सुशांत सिंह प्रकरण : CBI करणार चौकशी, पार्थ पवारांचं 'सत्यमेव जयते' ट्वीट

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयनं सीबीआयकडे सोपवली आहे. तसंच मुंबई पोलिसांना सर्व दस्तावेज सीबीआयला देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

पार्थ पवार यांनी मात्र यानंतर सत्यमेव जयते असं ट्वीट केलं आहे. त्यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावर शरद पवारांनी त्यांना फटकारलं होतं.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रत पाहिल्यानंतर त्याचा अभ्यास करू आणि मग त्यावर प्रतिक्रिया देऊ, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राजकीय बाबी बोलणं योग्य नसल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय.

महाराष्ट्र सरकार या निर्णयाला आव्हान देणार का याविषयी संजय राऊत म्हणाले, "याबाबत ऍडव्होकेट जनरलच बोलू शकतील. किंवा मग डीजी वा मुंबईचे कमिशनर सांगतील. याविषयी मी बोलणं उचित नाही. महाराष्ट्र राज्याची अशाप्रकारे बदनामी करणं योग्य नाही. महाराष्ट्राचं शासन, प्रशासन, गृहमंत्रालय, न्याय व्यवस्था नेहमीच या देशात सर्वोत्तम राहिलेली आहे."

तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल सुनावल्यानंतर नितेश राणेंनी ट्वीट केलंय, "अब बेबी पेंग्विन तो गियो!!! इट्स शोटाईम!"

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये लिहीलंय, "न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय! या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा!"

या सगळ्यामध्ये पार्थ पवारांच्या 'सत्यमेव जयते' या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. याविषयी विचारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांगितलं, "कुठल्याही गोष्टीचा कुठलाही अर्थ आपल्याला काढता येतो. त्याच्यात आपल्याआपल्या विचारावर खरंतर असतं. याचा अर्थ तुम्ही काय काढताय, हे मला त्याठिकाणी सांगता येणार नाही. मी एवढंच सांगतो सुशांतला न्याय मिळायला पाहिजे आणि महाराष्ट्र पोलिसांवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. त्या ट्वीटमध्ये काय लिहीलं, कसं लिहीलं, का लिहीलं हे मला आत्ता लगेच सांगता येणार नाही."

तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आपण स्वागत करत असल्याचं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलंय. ते म्हणाले, "सुरुवातीपासूनच आम्ही म्हणत होतो की ज्या पद्धतीने या चौकशीला अयोग्य दिशेने मुंबई पोलीस घेऊन जात आहेत, त्यामागचा बोलविता धनी, त्यामागचा हात कोणाचा आहे आम्हाला याचं स्पष्टीकरण आणि याचं उत्तर हवंय. सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना योग्य दिशेने काम करू दिलं जात नव्हतं, ही आमच्या मनातली शंका आहे. आणि राज्य सरकारमध्ये बसलेल्या पक्षांना आम्ही खडसावतोय आणि खबरदार म्हणून इशारा सुद्धा देतोय की यापुढे सीबीआयला जेव्हा चौकशी जाईल तेव्हा सकारात्मक भूमिका घ्या."

रिया चौकशीला उपस्थित राहील - वकील

"सुप्रीम कोर्टाने या प्रकारणी तथ्य आणि मुंबई पोलिसांच्या रिपोर्टचा अभ्यास केल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे दिलं आहे," रियाने ही हीच मागणी केली होती, असं तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी म्हटलंय.

"या प्रकरणी दोन्ही राज्यांनी एकमेकांवर राजकीय हस्यक्षेपाचा आरोप केला होता. त्यामुळे कोर्टाने या प्रकरणाची चौकशी न्यायाच्या दृष्टीने करण्यासाठी प्रकरण सीबीआयकडे देत आहे," असंही त्यांनी म्हंटलंय.

या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे गेल्याने रिया चौकशीला उपस्थित राहील. ज्याप्रकारे तिने मुंबई पोलीस आणि ईडीला सहकार्य केलं होतं, असं रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितलं आहे.

कोर्टानं काय म्हटलं?

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहे. तसंच पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल करणंही योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

या प्रकरणाचा मुंबई पोलीस तपास करत होते. मात्र, सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर बिहार पोलिसांनी केंद्र सरकारकडे विनंती करत सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली. याचा विरोध करणारी याचिका रिया चक्रवर्तीने दाखल केली होती.

11 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवत या प्रकरणातल्या सर्व पक्षकारांना सबमिशन्स सादर करण्यात सांगितलं होतं.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी 2 महिने FIR का दाखल केला नाही याचं उत्तर मुंबई पोलीस आयुक्तांनी द्यावं. तसंच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणी आता राजिनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

रियाची मागणी फेटाळली

पाटण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीचा तपास मुंबई पोलिसांकडे देण्याबाबत रियाने याचिका दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टानं आता संपूर्ण केस सीबीआयकडे दिली आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सुरुवातीपासून मुंबई पोलीस करत असून माझा जबाब मी त्यांच्याकडे नोंदवला आहे, असं रियानं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं होतं.

आपण सुशांतची गर्लफ्रेंड असल्याचं रियाने सांगितलं आहे. पण सुशांतच्या वडिलांनी आपल्या मुलाचा मृत्यू रियामुळे झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी 25 जुलैला पाटण्यातील राजीव नगर पोलीस स्टेशनमध्ये रिया विरोधात गुन्हा नोंदवला होता.

मी आदित्य ठाकरेंना कधी भेटले नाही की बोलले नाही: रिया चक्रवर्ती

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू असून तिने मंत्री आदित्य ठाकरे यांना ओळखत नसल्याचं तसंच त्यांच्याशी कोणत्याही स्वरुपाचं संभाषण झालं नसल्याचं पोलिसांना सांगितलं आहे.

रियाच्या वतीने तिचे वकील सतीश मान शिंदे यांनी हे वक्तव्य जारी केलं आहे. "रिया आदित्य ठाकरेंना कधीच भेटली नाही. ते शिवसेनेचे नेते आहेत इतकंच तिला ठाऊक आहे", असं ते म्हणाले. त्याचसोबत अभिनेता डिनो मोरियाला रिया फक्त कार्यक्रमांमध्ये भेटली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

रिया आदित्य ठाकरेंना ओळखत नाही आणि तिने कधीच त्यांची भेटसुद्धा घेतली नाही. रियाने कधीच फोनवरून किंवा इतर कोणत्या माध्यमांतून त्यांच्याशी संपर्क साधला नाही किंवा बोलली नाही. तर अभिनेता डिनो मोरियाला रिया ओळखत असून इंडस्ट्रीतील एक कलाकार म्हणून काही कार्यक्रमांमध्ये दोघांची भेट झाली होती.'

सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी ईडी रिया व तिच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहे.

याविषयी तिच्या वकिलांनी पुढे म्हटलं, "रियाला मुंबई पोलीस व ईडीने समन्स बजावले होते. तिला बोलावण्यात आलेल्या सर्व तारखांना ती चौकशीसाठी उपस्थित होती. मुंबई पोलीस व ईडीने रिया आणि सुशांत यांच्यातील नातं आणि तिच्या आर्थिक गोष्टींबाबत कसून चौकशी केली.

"याप्रकरणी मुंबई पोलीस आणि ईडीने रियाचा फोन, लॅपटॉप आणि तिचा डीएनएसुद्धा घेतला आहे. यासोबतच तिचे बँक स्टेटमेंट्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स, सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर आणि इलेक्ट्रॉनिक डेटा मुंबई पोलीस व ईडीने घेतले आहेत. पोलिसांच्या तपासाचा अहवाल सुप्रीम कोर्टाला सुपुर्द करण्यात आला आहे. 

डिसेंबर 2019 मध्ये रिया सुशांतच्या घरी राहायला गेली असंही त्यांनी त्यात स्पष्ट केलं. एप्रिल 2019 मध्ये एका पार्टीला रिया व सुशांतने हजेरी लावली होती. त्यानंतर ते दोघं डेट करू लागले.

सुशांतच्या वांद्रे इथल्या राहत्या घरी रिया डिसेंबरमध्ये शिफ्ट झाली आणि 8 जून 2020 पर्यंत रिया व सुशांत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. 8 जून रोजी रियाने सुशांतचं घर सोडलं. 14 जून रोजी राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)