You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : रशियात लशीला ऑगस्टमध्ये मान्यता?
रशियात कोरोना विषाणूवरच्या लशीसंदर्भात स्थानिक यंत्रणांची परवानगी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आरोग्यसेविकांना ही लस देण्यात येईल असं या प्रक्रियेशी संलग्न सूत्रांनी सांगितलं. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.
मॉस्कोस्थित रशिया सरकारच्या संशोधन केंद्रात अर्थात गामालेया इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावर लस तयार करण्याचं काम सुरू होतं. जुलै महिन्यात माणसांवर या लशीची चाचणी घेण्यात आली. ऑगस्टमध्ये लशीची मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्यात येईल.
मोठ्य़ा प्रमाणावर चाचण्या सुरू असतानाच नियामक यंत्रणांकडून लशीला हिरवा कंदील मिळेल अशी चिन्हं आहेत. कोरोनावर लशीला परवानगी देणारा रशिया पहिलाच देश ठरू शकतो.
कोरोनाच्या लशीकरता रशियाच्या वेगावर पाश्चिमात्य देशांनी साशंकता दर्शवली आहे. राष्ट्राभिमानासाठी रशियाने शास्त्रोक्त प्रक्रिया आणि सुरक्षितता यांना झुगारून तर दिलं नाही ना अशी चर्चा सुरू आहे.
ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये लशीला नियामक यंत्रणांकडून परवानगी मिळू शकते. 10 ऑगस्ट ही परवानगी मिळू शकण्याची तारीख असू शकते. 15 ऑगस्टपूर्वी नक्कीच परवानगी मिळेल असं सूत्रांनी स्पष्ट केलं.
15 ऑगस्टपर्यंत भारतात लस उपलब्ध होणार नाही. भारतात लस उपलब्ध होण्यासाठी किमान 7-8 महिन्यांचा कालावधी लागेल असं तज्ज्ञ सांगत आहेत. याविषयची सविस्तर बातमी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. जगभरात लसीवर कुठे कुठे संशोधन सुरू आहे यावरची बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
आतापर्यंत लशीच्या चाचण्यांचे निष्कर्ष अतिशय उत्साहवर्धक असल्याचंही त्यांनी सांगितलं.
लशीला नियामक यंत्रणांकडून परवानगी मिळाल्यानंतर कोव्हिड-19 रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य सेवकांना लस देण्यात येईल.
लस शोधण्याचं काम नियंत्रित करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेने यासंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र लस झटपट तयार व्हावी यासाठी शास्त्रीय तसंच सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला आहे.
आरोग्य मंत्रालय सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करत आहे. लहानातील लहान मुद्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलेलं नाही, असं या संस्थेचे प्रमुख किरील डिमिट्रोव्ह यांनी सांगितलं.
रशियाने 1957 साली स्पुतनिक हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला होता. रशियाचे शास्त्रज्ञ स्पुतनिकसाठी जसे झटले होते तसंच आता काम करत आहेत असं किरील यांनी सांगितलं.
रशिया अन्य देशांमध्ये सुरू असलेल्या कोरोना लशीसंदर्भातील गोपनीय माहिती चोरत असल्याचा आरोप ब्रिटनच्या नॅशनल सायबर सेक्युरिटी सेंटरने केला होता. रशियाने हे आरोप फेटाळले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शंभरहून अधिक लशी तयार करण्याचं काम जगभरात अनेक ठिकाणी सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, चार देशांमध्ये लशीची मानवी चाचणी चौथ्या टप्प्यात पोहोचली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)