सामूहिक बलात्कारानंतर पीडितेलाच तुरुंगात का डांबण्यात आलं?

ही लढाई तुझी एकटीची नाही, असा विश्वास एखाद्या बलात्कार पीडितेला कायदा व्यवस्था, समाज आणि प्रशासन किती प्रमाणात देतात? पोलीस स्टेशन, कार्यालयं आणि समाजात पीडितेचा अनुभव कसा असतो?

बिहारमधील अररियामधील बलात्कार पीडित आणि तिच्या दोन मित्रांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तुरुंगात डांबलं गेलं. न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवून घेत असतानाच हा प्रकार घडला.

बलात्कार पीडितेला 10 दिवसांनी जामीन मिळाला. मात्र, तिला मदत करणारे तन्मय आणि कल्याणी हे दोन्ही मित्र अजूनही तुरुंगातच आहेत.

जामीन मिळाल्यानंतर बलात्कार पीडितेनं बीबीसीशी बोलताना न्यायासाठीचा तिचा संघर्ष सांगितला. या बलात्कार पीडितेची ही व्यथा ऐकल्यानंतर हेही लक्षात येईल की, बलात्कारासारखी हिंसा सहन केल्यानंतरही पीडित पुढे येऊन व्यथा मांडत का नाहीत.

सामूहिक बलात्कारानंतर...

माझं नाव खुशी (नाव बदलेलं आहे) आहे. सहा जुलैच्या रात्री माझ्यावर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर जगासाठी हेच माझं नाव आहे. आता मी 10 दिवस तुरुंगात जाऊन आलेय.

हो, बरोबर ऐकलंत तुम्ही. बलात्कार माझ्यावरच झाला आणि तुरुंगात सुद्धा मलाच जावं लागलं. माझ्यासोबत माझ्या मित्र-मैत्रिणींनाही तुरुंगात जावं लागलं. कल्याणीताई आणि तन्मयदादा हे दोघेही माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले होते. मात्र, त्यांनाही तुरुंगात जावं लागलं.

पुढच्या लढाईत सुद्धा हे दोघे माझ्यासोबत असतील, याची खात्री आहे. त्या दोघांना अजूनही तुरुंगातच ठेवलंय.

10 जुलैच्या दुपारची वेळ असेल. आम्हाला तिघांना अररिया महिला पोलीस ठाण्यात आणलं आलं. त्यानंतर न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवायचा होता. पोलिसांनी सांगितलं होतं की, कलम 164 अन्वये असा जबाब सगळ्यांना नोंदवावा लागतो.

कल्याणी ताई, तन्मय दादा, मी आणि आणखी काहीजण पायी चालतच अररिया जिल्हा कोर्टात पोहोचलो. आम्ही कुणी शाळेतही गेलो नाहीय. त्यामुळे लिहिता-वाचता येत नाही. मी आता 22 वर्षांची आहे. या 22 वर्षांत मी खूप काही पाहिलंय आणि त्यातून शिकलेय.

कल्याणीताई आणि तन्मयदादा यांच्या घरी मी काम करते. त्यांच्या एका संघटनेशीही मी जोडलेय. या दोघांसोबत काम करताना मला एवढं निश्चित लक्षात आलं की, कायद्याच्या दृष्टीनं आपण सगळेच सारखे आहोत आणि आपल्याला न्याय मिळतो.

त्या दिवशी आम्ही खूप घाबरले होते. न्यायाधीश साहेबांसमोर जबाब नोंदवायचा होता.

आम्ही कोर्टात होतो तेव्हा...

ज्या मुलानं मला त्या रात्री मोटरसायकल शिकवण्याच्या बहाण्याने नेलं आणि दुसऱ्या मुलांजवळ सोडून पळून गेला, तो मुलगाही कोर्टात असेल, हे कोर्टात जाण्याआधी आम्हाला माहीत नव्हतं.

मी मदतीसाठी याचना करत राहिले. मात्र, तो थांबला नाही. आम्ही केवळ मित्र आहोत. एकमेकांवर प्रेम करत नाही. मला सायकल चालवायला येते. खूप चांगल्याप्रकारे सायकल चालवता येते.

त्या मुलानं मला मोटरसायकल शिकवण्याचा शब्द दिला होता. मलाही मोटरसायकल शिकायची आहे. आपल्या मर्जीनं कुठेही जाणं, हे किती भारी असतं.

त्याच्यासोबत काही दिवस मोटरसायकल शिकलेही. त्यानंतर 6 जुलैच्या रात्री मोटरसायकल शिकवण्याच्या बहाण्यानेच तो मला घेऊन गेला. त्यानंतर जे झालं, त्याच कारणानं मी कोर्टात उभी होते.

कोर्टात ज्यावेळी त्याला तिथं पाहिलं, तेव्हा मला आणखी भीती वाटली. त्याची आईही तिथे होते. मला त्या रात्रीचा सर्व घटनाक्रम पुन्हा आठवला.

त्याला समोर पाहताच आलं नसतं, असं काही होऊ शकलं नसतं का? माझा जबाब कुठे दुसऱ्या ठिकाणी नोंदवता आला नसता का? मी फार अस्वस्थ झाले.

मनात आलं की, पटापट जबाब नोंदवून घ्यावं आणि आम्ही इथून निघून जावं.

माझा जबाब तातडीनं नोंदवला जाऊ शकला असता का?

मला गरगरल्यासारखं वाटत होतं. मात्र, तरीही आम्हाला तीन-चार तास तिथेच त्या उष्णतेत वाट पाहत उभं राहावं लागलं. तिथे कुठे खुर्ची मिळू शकली असती का, ज्यामुळे आम्ही शांतपणे बसू शकलो असतो?

त्या रात्रीनंतर मी किती त्रासात होते. माझ्यासोबत काय झालंय, हे कुणाला सांगूही वाटत नव्हतं. मला माहीत होतं की, बलात्कारासोबत किती बदनामीही जोडली गेलीय.

कुटुंब आणि समाज काय म्हणाले? मलाच दोषी ठरवेल? माझं सायकल चालवणं, त्या रात्री त्या मुलासोबत मोटरसायकल शिकणं, मुक्तपणे वावरणं, संघटनेत त्या दादा-ताईंना सोबत देणं, आंदोलनात जाणं, या सर्व गोष्टींमध्ये माझ्यावरील बलात्काराची कारणं शोधली जातील?

हे सर्व माझ्या डोक्यात सुरू होतं आणि यातील बहुतांश गोष्टी प्रत्यक्षात घडल्या सुद्धा.

आमच्या मोहल्ल्यात लोक म्हणायचेही की, ही मुलगी शिकली नाहीय, तरीही सायकल चालवते, स्मार्टफोन बाळगते. माझ्यातल्याच चुका शोधू लागले होते. मात्र, माझी आत्या मला म्हणाली की, आता नाही बोललीस, तर ही मुलं तुला पुन्हा त्रास देतील.

मी हिंमत केली आणि...

मलाही वाटलं की, माझ्यासोबत जे झालं, ते इतर कुणासोबतही व्हायला नको. ज्यांच्या घरी मी काम करायचे, त्या कल्याणीताई आणि तन्मयदादानेही सांगितलं की, आपण पोलीस केस करायला हवी.

मग हिंमत केली आणि म्हटलं, इतकं सहन केलंच आहे, तर आणखी करू. मात्र, कोर्टात त्या दिवशी तासन् तास वाट पाहिल्यानंतर आणि त्या मुलाला समोर पाहिल्यानंतर आणखी भीती वाटली.

तुम्ही असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं? त्या घटनेच्या रात्रीनंतरच्या चार दिवसात कितीतरी वेळा पोलिसांना त्या रात्रीबद्दल सांगितलं असेल. अनेकदा तर मलाच त्या घटनेबद्दल दोषी ठरवलं जात होतं.

एकदा तर एका पोलिसानं संपूर्ण प्रकरण माझ्यासमोर वाचून दाखवलं आणि ज्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, त्याचे कुटुंबीय माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले.

लग्न कर, इथवर ते बोलले. माझ्यावर इतका दबाव येऊ लागला की, मी आजारीच पडेन की काय, असं वाटू लागलं. वृत्तपत्रात तर माझं नाव, पत्त सर्वच छापून आलं.

या सर्वांपासून मला वाचवू शकेल, असा कोणता नियम नाहीय का? बलात्कार झाल्याची गोष्ट वारंवार सांगावी का लागली? माझ्याबाबतची ती घटना सगळ्यांसमोर वारंवार का सांगितली जात होती?

असं वाटत होतं की, मला ओळखणाऱ्या आणि न ओळखणाऱ्या आजूबाजूच्या सगळ्यांनाच आता माझ्याबद्दल कळायला लागलं होतं. ज्या बदनामीची मला भीती वाटत होती, नेमकं तेच घडत होतं.

न्यायाधीश संतापले...

त्यादिवशीही न्यायालयात पट्टेदारानं आम्हाला चेहऱ्यावरील कपडा काढायला सांगितला.

माझा चेहरा बघताच ते म्हणाले, "अरे मी तुला ओळखलं. तू सायकल चालवत होती ना. मी अनेकदा तुला टोकायचा प्रयत्न केला होता. पण, बोलू शकलो नाही."

पट्टेदार आम्हाला नेमकं काय बोलणार ते काही माहिती नव्हतं. कोर्टात अनेक वेळ वाट पाहिल्यानंतर न्यायाधीशांनी आम्हाला आत बोलावलं. आता खोलीत फक्त मी आणि तेच होते. अशास्थितीत मी कधीच राहिले नव्हते.

आता काय होईल, काय करावं लागेल, इथं कल्याणीताई आणि तन्मयदादा का नाही? माझ्या मनात प्रश्नांनी काहूर माजवलं होतं. न्यायाधीशांनी माझं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं आणि ते लिहूनही घेतलं.

त्यानंतर त्यांनी जे लिहिलं ते मला वाचून दाखवलं. त्यांच्या तोंडावर रुमाल होता. मी जे बोलले तेच त्यांनी लिहिलं आहे का, यावर मी विचार करत होते.

मी म्हटलं, "सर तुम्ही काय म्हणत आहात ते मला समजत नाहीये. तुम्ही रुमाल काढून सांगा," त्यांनी रुमाल काढला नाही. पण परत माझा जबाब ऐकवला आणि मग माझं डोक सुन्न झालं.

त्यानंतर त्यांनी मला त्या जबाबावर सही करण्यास सांगितलं.

मी भलेही कधी शाळेत गेले नव्हते, पण इतकं तर नक्कीच कळत होतं की, जोवर एखादी गोष्ट तुम्हाला कळत नाही, तोवर कोणत्याच कागदावर सही करायची नाही. मी नकार दिला.

कल्याणी ताईला बोलवा. ती मला वाचून दाखवेल आणि मग मी या कागदावर सही करेल, असं मी त्यांना म्हटलं.

हे ऐकून न्यायाधीश संतापले आणि म्हणाले, "का तुला माझ्यावर विश्वास नाही का? मूर्ख मुलगी. तुझ्यावर काही संस्कार झालेत की नाही?"

आमचं कुणीच ऐकत नव्हतं

मी काही चुकीचं बोलले का, असा प्रश्न माझ्या मनात आला. मी म्हणाले, नाही, तुमच्यावर विश्वास आहे. पण, तुम्ही जे काही सांगत आहात, ते मला समजत नाहीये.

आम्हाला जोवर जबाब समजत नाही, तोवर कुणीतरी तो समजून सांगायला पाहिजे, असा एखादा नियम नाही का?

मला इतकी भीती वाटली की मी त्यावर सही केली आणि पळतपळत कल्याणी ताईकडे गेले. तोवर न्यायाधीशांनी इतर कर्मचारी आणि पोलिसांना कोर्ट रूममध्ये बोलावलं होतं.

त्यानंतर त्यांनी कल्याणीताईला बोलावलं. कल्याणी ताई आणि मी आत गेले. न्यायाधीश अजूनही रागातच होते. मी आणि कल्याणीताईनं त्यांची माफी मागितली. असं असतानाही आमचं कुणी काहीच ऐकायला तयार नव्हतं.

मला सतत मूर्ख मुलगी असं संबोधलं जात होतं आणि तू या मुलीवर संस्कार नाही केले का, असा प्रश्न कल्याणीताईला विचारला जात होता.

न्यायाधीशांनी आमचं पूर्ण म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं. कल्याणीताई आणि तन्मयदादानं न्यायाधीशांसमोर बोलायचा प्रयत्न केला.

जर तिला जबाब समजला नसेल, तर पुन्हा एकदा वाचावं आणि तिला समजावण्यात यावं, असं ते म्हणाले.

यावर न्यायाधीश म्हणाले, इथं किती काम आहे, दिसत नाही का?

आम्ही लढत राहू

आम्ही गरीब नसतो, तर आमचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं असतं ना? मी कदाचित मोठ्यानं बोलत असेल, पण तसं बोलणं चुकीचं आहे का?

जोवर जबाब समजत नाही, तोवर मी सही करणार नाही, असं मी न्यायाधीशांना म्हटलं. कायद्यात असं म्हणणं चूक आहे का?

त्या खोलीत इतका गोंधळ होता की आता आमचं म्हणणं ऐकलं जाणार नाही, हे आम्हाला कळालं होतं. तन्मय दादा आणि कल्याणी ताई तिथंच उभे होते.

त्यानंतर आमचा व्हीडिओ काढण्यात आला आणि आम्ही सरकारी कामकाजात अडथळ आणतोय, असं आम्हाला सांगण्यात आलं. त्यासाठी तुरुंगात जावं लागेल असंही सांगण्यात आलं.

आता इतकं सहन केलं आहे तर हेसुद्धा सहन करू असा विचार आम्ही केला. मला 10 दिवसांनंतर जामीन मिळाला. पण, जे माझ्यासोबत उभे होते त्यांना अजूनही तुरुंगात डांबलं आहे.

आमच्याविरोधात जो खटला दाखल झाला आहे, त्यात लिहिलं आहे की, आम्ही शिवी दिली, तर जबाबाचा कागद फाडण्याचा प्रयत्न केला. पण, न्यायाधीशांनी आमचं म्हणणं का ऐकलं नसावं?

आम्हाला फक्त न्याय हवा आहे आणि आमची लढाई सुरूच राहिल.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)