विकास दुबेः 8 पोलिसांच्या मृत्यूपासून एन्काऊंटरपर्यंत कशा घडल्या घटना?

विकास दुबे प्रकरणाची सुरुवात उत्तर प्रदेशातील कानपूरमधून होते. चौबेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिकरू हे विकास दुबेचं गाव. इथेच 2 आणि 3 जुलैच्या रात्री पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली.

विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात DSP सह आठ पोलिसांचा जीव गेला. शिवाय, सहा पोलीस कर्मचारी जखमीही झाले होते.

विकास दुबेवर 6 गुन्हे दाखल झालेले होते. काही दिवसांपूर्वीच कानपूरमधील राहुल तिवारी नावाच्या व्यक्तीनं कलम 370 अंतर्गत तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणात विकास दुबेला पकडण्यासाठी पोलीस बिकरू गावात गेले होते.

राहुल तिवारींनी ज्या प्रकरणात तक्रार दाखल केली होती, त्याच प्रकरणामुळे विकास दुबे आणि त्याचे साथीदार फरार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं होतं. विकास दुबेच्या संपर्कात असणाऱ्या 100 हून अधिक जणांचे मोबाईल फोन सर्व्हिलन्सवर टाकण्यात आले होते. म्हणजेच, त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली होती.

आरोपींविरोधात कडक करवाई करा आणि घटनेचा अहवाल सादर करा, असा आदेशच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस महासंचालकांना दिला होता.

त्यानंतर विकास दुबे याला पकडण्यासाठी पोलिसांची 60 पथकं तैनात करण्यात आली होती.

ज्या दिवशी पोलिसांवर हल्ला झाला आणि त्यात 8 पोलिसांचा मृत्यू झाला. त्या दिवसापासून आजपर्यंतचा तारीखनिहाय काय काय घडलं, हे पाहूया.

3 जुलै

प्रेम प्रकाश पांडेय आणि अतुल दुबे हे विकास दुबेचे दोन साथीदार चकमकीत ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला. या चकमकीदरम्यान काही पोलीस जखमी झाल्याचंही सांगितलं गेलं.

उत्तर प्रदेश सरकारनं फरार झालेला मुख्य आरोपी विकास दुबे याची माहिती देणाऱ्याला 50 हजार रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली. विकास दुबेची माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल, असंही सांगितलं गेलं. त्यानंतर बक्षीसाची रक्कम वाढवून पाच लाखांपर्यंत नेण्यात आली.

4 जुलै

बिकरू गावातील विकास दुबेचं घर जिल्हा प्रशासनानं जमीनदोस्त केलं.

त्यानंतर गँगस्टर कायद्याअंतर्गत विकास दुबेची अवैध संपत्ती आणि अकाऊंट्सही सिल करण्यात आली.

विकास दुबेला मदत करण्याच्या आरोपाखाली पोलीस कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. चौबेपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी विनय तिवारी यांचं निलंबन करण्यात आलं.

5 जुलै

विकास दुबेचा साथीदार दयाशंकर अग्निहोत्री याला अटक करण्यात आलं. या अटकेदरम्यान चकमक झाली होती. या चकमकीत अग्निहोत्रीच्या पायाला गोळीही लागली. कानपूरमधल्या कल्याणपूर परिसरात ही चकमकीची घटना घडली.

दयाशंकर अग्निहोत्रीवर 25 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर झालं होतं.

वीज विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. कारण ज्या रात्री पोलीस आणि विकास दुबेमध्ये चकमक झाली, तेव्हा वीज पुरवठा खंडीत झाला होता.

त्यासह 5 जुलैला विकास दुबेशी संबंधित आणखी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

6 जुलै

उत्तर प्रदेशातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांचं विकास दुबेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली निलंबन करण्यात आलं.

7 जुलै

डीआयजी (STF) अनंत देव यांची बदली मुरादाबाद सेक्टरमधील PAC मध्ये करण्यात आलं. पोलीस उपअधीक्षक देवेंद्र कुमार मिश्रा यांच्या एका पत्राच्या आधारावर अनंत देव यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.

देवेंद्र कुमार मिश्रा यांचा विकास दुबेच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

याच रात्री कानपूर एसएसपींनी चौबेपूर पोलीस ठाण्यातील सर्व 68 कर्मचाऱ्यांना रिझर्व्ह पोलीस लाईनमध्ये पाठवलं.

8 जुलै

हरियाणातील फरीदाबादमधून विकास दुबेच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आलं. उत्तर प्रदेशचे STF आणि लोकल क्राईम ब्रँचच्या संयुक्त ऑपरेशनअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

विकास दुबेलाही त्या दिवशी फरीदाबादमध्ये पाहण्यात आल्याचं म्हटलं गेलं. एका सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर हा दावा करण्यात आला होता.

उत्तर प्रदेशाच्या हमीरपूरमध्ये विकास दुबेचा निकटवर्तीय अमर दुबे याचा चकमकीत मृत्यू झाला. त्यानंतर विकास दुबेचा आणखी एक साथीदार श्यामू वाजपेयी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

चौबेपूर पोलीस ठाण्याचे निलंबित प्रभारी विनय तिवारी यांना ताब्यात घेण्यात आलं.

9 जुलै

विकास दुबेचे दोन साथीदार ठार करण्यात आले.

पोलिसांच्या दाव्यानुसार प्रभात हा विकास दुबेचा साथीदार पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी चकमकीत प्रभातचा मृत्यू झाला. तसंच, बउवा दुबेचा इटावामध्ये चकमकीत मृत्यू झाला.

विकास दुबेला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये दुपारी पाहिल्याची आणि नंतर पकडण्याची बातमी धडकली.

अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, विकास दुबेने गुरुवारी सकाळी महाकालेश्वर मंदिरात व्हीआयपी तिकीट घेतलं होतं.

त्यानंतर विकास दुबेने स्वत: सांगितलं की, 'मैं विकास दुबे हूँ, कानपूरवाला'.

महाकाल मंदिरातून विकास दुबेला ताब्यात घेण्यात आलं. मध्य प्रदेश सरकारनं उत्तर प्रदेश सरकारला दुबेच्या अटकेबाबत माहिती दिली. त्यानंतर STF आणि पोलिसांचं पथक उत्तर प्रदेशातून उज्जैनला रवाना झालं.

रात्री उशिरा विकास दुबेच्या पत्नी आणि मुलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. लखनऊच्या कृष्णा नगरच्या पोलिसांनी विकास दुबेची पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे वृत्त आले.

10 जुलै

STF चं पथक विकास दुबेला मध्य प्रदेशातून कानपूरच्या दिशेनं घेऊन येत होतं. परतीच्या प्रवासादरम्यान पोलिसांची गाडी उलटली आणि विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांच्या कारवाईत विकास दुबेचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या दाव्यानुसार, या घटनेतही चार पोलीस जखमी झाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)