You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई पाऊस: शरद पवारांचं दक्षिण मुंबईच्या पावसाबद्दलचं मत कितपत खरं आहे?
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मान्सूनचे कोडे कोणालाच पूर्णपणे उलगडता आले नसले तरी भारतात पडणाऱ्या पावसात ठराविक वर्षांमध्ये काही बदल घडून आलेले दिसतात. अशा प्रकारचे अनेक चढ-उतार पावसाळ्यात दिसून येतात.
मुंबईला गेले तीन दिवस पावसानं झोडपलं आहे. त्यातही दक्षिण मुंबईत कुलाबा परिसरात मोठा पाऊस झाला आहे. यामुळे दक्षिण मुंबईत विविध ठिकाणी अगदी मंत्रालयाजवळही पाणी साचलं.
परवाच्या दिवशी दक्षिण मुंबईत खासदार सुप्रिया सुळे यांनी गाडीमधूनच एक फेसबुक लाइव्ह केलं. मंत्रालय परिसरात साचलेल्या पाण्याला पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचं एक निरीक्षण नोंदवलं आहे.
निवडणुकीच्या काळात साताऱ्यामध्ये भर पावसात झालेली सभा आणि शरद पवार यांचा पावसात भिजत असूनही भाषण करत असल्याचा व्हीडिओ प्रसिद्ध झाला होता. या पावसातल्या सभेने निवडणुकीचं वारं बदललं असं म्हणतात.
दक्षिण मुंबईत पाणी साठण्याच्या मतामधून त्यांना कदाचित मुंबई महानगरपालिकेच्या कामावर बोट ठेवायचं असेल आणि पर्यायाने शिवसेनेकडेही असाही अर्थ त्यांच्या वक्तव्यातून घेतला गेला. परंतु शरद पवार यांच्या पावसाबद्दलच्या आताच्या निरीक्षणामागे राजकीय नसून हवामानशास्त्रीय कारणं आहेत. मुंबईच्या पावसाबद्दल त्यांचं निरीक्षण का महत्त्वाचं आहे ते पाहू.
पाऊस सुरू होण्याची तारीख, पावसाची वारंवारता, सातत्य, पावसाचे दिवस यामध्ये दरवर्षी बदल होताना दिसतो. गेल्या वर्षी तसेच या वर्षीही जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबई, कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झालेला दिसून येतो. यावर्षीही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच जास्त पाऊस झाल्याचं दिसून येतं.
शरद पवार काय म्हणाले?
या फेसबूक लाइव्हमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार गाडीमधून यशवंतराव चव्हाण सेंटरमधून त्यांच्या निवासस्थानी जात असल्याचे दिसते. रस्त्यावर साचलेलं पाणी पाहून या दोन्ही नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं असून शरद पवार यांनी या परिसरात अशी स्थिती पहिल्यांदाच पाहात असल्याचं सांगितलं. सुप्रिया सुळे यांनी तर आपण समुद्रातूनच जात आहोत असं वाटत असल्याचं सांगितलं आहे.
1967 साली शरद पवार पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत गेले. त्यापूर्वीही ते विद्यार्थी असताना विधानसभेच्या प्रेक्षकदीर्घेत गेल्याची आठवण त्यांनी आणि त्यांचे मित्र खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितली आहे.
याचाच अर्थ गेल्या 50 ते 55 वर्ष विधानसभेच्या निमित्ताने त्यांचं या परिसरात जाणं-येणं आहे. त्यामुळे तिथल्या पावसाची एकप्रकारची निरीक्षणातून तयार झालेली मानवी नोंद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे परवा पडलेल्या पावसाचे नक्की स्वरुप कसे होते ते जाणून घ्यावं लागेल.
यंदाच्या मुंबईच्या पावसाचं वेगळेपण काय आहे?
महाराष्ट्रात आणि मुंबईत यावर्षी वादळी पावसाचं प्रमाण जास्त असल्याचं मत इंग्लंडमधल्या रेडींग विद्यापीठातील हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी व्यक्त केलं.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "या पावसाळ्यात मुंबईमध्ये महिन्याचा सगळा पाऊस त्या महिन्यातील काही दिवसांमध्ये पडताना दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर जून ते सप्टेंबर (122 दिवस) मधील सरासरी पाऊस हा यंदा जवळपास 65 दिवसांमध्येच पडला आहे. मुंबईत पाऊस जोरदार झाला असला तरी अजूनही तलावक्षेत्रात तितका जोराचा पाऊस झालेला नाही."
3 ते 6 ऑगस्ट या काळात मुंबईत एवढा पाऊस का पडला?
गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबईमध्ये पडलेल्या पावसामागचं तात्कालिक कारण सांगताना अक्षय देवरस म्हणाले, "3 ते 6 ऑगस्ट या काळात मुंबईजवळील समुद्राच्या वर द्रोणीय आकाराचा एक कमी दाबाचा पट्टा होता. ही स्थिती काही नवीन नाही. अशा स्थितीमुळे या पूर्वीदेखील जोरदार पाऊस पडला आहे.
परंतु यंदा या स्थितीबरोबरच एक वेगळा कमी दाबाचा पट्टा तयार झाला जो 5 तारखेला मुंबईच्या खूपच जवळ होता. यामुळे वारे चक्राकार फिरू लागले आणि त्यांनी समुद्रावर तयार झालेल्या ढगांना 5 तारखेला दक्षिण मुंबईकडे ढकलायला सुरुवात केली.
या ढगांनी दक्षिण मुंबई ओलांडल्यावर ते क्षीण होत गेले. त्यामुळे दक्षिण मुंबईच्या तुलनेत 5-6 दरम्यान शहराच्या इतर भागांत तितक्या तीव्रतेची हवा आणि पाऊस झाला नाही."
दक्षिण मुंबईतला पाऊस
मुंबईमध्ये कुलाबा आणि सांताक्रुझचा विचार केला तर जून ते सप्टेंबर कालावधीमधला सरासरी पाऊस हा कुलाब्यापेक्षा सांताक्रुझमध्ये 200 मिमी हून अधिक पाऊस पडतो.
गेल्या चाळीस वर्षांचा विचार केला तर ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीच्या दिवसांत कुलाब्यात साधारण 150 ते 250 मिमी पाऊस पडला आहे. परंतु यावर्षी 5-6 ऑगस्ट या कालवधीत 331.8 मिमी इतका पाऊस पडला. तर याच काळात सांताक्रुझमध्ये 162.3 मिमी इतकाच पाऊस पडला. त्यामुळे दक्षिण मुंबईत दरवर्षी अतिवृष्टीत होणाऱ्या पावसा पेक्षा यंदा जास्त पाऊस झाला हे स्पष्ट आहे.
दक्षिण मुंबईच्या पावसाबद्दल अक्षय देवरस आणखी एक निरीक्षण मांडतात.
ते म्हणाले, "साधारणपणे मान्सून सक्रीय असताना जमिनीवर वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग (विंड गस्ट) खूप तर प्रतीताशी 40 ते 50 किमी इतका असतो; मात्र परवा झालेल्या पावसाच्या वेळेस दक्षिण मुंबईत हा 100 किमी प्रतितासाहून अधिक होता. त्यामुळे एका कमी तीव्रता असलेल्या चक्रीवादळासारखं दक्षिण मुंबईत नुकसान झालं."
5 ऑगस्ट रोजी कुलाबा वेधशाळेने केवळ 9 तासांमध्ये 229.6 मिमी इतकी पावसाची नोंद केली. पावसाची ही तीव्रता आधीच्या वर्षांशी तुलना करता फारच जास्त असल्याचे दिसून येते. खालील ट्वीटमधील आलेखाचे निरीक्षण करता हा पाऊस किती जास्त होता याचा अंदाज येतो.
'चटकन कोणताही निष्कर्ष काढू नये'
गेल्या चार दिवसांमध्ये मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसावरुन कोणताही निष्कर्ष चटकन काढू नये असे मत भारतीय हवामान विभागाचे माजी मुख्यसंचालक डॉ. रंजन केळकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले, ''मान्सून गेले हजारो वर्षं पडतो आहे आणि आपल्याकडची माहिती केवळ 100 ते दीडशे वर्षांतली आहे. त्यामुळे मान्सूनच्या बदलांबाबत तात्काळ काहीच मत मांडता येणार नाही.
मान्सून हा नेहमीच कमी-अधिक प्रमाणात, थोडा मागे-पुढे होत असतो. मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबईत एका दिवसात 22 ते 25 सेंटीमीटर पाऊस पडणं काहीच वेगळं नाही. आपल्याकडे कोकणात, महाबळेश्वरला मेघालय-आसामच्या तोडीचा पाऊस पडतो हे विसरता येणार नाही.''
मग गेल्या काही वर्षांमध्ये एखाद दिवस पाऊस पडला तरी तो रौद्र वाटू लागतो, लगेचच पाणी साठून नुकसान होते त्यामागचे काय कारण असावे यावर 'नियोजनाचा अभाव' असे मत केळकर यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, "शंभर वर्षांपासून पावसामध्ये काहीच फरक नाही. परंतु ब्रिटिशांनी तयार केलेल्या ड्रेनेज सिस्टिमवर आथा वाढलेल्या लोकसंख्येचा ताण आला आहे. तेव्हाचे नियोजन त्यावेळच्या लोकसंख्येला अनुसरून होतं. परंतु आज मुंबईची लोकसंख्या पाहाता ती व्यवस्था अगदीच तोकडी आहे."
मुंबईच्या पश्चिम भागात, पश्चिम किनाऱ्यावर जास्त पाऊस पडल्याचं निरीक्षणही केळकर यांनी मांडलं. ते म्हणाले, ''यावर्षी मुंबईच्या पूर्व भागात आणि जेथे मुंबईला पाणी पुरवठा करणारी तळी आहेत तेथे सुरुवातीच्या काळात पाऊस कमी पडला परंतु मुंबईच्या पश्चिमेस पावसाचा जोर होता. त्यामुळेच मुंबईला पाणी पुरवठा करण्यात अडथळा येईल की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु आता त्या भागातही पाऊस वाढल्यास तळी पूर्ण भरतील आणि पाणीपुरवठा सुरळीत होईल असे चांगले संकेत दिसत आहेत.''
पाणी जाणार तरी कोठे?
शहरनियोजनकार चंद्रशेखर प्रभू यांनी दक्षिण मुंबईत अशा प्रकारे पाणी भरण्याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
ते म्हणतात, "शहराचं नियोजन करताना वसई, उरण सारखे अनेक प्रदेश कमी उंचीचे तसेच राहू दिले होते. मात्र कालांतराने या प्रदेशात मोठ्या प्रमाणात भर घालून नव्या जमिनीची निर्मिती करण्यात आली. म्हणजेच रिक्लमेशन करण्यात आलं.
वांद्रे-कुर्ला परिसरातही मोठ्या प्रमाणात रिक्लमेशन झालं. पूर्वी मोठ्या भरतीच्या वेळेस आणि जास्त पावसांच्या दिवसात पाणी या प्रदेशात साठायचं परंतु त्यांची उंचीही वाढल्यामुळे दक्षिण मुंबईत रस्त्यांवर पाणी आल्याचं दिसून येतं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)