You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई पाऊस: देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर निशाणा नालेसफाई की हातसफाई?
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर आलेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या
1. नालेसफाई की हातसफाई? देवेंद्र फडणवीस यांचा राज्यसरकारवर निशाणा
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवरून मुंबईत नालेसफाई झाली की हातसफाई?, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.
मंगळवारी एका दिवसात मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यातल्या आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. या पावसाने मुंबईत बरंच नुकसानही केलं. अनेक रस्ते जलमय झाले, घरांमध्ये पाणी शिरलं. काही ठिकाणी छप्परही उडून गेली. तर अनेक ठिकाणी झाडं पडली.
या सर्व नुकसानीसाठी मुंबईची अपुरी नालेसफाई जबाबदार असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
"ज्या गतीने पम्पिंग स्टेशनची उभारणी करायला हवी होती तशी झालेली नाही. त्यामुळेच दक्षिण मुंबईत पाणी साचलं", असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. गेल्या 15 वर्षांत महापालिकेने केलेल्या दुर्लक्षाचा हा परिणाम असल्याचंही ते म्हणाले.
तर दुसरीकडे अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून नुकसान झालेल्या मुंबईकरांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
या पत्रात भातखळकर यांनी म्हटलं आहे, "दरवर्षीप्रमाणे तुंबणारे पाणी अशी ही परिस्थिती नाही. ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करा आणि मुंबईकरांना मदत करा."
2. दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक संपादक मुरलीधर शिंगोटे यांचे निधन
दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक संपादक मुरलीधर शिंगोटे यांचे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. वृत्तपत्र विक्रेता ते मुंबई चौफेर, पुण्यनगरी, दैनिक वार्ताहर, दैनिक यशोभूमी अशा विविध वृत्तपत्रांचे ते मालक आणि संपादक होते.
- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
कर्नाटक मल्ला, तामिळ टाइम्स ही बिगर मराठी वृत्तपत्रं सुद्धा त्यांच्या समूहाकडून प्रकाशित होत होती. ही बातमी दैनिक सामनाने दिली आहे.
3. वंचित बहुजन आघाडीचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
कोव्हिड-कोव्हिड करणं थांबवा आणि व्यवहार सुरू करा. नाहीतर 10 तारखेनंतर रस्त्यावर उतरू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, "कोरोना काळात पंतप्रधान कार्यालय ते जिल्हा पातळीपर्यंत चालढकल करणं सुरू आहे. सरकारने कोव्हिड-कोव्हिड करणं थांबवावं. फक्त मोबाईलच्या कॉलरट्युनवरून देशात अनलॉक आहे म्हणून सांगू नये. ते प्रत्यक्षात लागू करावे."
ते पुढे म्हणाले, "राज्याचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. शासन स्वतःहून निर्णय का घेत नाही. सर्व निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयावर सोडले आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने एक वेळा पत्रक ठरवून या दिवसापासून सर्व व्यवहार सुरू होतील, असं सांगावं."
2019 च्या वर्षभरात जेवढी माणसं दगावली तेवढीच 2020 च्या कोरोना काळात दगावली आहेत. त्यामुळे सरकारने कोरोनातून बाहेर पडून सर्व व्यवहार सुरू करावे. नाहीतर 10 ऑगस्टपासून आम्ही लॉकडाऊन पाळणार नाही, असा इशाराही आंबेडकर यांनी सरकारला दिला आहे.
4. उद्धव आणि आदित्य ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या महिलेविरोधात मुंबई सायबर विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनैना होले असं या महिलेचं नाव आहे. युवा सेनेचे पदाधिकारी आणि वकील धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यापासून ते सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापर्यंत सर्वच प्रसंगांवर पोस्ट करत ही महिला मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करत असे.
काही पोस्टमध्ये अतिशय खालच्या पातळीवरच्या भाषेचा वापर केल्याचा तर काहींमध्ये मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याचा मिश्रा यांचा आरोप आहे. या महिलेने पोस्ट केलेल्या एका फोटो उद्धव ठाकरे यांना मौलवीच्या वेषात दाखवलं आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याचं वकील धर्मेंद्र मिश्रा यांचं म्हणणं आहे.
या प्रकरणी संबंधित महिलेला अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आलं. सायबर पोलीस या महिलेचं ट्वीटर अकाउंट तपासत आहेत. त्यानुसार पुढील कारवाई होईल.
5. दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून या आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्याच्यावर याआधीही गुन्हे दाखल आहेत.
पश्चिम विहार परिसरात 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानतंर तिच्यावर धारदार शस्त्राने वारही करण्यात आले. मुलीची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
झी न्यूजने ही बातमी दिली आहे.
आरोपी घरफोडी करत असताना या मुलीने त्याला बघितलं आणि ती ओरडली. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने तिच्यावर बलात्कार करून नंतर तिला गंभीर जखमीही केलं. आरोपीवर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहे. 2006 साली त्याच्यावर खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
या बलात्कार प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 20 पथकं तयार केली होती. या पथकांनी शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि अनेकांची चौकशी केली. अखेर आरोपीला अटक केल्याची माहिती दिल्लीच्या पोलीस सहआयुक्तांनी दिल्याचं पीटीआने म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)