सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात 15 कोटींच्या व्यवहाराचाही पोलीस तपास करणार

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. सुशांत सिंहच्या बॅंकेतून 15 कोटींचा व्यवहार झाला होता का, ही रक्कम कुणाला देण्यात आली होती या प्रकरणात पोलीस तपास करणार आहेत.

सक्तवसुली संचलनालयाची (ED) नजर देखील या व्यवहारावर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ईडीने बिहार पोलिसांकडून एफआयआर घेतली आहे आणि ते पुढील तपास करत आहेत.

15 कोटी व्यवहार प्रकरणात संशयाची सुई सुशांत सिंह राजपूत याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या भावावर असल्याचं एनडीटीव्हीने म्हटलं आहे.

'गुन्हा दाखल करून घेण्यास पोलीस तयार नव्हते'

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा नोंदवण्यास पाटणा पोलीस तयार नव्हते. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मंत्री संजय झा यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती माजी सॉलिसिटर जनरल आणि सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी दिलीय.

विकास सिंह हे सुशांत सिंहच्या वडिलांचे वकील असून त्यांनी दिल्लीत ही माहिती दिली.

आत्महत्या प्रकरणाची चौकशी पटना पोलिसांनी करावी अशी मागणी सुशांत सिंहच्या कुटुंबीयांनी केलीय. सीबीआय चौकशीबाबत कुटुंबीय आग्रही नसल्याचं विकास सिंह यांनी सांगितंलय.

मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला होता. उलट याप्रकरणात बॉलिवूडमधल्या मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेसची नावं गोवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. त्यामुळे हे प्रकरण वेगळ्या दिशेला जात होतं असं विकास सिंह यांनी सांगितलंय. अखेर पाटणा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

मुंबई पोलीस या प्रकरणाच्या चौकशीत दिरंगाई करत असल्याचा आरोपही विकास सिंह यांनी केलाय. आम्हाला या प्रकरणाची सखोल चौकशी हवी असून सत्य बाहेर यायला हवं असंही त्यांनी नमूद केलं.

ईडीनं चौकशी करावी - देवेंद्र फडणवीस

सुशांत सिंह आत्महत्येची अंमलबजावणी संचलनालयनं (ईडी) चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ते म्हणाले, "सुशांत सिंह यांच्या प्रकरणात एक जन आक्रोश उभा राहिला आहे. याप्रकरणी सातत्यानं वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. पण, सरकार सीबीआय चौकशीला नकार देत आहे. आता नुकताच या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराची बाब समोर आली आहे. या परिस्थितीत ईडीनं या प्रकरणाची तपासणी करावी."

रिया चक्रवतीवर गुन्हा दाखल

सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटणा सेंट्रल झोनचे इन्स्पेक्टर जनरल संजय सिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली.

पुढच्या कार्यवाहीसाठी चार सदस्यीय टीम मुंबईला पाठवण्यात आली आहे. ही टीम मुंबई पोलिसांकडून केसची डायरी आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रं ताब्यात घेतील, असं संजय सिंग यांनी स्पष्ट केलं.

सुशांत सिंगचे वडील के के सिंग यांनी पाटण्यातील राजीव नगर पोलीस स्थानकात रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. प्रेमात असल्याचं भासवून रियाने सुशांतकडून पैसे उकळले आणि त्याला आत्महत्येला प्रवृत्त केला असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे.

भारतीय दंड संहितेच्या 406, 420, 341, 323, 342 या कलमांअंतर्गत रियावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्याच्या कारणास्तव मुंबईला जाऊन ही केस लढू शकणार नसल्याचं सुशांतच्या वडिलांनी सांगितलं आहे. त्यामुळे तक्रार पाटण्यातील पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी रियानेच सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केली होती.

मुंबई पोलीस सुशांतच्या मृत्यूप्रकरणी तपास करत असून, आतापर्यंत 38 लोकांचे जवाब नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये आदित्य चोप्रा, संजय लीला भन्साळी, शेखर कपूर, महेश भट्ट, मुकेश छाबरा यांचा समावेश आहे. रियाची गेल्या महिन्यात नऊ तास कसून चौकशी करण्यात आली होती.

धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची चौकशी 28 जुलै रोजी करण्यात आली. 14 जून रोजी सुशांत सिंगचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला होता. काही दिवसांपूर्वीच सुशांत अभिनित दिल बेचारा हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.

रियाची सीबीआय चौकशीची मागणी

रियानं या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

"आजपासून एक महिन्यापूर्वी सुशांत सिंह राजपूतचा मुंबईतील घरात मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी" अशी मागणी त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीने केली आहे. ही मागणी तिने ट्वीटरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

रियाने अमित शाह यांना विनंती करताना सुशांतने हे पाऊल उचलण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, त्याला कसला तणाव होता हे मला जाणून घ्यायचं आहे असं ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

त्याच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या, अनेकांनी कट-कारस्थान असल्याचं म्हटलं आणि बॉलिवुडमधल्या अनेकांनी एकमेकांवर ताशेरे ओढले. सुशांतला नैराश्याने ग्रासलं होतं, त्याला वैयक्तिक आयुष्यात अपयश येत होतं, वगैरे अशा अनेक गोष्टी बोलल्या गेल्या.

याच दरम्यान त्याची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्यावरही अनेकांच्या नजरा होत्या. आज अखेर त्याच्या मृत्यूच्या एका महिन्याने रियाने एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सुशांतला पत्र लिहिलंय... त्यांच्यातल्या नात्याचा उलगडा केलाय.

पाहा रियाने सुशांतसाठी काय लिहिलंय...

मला आजही माझ्या भावना आवरता येत नाहीयेत... माझ्या मनाला न भरता येणारी जखम झालीय.

तुझ्यामुळे माझा प्रेमावर विश्वास बसला, त्याची ताकद कळली. तू मला शिकवलं, की कसं गणिताच्या एका साध्या समीकरणातून अख्ख्या जीवनाचा अर्थ काढता येऊ शकतो. खरं सांगते, तुझ्याकडून मी दररोज काहीतरी नवीन शिकले. मला कदाचित यावर कधीच विश्वास बसणार नाही की तू आता इथे नाहीये.

मला माहितीय की तू आता एका जास्त शांत ठिकाणी आहेस... तिथे चंद्र आहे, तारे आहेत, त्या आकाशगंगांनी तुझ्यासारख्या 'सर्वांत महान भौतिकशास्त्रज्ञाचं' जंगी स्वागत केलं असेल.

तू दयाळू होतास, उत्साही होतास... एखाद्या तुटलेल्या ताऱ्यालाही तू खुलवशील असा. आता तूच आहेस... एक तुटता तारा. मी वाट बघेन तुझी, माझा तुटता तारा... की तू माझ्याजवळ परत यावं.

एक चांगली व्यक्ती होण्यासाठी जे काही लागतं, ते सारं काही तुझ्यात होतं. कदाचित तू या जगात सर्वांत महान होतास. आपलं प्रेम व्यक्त करायला माझ्याकडे नेमके शब्द नाहीच... आणि मला वाटतं तू खरंच बोलला होतास जेव्हा तू म्हणाला होतास की आपल्या दोघांच्याही समजण्यापलीकडे आहे हे सारं.

तू खुल्या मनाने सर्वच गोष्टींवर प्रेम केलं, आणि आता तुझ्यामुळे मला हे कळून चुकलंय की आपलं प्रेम खरंच निस्सीम होतं.

तुला शांती मिळो, सुशी.

30 दिवस तुला गमावून झाले... पण तुझ्यावर प्रेम आयुष्यभर करेन.

आयुष्यभरासाठीचे ऋणानुबंध... अनंत काळापर्यंत आणि त्यापलीकडेही...

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)