देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची स्तुती करून भाजप-मनसे युतीचे संकेत देताहेत का?

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

मराठी माणूस आणि हिंदुत्व या दोन मुद्यांमुळे मनसे-भाजप एकत्र येऊ शकतात. मात्र परप्रांतीयांसंदर्भात मनसेने सर्वसमावेशक भूमिका घ्यायला हवी असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याने नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.

पत्रकार राजू परूळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांना मनसे तसंच राज ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तरपणे आपली भूमिका मांडली.

देवेंद्र म्हणाले, 'कोणाच्या म्हणण्याने त्यांनी हिंदुत्वाची कास धरली असं मला वाटत नाही. राज ठाकरेंना राजकीय परिस्थिती नीट समजते. कुठे पोकळी आहे तेही त्यांना कळतं. ही पोकळी कशी भरून काढायची हेही त्यांना उमगतं. त्यासाठी त्यांच्याकडे योजना असते. शिवसेना मोठी कधी झाली? जेव्हा त्यांनी मराठी माणसाच्या बरोबरीने हिंदुत्वाचा मुद्दा उचलला. मराठी माणूस प्राण आहे आणि हिंदुत्व आमचा श्वास आहे असं शिवसेनेने स्पष्ट केल्यानंतरच पक्षाने मजबूत वाटचाल केली. राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांना ओळख मिळाली'.

'महाराष्ट्रात मराठी माणूस केंद्रबिंदू असणं साहजिक आहे. मात्र त्यामुळे व्यापकतेला खीळ बसते. भूमिका मर्यादित होते. काही प्रश्नांवर भूमिका घेता येत नाही. हिंदुत्वाकडे वळा असं मी त्यांना सुचवलेलं नाही,' असं देवेंद्र यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले, ' राज ठाकरे माझे मित्र आहेत. अनेक वर्षांचे आमचे संबंध आहेत. अनेकवेळा मीडियाला न समजता आम्ही भेटलो आहोत, बोललो आहोत. मुख्यमंत्री असतानाही भेटी झाल्या आहेत. राज ठाकरेंशी गप्पा मारायला मजा येते. त्यांच्याकडे नवीन गोष्टी असतात, नवीन ज्ञान असतं. त्यांनी माझ्यावर खूप टीका केली आहे. मीही त्यांच्यावर केली आहे. एकमेकांची उणीदुणी काढली आहेत. त्यांच्याकडे एक वेगळा विचार असतो. त्यांची प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची वेगळी पद्धत असते'.

'ते हिंदुत्वाकडे येत आहेत असं माझ्या लक्षात आलं (माझ्या भेटण्याने ते हिंदुत्वाकडे वळले नाहीत) त्यावेळी मी त्यांची भेट घेतली. नेमकं त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेतलं. त्यांचा विचार योग्य होता. ते योग्य दिशेने जात आहेत,' असं देवेंद्र म्हणाले.

मनसेचा झेंडा भगवा झाला त्यासंदर्भात विचारलं असता देवेंद्र यांनी राज ठाकरे यांनी केलेला खुलासा उलगडून सांगितला. 'मनसे काढली तेव्हाच भगवा झेंडा घेणार होतो. परंतु आमच्या काही लोकांनी मिक्स झेंड्याचा विषय काढला. सगळ्या विचाराचे लोक आपल्याकडे आहेत. त्यावेळेस मी भगवा झेंडा रजिस्टर करून ठेवला आहे. आज आणलेला नाही', असं राज यांनी सांगितल्याचं देवेंद्र म्हणाले.

'त्यांच्या हिंदुत्वाकडे जाण्याने माझा इंटरेस्ट वाढला आहे हे नक्की. दोन गोष्टीत आमचं निश्चित पटू शकतं. मराठी माणसाचा विषय, हिंदुत्व. शंभर टक्के मान्य. परप्रांतीय तसंच गैरमराठीभाषीयासंदर्भात टोकाची भूमिका मान्य होऊ शकत नाही. आताची त्यांची भूमिका फार टोकाची नाही. व्यापक होते आहे. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. मराठी माणूस महत्त्वाचा आहे, परंतु बिगरमराठी माणसाचा तिरस्कार करून राजकारण करता येणार नाही. सर्वसमावेशक राजकारण करावं लागेल. त्या एका मुद्यावर आमचे विचार जुळत नाहीत तोपर्यंत प्रेमप्रकरण, मैत्री म्हणा, राजकीयदृष्ट्या होणं कठीण आहे', असं देवेंद्र यांनी सांगितलं.

राजकीय समीकरणांबाबत विचारलं असता ते म्हणाले, 'एकत्र येण्याची शक्यता किती वाढलेय हे तुम्ही त्यांना विचारू शकता. त्यांच्या मनात काय हे मी सांगू शकत नाही. यापूर्वीही अनेकदा मनात होतं की राज ठाकरेंसोबत गेलं पाहिजे. तत्वामुळे आम्ही गेलो नाही. व्यक्ती म्हणून वैर असण्याचं कारण नाही. जुनी मैत्रीच आहे. हिंदुत्व आणि मराठी माणूस यावर विवाद होऊ शकत नाही. परप्रांतीयांनी मराठी माणसाच्या डोक्यावर बसावं असं आम्हालाही वाटत नाही. परंतु परप्रांतीयासंदर्भात टोकाची भूमिका आम्ही मान्य करू शकत नाहीत'.

मनसेमुळे मतांचं विभाजन होऊ नये म्हणून...

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्याने शिवसेनेला मानणारा थोडा वर्ग नाराज झाला आहे. आता या नाराज लोकांची मतं शिवसेनेला पर्याय म्हणून मनसेला मिळू शकतात. मनसेमुळे मतांचं विभाजन होऊ नये म्हणून त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा भाजपचा विचार दिसतो आहे असं लोकसत्ताचे राजकीय संपाक संतोष प्रधान यांनी सांगितलं.

'मुंबई महापालिका तसंच अन्य निवडणुकांमध्ये मराठी मतं मनसेला मिळू शकतात. कारण मुंबईत भाजप हा प्रतिगुजराती पक्ष असा राग असल्याने म्हणावी तेवढी मतं मिळत नाहीत. अशावेळी मनसे-भाजप एकत्र असतील किंवा औपचारिकदृष्ट्या एकत्र नसतील पण सामंजस्याचं ठरलं असेल तर दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो'.

मुंबईत कोरोनाचं संकट तीव्र झालं आहे. मालाडमध्ये हॉस्पिटलचं बिल कमी करण्यासंदर्भात मदत केल्याने हिंदीभाषिक नागरिकांनी हिंदीतून मनसेचे आभार मानले होते. काही महिन्यांपूर्वी उत्तर भारतीय महासंघाच्या व्यासपाठीवर राज ठाकरे यांनी भाषण केलं होतं.

राज ठाकरेंना राजकीय स्पेस काबीज करायची आहे.

कामगारांना त्यांच्या राज्यातच काम मिळावी ही भूमिका पहिल्यापासूनच

भारत-चीन सीमेवर तणाव असतानाही पंतप्रधानांनी 50 हजार कोटी रुपयांच्या योजनेची घोषणा केली. उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ या राज्यांमध्ये परतलेल्या कामगारांना तिथेच काम मिळावं आणि त्यातून उदरनिर्वाहाचं साधन मिळावं हा या योजनेमागचा उद्देश आहे. काही दिवसांपूर्वीच योगी आदित्यनाथ यांनीही उत्तर प्रदेशात परतलेल्या कामगारांना राज्यातच रोजगार मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हटलं होतं असं मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, 'मनसेच्या स्थापनेपासून आम्ही हीच भूमिका मांडत आहोत. घटनेच्या चौकटीत राहूनच आम्ही आमचं म्हणणं मांडत आहोत. केंद्र सरकारने पर्यायाने भाजपने त्या त्या राज्यातच लोकांना रोजगार मिळवून देण्याची भूमिका घेतली असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करतो'.

'देवेंद्रजी मनसेच्या परप्रांतीयांसंदर्भातील भूमिकेबाबात काय भूमिका मांडली हे मी ऐकलेलं नाही. परंतु परप्रांतियांच्या संदर्भातील भूमिका व्यापक करायची म्हणजे नेमकं काय करायचं हे त्यांनी स्पष्ट करावं. केंद्र सरकार, विविध राज्यं आता जी पावलं उचलत आहेत ते आम्ही सुरुवातीपासून म्हणत आहोत. मुंबई ठाण्यातल्या कारखान्यात बीड, उस्मानाबाद, हिंगोली, यवतमाळ इथली माणसं असावीत', असं ते म्हणाले.

'राजकीय समीकरणं कशी होतील आताच सांगणं कठीण आहे. नवीन सरकार येऊन सहा महिने होत आहेत. हनिमून पीरियड संपेल. कोरोनाचं संकट मोठं आहे. नवी मुंबई किंवा औरंगाबाद इथल्या निवडणुकांचा विचार केला तरी सहा महिने किंवा वर्षभराचा अवधी आहे', असं त्यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)