You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'गरिबीमुळे महिलांबरोबर भेदभाव होतो', सेलिब्रिटींचं जागतिक नेत्यांना पत्र
महिला आणि पुरुषांना समान वेतन मिळावं म्हणून जगभरातले सेलिब्रिटी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करताना दिसत आहेत.
प्रसिद्ध निवेदिका ऑप्रा विन्फ्रे आणि मेरिल स्ट्रीप यांनी एक पत्र लिहून जागतिक नेत्यांना, जगभरातील राजकारण्यांना 'नोटीस' दिली आहे.
ONE या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे त्यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रावर 140 जणांच्या सह्या आहेत.
जगातल्या प्रत्येक मुलीला शिक्षण आणि समान संधी मिळावी म्हणून आपण प्रयत्न करावे अशी विनंती केली आहे.
ब्लॅक पॅंथर चित्रपटातील कलाकार लेटिटिया व्राइट आणि थँडी न्यूटन, नताली डॉर्मर, लेना डेनहम, नताली पोर्टमन आणि इसा रे यांनी देखील या पत्रावर सह्या केल्या आहेत.
गरिबीमुळे महिलांवर अन्याय
'गरिबीमुळं महिलांवर अन्याय होतो,' असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे एखाद्या महिलेची आर्थिक स्थिती जितकी हलाखीची असते तितका त्या महिलेवर अन्याय होण्याचा धोका अधिक असतो.
जोपर्यंत जगात गरीब महिला आहेत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसू शकत नाही, असं या पत्रात म्हटलं गेलं आहे.
व्यवस्थेतून निर्माण झालेल्या लिंगभेदाच्या दुष्परिणामांबाबत त्यांनी भाष्य केलं. महिलांवर लैंगिक अत्याचार होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यात यावेत, असं या पत्रात म्हटलं आहे.
सर्व नेत्यांनी लिंगभेदाविरोधात उभं राहावं, असं आवाहन या पत्रातून केलं गेलं आहे.
कलाकांरोबरोबरच अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव मॅडेलिन ऑलब्राइट, फेसबुकच्या शेरील सॅंडबर्ग, हफिंग्टन पोस्टच्या संस्थापिका अॅरिआना हफिंग्टन यांनी देखील या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
ते पत्र असं आहे,
जगभरातल्या प्रियराजकारण्यांनो,
आम्ही तुम्हाला खालील कारणांसाठी नोटीस पाठवत आहोत.
जगात 13 कोटी मुली शिक्षणापासून वंचित आहेत. एक अब्ज महिलांचं बॅंक खातं नाही. 39,000 मुलींना अल्पवयातच लग्न करावं लागतं आणि महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन मिळतं. त्या सर्वांच्या वतीने आम्ही तुम्हाला नोटीस पाठवत आहोत.
जगभरात अशी कोणतीही जागा नाही जिथं महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं संधी आहेत. पण आर्थिक स्तर जर कमी असेल तर तिथं महिलांना सातत्यानं लिंगभेदाला सामोरं जावं लागतं.
गरिबीमुळं महिलांबरोबर भेदभाव होतो आणि जोपर्यंत जगात गरीब महिला आहेत तोपर्यंत आम्ही हातावर हात धरून बसू शकत नाही.
महिलांची स्थिती सुधारण्याची तुमच्याकडं संधी आहे. G7 असो वा G20, किंवा अफ्रिकन युनियनची बैठक असो, तुम्ही महिलांची स्थिती सुधारण्याच्या कार्याप्रती कटिबद्ध व्हा, जर तुम्ही हे करू शकलात तर तुम्ही सुधारणांचे दूत म्हणवले जाल.
जोपर्यंत प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत.
जोपर्यंत सर्वांना समान वागणूक मिळणार नाही तोपर्यंत आपण समान आहोत असं म्हणण्याला काही अर्थ नाही.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)