देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांनी आपली साथ सोडल्याचं कधी लक्षात आलं?

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी

23 नोव्हेंबर 2019 ला महाराष्ट्राच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करेल अशी घटना घडली होती. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अगदी पहाटे राजभवनात जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदांची शपथ घेतली. या घटनेला आज एक वर्षं पूर्ण झालं आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं.

23 नोव्हेंबर 2019...सकाळी 9 चा सुमार होता...च्या सुमारासची ती वेळ होती. मुंबईतल्या मरिन ड्राईव्ह परिसरातल्या पोलीस जिमखान्यात देवेंद्र फडणवीसांचे डोळे एका व्यक्तीची आतुरतेने वाट पाहत होते.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 10 वर्षं पूर्ण झाली होती. प्रथेप्रमाणे त्यादिवशी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांनी या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहाणं अपेक्षित होतं.

मरिन ड्रायईव्हवरील पोलीस जिमखान्यात एका मागोमाग एक सर्व महत्त्वाच्या लोकांच्या गाड्या येत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथं उपस्थित झाले. जवळपास सर्व महत्त्वाची मंडळी इथं आली. पण देवेंद्र फडणवीसांना एका व्यक्तीची अनुपस्थिती जाणवत होती. ती व्यक्ती होती अजित पवार.

प्रोटोकॉलनुसार अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याआधी तिथं हजर राहाणं गरजेचं होतं. सकाळी अजित पवार यांची गाडी त्यांच्या घरातून तर निघाली, पण ती पोलीस जिमखान्यावरील या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात पोहोचलीच नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या मनातली चलबिचल आणखी वाढली होती. एकीकडे सुप्रीम कोर्टात त्यांच्या सरकारच्या भवितव्याबाबत सुनावणी सुरू होणार होती आणि दुसरीकडे अजित पवार यांनी मारलेली दांडी नेमका इशारा देणारी होती.

घरातून निघालेली अजित पवार यांची गाडी थेट नरिमन पॉइंटच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये घुसली. तिथं कुणीतरी त्यांची वाट पाहात होतं. अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला ते आयुष्यात कधीच 'नाही' म्हणू शकत नव्हते. ती व्यक्ती समोर येताच अजित पवारांनी त्यांना वाकून नमस्कार केला. त्या दोघांमध्ये आतापर्यंत एवढी अवघडलेली स्थिती कधीच आली नव्हती... कोण होती ती व्यक्ती?

काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या '36 डेज ए पॉलिटिकल क्रॉनिकल ऑफ ऍम्बिशन, डिसेप्शन, ट्रस्ट ऍन्ड बिट्रेयल' या पत्रकार कमलेश सुतार यांनी लिहिलेल्या पुस्तकात या घटनेचं वर्णन करण्यात आलं आहे.

हॉटेल ट्रायडन्टमध्ये भेटलेल्या या व्यक्तीनं राज्यात सध्या अस्तित्वात असलेलं सरकार स्थापन करण्यासाठी अप्रत्यक्ष किती मोठी भूमिका बजावली आहे हे सुद्धा कमलेश सुतार यांनी मांडलं आहे.

महाराष्ट्रात ऑक्टोबर 2019 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक ही सर्वार्थानं सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांना महत्त्वाकांक्षा, विश्वास आणि विचारधारेच्या मुद्द्यांवर उघडं पाडणारी ठरली आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर महिनाभरापेक्षा जास्त काळ चाललेल्या सत्तास्थापनेच्या राजकीय नाट्यात अनेक पात्र आहेत. अनेक घटना आहेत. अनेक न सांगितलेल्या गोष्टी आहेत आणि त्यातून निर्माण होणारा खूप मोठा राजकीय अर्थही आहे. तोच शोधण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या या घडामोडींचं प्रत्यक्ष वार्तांकन करणाऱ्या तीन पत्रकारांनी पुस्तकाच्या रुपात केला आहे.

पत्रकार जितेंद्र दीक्षित यांचं '35 डेज: हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्रा चेंज फॉरेव्हर इन 2019,' पत्रकार कमलेश सुतार याचं '36 डेज ए पॉलिटिकल क्रॉनिकल ऑफ अॅम्बिशन, डिसेप्शन, ट्रस्ट अॅम्बिशन बिट्रेयल' आणि पत्रकार सधीर सूर्यवंशी यांचं 'चेकमेट : हाऊ द बीजेपी वन अॅन्ड लॉस्ट महाराष्ट्र' ही तीन पुस्तकं प्रकाशित झाली आहे.

सत्ता स्थापन होऊन सहा महिने झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर ही पुस्तकं येत आहेत.

'लाँग लिव्ह शरद पवार'

अर्थात एवढ्या मोठ्या राजकीय नाट्यातून स्थापन झालेलं हे सरकार किती काळ टिकेल हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर एक शिवसेना नेते 'लाँग लिव्ह शरद पवार' असं म्हणून देतात. याचाच अर्थ जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसवर शरद पवार यांचं नियंत्रण आहे तोपर्यंत हे सरकार चालेल.

मग राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी आतूर झालेल्या देवेंद्र फडणवीसांचं काय होईल, या प्रश्नाच्या उत्तराची पार्श्वभूमी पत्रकार जितेंद्र दीक्षित यांच्या '35 डेज हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्रा चेंज फॉरेव्हर इन 2019' या पुस्तकात देण्यात आली आहे.

जितेंद्र दीक्षित यांच्या मते, "ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या या राजकीय नाट्याच्या स्क्रिप्टची सुरुवात 2014 मध्येच झाली होती. अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद हे तात्कालिक कारण होतं. पण त्यामागे अनेक मोठी कारणं आहेत. 2014 ते 2019 काळात दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कटुता आली होती, त्याचा परिपाक शिवसेनेनं निवडणुकीनंतर त्यांच्या हातात निर्णायक आकडे आल्याचं लक्षात येताच युती तोडण्यात झाला. हे भाजला अगदीच अनपेक्षित होतं."

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा अजिबात लपून राहिलेल्या नाहीत. 10 वर्षं मुख्यमंत्री राहिल्यानंतर ते केंद्रात जातील, ते भाजपचे पुढे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा पत्रकारांमध्ये कायम असायची.

एका पत्रकारानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, "काही पत्रकारांना देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा बोलून दाखवलं होतं की त्यांना केंद्रात खूप मोठी भूमिका बजावायची आहे."

केंद्रातल्या या मोठ्या भूमिकेसाठी त्यांना आणखी किमान ५ वर्षं मुख्यमंत्री होणं गरजेचं होतं. त्यासाठीच 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेबरोबर युती करण्याचा आग्रह धरला. केंद्रीय नेतृत्व फारसं अनुकूल नसतानाही त्यांनी युती करवून घेतली. केद्रानंही त्यांचं ऐकलं आणि त्यांना तेवढी मोकळीकही दिली.

...आणि केंद्रानं फडणवीसांना वाऱ्यावर सोडलं

पण निवडणूक निकालांनंतर मात्र शिवसेनेनं संधी हेरली आणि युती तोडली त्यावेळी केंद्रानं देवेंद्र फडणवीस यांना वाऱ्यावर सोडलं.

याबाबत जितेंद्र दीक्षित सांगतात, "महाराष्ट्राबरोबरच हरियाणाच्या सुद्धा निवडणुका झाल्या होत्या. तिथंही भाजपला सत्ता स्थापनेसाठी जमवाजमव करायची होती.

अमित शहा यांनी ती लगेचच जुळवून आणली. हरियाणात लोकसभेच्या फार जागा नाहीत. पण महाराष्ट्र मोठं राज्य आहे. ते भाजपसाठी महत्त्वाचं आहे. पण तरीही अमित शहांनी याबाबत काहीच वक्तव्य केलं नाही. उद्धव ठाकरेंशी सुद्धा ते बोलले नाहीत. त्यांनी यात काहीच रस घेतला नाही याचा सरळ अर्थ आहे की त्यांनी फडणवीसांना वाऱ्यावर सोडलं."

या घटना घडत असताना जेव्हा फडणवीस नवी दिल्लीत अमित शहा यांना भेटण्यासाठी गेले होते तेव्हा नेमकं काय झालं होतं याचा दखलाही दीक्षित यांनी त्यांच्या पुस्तकात दिला आहे.

अजित पवारांची साथ फडणवीसांनी का घेतली?

केंद्राकडून कुठलीही फारशी मदत मिळत नसताना आपलं राजकीय करीअर अडचणीत येऊ नये यासाठीच त्यांना अजित पवार यांच्याबरोबर जाऊन सरकार स्थापन करावं लागलं, असं जितेंद्र दीक्षित सांगतात.

त्यांच्या मते, भाजपसाठी महारष्ट्रात सरकार बनवणं सोपं होतं. मोदी किंवा शहांनी उद्धव ठाकरे यांना एक फोन केला असता किंवा भाजपचं केंद्रातलं कुणी 'मातोश्री'वर आलं असतं तर शिवसेना मानली असती.

वाजपेयींच्या काळातसुद्धा शिवसेना नाराज व्हायची तेव्हा केंद्रातलं कुणीतरी 'मातोश्री'वर आलं आणि चर्चा झाली की लगेच आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत असं शिवसेनेकडून जाहीर केलं जायचं. पण यावेळी फडणवीसांना एकटं पाडण्यात आलं होतं. केंद्राकडून असं कुठलंही पाऊल उचण्यात आलं नाही. फडणवीसांमुळेच असं करण्यात आलं.

केंद्रीय नेतृत्वानं फडणवीसांना तुम्हीच या समस्या निर्माण केल्या आहेत आता तुम्हीच निस्तरा असं सागंण्यात आल्याचं, दीक्षित सांगतात. त्यामुळेच काहीही करून फडणवीसांना पुन्हा सत्ता स्थापन करून दाखवणं भाग होतं.

सोफीटेल हॉटेल, मिरची हवन आणि शपथविधी

तिकडे महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या होत्या. 22 नोव्हेंबरला वरळीतल्या नेहरू सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या नावावर मुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब झालं. सर्व राजकीय पत्रकारांनी सुटकेचा निश्वास टाकला, पण तो औटघटकेचा ठरणार होता कारण पुढचे 80 तास त्यांची पुरती दमछाक करणारे होते.

22 नोव्हेंबर 2019 ते 27 नोव्हेंबर 2019 दरम्यान महाराष्ट्रात आलेल्या या राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेल्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये नेमकं कधी आणि तसं हे सगळं ठरलं याचा घटनाक्रम सुधीर सूर्यवंशी यांनी त्यांच्या 'चेकमेट : हाऊ द बीजेपी वन अॅंड लॉस्ट महाराष्ट्र' या पुस्तकात मांडला आहे. सुधीर सूर्यवंशी यांनी याबाबत द वायरसाठी विस्तृत लेख लिहिला आहे.

'22 नोव्हेंबरची नेहरू सेंटरमधली बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांच्या सहीचं पत्र घेऊन अजित पवार यांच्या चर्चगेटमधल्या घरी पोहोचले. रात्री साडेदहाला ते पुन्हा घराबाहेर पडले. त्याची गाडी पश्चिम उपनगरांच्या दिशेनं निघाली. वाटेत त्यांनी गाडी थांबली आणि गाडीतून उतरले. ड्राव्हरला गाडी घेऊन पुन्हा घरी जा असं सांगितलं आणि दुसऱ्या एका गाडीत ते बसून रवाना झाले. त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा मुख्यमंत्र्यांचा ताफा सोडला आणि तेही दुसऱ्या एका गाडीत बसून पश्चिम उपनगरांच्या दिशेने रवाना झाले.

दोन्ही नेते बीकेसीमधल्या सोफिटेल हॉटेलमध्ये दाखल झाले. पण कुणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी हॉटेलच्या मागच्या दारानं प्रवेश केला.

दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येणं हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अलार्मिंग होतं, तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांना गृह खातं आणि उपमुख्यमंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता अजित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा होती. त्याहून मोठा धोका त्यांना सुप्रीया सुळे यांना पुढल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री केलं जाण्याच्या चर्चेचा वाटला' असं सुधीर सूर्यवंशी लिहितात.

दोन्ही नेत्यांना त्यांच्या त्यांच्या राजकीय करीअरमध्ये निर्माण झालेल्या संभाव्य धोक्यांच्या भीतीनेच घाईघाईत शपथविधी उरकण्यास भाग पाडलं.

'शरद पवार यांना याची कल्पना आली तर आपल्याला हे करता येणार नाही हे अजित पवार जाणून होते. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे लोक पाठिंब्याची पत्र घेऊन राजभवनावर जाण्याआधीच शपथविधी उरकण्याचं ठरलं.

मध्यरात्रीतून सर्व यंत्रणाला कामाला लागल्या. दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनापासून ते मुंबईतल्या राजभवनात हालचाली वाढल्या. राजभवनातल्या माईक सिस्टिम हाताळणाऱ्या स्टाफला रात्री तिथंच थांबवून ठेवण्यात आलं. तेव्हाच काहीतरी वेगळ घडत असल्याची कुणकुण तिथल्या लोकांना लागली. पण नेमकं काय घडणार आहे हे समजण्यासाठी पहाटेचे 6 वाजणं गरजेचं होतं.

तिकडे अजित पवारांच्या गोटात आमदारांची जुळवाजुळव सुरू झाली, तर फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी मात्र वेगळीच गडबड सुरू झाली. काही तांत्रिकांचं आगमन झालं आणि त्यांनी मिरची हवन सुरू केलं. मध्य प्रदेशातल्या नलखेडातल्या बगलामुखी मंदिरातून हे तांत्रिक आले होते. उत्तराखंडमध्ये जेव्हा हरिश रावत यांचं सरकार अडचणीत आलं होतं तेव्हा त्यांच्या भावानं नलखेडाला जाऊन मिरची हवन केलं होतं. त्यानंतर त्यांचं सरकार वाचलं होतं. त्यानंतर हे हवन राजकराणी आणि उद्योग विश्वातल्या लोकांध्ये प्रसिद्ध झालं आहे. त्यामुळेच सत्तेत टिकून राहण्यासाठी फडणवीस यांनी हे हवन केलं,' असं सूर्यवंशी लिहितात.

याआधीही फडणवीस यांनी सत्तेत टिकून राहण्यासाठी असं हवन केल्याचं बोललं जातं.

या हवनानंतर देवेंद्र फडणवीस राजभवनावर शपथ घेण्यासाठी रवाना झाले होते. आतापर्यंत सर्व महत्त्वाच्या कामांसाठी निळ्या रंगाचं जॅकेट घालणारे देवेंद्र फडणवीस या शपथविधीला मात्र तांत्रिकांच्या सांगण्यावरून काळं जॅकेट घालून उपस्थित झाले होते.

राजभवनावर साडेसहाच्या सुमारास त्यांचा आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला, काही मिनिटांमध्ये टीव्हीवर, 'देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदी' अशी ब्रेकिंग सुरू झाली होती आणि घरोघरी पोहोचलेल्या सर्व वृत्तपत्रांचा मथळा होता 'उद्धव ठाकरे होणार मुख्यमंत्री.'

...आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणाऱ्या त्या 80 तासांची सुरूवात झालेली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)