You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फेसबुक: राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर फेसबुकचे प्रत्युत्तर, 'आमचे धोरण सर्वांनाच लागू'
अमेरिकेतील एका वृत्तपत्रातील बातमीचा आधार घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअपवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) कंट्रोल आहे. ते या माध्यमातून द्वेष पसरवतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
त्यांच्या या विधानाला फेसबुकच्या प्रवक्त्यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की फेसबुकची धोरणं सर्वांनाच सारखी लागू होतात. कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या पक्षासाठी ती समानच आहेत असे स्पष्टीकरण फेसबुकने दिले आहे.
द्वेष पसरवणारे वक्तव्य मग ते कोणत्याही पक्षाचं असो किंवा संघटनेचं असो ते आम्ही आमच्या धोरणाप्रमाणे रोखतो असं फेसबुकने म्हटलं आहे. या क्षेत्रात भरपूर काम होणं अद्यापही बाकी आहे याची फेसबुकला जाणीव आहे आणि आम्ही ते करत आहोत.
भाजप नेते तसंच माहिती व प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या आरोपांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
पराभूत मनोवृत्तीचे लोक संपूर्ण जगावरच भाजप आणि RSS चा कंट्रोल असल्याचं वक्तव्य करत आहेत असा टोमणा रविशंकर प्रसाद यांनी लगावला आहे.
रविशंकर प्रसाद ट्वीट करून म्हणाले, "पराभूत व्यक्ती आपल्या पक्षातील लोकांवरसुद्धा प्रभाव पाडू शकत नाहीत. ते जगावर भाजप आणि RSS चं नियंत्रण असल्याचं बोलत असतात."
लेखात काय लिहिलंय?
वॉल स्ट्रीट जनरल या वृत्तपत्रात नुकताच एक लेख प्रकाशित झाला होता. "फेसबुक हेट-स्पीच रुल्स कोलाईट विथ इंडियन पॉलिटिक्स" असं या लेखाचं शीर्षक होतं.
सत्ताधारी भाजपशी संबंधित नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांसंदर्भात फेसबुक डोळेझाक करतो, नियमांमध्ये सूट दिली जाते, असा दावा या लेखात करण्यात आला आहे.
यामध्ये तेलंगणमधील भाजप खासदार टी राजासिंह यांच्या एका पोस्टचा उल्लेख करण्यात आला आहे. यात त्यांनी अल्पसंख्याक समाजाविरुद्ध हिंसेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या बातमीत फेसबुकमधील विद्यमान आणि माजी कर्मचाऱ्यांशी बातचीत केल्याचं सांगण्यात आलं आहे.
फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनी राजा यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतातील फेसबुकच्या वरीष्ठ अधिकारी अनखी दास यांनी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांवर हेट स्पीच नियम लागू करण्याचा विरोध केला.
वॉल स्ट्रीट जनरलच्या बातमीनुसार, भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाई केल्यास कंपनीच्या देशातील व्यवसायाचं नुकसान होईल, भारत हीच फेसबुकसाठी मोठी बाजारपेठ आहे, असं फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी डायरेक्टर अनखी दास यांनी कर्मचाऱ्याला सांगितलं.
पण या लेखात प्रकाशित झालेली माहिती बीबीसीने स्वतंत्रपणे पडताळलेली नाही.
बातमीनंतर राजकारण तापलं
ही बातमी छापून आल्यानंतर भारतात राजकारण तापल्याचं दिसून आलं. ट्वीटरवर याप्रकरणी चर्चा होऊ लागली. ट्रेंड सुरू झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि RSS वर निशाणा साधला आहे.
पण रविशंकर प्रसाद यांनी आपल्या आधीच्या आरोपांची आठवण करून दिली.
निवडणुकीपूर्वी माहितीचा वापर शस्त्रासारखा करण्यासाठी केंब्रिज अॅनालिटीका आणि फेसबुकसोबत तुमचं संगनमत रंगेहाथ पकडलं गेलं होतं. आता आम्हाला प्रश्न विचारण्याची तुमची हिंमत कशी झाली?" असं प्रसाद म्हणाले.
तसंच रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांनाच प्रतिप्रश्न विचारला आहे. राहुल गांधी यांनी बंगळुरू हिंसाचाराचा निषेध का नोंदवला नाही, असं ते म्हणाले.
सध्या माहितीची उपलब्धता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं लोकशाहीकरण झालं आहे. तुमच्या कुटुंबीयांचे सेवक हे नियंत्रित करत नाहीत, यामुळे तुम्हाला दुःख होतं.
आतापर्यंत बंगळुरू दंगलीचा तुम्ही निषेध नोंदवल्याचं ऐकिवात नाही. तुमचं धाडस कुठे गायब झालं?
काँग्रेसची जेपीसीद्वारे चौकशीची मागणी
फेसबुकवर गंभीर आरोप करणारी ही बातमी प्रकाशित होताच काँग्रेस नेते अजय माकन यांनी रविवारी एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी संयुक्त संसदीय समितीकडून फेसबुक आणि व्हॉट्सअप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हे प्लॅटफॉर्म निवडणुकीत भाजपची किती मदत करतात, याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे, असं माकन म्हणाले.
वॉल स्ट्रीट जनरलची ही बातमी त्यांनी फेसबुक मुख्यालयाच्या निदर्शनास आणून दिली, या प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी फेसबुककडेसुद्धा केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)