You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अर्णब गोस्वामी : उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्या प्रकरणी हक्कभंग आणि अन्वय नाईक आत्महत्येच्या चौकशीचे आदेश
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला.
या प्रस्तावानंतर विधिमंडळात गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे विधिमंडळाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं आहे.
गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली.
जर या राज्यात पत्रकारांना कुणी काही बोललं किंवा त्यांना हात लावला तर या विधिमंडळाने पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा काढला पण जेव्हा एखादा पत्रकार लोक प्रतिनिधींबद्दल काही बोलतो त्यावर कारवाई व्हायला नको का असा प्रश्न परब यांनी विचारला.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी अर्णब यांनी महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका केली आहे.
याआधी सुशांत सिंह प्रकरणावरून संजय राऊत आणि अर्णब गोस्वामी यांच्यात जुंपली होती.
"रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासंदर्भात ज्या भाषेचा प्रयोग केला त्याचा मी निषेध करतो. माध्यम स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. अर्णब यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी," असं प्रताप सरनाईक म्हणाले.
सुपारीबहाद्दर पत्रकार म्हणून अर्णब गोस्वामींचा उल्लेख
अर्णब गोस्वामी वाट्टेल त्या भाषेत नेत्यांना बोलतात असं परब म्हणाले, "अर्णब यांना ते स्वत: न्यायाधीश असल्यासारखं वाटतं. हे उद्धव ठाकरे, हे शरद पवार अशा शब्दांत ते उल्लेख करतात. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी. या सदनाला पत्रकारांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा अधिकार आहे तसाच अश्लाघ्य भाषेचा उपयोग करणाऱ्या पत्रकारांविरोधात कारवाई करण्याचा अधिकारही सदनाला आहे.
"अशा भाषेचा उपयोग पंतप्रधानांच्या संदर्भात झाला तर कारवाई करण्यात येते. मग मुख्यमंत्र्यांसंदर्भात अशा भाषेचा उपयोग झाल्यास कारवाई का नाही? पंतप्रधानांना कोणी काही बोललं की तुम्हाला राग येतो, मग आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोणी वावगं बोलत असेल तर तुम्हाला राग येत नाही का? टिनपाट सुपारीबहाद्दर पत्रकारावर कारवाई व्हायलाच हवी," असं अनिल परब म्हणाले.
अन्वय नाईक आत्महत्येची चौकशी होणार - गृहमंत्री
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलीस पत्रकार अर्णब गोस्वामी यांची चौकशी करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
मे 2018 मध्ये इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत 'अर्णब गोस्वामीने रिपब्लिक स्टुडियोच्या इंटेरिअरचे पैसे थकवल्याचं' लिहिलं होतं. या प्रकरणी आज आमदार सुनिल प्रभू यांनी विधानसभेत अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात तक्रार करत या प्रकरणाची पोलीस चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, अन्वय यांच्या पत्नी आणि मुलीनेही आपल्याकडे तक्रार केल्याचं गृहमंत्री देशमुख यांनी सांगितलं. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, "विधानसभेत आमदार सुनिल प्रभू यांनी अर्णब गोस्वामी त्यांच्याबद्दल एक तक्रार दिलेली आहे. त्यामध्ये काही वर्षांपूर्वी अर्णब गोस्वामीचा जो रिपब्लिक स्टुडियो आहे, त्याच्या इंटिरिअरचं काम अन्वय नाईक या आर्किटेक्टला दिलं होतं. त्या अन्वय नाईक यांचे पैसे अर्णब गोस्वामीने दिले नाही. म्हणून अन्वय नाईक यांना आत्महत्या करावी लागली. याच्याबद्दलची रितसर तक्रार त्यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि त्यांची मुलगी प्रज्ञा नाईक यांनी माझ्याकडे दिलेली आहे. त्याबाबतची चौकशी महाराष्ट्र पोलीस करणार आहे."
अन्वय नाईक यांना न्याय मिळावा आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी काही दिवसांपूर्वीच #JusticeForAnvay अशी मोहीमही सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आपल्या कार्यक्रमात एकेरी उल्लेख करत सरकार पाडण्याची धमकी दिल्याप्रकरणी उद्धव ठाकरे फॅन क्लबच्या वतीने दोन दिवसांपूर्वीच नागपुरात पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
इतकंच नाही तर जून महिन्यात चुकीची पत्रकारिता, वस्तुस्थितीला न धरून रिपोर्टिंग करणे, धार्मिक तणाव वाढवणारे डिबेट शो करणे, प्रक्षोभक भाषा वापरणे याविरोधात पुण्यातही सामाजिक कार्यकर्ते निलेश नवलखा यांनी अर्णब गोस्वामींविरोधात पोलीस तक्रार केली आहे.
पालघर मॉब लिंचिंग प्रकरणावर आपल्या डिबेट शोमध्ये चर्चा करताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे आणि दोन धर्मात तेढ निर्माण करणारं रिपोर्टिंग करण्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांना राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गोस्वामींविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन वेळा गोस्वामी यांची चौकशीही केली आहे.
हे वाचलंत का?
- अन्वय नाईक प्रकरण काय आहे? ते आता का चर्चेत आलंय?
- संजय राऊत आणि अर्णब गोस्वामी यांच्यात सुशांत सिंह प्रकरणावरून का जुंपली?
- चांगली बातमी! ऑक्सफर्ड विद्यापीठात लस जवळपास अंतिम टप्प्यात
- कोरोना लस: 'या' भारतीयाने कोरोनावरच्या लशीसाठी प्राण पणाला लावले
- लाखो प्राण वाचविणाऱ्या लसींवर लोक आजही भरवसा का नाही करत?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)