भारत-चीन सीमावाद : चीननं जीवितहानीचा आकडा जाहीर केला तर भारत सरकारवर दबाव वाढेल - ग्लोबल टाइम्सची बातमी

लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीन या दोन देशांमधील सैनिकांमध्ये 15 जूनच्या रात्री हिंसक झटापट झाली. यात भारताचे 20 जवान मृत्युमुखी पडले.

भारतानं मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची यादी जाहीर केली. मात्र, चीनच्या सैनिकांबाबत चीननं कोणतीच माहिती अद्याप दिली नाही. याचबाबत चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइ्समध्ये भारताला इशारा देणारी बातमी छापून आलीय.

"लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत चीनची किती जीवितहानी झाली हे जाहीर केलं, तर भारत सरकारवरचा दबाव अजून वाढेल. कारण ही हानी 20 पेक्षा कमीच आहे," असं चीन सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'नं म्हटलंय.

"देशातील चीनविरोधी भावनेवर भारतानं नियंत्रण मिळवलं नाही आणि भारतानं पुन्हा कोणताही सीमा संघर्ष निर्माण केल्यास त्यांचा 1962 पेक्षाही अधिक अपमान होईल," असंही या बातमीत म्हटलंय.

भारताचे 20 जवान मृत्युमुखी पडले, तर 70 जवान जखमी झाल्याचा दावा चीननं ग्लोबल टाइम्सच्या या बातमीतून केलाय.

भारताच्या 20 जवानांनी प्राण गमावला

लडाखच्या पूर्वेकडच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यातली सीमा ज्याला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणतात, तिथे पुन्हा एकदा तणाव आहे. लहान-मोठ्या कुरबुरी अधूनमधून असायच्या. मात्र, यावेळी परिस्थिती जास्त गंभीर आहे.

सोमवारी (15 जून) रात्री भारत आणि चीन यांच्या जवानांमध्ये हाणामारी झाली. यात भारताच्या 20 जवानांना आपले प्राण गमवावे लागले.

हे सर्व 16 बिहार रेजिमेंटचे जवान होते. सुरुवातीला 3 जवान शहीद झाल्याची बातमी आली. मात्र, त्यानंतर भारतीय लष्कराने स्वतःच निवेदन जारी करत गंभीररित्या जखमी असणाऱ्या 17 जवानांचाही मृत्यू झाल्याचं सांगितलं.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव या संपूर्ण प्रकरणावर बोलताना म्हणाले, "दोन्ही देशांच्या सीनिअर कमांडरांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनुसारच पुढे कृती होईल, असं आम्हाला वाटलं होतं."

"15 जूनच्या रात्री चिनी लष्कराने अचानक कल बदलला. चीनने एकतर्फी निर्णय घेत जैसे थे परिस्थिती फेटाळली आणि याचाच परिणाम म्हणून दोन्ही बाजूने हिंसक चकमक झडली. दोन्हीकडचे लोक दगावले. हे टाळता आलं असतं. मात्र, चीनने कराराचं प्रामाणिकपणे पालन केलं नाही."

20 भारतीय जवानांच्या मृत्यूच्या बातमीने भारतात राजकारण तापलं. पंतप्रधानांनी जनतेसमोर येऊन माहिती द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हीडिओ संदेश आला.

या संदेशात ते म्हणाले की, भारतीय जवानांचं हौतात्म्य वाया जाणार नाही. पंतप्रधान मोदी हेदेखील म्हणाले की, भारतीय जवानांचा मारताना मृत्यू झाला. म्हणजेच पंतप्रधानांना म्हणायचं होतं की, फक्त भारतीय जवानांचं नुकसान झालेलं नाही.

चिनी जवानही ठार झाले का?

चीनचे जवानही ठार झाल्याच्या बातम्या भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये मंगळवार (16 जून) पासूनच येत आहेत. काहींनी तर सूत्रांच्या हवाल्याने मृत्यूमुखी पडलेल्या चिनी जवानांची संख्याही सांगितली.

मात्र, चिनी जवान ठार झाले का, झाले तर किती, हे अजूनही स्पष्ट नाही. बुधवारी (17 जून) हाच प्रश्न चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत पीटीआय या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने विचारला.

चीनचेही जवान ठार झाल्याचं भारतीय प्रसार माध्यमांमध्ये सांगण्यात येतंय. तुम्ही यावर स्पष्टीकरण देऊ शकता का, असा त्यांचा प्रश्न होता.

या प्रश्नाचं उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते चाओ लिजियान म्हणाले, "मी जसं सांगितलं की दोन्ही देशांचे जवान ग्राउंडवर खास मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्याकडे अशी कुठलीची माहिती नाही, जी इथे सांगता येईल. मला असं वाटतं आणि तुम्हीही बघितलं असेल की हे घडलं तेव्हापासून सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही पक्ष चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत."

चाओ लिजियान म्हणाले, "जगातली दोन विकसनशील आणि उदयोन्मुख राष्ट्रं भारत आणि चीन यांच्यातल्या मतभेदांपेक्षा जास्त द्विपक्षीय हित आहे. दोन्ही देशांनी आपापल्या नागरिकांचं हित आणि अपेक्षा यानुसार संबंधी योग्य मार्गावार पुढे न्यावे आणि काहीएक सहमती तयार करून त्याचं पालन करावं, हे गरजेचं आहे. भारतीय पक्ष आमच्याबरोबर काम करेल आणि दोघंही एकत्र पुढे जाऊ, अशी आम्हाला आशा आहे."

सीमेवर अशी हिंसक चकमक पुन्हा होणार नाही, अशी अपेक्षा ठेवता येईल का, या पीटीआयच्या प्रश्नावर चाओ लिजियान म्हणाले, "आम्हाला आणखी संघर्ष नको, हे स्पष्टच आहे."

गलवान खोऱ्यावर चीनने सांगितला दावा

पीटीआयच्या प्रतिनिधीने चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना सध्या ग्राऊंडवर काय परिस्थिती आहे, असा प्रश्न विचारला. विशेषतः ज्या गलवान खोऱ्यात हे सगळं घडलं तिथली परिस्थिती कशी आहे?

गलवान खोऱ्याविषयी आजवर वाद नव्हता. अचानक या भूभागावरून समस्या कशी निर्माण झाली? पीपल्स लिबरेशन आर्मीने म्हटलं आहे की, गलवान खोऱ्याचं सार्वभौमत्व कायमच चीनकडेच होतं. मात्र, या भूभागावरून आजवर तर कुठलाच वाद नव्हता. तुम्ही यावर काय सांगाल?

या प्रश्नांच्या उत्तरात चाओ लिजियान म्हणाले, "तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की, भारत आणि चीन लष्कर आणि डिप्लोमॅटिक पातळीवर चर्चा करत आहेत. सत्य अगदी उघड आहे. जे काही घडलं ते एलएसीवर चीनच्या बाजूला घडलं आहे. यावर चीनला काहीही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही."

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, चीनचा गलवान खोऱ्यावरचा दावा स्वीकारार्ह नाही.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने चाओ लिजियान यांना विचारलं की, चीन आणि भारत यांच्यातला वाद चर्चेतून सोडवण्यावर एकमत झाल्यावरही तणावाची परिस्थिती का होती? परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी कुणाची आहे? परराष्ट्र मंत्रालयाची की लष्कराची?

या प्रश्नाचं उत्तर देतानाच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते चाओ लिजियान म्हणाले, "सीमेवरचा तणाव निवळण्यासाठी चीन आणि भारत डिप्लोमॅटिक आणि सैन्य पातळीवर चर्चा करत आहेत. 6 जून रोजी दोन्ही देशांच्या सीनिअर कमांडर यांच्यात चर्चा झाली होती."

"या चर्चेत शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यावर दोघांचही एकमत झालं होतं. मात्र, 15 जून रोजी अचानक भारतीय जवानांनी या एकमताचं उल्लंघन केलं आणि बेकायदा हालचालींसाठी एलएसी ओलांडली."

त्यांनी चिनी जवानांना चिथावलं आणि हल्ला केला. याच कारणामुळे दोन्ही पक्षांमध्ये हिंसक हाणामारी झाली. चीनने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे आणि भारताने आपल्या जवानांना सक्तीने थांबवावं, अशी मागणी केली आहे.

कुठलीही एकतर्फी कारवाई पुन्हा घडली तर प्रकरण अधिक गुंतागुंतीचं होईल. चीन आणि भारत या मुद्द्यावर सहमत आहेत की संवादातूनच वादावर तोडगा काढता येईल. चीन आणि भारत डिप्लोमॅटिक आणि सैन्य दोन्ही पातळ्यांवर चर्चा करत आहेत."

चीनने भारताचा विश्वासघात केला?

सामरिक विषयांचे जाणकार ब्रह्मा चेलानी यांनी या संपूर्ण वादाविषयी ट्वीटरवर लिहिलं आहे की, साम्यवादी हुकूमशाही राजवटीत चीन 'ठग' स्टेट बनला आहे.

चेलानी लिहितात, "चीन द्विपक्षीय कराराचा आदर करत नाही आणि आंतरराष्ट्रीय नियमांचाही नाही. वास्तव हे आहे की चीन द्विपक्षीय कराराला दुसऱ्या देशाविरोधात वापरतो आणि स्वतःवर कधीच लागू करत नाही. भारत याच जाळ्यात अडकला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं म्हणणं आहे की या अनपेक्षित घटनेचे द्विपक्षीय संबंधांवर अत्यंत वाईट परिणाम होतील. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की चीनच्या आक्रमकतेमुळे सर्व द्विपक्षीय संबंध तुटतील."

चेलानी पुढे लिहितात, "1993 पासून आजवर चीनसोबत भारताने पाच सीमा व्यवस्थापन करार केले आहेत आणि या पाचही करारांवर मोठा गाजावाजा करत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. मात्र, यापैकी कुठल्याही करारामुळे चीनकडून होणारं अतिक्रमण रोखण्यात मदत झाली नाही. चीन पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे."

"चीनने गुपचूप भारताचा भूभाग आपल्या ताब्यात घेतला आणि म्हणतोय की, हा भूभाग कायमच त्यांचा होता. चीन पहिल्यांदाच गलवान खोऱ्यावर दावा सांगतोय. 1962 च्या युद्धानंतर गलवान खोरं आणि जवळपासच्या सर्वच सामरिक उंच भागांवर चीनने कधीच घुसखोरी केलेली नव्हती. भारताने या ठिकाणांवर जवान तैनात न करून मोठी चूक केली आहे. हे भाग सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)