कोरोना लॉकडाऊनः शाळेनं सुरू केलं टीव्ही चॅनल, सोलापुरात ई-लर्निंगच्याही पुढचा टप्पा

विद्यार्थी
    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

गेल्या चार महिन्यापासून जगभरात कोरोनाची साथ पसरली आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी जगभरातील विविध देशांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत.

1 जूनपासून भारतातले व्यवहार हळूहळू सुरू व्हायला सुरुवात झाली आहे. पण दुसरीकडे कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्यासुद्धा वाढत चालली आहे. त्यामुळे सरकारने सोशल डिस्टन्सिंग राखण्याच्या सूचना प्रत्येकाला दिलेल्या आहेत.

कोरोना संकटादरम्यान शाळा-महाविद्यालयांना मार्च महिन्यात सुटी देण्यात आली तेव्हापासून शालेय संस्था बंदच होत्या. दरम्यान अनेक परीक्षा रद्द करण्यात आला.

यावर्षी 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष 2020-21 सुरू होईल पण शाळा अद्याप सुरू होणार नाहीत, असा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

पण शाळा कधी पूर्ववत सुरू होतील, याचं उत्तर सध्यातरी कुणाकडेच नाही. या पार्श्वभूमीवर अनेक शाळांनी मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

झूम, स्काईप यांसारख्या अपवरून मुलांचे क्लास घेतले जात आहेत. पण या यंत्रणेतही त्रुटी असल्याचं हळूहळू लक्षात येऊ लागलं आहे.

विद्यार्थी

त्यामुळे सोलापुरातील जुनी मिल कंपाऊंड परिसरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चक्क टीव्ही चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला. या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे.

'चॅनल नंबर 999'

लॉकडाऊनमुळे शाळा-महाविद्यालयं बंद असल्यामुळे अनेक महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला. पण यातील अडचणी लोकांना लक्षात येऊ लागल्या.

अनेकवेळा इंटरनेट आणि नेटवर्कच्या समस्येमुळे संपर्क तुटतो. मोबाईलवर विविध अॅप एकाचवेळी काम करत असल्यामुळे अनेक नोटिफिकेशन येत असतात. अशावेळी विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होऊ शकतं. शिवाय विद्यार्थी लहान स्क्रिनवर जास्त वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.

कोरोना
लाईन

नागेश करजगी ऑर्किड स्कूलने सुरुवातीला ऑनलाईन क्लासची संकल्पना वापरली होती. पण यातील अडचणी आणि तक्रारी लक्षात आल्यानंतर या विषयावर चर्चा करण्यासाठी त्यांनी शाळेचे विश्वस्त आणि शिक्षकवर्गाची बैठक बोलावली.

यातील चर्चेनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी टीव्ही चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती शाळेचे संस्थापक आणि संचालक कुमार करजगी यांनी दिली.

ते सांगतात, "कोरोना व्हायरसमुळे येणारा काही काळ शाळा सुरू करणं शक्य नाही. म्हणून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी इतर पर्यायांचा अवलंब करावा लागणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी एक वेळ ऑनलाईन क्लासमध्ये गंभीरपणे उपस्थित राहू शकतात. पण बालवाडी किंवा प्राथमिक शाळेतील लहान मुलांकरिता ऑनलाईन क्लास उपयोगाचे नाहीत. शिवाय त्यांच्या हाती इंटरनेटची सुविधा इतक्या लहान वयात देणं धोकादायक आहे.

लहान स्क्रिनमुळे त्यांना डोळ्याचे लहान वयातच डोळ्याचे विकार जडण्याची शक्यता आहे. या सगळ्या बाबींचा विचार करून आम्ही टीव्ही चॅनल उघडण्याचा निर्णय घेतला."

"त्यासाठी आम्ही भिमा रिद्धी डिजिटल सर्व्हीस (इन केबल नेटवर्क) यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही पैशाचा विचार न करता, कमी दरात याबाबत करार करण्याची तयारी दर्शवली. यानंतर चॅनल नंबर 999 वर नागेश करजगी स्कूलचं टीव्ही चॅनल सुरू करण्यात आलं,

शाळेत टीव्ही चॅनलसाठीचा संपूर्ण सेटअप उभारण्यात आला. 6 तंत्रज्ञ या चॅनलचं तांत्रिक काम पाहतात. त्यांच्या मदतीने शाळेचे 85 शिक्षक आपले क्लास घेत असल्याचं संचालक कुमार करजगी सांगतात.

प्रत्येक वर्गासाठी विशिष्ट टाईम-स्लॉट

आपण टीव्ही चॅनलवर विविध सिरीयल पाहतो. बातम्या पाहतो. टीव्ही चॅनलवर प्रत्येक कार्यक्रमाची वेळ ठरलेली असते. त्याचप्रमाणे करजगी स्कूलच्या चॅनल नंबर 999 वरसुद्धा क्लासच्या 'प्रसारणाचं' स्वतंत्र असं वेळापत्रक बनवण्यात आलं आहे.

करजगी स्कूलमध्ये पहिली ते दहावीच्या वर्गात सर्व मिळून सुमारे 1500 विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना टीव्हीवर शिकवण्यासाठी खऱ्याखुऱ्या शाळेप्रमाणेच प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटात विभागण्यात आलंय.

वेळापत्रक

सकाळचं सत्र माध्यमिक शाळेतील वर्गांसाठी तर दुपारचं सत्र प्राथमिक शाळेच्या वर्गांसाठी आहे. सकाळी सहा वाजता प्रार्थना आणि योगासनांनी या टीव्ही चॅनलचं कामकाज सुरू होतं. नंतर एका-एका वर्गाचे क्लास घेण्यात येतात.

नागेश करजगी शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली हजारे सांगतात, "सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना घरातूनच शिक्षण घ्यावं लागेल. आपण या परिस्थितीसाठी सज्ज नव्हतो. या काळात तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना तयार व्हावं लागणार आहे. याच्या काही मर्यादाही आहेत. यातून सगळाच अभ्यासक्रम पूर्ण होईल, असंही नाही.

पण विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून दूर होऊ नयेत, त्यांची शिक्षणाची सवय मोडू नये, याचा विचार करून हे चॅनल सुरू करण्यात आलं आहे. नागेश करजगी शाळेचं टीव्ही चॅनल शिक्षण क्षेत्राला एक नवी दिशा देईल."

सोलापूर ग्रामीण पोलिसांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या विजयालक्ष्मी कुरी यांची मुलगी समर्था नागेश करजगी शाळेत सहावीच्या वर्गात शिकते.

विजयालक्ष्मी सांगतात, "शाळेने सुरुवातीला लर्न अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं. पण यामुळे त्यांच्या डोळ्यावर ताण पडत असल्याचं आमच्या लक्षात आलं. या अडचणी आम्ही शिक्षकांना कळवल्या. त्यांचा टीव्ही चॅनल सुरू करण्याचा निर्णय दिलासादायक आहे. हा नावीन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण राज्यात वापरता येऊ शकतो."

"इतर शाळांनाही क्लास घेण्याची परवानगी"

नागेश करजगी शाळेने आपल्या चॅनल नंबर 999 चं प्रक्षेपण संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सुरू केलं आहे. हे चॅनल एका शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलं असलं तरी केबल नेटवर्कवर प्रसारित होत असल्यामुळे इतर शाळांचे विद्यार्थीही चॅनल पाहू शकतात.

वेळापत्रक

सोलापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आणि शरदचंद्र पवार प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी करजगी शाळेचं चॅनल पाहिलं. ही शाळा इंग्रजी माध्यमाची सीबीएसई बोर्डची शाळा आहे.

सोलापुरात मराठी तसंच सेमी-इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनाही या चॅनलचा लाभ मिळवून द्यावा, असा विचार त्यांच्या मनात आला.

ते सांगतात, "करजगी स्कूलने पुढाकार घेऊन टीव्ही चॅनल उघडल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही संचालक कुमार करजगी यांच्याशी संपर्क साधला. दोघांमध्ये चर्चा होऊन करजगी यांनी रोज चार तासांचा वेळ मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी मोफत राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला."

"जिल्ह्यात प्रश्नपत्रिका काढणाऱ्या शिक्षकांच्या समितीतील तज्ज्ञ शिक्षक आहेत. हे शिक्षक रोज चार तास वेगवेगळे विषय शिकवतील. प्रत्येक वर्गासाठी याचं वेळापत्रक बनवण्याचं नियोजन सुरू आहे. ग्रामीण भागातील मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांनासुद्धा याचा लाभ मिळेल," असं माने सांगतात.

"एकतर्फी व्यासपीठ?"

इंटरनेट किंवा इतर अॅपच्या माध्यमातून शिक्षण घेताना दोन्ही बाजूंनी संवाद होते. या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रतिक्रिया देण्याची, कमेंट करण्याची किंवा आपला प्रश्न विचारण्याची संधी मिळते.

विद्यार्थी

पण टीव्ही चॅनल हे संवादाचं एकतर्फी माध्यम म्हणून ओळखलं जातं. टीव्ही चॅनलवरच्या एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायची असेल तर इतर माध्यमांचा वापर करावा लागतो. किंवा एखादा भाग प्रक्षेपित झाल्यानंतर पुन्हा तो पाहता येत नाही.

यामुळे चॅनल पाहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं शंकानिरसन कसं केलं जाईल, हा प्रश्न उपस्थित होतो.

याबाबत माहिती देताना कुमार करजगी सांगतात, "टीव्ही चॅनल सुरू करताना या बाबींचा विचार करूनच आम्ही सर्व नियोजन केलं आहे. टीव्ही चॅनलवरची शिक्षणपद्धती अत्यंत सोपी ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी विद्यार्थ्यांना एखादी शंका असल्यास ते आपले प्रश्न संबंधित शिक्षकांना पाठवू शकतात.

"विद्यार्थ्यांच्या शंकानिरसनासाठी शनिवार-रविवार हे दोन दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांचं शंका-निरसन केलं जाणार आहे."

"याशिवाय काही घरांमध्ये स्थानिक केबल नेटवर्कचं कनेक्शन नसतं. अनेकजण डिश टीव्ही वापरतात. अशा विद्यार्थ्यांचाही शाळेने विचार केला आहे. शाळेच्या युट्यूब चॅनलवर प्रत्येक क्लासचा व्हीडिओही अपलोड करण्यात येईल. त्यामुळे क्लास चुकलेले विद्यार्थी कोणत्याही वेळी हे व्हीडिओ पाहू शकतात."

येणारा काही काळ शाळा याच प्रकारे टीव्हीवर सुरू असेल. केबल नेटवर्कच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही चॅनलचं प्रसारण करू शकतो. महाराष्ट्र सरकारने याबाबत पुढाकार घेतल्यास आपण त्यांना मदत करण्यासाठी तयार आहोत, असंही करजगी यांनी सांगितलं.

तानाजी माने यांच्या मते, "ऑनलाईन किंवा टीव्ही माध्यमातून शिक्षण हा कायमस्वरूपी पर्याय नाही. पण कोरोना संकटामुळे सध्याच्या स्थितीत आपल्याकडे दुसरा पर्यायही उपलब्ध नाही. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेची हमी मिळत नाही, तोपर्यंत अशाच प्रकारे शिक्षण घ्यायची सवय आपल्याला लावून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी करजगी स्कूलचा पुढाकार कौतुकास्पद आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)