष्कार टाकेल या भीतीने लक्षणे दिसत असताना चाचणी केली जात नाही, तसेच अंगावर आजार काढला जातो. त्यामुळे त्यांच्यापासून देखील इतरांना घरातील इतर सदस्यांना लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. मला काही होत नाही हा गैरसमज देखील मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात आहेत,'' वडगावकर सांगतात.
पुण्याशी सातत्याने येणारा संपर्क
पुण्याजवळील ग्रामीण भागातील मोठी लोकसंख्या ही कामानिमित्त पुणे शहरात दररोज येत असते. अनलॉकनंतर अनेक व्यवहार सुरु झाल्याने पुण्यात कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली. त्यामुळे हळूहळू शहरापुरता असलेला संसर्ग ग्रामीण भागात देखील वाढला.
खडकवासल्याचे सरपंच सौरभ मते म्हणतात, ''पुणे शहरात कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या आमच्या गावात अधिक आहे. पुण्याजवळील इंडस्ट्रीयल भाग त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण आमच्याकडे अधिक आहे. अनलॉकनंतर आमच्या गावात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्यामुळे घरातील इतरांना लागण होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.''
आरोग्य सर्वेतून ग्रामीण भागातील कोरोनाचे चित्र झाले स्पष्ट
पुणे शहरानंतर हळूहळू ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने त्यातच गणेशोत्सव आणि मोहरम असे सण येऊन गेल्याने मंचर शहरवासियांनी गावाचा आरोग्य सर्वे करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 'डॉक्टर आपल्या दारी' ही मोहीम राबविण्यात आली.
गावातील साधारण तीस तरुण आणि डॉक्टर यांचे गट करुन घरोघरी जाऊन नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यात कोणाला कोरोनाची लक्षणे आहेत का, हे प्रामुख्याने तपासण्यात आले.
ज्यांना लक्षणे आढळत आहेत अशांनाच कोरोना चाचणी करण्यास पाठविण्यात आलं. या सर्वेला चांगला प्रतिसाद मिळाला तसेच अनेक लोक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले, असं माजी सरपंचांनी सांगितले.
मंचर गावचे माजी सरपंच दत्ता गंजाळे यांनी म्हटलं, ''गणपती आणि मोहरम मोठ्या उत्साहात आमच्या गावात साजरा केला जातो. त्यामुळे गावात कोरोनाचा संसर्ग झाल्याची भीती होती. म्हणून आम्ही 'डॉक्टर आपल्या दारी' ही मोहीम राबवली. याचे सकारात्मक परिणाम समोर आल्याने संपूर्ण गावाचा आरोग्य सर्वे करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका दिवसात संपूर्ण गावाचा सर्वे करणारे मंचर हे पहिलेच गाव असावे. या सर्वेमध्ये 207 नागरिक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. गावाला कोरोनामुक्त करण्यासाठी धारावीच्या धर्तीवर पुढेही हा सर्वे करण्यात येणार आहे.''
सूक्ष्म सर्वेक्षणावर भर
पुणे शहराच्या आजूबाजूच्या 98 ग्रामपंचायतींमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. त्यामुळे या गावांना हॉटस्पॉट घोषित केले आहे. या सर्वच गावांमध्ये आता हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. याविषयी बीबीसीने पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संवाद साधला.
प्रसाद यांनी म्हटलं, ''सध्या आम्ही जास्त रुग्ण असलेल्या 98 गावांमध्ये आरोग्य सर्वे करतोय. 15 पेक्षा जास्त रुग्ण असतील आणि लोकल ट्रान्समिशन दिसत असेल तर त्या ग्रामपंचायतीला हॉटस्पॉट ठरविण्यात येते. एकाच दिवशी दोनशेहून अधिक रुग्ण आढळणारे मंचर हे पहिलेच गाव आहे. मंचरमध्ये विविध ठिकाणी कामानिमित्त जाणारी लोकसंख्या जास्त असल्याने तेथे जास्त लागण झाल्याचे समोर आले आहे. आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याची आरोग्य तपासणी करतोय तसेच लक्षणे असणाऱ्यांची लगेच कोरोना चाचणी देखील करत आहोत."
पुढे प्रसाद सांगतात, "जनगणनेबाबतचा सर्वे जसा केला जातो, त्याच पद्धतीने हा सर्वे करण्यात येत आहे. पुण्यातून पाच राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यामुळे या महामार्गांच्या आजूबाजूला मोठ्या इंडस्ट्री आहेत. त्याचबरोबर दाटवस्तीच्या ग्रामपंचायत देखील आहेत. त्यामुळे या भागांमध्ये लागण जास्त दिसत आहे. हा आरोग्य सर्वे आम्ही विविध गावांमध्ये दररोज करत आहोत. तसेच मास्क न घालणाऱ्यांवर कडक कारवाई देखील करत आहोत.''
पुणे जिल्हा परिषदेच्या आकडेवारीनुसार 22 सप्टेंबर पर्यंत एकूण 36,140 इतक्या नागरिकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे, तर 23135 इतके नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत.
या दिवशी 9336 इतके रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 2777 इतके रुग्ण गृह अलगिकरणात आहेत. आत्तापर्यंत 892 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1,22,823 इतक्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)