कोरोना व्हायरस : लठ्ठ व्यक्तींसाठी कोव्हिड-19 जास्त धोकादायक?

लठ्ठ व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाल्यास इतरांच्या तुलनेत धोका दुप्पट असतो. मृत्यू होण्याचा धोका जवळपास 50 टक्के अधिक असतो, असे एका जागतिक संशोधनातून समोर आले आहे.

लठ्ठपणामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या इतर आजारांची शक्यता अधिक असते, असे अमेरिकेतील संशोधकांचे म्हणणे आहे.

कमकुवत रोगप्रतिकारक क्षमतेमुळे अशा व्यकींना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. तसेच लठ्ठ व्यक्तींना कोरोना व्हायरसची लस दिल्यास ती कमी प्रभावी ठरू शकते असाही दावा या संशोधकांनी केला आहे.

बॉडी मास इन्डेक्स (BMI) 30 पेक्षा जास्त असलेल्या लोकांमध्ये फ्लूसाठीच्या लशीचा प्रभावही कमी दिसून येतो. या तत्वावर हा दावा करण्यात येत असल्याचे ते सांगतात.

नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील टीमने जगभरातील 75 संशोधनांच्या आकडेवारीचा अभ्यास केला. ज्यात जवळपास 4 लाख रुग्णांचा समावेश होता.

लठ्ठ असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागण्याची शक्यता 50 टक्के होती. तर 74 टक्के अशा रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करावे लागले. कोरोना विषाणूमुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यताही होती.

यूकेमध्येही केलेल्या संशोधनातही ही बाब आढळून आली आहे. जास्त वजन असलेल्या लोकांना अधिक धोका असल्याने सरकारने वजन कमी करण्यासाठीही उपाययोजना सुरू केल्या.

लठ्ठ व्यक्तींसाठी कोव्हिड-19 जास्त धोकादायक?

"लठ्ठ लोकांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका तुलनेनं जास्त असतो. लठ्ठ लोक कोरोनाची लागण झाल्यानंतर गंभीररित्या आजारी पडू शकतात. त्यांच्या मृत्यूची शक्यतासुद्धा वाढते," असं मत ब्रिटीश संशोधकांनी व्यक्त केलं आहे.

पब्लिक हेल्थ इंग्लंडकडून नुकताच याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

ब्रिटीश आरोग्य विभागाच्या पब्लिक हेल्थ इंग्लंड संस्थेकडून करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, "लठ्ठ आणि वजन जास्त असलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्यास रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता जास्त असते. तसंच त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्याची जास्त गरज पडते. वाढत्या वजनासह त्यांना असलेला धोका वाढत जातो."

पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या मुख्य आहारातज्ज्ञ डॉ. एलिसन टेडस्टोन यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्या म्हणतात, "अधिक वजनामुळे इतर आजारांसह कोव्हिड-19 संसर्गामुळे आजारी पडणं तसंच मृत्यूची शक्यता जास्त असते. त्यामुळे वजन कमी केल्यास आरोग्याला तर फायदा आहेच. शिवाय कोव्हिड-19 चा धोकासुद्धा कमी होतो."

ब्रिटीश सरकार लोकांना लठ्ठपणा कमी करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहे. युरोपियन देशांमध्ये ब्रिटनलाच लठ्ठपणाने सर्वाधिक ग्रासलं आहे.

सध्या इंग्लंडमधील सुमारे दोन तृतीयांश लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे किंवा त्यांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त तरी आहे. अशीच स्थिती वेल्स, स्कॉटलँड आणि नॉर्दर्न आयर्लंडचीही आहे.

तुमचंही वजन जास्त आहे का?

ब्रिटीश नॅशनल हेल्थ सिस्टिमनुसार, 25 ते 29.9 बॉडी मास इंडेक्स असलेल्या प्रौढ व्यक्तींचं वजन जास्त मानलं जातं. तर 30 ते 39.9 मास इंडेक्स असलेल्या लोकांना लठ्ठ संबोधलं जातं.

कोणत्याही व्यक्तीच्या वजनाला (किलो) त्याच्या उंचीने (मीटरमध्ये लांबीचा वर्ग) भागल्यास त्याचा बॉडी मास इंडेक्स मोजला जातो.

लठ्ठपणा मोजण्याची दुसरी पद्धत म्हणजे कंबर मोजणं आहे. 94 सेंटीमीटरपेक्षा जास्त कंबर असलेले पुरुष आणि 80 सेंटीमीटरपेक्षा जास्त कंबरेचं माप असणाऱ्या महिलांना लठ्ठपणाच्या समस्या सुरु होतात.

कोव्हिड-19 पासून बचाव होण्यासाठी इंग्लंडच्या नागरिकांनी लठ्ठपणा कमी करण्याचं आवाहन पब्लिक हेल्थ इंग्लंडने आपल्या अहवालात केलं आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक सुसन जेब यांच्या मते, "आतापर्यंत झालेल्या अभ्यासानुसार ज्येष्ठ नागरिक, पुरुष, भारतीय उपखंडातील नागरिक तसंच धार्मिक समुदायातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्याचं निदर्शनास आलं होतं."

या अभ्यासासोबतच आता लठ्ठपणा ही बाबसुद्धा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

लोकांनी आपली लाईफस्टाईल बदलून लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची योग्य वेळ आली असल्याचंही सुसन यांना वाटतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)