राहुल गांधी: 'नरेंद्र मोदी हे खरे तर सरेंडर मोदी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरं तर सरेंडर मोदी आहेत, त्यांनी चीनसमोर शरणागती पत्करली, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

त्यांनी ट्वीट करून जपान टाईम्सच्या वेबसाईटवरची बातमी शेअर करत हा आरोप केला आहे.

गलवान खोरे प्रकरण आणि भारत चीन तणावानंतर गेल्या काही दिवसांत काँग्रेस नेते राहुल गांधी नरेंद्र मोदींवर वारंवार टीका करताना दिसत आहेत.

त्यांच्या या वक्तव्याला अद्याप भाजपकडून प्रतिक्रिया आली नाहीये.

याआधी, चीनचे सैनिक भारतात घुसलेच नाहीत, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समाचार घेतला होता.

पंतप्रधान मोदींनी चीनला आपली जमीन स्वाधीन केली, असं राहुल यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.

जर जमीन चीनची होती तर मग आपल्या सैनिकांनी जीव का गमावला? हे सगळं कुठे घडलं? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करून चर्चा केली होती. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील विविध पक्षांचे नेते या चर्चेत सहभागी झाले.केंद्र सरकार किंवा कुठल्याच पक्षाकडून या सर्वपक्षीय बैठकीतले मुद्दे समोर आले नाहीत. मात्र, PTI या वृत्तसंस्थेने या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे समोर आणले आहेत.

"आतापर्यंत ज्यांना कुणीच प्रश्न विचारत नव्हता, ज्यांना कुणीच रोखत नव्हतं, त्यांना आपल्या जवानांनी काही सेक्टर्समध्ये रोखलंय, त्यांना इशारा देत आहेत," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं.

कुठेही आपली गुप्तचर यंत्रणा अयशस्वी झाली नसल्याचा दावा या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला.

या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, "टेलिकॉम, रेल्वे, हवाई उड्डाण अशा क्षेत्रात चीनच्या कंपन्यांना परवानी आपण द्यायला नको."

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार इत्यादी दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)