सोनू पंजाबन : देहविक्रीला समाजसेवा म्हणणारी ही महिला कोण होती?

    • Author, चिंकी सिन्हा
    • Role, पत्रकार, बीबीसीसाठी

सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. थंडीचे दिवस होते. बहादूरगढला बसमधून उतरताच 17 वर्षांच्या त्या मुलीने पुढे होऊन चालत जाताना जवळच्या पोलीस स्टेशनचा पत्ता विचारला होता. समोरच नजफगढचं पोलिस स्टेशन होतं.

9 फेब्रुवारी 2014च्या सकाळी ती मुलगी पोलीस स्टेशनात हजर होती. रोहतकच्या राजपाल नावाच्या माणसाकडे तिची काही कागदपत्रं आहेत. ते कागद मिळवून द्या, असं ती पोलिसांना म्हणाली.

तिच्यावर झालेल्या सर्व अन्यायाची कहाणी तिने समोर बसलेल्या पोलिसांना सांगितली. तिला कसं डांबण्यात आलं, त्रास देण्यात आला, कशा पद्धतीने शोषण करण्यात आलं हे तिने सांगितलं. पोलिसांनी डायरीत सगळं टिपून ठेवलं.

सगळं कथन करताना तिने सोनू पंजाबनचं नाव घेतलं. देहविक्रय करवून घेणाऱ्यांमध्ये तिचाही समावेश होता. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर करून घेतली.

पोलीस ज्या वेळेस त्या मुलीची तक्रार दाखल करून घेत होते तेव्हा दिल्लीतल्या कुख्यात सेक्स रॅकेटची म्होरक्या सोनू पंजाबन अटकेत होती. काही महिन्यांनंतर सोनूची शिकार झालेली ती मुलगी गायब झाली. मात्र 2017 मध्ये अगदी रहस्यमय पद्धतीने ती मुलगी प्रकट झाली. सोनू पंजाबनला पुन्हा अटक करण्यात आली. यानंतर तीन वर्षांनंतर दिल्लीतल्या एका न्यायालयाने तिला दोषी ठरवलं आणि 24 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

अनेक वर्ष ती पोलिसांना गुंगारा देत राहिली. अश्लाघ्य अपराध घडवून आणणाऱ्या महिला गुन्हेगाराला झालेली अटक चर्चेचा विषय ठरली. सोनूने जे केलं ते चांगल्या स्त्रीच्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध होतं.

न्यायाधीशांच्या मते, सोनू सभ्य समाजात राहण्याच्या लायकीची नाही. दिल्लीत आपलं रॅकेट चालवणाऱ्या मुलींची दलाल नेहमी सांगत असे की, त्रासलेल्या मुलींसाठी तारणहार आहे. परिस्थितीने गांजलेल्या मुलींना तिने आश्रय दिला.

महिलांचा स्वत:च्या शरीरावर अधिकार आहे, असं सोनू सांगते. ते शरीर कोणाला विकायचं हे त्या ठरवू शकतात. हे काम करण्यासाठी ती मदत करत असे. आपण सगळेच थोड्या फार फरकाने काही ना काही विकत असतो- आपले गुण, कलाकौशल्य, प्रेम, आत्मा वगैरे वगैरे.

मात्र यावेळी खरेदी-विक्रीच्या या धंद्याची शिकार एक अल्पवयीन मुलगी होती.

सोनू पंजाबनला तुरुंगावसाची शिक्षा ठोठावताना न्यायाधीश प्रीतम सिंह यांनी म्हटलं की, महिलांची अब्रू तिच्या आत्मसन्माएवढीच अमूल्य आहे. दोषी गीता अरोरा उर्फ सोनू पंजाबन हिने स्त्री असल्याच्या सगळ्या मर्यादांचं उल्लंघन केलं आहे. कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा तिला सुनावण्यात यावी.

अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर केली अटक

सोनू पंजाबन हिच्याविरुद्ध करण्यात आलेली तक्रार 2015 मध्येच क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आली होती. 2017 मध्ये क्राईम ब्रँचचे डीसीपी भीष्म सिंह यांनी या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला. 2014 मध्ये गांधीनगरच्या घरातून पळून गेलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली.

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर ती मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

नोव्हेंबर महिन्यात पोलिसांनी तिला यमुना विहारमधून शोधून काढलं. तिथे ती आपल्या काही मित्रांबरोबर राहत होती. त्यावेळी सोनू पंजाबनची 2014च्या मकोका केसप्रकरणी सबळ पुराव्याअभावी सुटका करण्यात आली होती. मात्र त्या मुलीचा शोध लागताच 25 डिसेंबर 2017 रोजी सोनूला अटक करण्यात आली.

शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर सोनू पंजाबनने खूप साऱ्या पेनकिलर्स खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तिला रुग्णालयात नेण्यात आलं. काही तासांतच तिची प्रकृती स्थिर असल्याचं सिद्ध झालं.

कठोर शिक्षेपासून वाचण्यासाठी तिने असं केलं असावं. न्यायाधीशांनी थोडी दया दाखवावी, असं तिला वाटलं असेल. मात्र न्यायाधीशांनी कोणतीही दयामाया दाखवली नाही.

ड्रग्सचं इंजेक्शन

खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश म्हणाले की, सोनू पंजाबनने पीडित मुलींच्या स्तनावर मिरचीची पावडर टाकली. जेणेकरून भीतीने त्या तिच्या कह्यात राहतील. आपल्या जबानीत त्या मुलीने ड्रग्सचं इंजेक्शन देण्यात आल्याचंही सांगितलं.

गाई म्हशींचं दूध काढण्यासाठी दिलं जाणारं इंजेक्शन होतं. हे इंजेक्शन शरीराला झटपट तयार करतं.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनूच्या अलिखित गुन्ह्यांची यादी मोठी आहे. तिच्या क्रूर मानसिकतेची असंख्य उदाहरणं आहेत. ती याहून अधिक धोकादायक असेल. ज्या मुलीच्या तक्रारीवरून सोनू पंजाबनला अटक करण्यात आली तिला तिने विकत घेतलं होतं.

तिच्या रॅकेटमध्ये अनेक गृहिणी आणि कॉलेजला जाणाऱ्या मुलींचा समावेश होता. त्या मुलींच्या देहविक्रयासाठी सोनू सगळी व्यवस्था करत असे आणि त्याच्या बदल्यात कमिशन घेत असे. हे सगळं परस्पर सहमतीने होत असे. अन्य दलालांकडून अल्पवयीन मुलींना विकत घेऊन ती ग्राहकांना पुरवत असे.

या मुलींना विकण्याआधी सोनू त्यांना कैदेत डांबून ठेवत असे. या मुलींना ग्राहकांकडे टप्प्याटप्प्याने पाठवण्यात येत असे. जेणेकरून दलालांना आपापल्या भागात मुलींचा पुरवठा करण्यात अडचण येऊ नये.

न्यायाधीशांनी सांगितलं की, सोनूने एक महिला असण्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या.

डीसीपी सिंह यांच्या मते सोनू एक भयंकर अशी स्त्री आहे. तिला कशाचाही भीती नाही आणि कसलाही पश्चाताप नाही.

मी तिला अल्पवयीन मुलींच्या खरेदी-विक्रीविषयी विचारल्यावर तिनं म्हटलं, की मला काही ठाऊक नाही. ती जाणीवपूर्वक असं बोलत होती. तिला माहिती होतं की ते जे करत आहे ते चुकीचं आहे. आपल्या समाजात असं मानलं जातं की महिलांवर महिला अशा स्वरुपाचे अत्याचार करू शकत नाहीत.

सोनू सभ्य समाजात राहण्याच्या लायकीची नाही?

सोनूला 24 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. भारतीय दंड संहितेच्या 328, 342, 366अ, 372, 373, 120 ब याच्यासह अनैतिक व्यापार रोखण्यासाठीच्या कायद्याच्या कलम 4, 5, 6 नुसार सोनूला शिक्षा सुनावण्यात आली.

पॉक्सो कायद्यानुसारही सोनूला दोषी ठरवण्यात आलं. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रीतम सिंह यांनी सोनूला शिक्षा सुनावताना तिला 64 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. न्यायालयाने सोनूचे सहआरोपी संदीप बेडवालला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. पीडित मुलीला त्याने नुकसानभरपाई म्हणून सात लाख रुपये द्यावेत असंही न्यायालयाने सांगितलं.

पोलिसांच्या मते, सोनूच्या जुलमांची शिकार ठरलेल्या मुलीने 2014 मध्ये स्वत:च्या मर्जीने घर सोडलं होतं. ती नशेत होती आणि हे सहन करू शकत नव्हती. तिच्या बहिणीचं लग्न होतं. या कार्यात आपण अडचण ठरू नये, असं तिला वाटत होतं.

सुनावणीनंतर निर्णय जाहीर करताना 'एलप्रेक्स' नावाच्या औषधाचा उल्लेख झाला होता. पीडित मुलगी नैराश्याने ग्रासलेली होती आणि या औषधाचा वापर करत होती. काही माणसं धमक्या देत असल्याचं या मुलीने तक्रारीत म्हटलं होतं.

प्रदीर्घ काळ बेपत्ता राहिल्यानंतर या मुलीचा ठावठिकाणा पोलिसांनी शोधून काढला. तिचं समुपदेशन करण्यात आलं. तिला नव्याने आयुष्य सुरू करण्यात मदत करण्यात आली. तिचं लग्नही झालं. तिला एक मुलगाही झाला आहे. ती आपल्या आईवडिलांबरोबर राहते.

लग्नानंतर सासरकडच्या लोकांनी तिला सोडून दिलं. मुलाचे आईवडील काहीही बोलणी करण्यास तयार नव्हते. ती मुलगी फोनवर बोलत नाही. तपास अधिकारी पंकज नेगी यांच्या मते, मुलीला आपला विजय झाला आहे असं वाटत आहे. तिला आता बरं वाटतं आहे.

सोनू पंजाबनच्या विरोधात न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की, महिलेची अब्रू तिच्या आत्म्याप्रमाणेच अमूल्य आहे. कुठलीही स्त्री एखाद्या अल्पवयीन मुलीच्या आत्मसन्मानाशी अशा पद्धतीने छेडछाड कशी करू शकते. तिची अब्रू ती अशा भयंकर पद्धतीने कशी मांडू शकते? अमानुष आणि लाजिरवाण्या कृत्यांसाठी कोणत्याही न्यायालयाकडून दयेस पात्र ठरू शकत नाही. अशा पद्धतीचं घृणास्पद कृत्यं करणारा माणूस सभ्य समाजात राहण्याच्या लायकीचा नाही, मग तो पुरुष असो की महिला. अशा माणसांसाठी तुरुंग हीच योग्य जागा आहे.

सोनू पंजाबनला मी पहिल्यांदा 2011 मध्ये दिल्लीतल्या एका न्यायालयात बघितलं. न्यायाधीशांसमोर हात जोडून ती उभी होती. तिचे केस पिंजारलेले होते. ती थकल्यासारखी वाटत होती. नशेच्या सवयीतून बाहेर पडण्यासाठीचा कोर्स ती करत आहे, असं पोलिसांचं म्हणणं होतं. तिहार तुरुंगात आपल्या कोठडीत ती झोपलेली असे.

त्या दिवशी न्यायालयात सुनावणीनंतर दुपारी सोनू हिला बसने तिहार तुरुंगात नेण्यात आलं. बसच्या खिडक्यांना सुरक्षेच्या कारणास्तव ग्रिल बसवण्यात आलं होतं. सोनू बसमधल्या थेट शेवटच्या जागेवर जाऊन बसली. मी पार्किंगमध्ये उभी होते.

जसं तिने मला पाहिलं, मी तिला सांगितलं की भेटायला येणाऱ्यांच्या यादीत माझं नाव लिही. मला आठवतंय की, जुलै महिना होता. प्रचंड गरम होत होतं. त्यांनी माझं नाव विचारलं. अनेक दिवस तिहार तुरुंगात फोन करून मी विचारत असे की, सोनू पंजाबनच्या अभ्यागत यादीत माझं नाव आहे. तिकडून सांगण्यात येई की सोनूला भेटायला येणाऱ्यांच्या यादीत सहा जणांची नावं आहेत, त्यात तुमचं नाव नाही.

अटकेच्या वेळेस वय होतं 30

सोनू पंजाबन तपासप्रकरणी सब इन्स्पेक्टर कैलाश चंद तपास अधिकारी होते. मेहरोली पोलीस स्टेशनात त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की सोनूला अडकवण्यासाठी सापळा रचण्यात आला होता.

कैलाश सांगत होते की, अटकेत असताना सोनूशी रात्र रात्रभर बोलत असे. पाच दिवस तिला या पोलीस स्टेशनमध्ये अटकेत ठेवण्यात आलं होतं. कैलाश सोनूसाठी सिगारेट, चहा आणि जेवण आणत असत. बदल्यात ती तिची कहाणी सांगत असे.

मेहरोलीत कैलाश चंद यांनी सोनूला पकडलं तेव्हा तिचं सौंदर्य पाहून ते हरखून गेले होते. मोबाईलमध्ये तिचे त्यांनी फोटोही काढले होते. मात्र आता हे फोटो धूसर झाले आहेत.

2011 मध्ये अटकेच्या वेळी सोनूचं वय 30 होतं. देहविक्रयाच्या धंद्यात पडल्यानंतर दीड वर्षातच तिने हे सोडून दिलं होतं. तोपर्यंत तिने स्वत:चं चालवण्यासाठी तिने नेटवर्क तयार केलं होतं.

पोलिसांनी सोनूकडून ग्राहक आणि संपर्कातील लोकांची यादीही ताब्यात घेतली होती. तिच्या मोबाईलमधील फोनबुकही जप्त करण्यात आलं होतं. सोनूच्या रॅकेटमध्ये शहरातल्या प्रतिष्ठित कॉलेजात शिकणाऱ्या मुलीही होत्या. त्या याकरता कॉन्ट्रॅक्टवर काम करत असत.

सोनूने कैलाश चंद यांना सांगितलं होती की, वेश्याव्यवसाय लोकसेवा आहे. आम्ही पुरुषांच्या मोकळं होण्याची सोय करतो. आम्ही महिलांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यात मदत करतो. तुमच्याकडे शरीर सोडून विकण्यासारखं काहीही नसेल तर ते जरूर विकावं. लोक काही ना काही विकतच असतात. हे बोलणं लिखित स्वरुपात चार्जशीटमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

पोलिसांशी बोलताना सोनू वारंवार सांगत असे की, ती समाजाला आवश्यक सेवा पुरवत आहे. आमच्यासारख्या महिला नसतील तर कितीजणींवर बलात्कार होईल ते सांगता येणार नाही.

ती सांगायची की, वासना एक बाजार आहे. हा बाजार नसेल तर समाजात अनागोंदीचं वातावरण होईल. नैतिकता वगैरे गोष्टी तिने खूप आधीच डोक्यातून दूर केल्या होत्या.

माझ्या एका डायरीत सोनू पंजाबनने पोलिसांनी ऐकवलेली एक गोष्ट सापडली. सोनूने अशा एका महिलेचा उल्लेख केला जिचा नवरा तिला मारायचा. तिच्याशी जबरदस्तीने सेक्स करायचा. तिला तो एक पैसाही देत नसे. त्यांचा एक मुलगा होता. त्याचं शिक्षण चांगलं व्हावं, तो मोठा व्हावा असं तिला वाटत असे.

कैलाश चंद यांना ती म्हणाली होती की, यात त्या महिलेचा काय दोष आहे? तिचं लग्न झालं आहे. म्हणून तिने स्वत:च्या इच्छा, आकांक्षा मारून टाकल्या आहेत. जो माणूस तिला मारहाण करतो तो तिच्याशी शरीरसंबंध ठेवतो. या माणसापासून वाचण्यासाठी तिच्याकडे एकच उपाय आहे तो म्हणजे शरीर. समाजाच्या दृष्टीने तिचं काम वाईट मानलं जाईल.

पोलिस सांगतात की, सोनू अतिशय हुशार होती. चांगले कपडे घालत असे. तिच्यात खूप आत्मविश्वास होता. 2017 मध्ये तिला पुन्हा पकडण्यात आलं. पोलिसांना हे माहिती होतं की तिच्याकडून गोष्टी वदवून घ्यायच्या असतील तर तिचं चांगलं आदरातिथ्य करायला हवं. म्हणूनच तिच्यासाठी रेड बुल एनर्जी ड्रिंक, सँडविच, बर्गर आणि पिझ्झा आणण्यात येत असे.

कैलाश चंद यांच्याप्रमाणे यावेळीही पोलीस तिच्याकरता सिगारेटची व्यवस्था करत. यावेळी तिने आपली कहाणी सांगितली आणि वेश्या व्यवसायाच्या समर्थनार्थ अजब तर्कही सांगितले. बेपत्ता झालेल्या मुलीला ती ओळखत याचा सोनूने इन्कार केला. यावेळी नशिबाने तिची साथ दिली नाही.

अनैतिक देहव्यापार रोखण्यासाठीच्या कायद्यानुसार 2007 मध्ये तिला प्रीत विहारमध्ये पकडण्यात आलं होतं. जामीनावर असताना 2008 मध्ये तिला याच गुन्ह्यांकरता पकडण्यात आलं होतं.

2011 मध्ये देहविक्रयाच्या व्यापारासंदर्भात तिला पकडण्यात आलं. त्यावेळी तिच्यावर मकोका कायदाही लावण्यात आला. दहशतवादी आणि गँगस्टर यांना पकडण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. 2002 मध्ये दिल्ली पोलिसांनी मकोका कायद्याचा प्रयोग करायला सुरुवात केली.

सोनूच्या दृष्टीने देहविक्रय ही जनसेवा

2019 मध्ये सोनूला पॅरोलवर सोडण्यात आलं होतं. त्यावेळी टीव्ही वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमध्ये तिने असं सांगितलं की, पोलीस तिला हैराण करत आहेत. कोणत्याही मुलीने ती दलाल असल्याचं 'ऑन रेकॉर्ड' सांगितलं नाही. ती लोकांना सुविधा पुरवत राहिली.

लग्न तुटलेल्या किंवा नवरा चांगलं वागवत नसलेल्या महिलांना आश्रय देत आहे असं ती भासवत असे. आपल्या घरी नवऱ्याच्या त्रासाने बेजार झालेल्या महिलांना मदत करते आहे असं सोनू सांगत असे. जीवनाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या महिलांची मदत करू पाहते आहे असं ती सांगत असे. त्यांना ठाऊक होतं की त्यांची कहाणी चर्चेचा विषय ठरणार आहे.

गुन्हा आणि पीडित अशी दोन्ही विश्वं सोनूला माहिती होती. ती दोन्ही जगांमध्ये वावरली होती. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या फुकरे तसंच 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या फुकरे रिटर्न्समध्ये भोली पंजाबनचं पात्र सोनूच्या कहाणीवर बेतलेलं होतं. दोन्ही चित्रपटात रिचा चढ्ढाने भोली पंजाबनची भूमिका साकारली होती.

सोनू पंजाबनवर मकोका खटला लावण्यात आला तेव्हा आरएम तुफैल यांनी तिच्या वतीने केस लढली होती आणि तिला सोडवलंही होतं. सोनूला 24 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर ते म्हणाले, हा खूप मोठा कालावधी आहे. या खटल्यात सोनूची बाजू मी मांडली होती. या निर्णयाविरोधात अपील करणार आहे.

भीक मागणं आणि वेश्या व्यवसाय हे जगातले दोन सगळ्यात जुने व्यवसाय आहेत. याबद्दल कोणालाच काही ठोस माहिती नाही. सगळेजण नैतिकतेच्या गोष्टी करतात. त्या गोष्टींचा आता राग येतो, असं तुर्केल म्हणाले.

पूर्व आणि दक्षिण दिल्लीत कोट्यवधी रुपयांचं सेक्स रॅकेट चालवणारी सोनू 2011 मध्ये मकोका अंतर्गत अटकेमुळे बातम्यांमध्ये आली होती. वर्तमानपत्रांमध्ये सोनूसंदर्भात ज्या बातम्या छापून आल्या त्यानुसार तिची राहणी आलिशान स्वरुपाची होती. तिची अनेक प्रेमप्रकरणं आहेत आणि किमान चार पती आहेत. सगळे कुख्यात गँगस्टर आहेत. यापैकी काही पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले गेले आहेत.

सोनूने या संबंधांना लग्न म्हणण्यास नकार दिला. तिच्या मते पोलिसांनीच सोनू पंजाबन असं तिचं नाव ठेवलं. लहानपणापासून आईवडील तिला सोनू नावाने हाक मारायचे. एक नवरा हेमंत उर्फ सोनू याच्याकडून घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं.

2003 मध्ये तिच्या विजय नावाच्या एका नवऱ्याचा उत्तर प्रदेशात एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर ती दीपक नावाच्या मित्राबरोबर राहू लागली. दीपक गाड्या चोरत असे. पोलिसांनी गुवाहाटीत झालेल्या चकमकीत दीपकला मारलं. त्यानंतर ती दीपकचा भाऊ हेमंत उर्फ सोनू याच्याबरोबर राहू लागली. हेमंत हाही गुन्हेगारच होता. आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हेमंतने बहादूरगढमध्ये एका माणसाची हत्या केली होती. सोनूच्या सांगण्यानुसार हेमंतचाही एका एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता.

हेमंतच्या मृत्यूनंतर तिला एकटं वाटू लागलं होतं. तिचे दोन भाऊ बेरोजगार होते. वडिलांचं निधन झालं होतं. मुलगा आणि आईची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. त्यावेळी त्यांनी कॉल गर्ल होत देहविक्रयाच्या कामात प्रवेश केला.

आणखी लग्नं केल्याचा सोनू इन्कार करते. पोलीस आणि मीडियाच्या मते विजयच्या मृत्यूनंतर सोनूची चार लग्नं झाली आहेत. पाचव्या नवऱ्याव्यतिरिक्त बाकी सगळ्यांचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे.

तपास अधिकारी पंकज नेगी सांगतात, सोनूच्या फोनमध्ये या सगळ्या व्यक्तींबरोबर तिचे फोटो आहेत. केसात सिंदूर भाळून ती या लोकांबरोबर उभी आहे. फोटोवरून एवढं कळतं की ते पती-पत्नी आहेत.

गीता मग्गू ते सोनू पंजाबन

सोनू पंजाबनचा जन्म 1981 साली गीता कॉलनीत झाला होता. तिचं नाव गीता मग्गू होतं. तिचे आजोबा पाकिस्तानातून शरणार्थी म्हणून आले होते. हरियाणातल्या रोहतकमध्ये ते स्थायिक झाले होते. तिचे वडील ओमप्रकाश दिल्लीला आले आणि स्थायिक झाले. ते रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत असत.

त्यांचं कुटुंब पूर्व दिल्लीतल्या गीता कॉलनी भागात राहत असे. सोनूला तीन भाऊबहीण होते. एक मोठी बहीण आणि दोन भाऊ. सोनूच्या मोठ्या बहिणीचं बालाचं लग्न सतीश उर्फ बॉबी नावाच्या माणसाशी झालं होतं. सतीश आणि त्याचा छोटा भाऊ विजय यांनी त्यांची बहीण निशाचं अफेअर असलेल्या व्यक्तीची हत्या केली होती. या गुन्ह्यासाठी दोघांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. पॅरोलवर सुटल्यानंतर 1996 मध्ये गीताने विजयशी लग्न केलं.

2011 मध्ये मी पहिल्यांदा त्यांच्या घरी गेले तेव्हा दगडांच्या पुढ्यात उभ्या असलेल्या विजयचा फोटो पाहिला होता. तो प्रेमविवाह होता. त्यावेळी तिचं वय जेमतेम 15 वर्ष होतं. त्यांना एक मुलगा झाला. मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा तो मुलगा 9 वर्षांचा होता.

तो त्यावेळी आईची वाट बघत होता. टॉय कार घेऊन येईन, असं तिने मुलाला सांगितलं होतं. तुरुंगातून तिचा फोन येतो, असं तो सांगतो. पारस आता 17 वर्षांचा आहे. पोलिसांच्या मते पारसला आपल्या आईविषयी सगळं काही ठाऊक आहे.

सोनूच्या कुटुंबीयांनी एका मुलीला दत्तक घेतलं होतं. मात्र विजयच्या मृत्यूनंतर दत्तक देणारे तिला घेऊन गेले. लग्नानंतर सात वर्षांनंतर विजयचा मृत्यू झाला. त्यावेळी तो पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता.

सोनू पंजाबनच्या वडिलांचं 2003 मध्ये निधन झालं. त्यानंतर तिने प्रीत विहारमध्ये ब्युटीशियन म्हणून काम करायला सुरुवात केली. तिथे तिची ओळख नीतू नावाच्या महिलेशी झाली. तिनेच देहविक्रयाच्या कामाबद्दल सोनूला सांगितलं.

रोहिणी भागात राहणाऱ्या किरण नावाच्या महिलेसाठी सेक्स वर्कर म्हणून काम करू लागली.

या कामासाठी तिने सुरुवातीला पर्यावरण कॉम्प्लेक्सच्या बी ब्लॉकमध्ये एक खोली घेतली. त्यानंतर फ्रीडम फायटर कॉलनी, मालवीय नगर आणि शिवालिक भागात जागा भाड्याने घेतली. दिल्लीतल्या सैदुल्लाजाब परिसरात अनुपम एन्केल्वहमध्ये तिने अपार्टमेंट खरेदी केली. संजय मखीजा नावाच्या माणसाकडून तिने ही जागा घेतली होती.

पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, संजय मखीजा आणि सोनू पंजाबन यांचे जुने संबंध आहेत. सोनू पंजाबच्या कामात, आधी सेक्स वर्कर म्हणून आणि नंतर हाय क्लास दलाल म्हणून काम करताना राजू शर्मा उर्फ अजय तिचा सहकारी होता.

राजू सुरुवातीला सोनूकडे स्वयंपाकाचं काम करत असे. त्यानंतर तो तिचा ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. तोही दलालीचं काम करत असे. सोनू पंजाबनच्या बरोबरीने त्यालाही दोनदा अटक करण्यात आली होती.

त्यांचा धंदा जोरात सुरू होता. सोनू आपल्या ग्राहकांसाठी कुक आणि क्लीनर ठेवत असे.

जसजसा सोनूचा कामाचा पसारा वाढत गेला तसं राजू आऊटस्टेशन म्हणजे बाहेरच्या शहरातल्या ग्राहकांचं काम करू लागला. दोघांनी आपापल्या एजंट्सच्या माध्यमातून कामाचं जाळं विणलं.

पोलिसांना दिलेल्या माहितीत सोनूने विविध भागात तिच्यासाठी दलालीचं काम करणाऱ्या एजंट्सची नावं घेतली. तांत्रिकदृष्ट्या ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते परंतु एकत्र मिळून काम करत असत. एखाद्या भागात सोनूचा ग्राहक असेल आणि तिथे मुलगी मिळत नसेल तर दुसऱ्या दलालाकडून मुलगी पुरवण्याची व्यवस्था केली जात असे. बाकी दलालही गरज पडली तर तसंच करत असत. परंतु त्यांच्यात आपापसात प्रचंड स्पर्धा होती.

तपास अधिकारी नेगी यांच्या मते, सोनूने या क्षेत्रात पाऊल ठेवलं तेव्हा सुरक्षा देणं आणि नेटवर्कसाठी 60 टक्के कमिशन घ्यायला सुरुवात केली.

तिची गाडी रात्री शहरात 500 किलोमीटरपर्यंत धावत असे. ही गाडी मुलींना लोकेशनहून पिक अप करत असे आणि क्लाएंट सर्व्हिससाठी शहरातल्या विविध ठिकाणी सोडत असे.

तिच्या कैदेत असणाऱ्या मुलींसाठी सोनू सर्वाधिक मार्जिन म्हणजेच पैसे घेत असे. या मुलींना तिने विकत घेतलेलं असे. अशाच एका अल्पवयीन मुलीने तिच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.

दिल्लीतील एक हायप्रोफाईल दलाल इच्छाधारी बाबा सध्या तिहार तुरुंगात आहेत. सोनूने पोलिसांना पुरावे देऊन इच्छाधारी बाबाला पकडून दिलं होतं.

अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये जेव्हा एखादी जागा रिकामी होते तेव्हा काही करून ही जागा भरली जाते. याप्रकरणातही हेच झालं. इच्छाधारी बाबाच्या अटकेनंतर सोनूने आपला धंदा आणखी विस्तारला.

सोनू पंजाबनला झालेली अटक चॅनेल्ससाठी हेडलाईन झाली होती. गुलाबी कार्डिगन आणि ब्ल्यू जीन्स पेहरावातील तिचे फोटो प्रसारमाध्यमांनी टिपले होते. अन्य मुलाखतींमध्ये ती लेदर जॅकेट, पिवळं झंपर आणि शाली अशा पेहरावात पाहायला मिळाली.

टीव्ही चॅनेलवर तिचा चेहरा दिसत असे. तिच्या गुन्ह्यांचा पाढा वाचून दाखवला जात असे. सुसंघटित सेक्स रॅकेट म्हणून तिच्या कामाचं उदाहरण दिलं जात असे.

सोनूची अधुरी एक कहाणी

सोनू पंजाबनच्या अटकेमुळे आणि प्रदीर्घ शिक्षेमुळे बाकी माणसं असे गुन्हे करण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. मात्र पोलिसांच्या मते सेक्स रॅकेट चालवणाऱ्या माणसांना न्यायालयाच्या प्रक्रियेतून शिक्षेपर्यंत नेणं अत्यंत अवघड आहे.

अल्पवयीन मुलीने धैर्य दाखवून सोनूविरुद्ध तक्रार दाखल केली नसती तर सोनूला पकडणं कठीण झालं असतं, असं भीष्म सिंह सांगतात.

सोनू पंजाबनला जेव्हा मी भेटले तेव्हा तिचं वय होतं 31. आता तिने चाळिशी पार केली आहे. तिला ठोठावण्यात आलेली शिक्षा लक्षात घेतली तर ती 64व्या वर्षी तुरुंगाच्या बाहेर येईल. तोपर्यंत ती कोणाच्या लक्षातही राहील की नाही शंकाच आहे. काही दिवसातच प्रत्येकजण आपापल्या विश्वात मश्गुल होऊन जाईल.

तूर्तास लांच्छनास्पद कृत्यासाठी सोनूची निर्भर्त्सना करण्यात आली. ती सभ्य समाजात राहायच्या लायकीची नाही असा शेरा न्यायालयाने दिला. त्यादिवशी अभ्यागतांच्या यादीत तिने माझं नाव लिहिलं असतं तर कदाचित मला तिचं म्हणणं ऐकायला मिळालं असतं. ज्या महिलेविरुद्ध एवढं लिहिलं गेलं आहे, बोललं गेलं आहे तिचं भावविश्व नेमकं कसं आहे हे जाणून घेता आलं असतं.

आता जोपर्यंत आता ती स्वत:हून काही सांगत नाही तोपर्यंत तिची कहाणी जगासमोर येणार नाही. पोलिसांच्या फाईल्समध्ये करण्यात आलेल्या नोंदी, तिच्याबाबत सांगण्यात येणारे किस्से, लोकांची मतं आणि न्यायालयाचा आदेश यांनीच तिच्या गोष्टीचा प्लॉट व्यापला आहे.

कोणत्याही परिस्थितीत ही सर्वसमावेशक गोष्ट नाही. जोपर्यंत ही गोष्ट अपूर्ण आहे तोपर्यंत 2001 मध्ये माझ्या नोटबुकमध्ये लिहिलेली तिची गोष्ट आठवत राहील. सब इन्स्पेक्टर कैलाश चंद यांना ती म्हणाली होती, मी जशी आहे त्याचा माझ्या कामाशी काहीएक संबंध नाही. माझ्या धंद्यावरून माझी ओळख बनवू नका.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)