देवेंद्र फडणवीस की शरद पवार : 'त्या' राजकीय नाट्याबद्दल कोण खरं बोलतंय?

    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"प्रत्येक गोष्टीच्या तीन बाजू असतात, एक तुमची बाजू, एक माझी बाजू आणि एक खरी बाजू."

देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत असेल आणि पत्रकाराने त्यांना एखादा कोड्यात टाकणारा प्रश्न विचारला, तर उत्तरादाखल फडणवीस यांच्या तोंडून हमखास हे वाक्य कानी पडतं.

ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राजू परूळेकर यांनी नुकतीच माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.

या मुलाखतीत स्वाभाविकपणे फडणवीसांना विधानसभा निवडणुकीतील सत्ता स्थापनेच्या डावपेचांसंदर्भात प्रश्न विचारले गेले. यावेळी फडणवीसांच्या आवडीचं हेच वाक्य पुन्हा एकदा त्यांच्या तोंडून ऐकायला मिळालं.

पण ही मुलाखत वेगळी ठरली. फडणवीसांनी काही गौप्यस्फोट केले. योग्य वेळ आल्यावर याचं उत्तर निश्चितपणे देऊ, असं म्हणून पूर्वी टाळलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी या मुलाखतीत दिली. पण याच उत्तरानंतर इतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. हे संपूर्ण प्रकरण आपण सविस्तरपणे समजून घेऊ.

महाराष्ट्रात गेल्या वर्षी 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यांचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. राज्यात भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 तर काँग्रेसला 44 जागांवर विजय मिळवता आला होता.

भाजप-सेना युती करून निवडणूक लढलेले असूनही मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांचं बिनसलं. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचा पाठिंबा मिळवून 23 नोव्हेंबर रोजी सरकारही स्थापन केलं. पण हे सरकार अवघ्या 80 तासांचं ठरलं.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं.

राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजप सोबत येण्यासाठी थेट शरद पवारांनीच ऑफर दिली होती, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

तर पवार यांनी मागे एका मुलाखतीत म्हटलं होतं, मोदींनीच त्यांना ऑफर दिली होती, पण आपण ती विनम्रपणे नाकारल्याचं पवारांनी म्हटलं होतं.

त्यामुळे दोन्ही मुलाखतींमध्ये एकाच घटनेबाबत दोन्ही नेत्यांची दोन वेगवेगळ्या टोकांची विसंगत विधानं पाहिल्यास, यात कोण खरं बोलतंय, हे अजून तरी स्पष्ट नसल्याचं दिसून येईल.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

मुलाखतीत फडणवीसांनी म्हटलं, "ज्यावेळी शिवसेना सोबत येत नाही, हे आमच्या लक्षात आलं, तेव्हा आमच्यासमोर कोणते पर्याय असू शकतील, याचा आम्ही विचार केला. त्यातल्या एका पर्यायात आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. म्हणजे अजित पवार नाही...थेट राष्ट्रवादी."

"यासंदर्भात योग्य त्या चर्चादेखील झाल्या होत्या. एका चर्चेत मी होतो. एकात मी नव्हतो. एकदम टोकाच्या चर्चा ज्या व्हायला पाहिजेत, त्या लेव्हलच्या सगळ्या चर्चा झाल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी (शरद पवार) आपली भूमिका बदलली आणि आम्ही कॉर्नर झालो. आम्ही शांत बसलो होतो.

"दोन तीन दिवस असे होते की, आम्ही मनातून हे सरकार आपलं नसेल असं ठरवून टाकलं होतं. त्या तीन-चार दिवसांत कुठलीच कृती आम्ही केली नाही. पण त्या तीन-चार दिवसांनंतर अजित पवारांकडून आम्हाला फिलर आला. आमची त्यांच्याशी चर्चा झाली. ते म्हणाले, मला हे मान्य नाही. जे शरद पवारांनी आधी सांगितलं होतं, त्यानुसार स्थिर सरकार भाजप आणि राष्ट्रवादीच देऊ शकतं, असं माझं आजही स्पष्ट मत आहे. पण जर पवारसाहेब शब्दावरून आता बदलत असतील, तर हे तीन पक्षांचं सरकार चालू शकत नाही, असं मला वाटतं. यातून राज्याचं नुकसान होईल. म्हणून तुमच्यासोबत सरकार बनवायला मी तयार आहे."

शरद पवारांचं 'व्हर्जन'

या घटनेबाबत शरद पवारांचं व्हर्जन जाणून घेण्यासाठी आपल्याला सहा महिने मागे जावं लागेल. 28 नोव्हेंबर 2019 ला ठाकरे सरकारचा शपथविधी झाला आणि त्यानंतर या सरकारचे शिल्पकार म्हणून शरद पवारांचं कौतुक सगळ्याच वाहिन्यांवर सुरू होतं.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर पहिली मुलाखत शरद पवारांनी दिली. ती मुलाखत 2 डिसेंबर 2019 रोजी एबीपी माझावर प्रसिद्ध झाली होती. त्या मुलाखतीतील 12 प्रमुख मुद्दे तुम्ही इथं वाचू शकता. (शरद पवार यांचे 12 गौप्यस्फोट)

यात अजित पवारांचं बंड, भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थापन यांसारख्या विषयांवर पवारांनी स्पष्टीकरण दिलं होतं. आपल्या मुलाखतीत पवार म्हणतात, "नरेंद्र मोदी यांना मी बऱ्याच दिवसांपूर्वी वेळ मागितली होती. त्यांनी वेळ दिली. कदाचित मोदींच्या कार्यालयाची ही इच्छा असावी, यामुळे माझ्याबद्दल गैरसमज वाढायला मदत होईल. मला काही चिंता नव्हती. मी विदर्भात अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान पाहण्यासाठी दौरा करून आलो होतो. अशा संकटाच्या काळात केंद्र सरकारने मदत करण्याची आवश्यकता आहे, हे मला त्यांच्या लक्षात आणून द्यायचं होतं. म्हणून मी वेळ मागितली होती. ती मिळाली. त्यांना मी त्यासंदर्भात पत्र दिलं आणि परिस्थिती सांगितली."

"ती बैठक संपल्यानंतर मी उठायला लागलो तेव्हा पीएम म्हणाले की, आपण एकत्र येऊन काम केलं तर मला आनंद होईल. मी म्हटलं आपले व्यक्तिगत संबंध उत्तम आहेत, ते राहतील. पण एकत्र काम करणं राजकीयदृष्ट्या मला शक्य नाही."

"मी म्हटलं राष्ट्रीय प्रश्न आले तर विरोधासाठी विरोध करणार नाही. त्यासाठी आम्ही नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊ. त्याची चिंता करू नका. पण एकत्रित काम करणं मला शक्य नाही. आमच्या पक्षाच्या विचारांचे अनेक जण आहेत. त्यांना आम्ही एक दिशा दिली आहे. त्याच्याबाहेर मी जाऊ शकत नाही. त्यामुळे हे मला शक्य नाही, असं विनम्रतेने सांगून मी निघून आलो. ज्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही, त्याची चर्चा का करायची?"

पुस्तकांमध्ये वेगळीच कहाणी?

2019 विधानसभा निवडणुकीनंतरचा सत्तास्थापनेचा तिढा आणि त्या अनुषंगाने घडलेल्या राजकीय घडामोडींबाबत आतापर्यंत तीन पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.

यात पत्रकार जितेंद्र दीक्षित यांच्या '35 डेज : हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्र चेंज्ड् फॉरेव्हर इन 2019,' पत्रकार कमलेश सुतार यांच्या '36 डेज ए पॉलिटिकल क्रॉनिकल ऑफ अॅम्बिशन, डिसेप्शन, ट्रस्ट अॅम्बिशन बिट्रेयल' आणि पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्या 'चेकमेट : हाऊ द बीजेपी वॉन अॅन्ड लॉस्ट महाराष्ट्र' या तिन्ही पुस्तकात अजित पवारांच्या बंडामागची कहाणी सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या तीनही पुस्तकांबाबत बीबीसीनं आधी माहिती दिली आहे, ती तुम्ही इथं वाचू शकता.

जितेंद्र दीक्षित यांच्या मते, "महाराष्ट्राबरोबरच हरियाणाच्या सुद्धा निवडणुका झाल्या होत्या. तिथंही भाजपला सत्ता स्थापनेसाठी जमवाजमव करायची होती. अमित शहा यांनी ती लगेचच जुळवून आणली. हरियाणात लोकसभेच्या फार जागा नाहीत. पण महाराष्ट्र मोठं राज्य आहे. ते भाजपसाठी महत्त्वाचं आहे. पण तरीही अमित शहांनी याबाबत काहीच वक्तव्य केलं नाही. उद्धव ठाकरेंशी सुद्धा ते बोलले नाहीत. त्यांनी यात काहीच रस घेतला नाही याचा सरळ अर्थ आहे की त्यांनी फडणवीसांना वाऱ्यावर सोडलं."

पण परुळेकरांना दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी अमित शाहांनाच तीन दिवसीय सरकारचे शिल्पकार म्हटलं. अजित पवार यांच्याबरोबर स्थापन झालेल्या त्या 80 तासांच्या सरकारची स्थापना भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी सल्लामसलत करूनच झाली. अमित शाहांचा या निर्णयाला पाठिंबा होता, असं फडणवीस म्हणाले.

दुसरीकडे सुधीर सुर्यवंशी यांच्यानुसार, "उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येणं हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अलार्मिंग होतं, तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांना गृह खातं आणि उपमुख्यमंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता अजित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा होती. त्याहून मोठा धोका त्यांना सुप्रीया सुळे यांना पुढल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री केलं जाण्याच्या चर्चेचा वाटला. त्यामुळे दोन्ही नेत्यांना त्यांच्या त्यांच्या राजकीय करिअरमध्ये निर्माण झालेल्या संभाव्य धोक्यांच्या भीतीनेच घाईघाईत शपथविधी उरकण्यास भाग पाडलं."

या पुस्तकांत लिहिलेल्या घटना गृहितकांवर आधारित आणि काल्पनिक असल्याचं फडणवीसांनी मुलाखतीत सांगितलं. राज्यात 23 ते 26 नोव्हेंबर 2019 मध्ये घडलेल्या घडामोडींबाबत आता आपण स्वतः पुस्तक लिहिणार असल्याचंही फडणवीस म्हणाले.

'खरी बाजू' कुणाची?

फडणवीस यांच्या मुलाखतीनंतर आता खरी बाजू कुणाची, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते सांगतात, "शिवसेना राष्ट्रवादीशी चर्चा करतेय. असं देवेंद्र फडणवीस याआधी सांगत होते. राष्ट्रवादी आणि भाजपची चर्चा सुरू होती, असं ते सांगत आहेत. हे काहीही असलं तरी शरद पवारांनी भाजपबरोबर न जाण्याचा निर्णय घेतला हे आजचं सत्य आहे. आमचं तीन पक्षाचं सरकार चाललय हे देवेंद्र फडणवीस यांनी आता स्वीकारलं पाहिजे. याआधीच्या गोष्टींमध्ये कोणाला रस नाही."

फडणवीस यांनी दिलेल्या माहितीमध्ये विरोधाभास असल्याचा दावा जितेंद्र दीक्षित करतात.

ते म्हणतात, "देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी ABP माझाला काही दिवसांपूर्वी दिलेल्या सांगितलं होतं की, अजित पवार यांनी ते जे काय करत आहेत त्याची शरद पवार यांना माहिती असल्याचा विश्वास फडणवीसांना दिला होता. पण आता मात्र ते बरोबर त्यापेक्षा वेगळं म्हणत आहेत. आता मात्र अजित पवारांना शरद पवार जे करत होते ते मान्य नव्हतं असं म्हणत आहेत."

राजकीय अभ्यासक हेमंत देसाई यांच्या मते, "दोन्ही पक्षांच्या दाव्यांवर कितपत विश्वास ठेवावा, हासुद्धा प्रश्नच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास पाहिला तर त्यांनी 2014 ला विनाअट भाजपला पाठिंबा दिला होता. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेसचा पाठिंबाही विनाकारण काढून घेतला होता. त्यामुळे त्यांचे अनेक निर्णय संशयास्पद राहिले आहेत."

"शिवाय, गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये शरद पवारांच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागला होता. हा केंद्र सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत राष्ट्रवादीने प्रचाराचा मुद्दा बनवला. शरद पवारांनी पावसात भाषणं करून आक्रमक प्रचार केला. या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकार स्थापनेसाठी भाजपकडे जाण्याची साशंकताही वाटते."

"त्यामुळे भाजपकडूनच त्यांना ऑफर झाली, हीच शक्यता निर्माण होते. पण असं असलं तरी राजकारणात काहीही शक्य आहे. सध्या तरी प्रत्येक जण आपली बाजू बरोबर आहे, हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे."

म्हणून अजित पवारांचं बंड आणि तीन दिवसांचं सरकार या एकाच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस, शरद पवार किंवा पुस्तकांच्या लेखकांनी आपापले व्हर्जन दिले. पण यातलं खरं सत्य अजूनही कुठेतरी गुलदस्त्यातच आहे, असं देसाई यांना वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)