You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रामदास आठवले: 'अयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार उभारणार' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1) रामदास आठवले: 'अयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार उभारणार'
अयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार बांधणार असल्याचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. या मागणीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार असल्यचं आठवलेंनी सांगितलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
गायक आनंद शिंदे यांनीही अयोध्येत बौद्धविहाराची मागणी केलीय. मात्र, आनंद शिंदे यांच्या आधीपासूनच आपण बौद्धविहारासाठी प्रयत्नशील असल्याचं आठवलेंनी म्हटलंय.
"अयोध्येत आता राम मंदिर उभं राहत आहे. तिथे राम मंदिराचे अवशेष सापडले आहेत. त्याआधी तिथे बौद्ध मंदिर होतं. अयोध्येत बौद्ध मंदिर व्हावं यासाठी फार आधीपासून माझ्या हालचाली सुरू आहेत. सरकारकडून जागा मिळाली तर ठीक आहे. पण सरकारकडून जागा मिळत नसेल तर तिथे एका ट्रस्टची स्थापन करुन 30 एकर जागा खरेदी करणार," असं रामदास आठवले यांनी सांगितलं.
आनंद शिंदे यांनी यात राजकारण आणू नये, असंही आवाहन रामदास आठवेंनी केलंय.
2) रिलायन्स: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नफा 31 टक्क्यांनी वाढला
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलाइन्स इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्याचे आकडे जारी केले आहेत. पहिल्या तीन महिन्यात RIL ला एकूण महसूल 88 हजार 253 कोटी रुपये राहिला आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.
कोविड-19 च्या संकटानंतर रिलाइन्स जिओ, रिटेल आणि ऑयव टू केमिकल व्यवसायाचे निकाल एनलिस्टच्या अपेक्षेपेक्षा चांगला राहिला आहे.
गेल्या आर्थिक वर्षाच्या काळात हा 10,104 कोटी रुपये होता.
जिओचा नफा एप्रिल ते जून या तीन महिन्यात 2 हजार 520 कोटी रुपये असून पहिल्या तीन महिन्यांच्या ऑपरेशनमधून येणारा कंसॉलिडेटेड उत्पन्न 91,238 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी सामान्य परिस्थितीत हा 1,62,353 कोटी रुपये होता.
3) राहुल गांधींची माफी मागत खुशबू सुंदर यांचा शिक्षण धोरणाला पाठिंबा
भारतातील नव्या शिक्षण धोरणाबाबत मतमतांतरं दिसून येत आहेत. विरोधकांमधील अनेकांनी या धोरणाच्या त्रुटी दाखवून देण्याचा प्रयत्न केला असतानाच, काँग्रेस नेत्या खुशबू सुंदर यांनी मात्र शिक्षण धोरणाला पाठिंबा दिलाय. लोकमतनं ही बातमी दिलीय.
पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडत असल्यानं खुशबू सुंदर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची माफीही मागितलीय.
खुशबू सुंदर म्हणाल्या, "नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल माझी भूमिका पक्षापेक्षा वेगळी आहे. त्यासाठी मी राहुल गांधींची माफी मागते. मात्र मी कटपुतली किंवा रोबोटप्रमाणे मान न डोलावता तथ्यांवर भाष्य करते. प्रत्येक मुद्द्यावर आम्ही आमच्या नेत्याशी सहमत असू शकत नाही. मात्र नागरिक म्हणून आपलं मत व्यक्त करू शकतो."
शिक्षण धोरणाचं स्वागत करत असले, तरी भाजपमध्ये जाणार नाहीय, असंही त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केलंय.
4) स्थलांतरिक मजुरांसाठी अभिनेता सोनू सूदकडून खास वेबसाईट सुरू
स्वत:च्या वाढदिवसाचं निमित्त साधत अभिनेता सोनू सूद यांनी स्थलांतरित मजुरांच्या नोकरीसाठी खास वेबसाईट सुरू केली आहे. 'प्रवासी रोजगार डॉट कॉम' असं या वेबसाईटचं नाव आहे. नॅशनल हेरॉल्डनं ही बातमी दिलीय.
'नौकरी मिलना अब असान' अशी या वेबसाईटची टॅगलाईन असून, त्यावर टोल फ्री क्रमांक दिला गेलाय. शिवाय, मोबाईल नंबर देऊन लॉगइन करता येतं. त्यानंतर संबंधित नोकरी शोधता येते.
बांधकाम, आरोग्य, लॉजिस्टिक्स, सुरक्षा, कृषी, अन्न प्रक्रिया, कॉल सेंटर, वेल्डर्स, घरकाम, मोबाईल दुरुस्ती इत्यादी क्षेत्रातील नोकऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे.
याआधी लॉकडाऊनच्या काळात मुंबईसह देशाच्या विविध शहरात अडकलेल्या मजुरांना आपापल्या राज्यात पोहोचवण्यासाठी सोनू सूद यांनी वाहनव्यवस्था केली होती. त्यावेळीही त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं होतं.
5) सुशांत सिंह आत्महत्या: अभिनेत्री अंकिता लोखंडेची बिहार पोलिसांकडून चौकशी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी अभिनेत्री अंकिता लोखंडेची बिहार पोलिसांनी चौकशी केली. मुंबईत जवळपास तासभर ही चौकशी झाली. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.
पवित्र रिश्ता या मालिकेत सुशांत आणि अंकितानं एकत्र काम केलं होतं. त्यानंतर पुढचे सहा वर्षे त्यांच्या दोघांच्या प्रेमसंबंधांची चर्चा होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रेस्थित राहत्या घरी सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केली. या प्रकरणाची सध्या मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.