जी. सी. मुर्मू नवे कॅग, सरकारी खात्यांवर ठेवणार नजर

जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर जी. सी. मूर्मू हे नवे कॅग म्हणजेच ऑडिटर अॅंड कम्प्ट्रोलर जनरल होतील अशी चर्चा होती. जी. सी. मूर्मू यांची कॅग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राजीव महर्षी हे 7 ऑगस्टला निवृत्त झाले त्यांच्या जागी गिरीश चंद्र मुर्मू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारी खात्यांचे ऑडिट करण्याची जबाबदारी कॅगवर असते. यापूर्वी कॅगच्या अहवालांनी देशात राजकीय वादळ उठल्याचं आपण पाहिलं आहे.

माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांची जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सिन्हा यांना जीसी मुर्मू यांच्या जागी जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलंय.

बुधवारी (5 ऑगस्ट) अचानक मुर्मू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्यात आलं, या घटनेला 5 ऑगस्टला एक वर्ष पूर्ण झालं. मुर्मू यांनी नेमका याच दिवशी राजीनामा दिला आहे.

मनोज सिन्हा मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात रेल्वे राज्यमंत्री होते. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. गाझीपूरमधून ते निवडणूक लढवत होते.

कोण आहेत जी. सी. मुर्मू?

साठ वर्षीय माजी आयएएस अधिकारी गिरीश चंद्र मुर्मू यांना गेल्या वर्षी 29 ऑक्टोबरला जम्मू-काश्मिरचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं.

गुजरात केडरचे अधिकारी असलेले मुर्मू नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना राज्याचे मुख्य सचिव होते.

गेल्या वर्षी 5 ऑगस्टला संसदेनं जम्मू काश्मिरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केलं आणि त्याला केंद्रशासित प्रदेश बनवलं.

लडाखलाही वेगळं करून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला.

31 ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख अधिकृतरित्या केंद्र शासित प्रदेश बनले. त्यानंतर दोन्ही ठिकाणी नायब राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली.

राधाकृष्ण माथुर यांना लडाखचं नायब राज्यपाल बनवण्यात आलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)