रिया चक्रवर्तीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून अटक

रिया चक्रवर्तीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं अटक करण्यात आली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. अटकेनंतर रियाला आरोग्य तपासणीसाठी सायन रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

गेले 2 दिवस रियाला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. रिया चक्रवर्तीची NCB कडून कसून चौकशी करण्यात आली होती. आजही ( 8 सप्टेंबर ) रियाला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) भाऊ शौविकला अटक झाल्यानंतर आता रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार होती.

रियाला अटक झाल्यानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने ट्वीट करून "देव आमच्या बरोबर आहे," असं म्हटलंय.

रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी तीन चौकशी संस्था रिलाया त्रास देत असल्याचं म्हटलंय.

एएनआय न्यूज एजन्सीशी बोलताना सतीश मानेशिंदे म्हणाले, "तीन केंद्रीय तपास संस्था एकट्या महिलेला त्रास देत आहेत. अशी महिली जिने एका ड्रग्ज घेणाऱ्या मुलावर प्रेम केलं जो अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्याच्या समस्येशी लढत होता आणि शेवटी आत्महत्या केली."

रियाच्या अटकेनंतर बिहारचे जीडीपी गुप्तेशवर पांडे यांचंसुद्धा वक्तव्य आलं आहे.

ते म्हणाले, रिया चक्रवर्तीचा खरा चेहरा समोर आला आहे, ड्रग्ज विकाणाऱ्यांशी तिचे संबंध आहेत. एनसीबीच्या तपासात ते आढळून आलं म्हणूनच तिला अटक झाली आहे.

दरम्यान, रिया अटकेसाठी तयार असल्याचं तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आधी म्हटलं होतं.

"रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार आहे. हा एखाद्याचं 'विच हंटिंग' करण्याचा प्रकार आहे. निर्दोष असल्यामुळेच रियाने बिहार पोलीस तसंच CBI, ED आणि NCB कडून दाखल प्रकरणांमध्ये अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केला नाही. प्रेम करणं हा गुन्हा असेल, तर त्याची शिक्षा भोगायला ती तयार आहे," असं वकील सतीश मानेशिंदे यांनी म्हटलंय.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात कोर्टानं सुशांतच्या घरातील मदतनीस दीपेश सावंत यांना 9 सप्टेंबरपर्यंत NCB कोठडी सुनावली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दीपेश सावंत (NCB) यांना अटक केली होती.

NCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांच्या माहितीनुसार, "दीपेश सावंत यांना ड्रग्स खरेदी आणि देवाण-घेवाणप्रकरणी अटक करण्यात आलीय. डिजिटल पुरावे आणि जबाबांच्या आधारे दीपेश सावंत यांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची चौकशी सुरू आहे."

दुसरीकडे, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युएल मिरांडा यांची मुंबईतील एस्प्लनेड कोर्टाने 9 सप्टेंबरपर्यंत NCB च्या कोठडीत रवानगी केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) नेच या दोघांना सात दिवसांच्या कोठडीची कोर्टाकडे मागणी केली होती.

तसंच, NCB ने कैझन इब्राहिम यांच्या कोठडीचीही मागणी कोर्टाकडे केली होती. कैझन यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाच्या चौकशीदरम्यान या तिघांनाही NCB ने नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्सटन्सेस (NDPS) कायद्याअंतर्गत काल (4 सप्टेंबर) ताब्यात घेतले होते.

NCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांच्या माहितीनुसार, शौविक आणि मिरांडा यांना NDPS कायद्याच्या कलम 20 B, 27 A, 28 आणि 29 अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची (NCB) टीम शुक्रवारी सकाळी (04 सप्टेंबर) रिया चक्रवर्तीच्या मुंबईतल्या घरी पोहोचली होती. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युएल मिरांडा यांना दोन तासांमध्ये अटक होईल असे काल रात्री नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने स्पष्ट केले होते. एएनआयने केलेल्या ट्वीटमध्ये ही माहिती दिली होती.

NCB नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्सटन्सेस (एनडीपीएस) अॅक्ट अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करत आहे.

एका अधिकाऱ्यानं याबाबत सांगितलं होतं, "हा सामान्य चौकशीचा भाग आहे. त्यावरच आमची अंमलबजावणी सुरू आहे. रिया आणि सॅम्यूअल मिरांडाच्या घरी ही चौकशी सुरू आहे."

याप्रकरणी NCBनं झायद विलात्रा आणि अब्देल बसीत यांना अटक केली आहे.

सुशांतच्या वडिलांचा रियावर खुनाचा आरोप

दरम्यान, सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी रिया ही 'खुनी' असल्याचा थेट आरोप केला आहे.

"रिया माझ्या मुलाला बऱ्याच काळापासून विष देत होती. ती खुनी आहे. तपासयंत्रणांनी तिला आणि तिच्या सहकाऱ्यांना अटक करायला हवी," असा आरोप के. के. सिंह यांनी केला आहे.

तर रिया चक्रवर्तीनं सुशांतसोबतच्या व्हॉट्स अॅप चॅटचे काही डिटेल्स India Today सोबत शेअर केले असून, त्यात सुशांतनं त्याच्या बहिणविषयी शंका व्यक्त केल्याचा रियाचा दावा आहे.

व्हॉट्सअप चॅटची तपासणी

रियाच्या फोनमधील व्हॉट्स अॅप चॅटवरून नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं नव्यानं तपास सुरू केला आहे, असं वृत्त NDTVनं दिलं आहे.

रियानं अंमली पदार्थांची खरेदी आणि वापर केला होता का, याविषयी हा तपास सुरू आहे. त्यामुळं सीबीआय आणि अंमलबजावणी संचलनालय (ED) यांच्या पाठोपाठ NCB ही तिसरी संस्थाही या प्रकरणाच्या तपासात उतरली आहे.

रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी मात्र अंमली पदार्थांविषयीचे आरोप फेटाळून लावले आहेत. "रियानं आयुष्यात कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही. ती कधीही रक्त तपासणीसाठी तयार आहे," असं त्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)