कोरोना लसः 'या' भारतीय राण्यांनी जगातल्या पहिल्या लसीकरणासाठी कशी मदत केली?

    • Author, अपर्णा अल्लूरी
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली

1805 साली म्हैसूरच्या राजदरबारात देवाजाम्मानी आल्या ते कृष्णराज वाडियार तृतीय यांच्याशी विवाह करण्यासाठी. त्यावेळी दोघंही 12 वर्षांचे होते आणि कृष्णराज वाडियार तृतीय यांना नुकतंच भारताच्या दक्षिणेकडच्या या राजघराण्याचे शासक घोषित करण्यात आले होते.

मात्र, देवाजाम्मानी यांच्यावर लवकरच एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली - देवीसारख्या भयंकर रोगावरच्या लशीच्या प्रचार आणि प्रसाराची. ईस्ट इंडिया कंपनीने या कार्यातील त्यांची भूमिका एका पेंटिंगच्या माध्यमातून जनतेसमोर मांडली.

"लसीकरण कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रेरित करणे, हा या चित्रामागचा उद्देश होता," असं कॅम्ब्रिज विद्यापीठातले इतिहासकार डॉ. नायजेल चान्सलर यांचं म्हणणं आहे.

त्याकाळी देवी रोगावरचा उपचार नवीन होता. जेमतेम सहा वर्षांपूर्वी एडवर्ड जेन्नर नावाच्या एका इंग्रज डॉक्टरने देवीवरची लस शोधून काढली होती. (जगातली ही पहिली लस आहे. त्यामुळे एडवर्ड जेन्नर यांना लसींचे जनकही म्हटलं जातं.)

मात्र, या लशीबाबत भारतात बरीच साशंकता होती आणि त्यामुळे विरोधही होता. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे या लशीचा प्रचार-प्रसार ब्रिटीश करत होते. एकोणीसाव्या शतकच्या सुरुवातीचा काळ हा भारतावर ब्रिटिशाचं वर्चस्व वाढण्याचा काळ होता.

मात्र, ब्रिटिशांनी हार मानली नाही. उलट एका विषाणूमुळे 'दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणारे मृत्यू टाळून लोकांचे प्राण वाचवणं' का गरजेचं आहे, हे त्यांनी पटवून दिलं.

भारत ब्रिटिशांसाठी सर्वात मोठी वसाहतवादी बाजारपेठ होती. त्यामुळे भारतात जगातली पहिली लस आणण्यासाठी राजकारण, सत्ता आणि लोकांची मनं वळवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने केलेले प्रयत्न यांचं एक उत्तम मिश्रण बघायला मिळालं.

या कामात ब्रिटीश सर्जन्स, जे प्रत्यक्ष लस टोचायचे ते भारतीय व्हॅक्सिनेटर्स, ज्यांच्यामार्फत लसीकरणाची योजना राबवली जायची ते अधिकारी आणि कंपनीचे ज्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते अशी राजघराणी या सर्वांचा त्यात सहभाग होता.

म्हैसूरच्या वाडियार राजघराण्याशी ब्रिटिशांचे अत्यंत जवळचे संबंध होते. ब्रिटिशांनीच तब्बल 30 वर्षांच्या विजनवासानंतर वाडियार घराण्याला पुन्हा एका राजसत्ता मिळवून दिली होती. त्यामुळे वाडियार एकप्रकारे ब्रिटिशांच्या ऋणात होते.

चित्रातील स्त्रिया

डॉ. चान्सलर यांच्या मते, जवळपास 1805 सालचं हे चित्र केवळ राणीच्या लसीकरणाचा दस्तावेज नाही तर लसीकरणासाठी ब्रिटिशांनी केलेल्या प्रयत्नांची कशी प्रगती होत गेली, हे जाणून घेण्यासाठीचा एक मार्गही आहे.

कापडावर चितारलेल्या या तैलचित्राचा 2007 साली शेवटचा लिलाव करण्यात आला. साऊथबायच्या ऑक्शन हाऊसने या चित्राचा लिलाव केला होता. मात्र, तोवर या चित्राचा नेमका विषय काय, हे कुणालाही माहित नव्हतं. चित्रकाराने आपल्या चित्रात तीन नाचणाऱ्या मुली किंवा सभ्य मुली चितारल्या असाव्या, असं या चित्राबद्दलचं मत होतं.

डॉ. चान्सलर म्हणतात की त्यांनी हे चित्र बघताच त्यांना जाणवलं की चित्राचा विषय हा नाही.

चित्रात उजव्या बाजूला चितारलेली स्त्री ही सर्वात लहान राणी देवाजाम्मनी असल्याचं त्यांनी ओळखलं. ते म्हणाले, "सहसा राणीने आपला डावा हात पदराने झाकला असता. मात्र, आपल्याला लस कुठे टोचण्यात आली हे दाखवण्यासाठी राणीने तो अशापद्धतीने उघडा ठेवला आहे जेणेकरून राजप्रतिष्ठाही जपली जावी."

त्यांच्या मते चित्रात डावीकडची स्त्री महाराजांच्या पहिल्या राणी आहेत. त्यांचंही नाव देवाजाम्मनी होतं.

डॉ. चान्सलर म्हणतात की, त्यांच्या नाकाखाली आणि हनुवटीभोवतीच्या त्वचेचा रंग उडाला आहे. ही त्यांना सौम्य संसर्ग दिल्याची खूण आहे. निरोगी व्यक्तीच्या शरीरात एखाद्या विशिष्ट रोगाशी लढणाऱ्या अँटीबॉडीज तयार करायच्या असतील तर त्या व्यक्तीला त्या विषाणूची सौम्य लागण दिली जाते. अशाप्रकारच्या लसीकरणासाठी त्याकाळी व्हॅरिओलेशन ही पद्धत होती.

व्हॅरिओलेशनमध्ये विषाणू संसर्गात पूर्णपणे बरा झालेल्या रुग्णाच्या शरीरावरील फोडावरच्या खपलीची भुकटी करून निरोगी व्यक्तीच्या नाकाखाली पेटवली जाते.

आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी डॉ. चान्सलर यांनी काही तपशीलही दिले. 2001 साली प्रकाशित झालेल्या एका लेखात ते देण्यात आले आहेत. एक म्हणजे या चित्राची तारीख वाडियार महाराजांच्या लग्नाच्या तारखेशी जुळते. शिवाय, जुलै 1806 चे दस्तावेज उपलब्ध आहेत. त्यात असं म्हटलं आहे की देवाजाम्मनी यांनी स्वतःचं लसीकरण करून घेतलं आणि त्याचा लोकांवर 'सकारात्मक प्रभाव' पडला आणि लोकही लसीकरणासाठी पुढे येऊ लागले.

दुसरं म्हणजे, म्हैसूरच्या इतिहासाचे तज्ज्ञ म्हणून डॉ. चान्सलर खात्रीशीरपणे सांगू शकतात की 'सोन्याच्या भरजरी बांगड्या' आणि 'डोक्यावर परिधान केलेला देखणा साज' ही खास वाडियार राण्यांची वैशिष्ट्यं आहेत. इतकंच नाही तर ज्या चित्रकाराने हे चित्र साकारलं आहे ते थॉमस हिकी यांनी यापूर्वीही वाडियार आणि त्यांच्या राजदरबारातल्या व्यक्तींची चित्र काढलेली आहेत.

ते लिहितात, "आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चित्रातल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर दिसणारा 'आश्वासक खरेपणा'." डॉ. चान्सलर म्हणतात एका युरोपीय चित्रकारासमोर राजघराण्यातल्या स्त्रिया स्मितहास्य करत अगदी सहज उभ्या आहेत, हे त्याकाळी कुणाच्याही भुवया उंचावण्यासाठी पुरेसं ठरलं असतं आणि केवळ एका चित्रासाठी अशा प्रकारची जोखीम राजघराण्याने खचितच उचलली नसती.

कदाचित हे चित्र म्हणजे राजघराण्याने ब्रिटिशांच्या उपकारांची केलेली परतफेडही असू शकते.

ईस्ट इंडिया कंपनीसाठी तो धावपळीचा काळ होता. 1799 साली त्यांनी म्हैसूरचे महाराज टिपू सुलतान यांना पराभूत करून वाडियार यांना पुन्हा एकदा सिंहासनावर विराजमान केलं होतं. मात्र, ब्रिटिशांचं वर्चस्व अजूनही पूर्णपणे स्थापन झालेलं नव्हतं.

डॉ. चान्सलर यांच्या मते अशा सगळ्या परिस्थितीत तत्कालीन मद्रास प्रांताचे गव्हर्नर विलियम बेन्टिक यांना या जीवघेण्या साथीच्या आजारात राजकीय संधी दिसली.

इतिहासकार प्रा. मिशेल बेनेट यांनी 'वॉर अगेन्स स्मॉलपॉक्स' या त्यांच्या पुस्तकात देवी रोगावरच्या लसीचा भारतातल्या कठीण प्रवासाचं वर्णन केलं आहे.

भारतात देवीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे मृत्यूही खूप व्हायचे. यात चेहऱ्यावर आणि शरीरावर खूप पुरळं यायची. पुढे पुरळाचे फोड होऊन त्यात पू जमा व्हायचा. ही फोडं फुटल्याने ताप येतो, वेदना होतात. जे या आजारातून बरे होत त्यांच्याही शरीरावर आयुष्यभरासाठी व्रण राहत.

अनेक शतकं व्हॅरिओलेशन आणि देवधर्म हाच या साथीवर उपचार होता. मरिअम्मा (मरिआई) किंवा शितला देवीच्या कोपामुळे देवी रोग होतं असा हिंदुंमध्ये समज होता. त्यामुळेच या रोगाला देवी रोग असं नाव पडलं.

त्यामुळे मग कुणाला देवी आली की या देवींची पूजा केली जायची. शिवाय, अनेक शतकं व्हॅरिओलेशन म्हणजे निरोगी व्यक्तीच्या त्वचेवरच्या फोडातील द्रव चोळून किंवा देवीच्या फोडावरच्या खपलीची भुकटी नाकावाटे हुंगून या रोगाचा प्रतिबंध करण्याचे प्रयत्न लोक करायचे.

गाईंच्या स्तनांना होणाऱ्या 'काऊपॉक्स' या आजारातला विषाणू देवी रोगावरच्या लशीचा आधार होता. त्यामुळे भारतात या लशीला खूप विरोध झाला. जे ब्राह्मण 'टीकादार' किंवा 'व्हॅरिओलेटर्स' होते त्यांनी या लशीला तीव्र विरोध केला. कारण यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनावरच गदा येणार होती.

प्रा. बेनेट सांगतात, "सुदृढ मुलांमध्ये गुरांचा आजार सोडणं, ही देखील मुख्य समस्या होती."

"तुम्ही 'काऊपॉक्स'चा अर्थ कसा लावाल? यासाठी त्यांनी संस्कृत विद्वानांना बोलावलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ते असा शब्द वापरत होते जो स्थानिक अत्यंत भयंकर आजारासाठी वापरत होते. शिवाय, 'काऊपॉक्स' आजारामुळे त्यांची जनावरं दगावण्याचीही भीती होती."

आणखी एक मोठी समस्या होती. ती म्हणजे लसीकरणाची 'आर्म-टू-आर्म' पद्धत. ही लसीकरणाची सर्वात प्रभावी पद्धत होती. यात पहिल्या व्यक्तीच्या दंडात सुईद्वारे लस सोडली जायची.

एका आठवड्यानंतर इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी 'काऊपॉक्स'चा फोड यायचा. डॉक्टर एक कट देऊन या फोडातला पू काढायचे आणि तो दुसऱ्या व्यक्तीच्या दंडात सोडायचे. अशी ही पद्धत होती.

कधी-कधी रुग्णाच्या दंडावरच्या वाळलेल्या फोडावरची खपली ग्लास प्लेटच्या मध्ये बंद करून दुसऱ्या ठिकाणी पाठवली जाई. मात्र, बरेचदा अशाप्रकारे ग्लास प्लेटच्या मधे ठेवून पाठवलेला द्रव निरुपयोगी व्हायचा.

यापैकी कुठलीही पद्धत वापरली तरीदेखील लस ही सर्व जाती, धर्म, वर्ण, वंश, स्त्री-पुरूष अशा सर्वांच्याच शरीरातून जायची. यामुळे हिंदुंमध्ये ज्याला विटाळ म्हटलं जाई, ती समस्या निर्माण होण्याचाही भीती होती.

त्यामुळे राजघराण्याच्या लोकांचीच याकामी मदत घेतल्यास या सर्व समस्यांवर आणि लोकांच्या मनात असलेल्या भीतीवर मात करता येणं अधिक सोपं ठरणार होतं. अखेर राजघराणातल्या लोकांची ताकद त्यांच्या रक्तातच असल्याचं मानलं जात होतं.

किमान भारतात या लशीचा वाडीयार राण्यांपर्यंतचा प्रवास अॅना डस्थॅल नावाच्या एका ब्रिटीश सर्व्हंटच्या तीन वर्षांच्या मुलीपासून सुरू झाला.

1800 मध्ये ब्रिटनमधून लशीचे नमुने पाठवायला सुरुवात झाली. कधी हे नमुने वाळवून पाठवले जाई तर कधी 'व्हॅक्सिन कुरिअर'च्या माध्यमातून. व्हॅक्सिन कुरिअर ही एक मानवी साखळी असायची. हे सर्वजण ब्रिटनहून निघणाऱ्या जहाजात बसायचे आणि प्रवासादरम्यान एका व्यक्तीच्या दंडातून पू काढून दुसऱ्या व्यक्तीच्या दंडात सोडला जाई. अशाप्रकारे इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत लस टिकवण्याचा प्रयत्न व्हायचा. मात्र, यापैकी एकही लस भारतात दाखल होईपर्यंत तग धरू शकली नाही.

अनेक अपयशानंतर अखेर संशोधकांनी दंडातला पू वाळवून तो ग्लास प्लेटच्या मध्ये ठेवून पाठवण्याचा प्रयत्न केला आणि मार्च 1802 मध्ये व्हिएन्नाहून बगदादला अशाप्रकारे लस पाठवण्यात यश आलं.

ही लस बगदादमध्ये असलेल्या एका अमेरिकन मुलाच्या दंडात देण्यात आली. त्यानंतर त्याच्या दंडात आलेल्या फोडातला पू यशस्वीपणे इराकमधल्या बसरा शहरात पोहोचवण्यात आला. तिथे ईस्ट इंडिया कंपनीच्या एका सर्जनने 'आर्म-टू-आर्म' पद्धतीने ही लस तत्कालीन बॉम्बे प्रांतात पोहोचवली.

14 जून 1802 रोजी अॅना डस्थॅल देवी रोगाविरोधात यशस्वीरित्या लसीकरण करणारी भारतातली पहिली व्यक्ती ठरली. तिच्याविषयी फारशी माहिती नाही. मात्र, ज्या डॉक्टरांनी तिला ही लस दिली त्यांनी ज्या नोंदी केल्या त्यात ही मुलगी 'अत्यंत सुस्वभावी' असल्याचं म्हटलं आहे. डस्थॅलचे वडील युरोपीय होते. मात्र. तिची आई कुठली होती, याची माहिती नसल्याच प्रा. बेनेट सांगतात.

प्रा. बेनेट म्हणतात "भारतीय उपखंडात सर्व लसीकरण या मुलीपासून आले आहेत."

आठवडाभरानंतर डस्थॅलच्या पूने तत्कालीन बॉम्बे प्रांतात पाच लहान मुलांना लस टोचण्यात आली. तिथून या लसीचा भारतातल्या ब्रिटीश वसाहतींमध्ये 'आर्म-टू-आर्म' प्रवास सुरू झाला. हैदराबाद, कोचीन, तिलीचेर्री, चिंगलेपुट, मद्रास आणि तिथून पुढे ही लस म्हैसूरच्या राजदरबारातही पोहोचली.

ब्रिटीश अधिकारी लसीचा पुरवठा कायम ठेवणाऱ्यांची नोंद सहसा ठेवत नसत. मात्र, ही लस काही 'अतिसामान्यांनाही' लोकांना देण्यात आल्याची नोंद मात्र आहे. यात जातीबाह्य लग्नातून जन्माला आलेल्या तीन मुलांना ही लस देण्यात आल्याची नोंद आढळते. शिवाय, एका मलयाळम मुलाच्या मदतीने लस कोलकात्याला पोहोचल्याचाही दाखला आहे.

राणी देवाजाम्मनी यांना वाळवून ग्लास प्लेटमध्ये ठेवलेल्या नमुन्यातून लस टोचण्यात आली की कुठल्या रुग्णाच्या दंडातून काढून देण्यात आली, याची माहिती उपलब्ध नाही. तसंच, या घराण्यातल्या इतर कुठल्या सदस्याला किंवा राजदरबारातल्या इतर कुणाला ही लस दिल्याचाही दाखला आढळत नसल्याचं डॉ. चान्सलर सांगतात.

मात्र, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

डॉ. चान्सलर यांच्या मते म्हैसूरमध्ये लसीकरणाचं महत्त्व पहिल्यांदा कळलं ते महाराजांच्या आजी लक्ष्मी अम्मानी यांनी केलं. लक्ष्मी अम्मानी यांच्या पतीचं निधनही देवी रोगाने झालं होतं. या चित्रात जी मधली स्त्री आहे त्याच लक्ष्मी अम्मानी असल्याचं डॉ. चान्सलर यांचं म्हणणं आहे. 'लांब चेहरेपट्टी आणि टपोरे डोळे' ही खास म्हैसूरच्या वाडियार राजघराण्याची वैशिष्ट्यं असल्याचं ते सांगतात.

डॉ. चान्सलर म्हणतात त्याच घराण्याच्या प्रमुख असल्याने हे चित्र काढणं शक्य झालं. कारण आक्षेप घ्यायला महाराजही खूप लहान होते आणि विरोध करण्यासाठी राण्याही लहान होत्या.

या प्रक्रियेचे फायदे कळू लागल्यानंतर देवी विरोधी मोहिमेनेही जोर धरला आणि जे आधी 'टीकादार' होते म्हणजे खपलीची भुकटी करून ती नाकाखाली जाळणारे लोकही पुढे लसीकरणाच्या बाजूने वळले. प्रा. बेनेट यांच्या अंदाजानुसार 1807 सालापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांना देवीची लस देण्यात आली होती.

पुढे हे चित्रही इंग्लडला गेलं आणि त्यानंतर ते लोकांच्या विस्मृतीतही गेलं.

1991 सालापर्यंत या चित्राकडे कुणाचं लक्षही गेलं नाही. 1991 साली डॉ. चान्सलर यांनी एका चित्रप्रदर्शनात हे चित्र पाहिलं. त्यांनीच विस्मृतीत गेलेल्या या राण्यांची जगाला नव्याने ओळख करून दिली आणि जगातल्या पहिल्या लसीकरण मोहिमेतलं या राण्यांचं महत्त्वही अधोरेखित केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)