You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे: उद्धव ठाकरे सरकार आणि महाविकास आघाडीनंतर मनसेचं पुढचं राजकारण कसं असेल?
युती तोडून शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाबरोबर गेल्यामुळे आता राज ठाकरेंचं राजकारण कसं असेल, याविषयी चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील राजकारण बदलताना दिसत आहे, या परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजकारण बदलेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज ठाकरे यांच्याकडे आता भाजपबरोबर जाण्याचा पर्याय असल्याचं बीबीसीचे भारतीय भाषांचे डिजिटल एडिटर मिलिंद खांडेकर सांगतात.
त्यांच्या मते, "राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला आता 13हून अधिक वर्षं झाली आहेत. आजपर्यंत त्यांना कधीही राज्याच्या सत्तेत वाटा मिळालेला नाही. त्यांनी पक्ष काढला तेव्हा राज्यात आघाडीचं सरकार होतं, त्यानंतर 2014मध्ये भाजपचं सरकार सत्तेत आलं आणि आता शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे आता भाजपसोबत जावं, हा त्यांच्यासमोरील पर्याय आहे. पण भाजप त्यांना सोबत घेणार का, हा प्रश्न आहे?"
"राज ठाकरेंचा प्रभाव मुंबईबाहेर दिसत नाही, तो मुंबई आणि काही प्रमाणात नाशिकमध्ये दिसतो. संपूर्ण महाराष्ट्रात या पक्षाचा प्रभाव नाही. त्यामुळे भाजप त्यांच्याबरोबर युती करेल का, हा प्रश्न जेव्हा निवडणूक येईल, तेव्हा समोर येईल. पण, सध्या तरी राज ठाकरे यांच्याकडे बसून राहाण्याशिवाय काही पर्याय नाहीये," खांडेकर पुढे सांगतात.
तर राज ठाकरे संधी साधून शिवसेनेला कोंडीत पकडू शकतात, असं मत पत्रकार धवल कुलकर्णी व्यक्त करतात.
ते म्हणतात, "शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी राज ठाकरे यांना भाजपकडून बळ मिळेल. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये सैद्धांतिक म्हणावी अशी कोणतीही समानता नाही. या सरकारमध्ये शिवसेनेला हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर तडजोड करावी लागू शकते आणि ज्यावेळेस शिवसेना मराठीच्या मुद्द्यावर तडजोड करेल, त्याचवेळेस मनसे संधी साधून शिवसेनेला कोंडीत पकडेल."
"राज ठाकरेंची विधिमंडळातली ताकद कमी झालेली असली, तरी 2009ला 13, 2014ला 1 आणि आता 2019मध्ये त्यांचा 1 आमदार निवडून आला आहे. पण, हे लक्षात घ्यायला हवं की, राज ठाकरेंसारखा करिश्मा असलेला नेता कुठल्याही संधीचा वापर करून तिचं सोन्यात रुपांतर करू शकतो. उत्तर भारतीय अथवा मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी तेच केलं होतं आणि हाच इतिहास पुन्हा घडताना येत्या 5 वर्षांत दिसू शकतो."
'राज ठाकरेंना काम करावं लागेल'
राज ठाकरे यांना राज्याच्या राजकारणात पुढं जायचं असेल, तर काम करावं लागेल, असं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे मांडतात.
त्यांच्या मते, "राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या संसदीय राजकारणात फारसं स्थान नाही, कारण त्यांच्या पक्षाचा एकच आमदार निवडून आलेला आहे. आताच्या परिस्थितीत तो आमदार कोणत्याही बाजूला असला. तरी त्यामुळे काही राजकीय चित्र बदलू शकत नाही. पण, राज ठाकरे यांना राज्याच्या राजकारणात पुढं जायचं असेल, त्यांचा पक्ष टिकवायचा असेल, तर काम करावं लागेल, जे की त्यांनी आजपर्यंत केलं नाही."
ते पुढे सांगतात, "राज ठाकरे पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी काम करत नाहीत. फक्त निवडणुका आल्या की सभा घेतात, सरकारविरुद्ध आवाज उठवतात. पण पक्षवाढीसाठी संघटनेची जी बांधणी करावी लागते, ती त्यांनी केलेली नाही.
गेली 5 वर्षं त्यांना खूप मोठी संधी होती, पण तरीसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. सध्याच्या राजकारणातील त्यांचं स्थान म्हणजे वेळोवेळी त्यांना जे प्रश्न भावतील त्यावर बोलणं अथवा आंदोलन करणं यापद्धतीनं ते काम करत राहतील."
राज-उद्धव एकत्र येणार?
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला राज ठाकरे उपस्थित होते. शरद पवार हे राज आणि उद्धव या दोघांच्या जवळचे आहेत. त्यामुळे हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याची शक्यता आहे, अशीही चर्चा सुरू आहे. पण, ज्येष्ठ पत्रकार अभिजीत ब्रह्मनाथकर ही शक्यता फेटाळून लावतात.
ते म्हणतात,"राजकीय भूमिका आणि कौटुंबिक आनंदाचे क्षण वेगवेगळे असतात. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे निश्चित झाल्यानंतर राज ठाकरेंनी मनसेचा उमेदवार मागे घेतला. याचं कारण ठाकरे कुटुंबाच्या विरोधात राज ठाकरेंनी मुद्दाम उमेदवार दिला, ही चर्चा त्यांना नको होती.
दुसरा मुद्दा म्हणजे राज ठाकरे नेहमीच कौटुंबिक बाबींना वेगळ्या बाजूला ठेवतात. मुलगा अमितच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला ते स्वत: उद्धव ठाकरेंकडे गेले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे त्या कार्यक्रमाला गेले आणि आता उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला राज आले आहेत. पण म्हणून ते एकत्र येतील असं वाटत नाही."
मनसेची भूमिका काय?
महाराष्ट्र धर्माच्या, मराठी माणसाच्या मुद्द्यावरच मनसेचा पुढील प्रवास सुरू राहिल, असं मत मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं.
ते म्हणाले, "मनसे भाजपबरोबर जाणार की नाही, याचा निर्णय आताच करण्याची घाई नाही. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे 3 पक्ष एकत्र आले म्हणून मनसेनं भाजपबरोबर जावं, असा अर्थ होत नाही. पण, आता महाविकास आघाडीचं हे सरकार कसं काम करतं, योग्य-अयोग्य कोणते निर्णय घेतं, मराठी माणसाच्या हिताचे निर्णय घेतं की नाही, हे बघून मनसे पुढील रणनीती ठरवेल."
भविष्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का, या शक्यतेविषयी देशपांडे म्हणाले, "उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याची प्रक्रिया घडेल असं वाटत नाही. मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी आहे. शिवसेनेची मराठी माणसाची भूमिका बोलण्यापुरती मर्यादित आहे, तर मनसेचे कार्यकर्ते मराठी माणसाच्या भल्यासाठी प्रत्यक्षात तुरुंगात गेले आहेत. महाराष्ट्र धर्माच्या, मराठी माणसाच्या मुद्द्यावरच मनसेचा पुढील प्रवास सुरू राहिल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)