उद्धव ठाकरे यांच्याबद्दल या 9 गोष्टी तुम्हाला कदाचित माहीत नसतील

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गेले नऊ दिवस झालेल्या बंडाच्या नाट्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे शिवसेना कशी सांभाळणार हा प्रश्न उपस्थित होत होता. पण उद्धव यांनी 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपपासून वेगळं लढूनही शिवसेनेला स्वबळावर 63 जागा जिंकून दिल्या होत्या. भाजपसोबत सत्तेत राहताना उद्धव यांनी बाळासाहेब ठाकरेंनंतरही शिवसेना सांभाळली आणि वाढवलीही.

पण हा लेख त्यांच्या राजकीय वाटचालीची चर्चा करण्याविषयी नाहीये. उद्धव ठाकरेंविषयी जाणून घेऊयात त्या 9 गोष्टी ज्या तुम्हाला कदाचित माहीत नसतील.

1. दारूची चवही सहन न होणारा नेता

फार कमी जणांना माहीत असेल की उद्धव ठाकरेंना दारूची चवही सहन होत नाही. याविषयी बोलताना 'द कझिन्स ठाकरे' या पुस्तकाचे लेखक धवल कुलकर्णी सांगतात, "1990 च्या दशकातली गोष्ट असेल, सामनाच्या वर्धापन दिनाची पार्टी होती. अनेक मान्यवर जमले होते. लोकांनी आग्रह केला म्हणून उद्धव ठाकरेंनी शॅम्पेनचा एक घोट घेतला. तिथे उपस्थित असणारे लोक सांगतात की त्यानंतर त्यांना प्रचंड ठसका लागला. त्यांना दारूची चव अजिबात सहन झाली नाही."

उद्धव ठाकरे आजही निर्व्यसनी आहेत.

2. घरातला श्रावणबाळ

उद्धव ठाकरेंच्या आत्या त्यांना लहानपणी श्रावणबाळ म्हणायच्या. त्याचं कारणही तसंच आहे. उद्धव ठाकरेंचा स्वभाव लहानपणापासून अतिशय शांत आहे. ते फारसे चिडत नाहीत. लहानपणी त्यांचं टोपणनाव डिंगा असं होतं. पण राज ठाकरेंची मोठी बहीण जयवंती त्यांना दादू म्हणायला लागल्या. म्हणून राज ठाकरेही त्यांना दादू म्हणायचे. पण त्यांची इतर भावंड मात्र त्यांना डिंगूदादा असं म्हणत.

3. राज ठाकरेंच्या बहिणीने जमवलं उद्धव ठाकरेंचं लग्न

जयवंती यांनी उद्धव ठाकरेंचं रश्मी ठाकरे (तेव्हाच्या पाटकर) यांच्याशी लग्न व्हावं म्हणून पुढाकार घेतला होता. रश्मी पाटकर आणि जयवंती ठाकरे या मैत्रिणी होत्या. "जयवंती यांनी सुचवलं होतं की ही मुलगी 'दादू' साठी साजेशी ठरेल," धवल सांगतात.

4. बॅडमिंटन तसंच क्रिकेटपटू

1996-1997ची गोष्ट. राज ठाकरेंनी बॅडमिंटन शिकायचं ठरवलं. त्यासाठी ते दादरला सरावासाठी जाऊ लागले. त्यानंतर त्यांनी 'दादू'ला म्हणजेच उद्धव ठाकरेंना खेळायला बोलावलं. पण एकदा खेळता खेळता उद्धव ठाकरे पडले. तेव्हा राज आणि त्यांचे काही मित्र उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून हसू लागले. त्यानंतर उद्धव यांनी सराव बंद केला, असा सगळ्यांचा समज झाला.

पण, उद्धव ठाकरेंनी सरावासाठी दुसरं कोर्ट बुक केलं होतं. बॅडमिंटन शिकण्यासाठी राज यांचा जो कोच होता, तोच उद्धव यांनी पळवला होता. त्यानंतर एकदा त्या कोचनं सांगितलं होतं की, उद्धव ठाकरे आता इतकं उत्तम बॅडमिंटन खेळतात की ते आम्हालाही 'टफ फाईट' देतील.

उद्धव ठाकरेंच्या जिद्दी, तसंच आपलं साध्य मिळवण्याची कष्ट करण्याच्या स्वभावचं दर्शन या प्रसंगातून घडतं असं धवल कुलकर्णी सांगतात.

5. फोटोग्राफीची आवड

उद्धव ठाकरेंना फोटोग्राफीची आवड आहे. त्यातही त्यांची स्पेशालिटी आहे एरिअल फोटोग्राफी. विमानातून केलेल्या विशिष्ट प्रकारच्या फोटोग्राफीला एरिअल फोटोग्राफी असं म्हणतात. महाराष्ट्रातल्या विविध स्थळांचं दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या फोटोचे 'महाराष्ट्र देशा' या नावाचे पुस्तक 2010 साली प्रकाशित झालं होतं. वारीचं दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या 'पहावा विठ्ठल' या पुस्तकाचे प्रकाशन 2011 साली झालं होतं. अनेकदा ते आपले मित्र मिलिंद गुणाजी याच्याबरोबर फोटोग्राफी करायला जातात.

6. हेल्थ कॉन्शिअस नेता

उद्धव ठाकरे एक हेल्थ कॉन्शिअस नेता आहेत. ते अत्यंत मोजकं खातात. आणि व्यायामाकडे पुरेपूर लक्ष देतात. त्यांच्या मोजून मापून बोलण्यावागण्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यविषयक सवयींवरही झाला आहे. उद्धव घरातही खूप शांत असतात.

7. काका-पुतण्याचं प्रेम

जसे राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे कधी काळी एकमेकांच्या खूप जवळ होते. तसंच उद्धव ठाकरे आणि त्यांचे काका, राज ठाकरेंचे वडील, श्रीकांत ठाकरेंही एकमेकांच्या खूप जवळ होते. श्रीकांत ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर खूप जीव होता.

त्यांच्या नात्याविषयी बोलताना धवल कुलकर्णी सांगतात की, "उद्धव दीड वर्षांचे असताना खूप आजारी पडले. ते त्यातून वाचतील की नाही अशी शक्यता तयार झाली. बाळासाहेब ठाकरे हताश झाले होते, तेव्हा श्रीकांत ठाकरेंनी त्यांची खूप शुश्रूषा केली. तेव्हापासूनच उद्धव आणि श्रीकांत ठाकरे यांच्या खूप जवळचे संबंध होते."

8. राजकीय प्रवासाची प्रेरणा रश्मी ठाकरे

उद्धव ठाकरेंच्या राजकीय प्रवासामागे कोणाची प्रेरणा असेल तर ती त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची. "त्यांना स्वतःला राजकीय महत्त्वकांक्षा आहेत. उद्धव यांच्या राजकीय जडणघडणीत रश्मी यांचा खूप मोठा वाटा आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं ही देखील त्यांची इच्छा होती. पण असं असतानाही त्यांनी घराची जबाबदरी समर्थपणे पेलली आहे."

"त्यांनी आपल्या मुलांना, आदित्य आणि तेजसला खूप शिस्तीत वाढवलं आहे. म्हणजे प्रत्येक आई आपल्या मुलांना शिस्त लावते. पण रश्मी ठाकरेंच्या शिस्तीमुळे आदित्य आणि तेजस इतर राजकीय नेत्यांच्या मुलांसारखे नाहीयेत," धवल कुलकर्णी नमूद करतात.

9. कुटुंब रंगलंय प्राणीप्रेमात

उद्धव ठाकरेंच्या परिवाराला ओळखणारे सांगतात की त्यांचं कुटुंब शांत आहे. त्यांच्या घरामध्ये एक सकारात्मकता जाणवते. मातोश्री बंगल्याच्या मागच्या बाजूला एक बाग आहे, तिथे विविध प्रजातीचे प्राणी, पक्षी आणि झाडं आहेत. तेजस ठाकरे त्या बागेच्या देखभालीकडे जातीने लक्ष घालतात. सगळ्या कुटुंबालाच प्राण्यांविषयी प्रेम आहे. तेजस ठाकरे यांनी खेकड्यांच्या काही नवीन प्रजातीही शोधून काढल्या आहेत असं धवल सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)