You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस लस : पुण्यात अशी तयार होत आहे 'ऑक्सफर्ड'ची 'कोविशिल्ड' लस - BBC Exclusive
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
जेव्हा पुण्याच्या हडपसर इथल्या 'सिरम इन्स्टिट्यूट'मध्ये आम्ही प्रवेश करतो, तेव्हा इथं आधुनिक जगाची जगण्याची आशा जिवंत आहे अशी भावना सतत साथीला असते.
जग अशा टप्प्यावर येऊन थांबलंय जिथं प्रत्येक आशेचा किरण हा अस्तित्वाला आधार वाटतो आहे. 'सिरम' मध्ये मानवाच्या अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या कोरोना विषाणूविरोधात ब्रिटनच्या 'ऑक्सफर्ड विद्यापीठा'तील संशोधकांनी जी लस निर्माण केली तिची निर्मिती होते आहे.
या लशीचं नाव आहे 'कोविशिल्ड'. तिच्या उत्पादनाचा पहिला टप्पा जेव्हा सुरू झाला आहे, तेव्हा 'बीबीसी मराठी'च्या टीमला विशेष प्रवेश देण्यात आला.
पुण्याच्या हडपसर-मांजरी परिसरातल्या शेकडो एकरच्या 'सिरम इन्स्टिट्यूट'च्या परिसराकडे सगळं जग आशेनं डोळे लावून बसलं आहे.
कारण या महामारीतून जगाला बाहेर काढू शकणाऱ्या लशीचे अब्जावधी डोस पुढच्या काही महिन्यांमध्ये इथे तयार होणार आहेत.
आजमितीला जगात सर्वाधिक लशींचं उत्पादन 'सिरम'च्या या परिसरात होतं. वर्षाला 1.5 अब्ज डोसेस, म्हणजे जगाच्या एकूण गरजेच्या 65 टक्के उत्पादन एकटी 'सिरम' करते.
म्हणूनच, सध्या ज्या युद्धपातळीवर ज्या प्रचंड संख्येनं जगाला लस हवी आहे, त्यासाठी 'सिरम' शिवाय दुसरा पर्याय कोणता असू शकला असता?
या जबाबदारीची जाणीव 'सिरम'च्या परिसरात जाणवत राहते. इथं कोणालाही प्रवेशाला परवानगी नाही. आम्हाला सुद्धा इथं येण्याअगोदर 'कोविड'ची टेस्ट करून घ्यावी लागली आहे. ती निगेटिव्ह असेल तरच इथं परवानगी आहे. 'सिरम'च्या पहिल्यापासून असलेल्या परिसरातल्या काही इमारती आता 'कोविशिल्ड'च्या उत्पादनासाठी राखीव झाल्या आहेत.
'सिरम'चा स्वत:चा 'एसईझेड' परिसरही त्यालाच लागून उभा आहे. तिथं आणि शेजारी असलेल्या मांजरीच्या परिसरात नव्यानं काही इमारती आधुनिक तंत्रज्ञानासह उभारल्या जाताहेत.
सध्या इथं अनेक रोगांच्या लशींची निर्मिती सुरु आहे. ती कधीच थांबणार नाही. जगातल्या 170 देशांना 'सिरम' लशी पुरवते. त्यामुळे कोरोना लशीसाठी ते काम थांबणं शक्य नाही.
म्हणूनच नवीन फॅसिलिटी उभारण्याचं कामही सुरू आहे. त्या बांधण्यासाठी परदेशांतले तंत्रज्ञ आवश्यक होते आणि लॉकडाऊन सुरु झाल्यावर विमानं बंद झाली.
पण 'सिरम'चं काम थांबणं कोणत्या सरकारसाठी परवडणारं नव्हतं. त्यामुळे 'वंदे भारत' सारख्या विशेष योजनांतून आवश्यक तंत्रज्ञांना इथं आणलं गेलं, असं आम्हाला सांगितलं गेलं. कारण एकच, 'सिरम' मध्ये कोरोना प्रसार थांबण्यासाठी आवश्यक लस तयार होणार आहे.
ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात शोधल्या जाणाऱ्या लशीवर सर्वांच्या आशा केंद्रीत पहिल्यापासून झाल्या होत्या.
'ऑक्सफर्ड'चा हा प्रोजेक्ट 'एस्ट्रा झेनेका'या प्रसिद्ध ब्रिटिश-स्वीडिश औषधनिर्माण कंपनीसोबत सुरू झाला. जुलै महिन्यात या लशीच्या पहिल्या टप्प्यातल्या मानवी चाचणीचे यशस्वी परिणाम 'लॅन्सेट'मध्ये प्रकाशित झाले.
जगाला हव्या असलेल्या उत्तराच्या आपण जवळ पोहोचलो असल्याची जाणीव झाली. पण ही लस निर्माण करणाऱ्या 'ऑक्सफर्ड' विद्यापीठ आणि 'एस्ट्रा झेनेका'ला पुण्याच्या 'सिरम इन्स्टिट्यूट'शिवाय पुढं जाणं शक्य नव्हतं.
कारण जगाला हवी असलेली अब्जावधी लशींची गरज आणि त्यासाठी उपलब्ध असलेला अत्यंत कमी वेळ. 'कोविशिल्ड'ची जबाबदारी अशा प्रकारे 'सिरम'कडे आली आणि उत्पादनाची प्रक्रिया तातडीनं सुरु झाली.
'कोविशिल्ड'चं प्राथमिक टप्प्यातलं उत्पादन सुरु
एखादी लस निर्माण करण्याचे वेगवेगळे टप्पे असतात. 'सिरम'च्या परिसरात वेगवेगळ्या 'फॅसिलिटी'ज मध्ये हे टप्पे सुरु आहेत. ते पाहायला जातांनाही सुरक्षेचे सगळे उपाय अनुसरून आत जावं लागतं.
थेट निर्मिती क्षेत्रातही जाता येत नाही. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काचेची भिंत असते. आत काम करणारे कर्मचारी पूर्ण 'पीपीई किट' घालून काम करत असतात. त्यांनी आतल्या वातावरणाला थोडंही एक्स्पोज होणं अपेक्षित नसतं.
'सिरम'नं लशीचे जे घटक आहेत त्याच्या निर्मितीला सुरुवात पहिल्या चाचण्यांचे निर्ष्कष आल्यावर केली.
सध्या लशीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा भारतासह जगभरात सुरु आहे. थोड्याच काळात तिसरा टप्पा सुरु होणार आहे.
त्याचे निष्कर्ष आल्यावर मग शेवटच्या परवानगीसहीत ही लस बाजारात येईल किंवा सरकारतर्फे सामान्य नागरिकांना देणं सुरु होईल.
त्याला किमान डिसेंबरपर्यंत वेळ लागण्याची शक्यता आहे. पण सध्याची आणीबाणी पाहता या शेवटच्या परवानगीपर्यंत उत्पादन थांबवणं शक्य नाही. त्यामुळे, परिणामी लस अयशस्वी होण्याचा धोका पत्करुनही, वेळेअगोदर काही डोसेस तयार असायला हवेत. याला 'ऍट रिस्क प्रॉडक्शन' म्हणतात. विशेष परवानगीने ते उत्पादन सुरू करण्यात आलं आहे. म्हणजे जेव्हा 'कोविशिल्ड'ला अंतिम परवानगी मिळेल, तेव्हा काही कोटी डोस आपल्या हातात असतील.
'सिरम इन्स्टिट्यूट'चे सीईओ आदार पूनावाला यांनी 'बीबीसी'ला विशेष मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले, " आम्ही या वर्षाखेरापर्यंत जवळपास 250 दशलक्ष डोसेस तयार करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. ते कसं पूर्ण होतं आहे ते प्रथम पहावं लागेल. आम्ही 5 ते 10 दशलक्ष डोसेस प्रत्येक महिन्याला बनवायला सुरुवात केली आहे. पुढच्या 2-3 महिन्यांत आम्ही हे उत्पादन तिपटीने वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे या वर्षाच्या अखेरीस 250 दशलक्ष लशीचे डोस तयार असतील."
एकीकडे उत्पादन सुरू झालं आहे आणि दुसरीकडे चाचण्याही सुरू आहेत. तिसऱ्या टप्प्यातली जगभरातल्या हजारो लोकांवरची चाचणी झाल्यावर डिसेंबर जानेवारीपर्यंत 'कोविशिल्ड' शेवटच्या परवानगीसह उपलब्ध होईल.
इतिहासात कोरोना वगळता एवढ्या वेगात अन्य कोणतीही लस आलेली नाही आहे. जेव्हापासून जगभरात अत्यंत वेगानं अनेक प्रगत देशांमध्ये कोरोना लशीच्या संशोधनाची प्रक्रिया सुरु झाली. असा वेग जगानं लसनिर्मितीसाठी कधीही पाहिलेला नव्हता.
एखाद्या लशीचं संशोधन पूर्ण होऊन, तिच्या प्राण्यांवरच्या आणि नंतर मानवावरच्या अनेक टप्प्यांतल्या चाचण्या पूर्ण होऊन, त्याचे अंतिम निष्कर्ष येऊन आणि मग ती द्यायला लागल्यावर मोठ्या लोकसंख्यमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी जातो.
मग आता रेकॉर्ड कालावधींत येणाऱ्या या लशींकडे पाहून त्यांच्या सुरक्षा मानकांबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. 'सिरम'च्या या भेटीत आम्हाला या डॉ. उमेश शाळीग्राम भेटतात जे संशोधन आणि विकास विभागाचे संचालक आहेत. त्यांच्या मते कोणत्याही लशीसाठी तडजोड केली गेली नाही आहे.
"सगळेजण फास्ट सगळं करण्याचा प्रयत्न करताहेत पण कुठेही बायपास घेत नाही आहेत. सगळेजण सिस्टिमेटिक डेव्हलपमेंट करताहेत. त्यात प्राण्यांवरच्या चाचण्या व्यवस्थित झालेल्या असतात, फेज वन झालेली आहे. ऑक्सफर्डची लस बघा, सगळ्या जगामध्ये त्याच्या ट्रायल्स सुरू आहेत. युकेमध्ये त्यांची 10 हजार लोकांवरची ट्रायल संपत आलेली आहे, ब्रझिलमध्ये मोठी ट्रायल सुरु आहे 4 हजारांवर, दक्षिण आफ्रिकेत सुरू आहे 2 हजार लोकांवरती आणि 30,000 लोकांवर अमेरिकेत ट्रायल सुरू केली आहे आणि भारतात 1600 जण आहेत. एवढा प्रचंड डेटा तयार होणार आहे. त्यात कुठेही बायपास घेण्यात आलेला नाही. फक्त ज्या वेगात हे घडतं आहे तो खूप प्रचंड आहे. कारण शेवटी तुम्हाला रिस्क बेनिफिट घ्यावा लागतो," डॉ शाळीग्राम म्हणतात.
'कोविशिल्ड' लस दोन भागांमध्ये घ्यावी लागेल
ही कोविशिल्ड लस दोन भागांची असेल. पहिला डोस घेतल्यावर, 28 दिवसांनी दुसरा 'बूस्टर डोस' घ्यावा लागेल. म्हणजे तेवढेच डोसेसची संख्याही वाढते. म्हणजे जेव्हा पूर्ण क्षमतेनं उत्पादन सुरू होईल तेव्हा डोसेसची संख्या अब्जावधींमध्ये असेल. तशी 'सिरम'ची क्षमता आहे.
म्हणजे जेव्हा 'सिरम'मध्ये एका प्रॉडक्शन लाईनवर लस 'व्हायल'मध्ये म्हणजे बाटल्यांमध्ये भरली जाते, तेव्हा इथं मिनिटाला 500 व्हायल्स भरल्या जातात.
एका व्हायलमध्ये 10 डोसेस असतात. म्हनजे मिनिटाला 5000 डोसेस. अशा अनेक प्रॉडक्शन लाईनवर उत्पादन जेव्हा सुरू होईल तेव्हा दिवसाची कोट्यावधी डोसेस निर्मितीची क्षमता असेल. त्यामुळे दोन भागांमध्ये दिल्या जाणाऱ्या या लशीच्या अब्जावधी डोसेसची गरज काही महिन्यांमध्ये पुरवता येईल. पण डोसेसची गरज का आहे?
याचं उत्तर देतांना डॉ. शाळीग्राम म्हणतात, "लस दिल्यावर तुमची प्रतिकारक शक्ती बूस्ट करावी लागते. तुमची पहिली इम्युनिटी तयार होत. त्यात 'टी सेल' इम्युनिटी असते आणि थोड्या एँटीबॉडी तयार होतात. पण ते जर तुम्ही बूस्ट केलं तर तुमच्या शरीरात एँटीबॉडीचं टायटर चांगल्या लेव्हलला राहतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही व्हायरसला एक्स्पोज होणार, तेव्हा ते टायटर जर चांगलं असेल तर त्याच्यामुळं डिसीज बर्डन रिडक्शन खूप लवकर होतं. म्हणजे व्हायरस तुमच्या शरीरामध्ये राहू शकणार नाही. म्हणून तुम्हाला टायटरची एक लेव्हल ठेवावी लागते. त्यामुळे दोन डोस घेतले की ते टायटर तसं राहण्याची शक्यता असते."
५० टक्के उत्पादन हे भारतासाठी
सहाजिक सर्वांसमोर पहिला प्रश्न हा आहे की ही लस कधी तयार होणार? 'कोविशिल्ड'बाबत त्याचं उत्तर हे आहे की डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीच्या सुरुवातीला ही लस तयार असेल.
दुसरा प्रश्न हा आहे भारतात तयार होणारी ही लस भारताला किती मिळणार आणि ती सर्वसामान्यांना परवडणार का? 'सिरम' ही लस थेट बाजारात न आणता केंद्र सरकारच्या ताब्यात देणार आहे. ती लस कशी वितरित करायची हा सरकारचा निर्णय असेल.
"मी हे अगोदरच स्पष्ट केलं आहे की जे काही आम्ही इथे बनवणार आहोत त्यातलं 50 टक्के उत्पादन हे भारतासाठी असेल. बाकीचं आपल्याला जगातल्या इतर देशांना पुरवावं लागेल. कारण ते देशही पूर्ववत सुरु झाले नाहीत तर त्यांचाही विश्वास परत येणार नाही. इथं केवळ आरोग्याचा नाही तर नैतिकतेचाही प्रश्न आहे. सगळेच जीव महत्वाचे आहेत, केवळ भारतीय नव्हे," आदार पूनावाला सांगतात.
पूनावाला पुढे म्हणतात, "सुरुवातीला मी असं म्हटलं होतं की 1000 रुपयांपर्यंत ही लस असेल. पण आता परिस्थिती पाहता त्यापेक्षाही अर्ध्या किंमतीला ती उपलब्ध असेल. त्यामुळे ती निश्चितच परवडण्यासारखी असेल. हे बहुतांशी सरकारवरही अवलंबून असेल कारण तेही आमच्याकडून ही लस विकत घेणार आहेत आणि लोकांना मोफत देणार आहेत. पण त्यासाठी सरकारला मोठं बजेट ठेवावं लागणार आहे. कारण इथं आपण 3 अब्ज डोसेसच्या गरजेबद्दल बोलतो आहोत."
अर्थात, 'कोविशिल्ड'ही एकमेव कोरोनावरची लस 'सिरम' बनवणार नाही आहे. या लशीसोबतच त्यांच्या 'नोवावैक्स' या कंपनीसोबतच त्यांचा लस बनवण्यासाठी करार झाला आहे.
स्वत: 'सिरम' त्यांच्या स्वत:च्या दोन कोरोना लशींवर सध्या काम करतं आहे. 'कोविशिल्ड' जरी परिणामांच्या आणि उत्पादनाच्या बाबतीत सर्वांच्या पुढे असली तरीही एका टप्प्यावर एवढ्या विविध कोरोना लशींचं उत्पादन एकट्या पुण्यात होत असेल.
तिसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचण्या
दुसरीकडे 'कोविशिल्ड'ची मानवी चाचणी भारतातही सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात 100 जणांना ही लस देण्यात आली आहे आणि आतापर्यंतचे परिणाम अपेक्षित, उत्साह वाढवणारे आहेत.
पुण्याच्या भारती हॉस्पिटलमध्येही यातलं काही लसीकरण सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्याही इथे होणार आहेत. पण सामान्य लोकांचा उत्साह एवढा आहे की हजारो जण स्वयंसेवक म्हणून लस टोचून घेण्यासाठी पुढे आले आहे.
डॉ संजय लालवानी, जे भारती हॉस्पिटलमध्ये या चाचण्यांचे मुख्य तपास नियंत्रक आहेत, ते म्हणतात, "आम्हाला फेज थ्री सुरू करायची आहे. आम्हाला कदाचित 100 किंवा 150 लोक रिक्रूट करावे लागतील. पण आमच्याकडे 2000 नावं अगोदरच आली आहेत. रोज जवळपास 100-150 मेल येताहेत की आम्हाला व्हॉलेंटिअर व्हायचं आहे. लोकांमधून खूप प्रतिसाद आहे."
येत्या पंधरवड्यात सुरू होणाऱ्या या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांसाठी जगभरातल्या हजारो स्वयंसेवकांना लस देण्यात येईल. भारतात 1600 जण या टप्प्यात असतील.
"यूकेमध्ये जवळपास 10,000 लोकांवर याची ट्रायल सुरू आहे. दक्षिण आफ्रिका आणी ब्राझिल इथंही हजारो लोकांवर ट्रायल सुरू आहे. अमेरिकेत जवळपास 40,000 लोकांवर ट्रायल सुरू होते आहे. त्यामुळे याच्यावर प्रचंड मोठा डेटा जनरेट होतो आहे. त्यामुळे अशा मोठ्या ट्रायल्स आपण परत केल्या पाहिजे याची गरज नाही. त्यामुळे आपल्या इथं जी ट्रायल सुरू आहे ती वेळेच्या दृष्टीकोनातून लक्षात घेता आणि तुम्हाला एवढ्या सगळ्या ट्रायल्स सगळीकडे करण्याची गरज नसते त्यामुळे इथे 1600 जणांवर ती होते आहे. पण तो आकडाही मोठा आहे. असं दिसतं आहे की काही रेअर साईड इफेक्ट जरी चुकून असले तरी ते डिटेक्ट करण्याची क्षमता यामध्ये आहे. त्यामुळे हा डेटाही अत्यंत पुरेसा आहे," असं 'सिरम'चे प्रसाद कुलकर्णी म्हणतात. सगळ्या मानवी चाचण्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
कोरोनाविरोधातली लसनिर्मिती निर्णायक टप्प्यावर आहे. तो निर्णायक टप्पा 'सिरम'मध्ये जाऊन पाहिल्यावर आम्ही हे नक्की म्हणू शकतो की मानवाचं कोरोनापासून वाचण्यासाठी वाट पाहणं लवकरच संपेल.
पण तोपर्यंत काळजी घेणं अत्यावश्यक आहे. भारतात यासोबत 'भारत बायोटेक'च्या कोवॅक्सिनचं काम सुरू आहे. रशियाची लस आलेली आहे, अमेरिकेची 'मॉडर्ना' अंतिम टप्प्यात आहे. जगत अन्यत्र अनेक प्रयोग सुरू आहेत. संपूर्ण जगानं अशी लढाई यापूर्वी क्वचितच लढली असेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)