You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्यसभा निवडणूकः ज्योतिरादित्य शिंदे, वेणूगोपाल राज्यसभेवर
राज्यसभेच्या 18 जागांसाठी आज निवडणूक पार पडली. यातील बहुतेक जागांवरील निकाल संध्याकाळपर्यंतच स्पष्ट झाला.राजस्थानमधून काँग्रेसचे उमेदवार केसी वेणुगोपाल आणि नीरज डांगी, तर भाजपचे उमेदवार राजेंद्र गहलोत विजयी झाले.मध्य प्रदेशातून भाजपचे ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेर सिंह सोलंकी विजयी झाले, तर काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह राज्यसभेत जाण्यात यशस्वी झालेत.
- कोल्हापूरच्या बहीणभावांनी शिंदेंच्या ग्वाल्हेरवर राज्य केलं तेव्हा...
- ज्योतिरादित्य शिंदेंच्या आजींनी जेव्हा मध्य प्रदेशातलं काँग्रेस सरकार पाडलं होतंझारखंडमधून झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन आणि झारखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश यांनी राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवलाय.आंध्र प्रदेशात सत्ताधारी YSR काँग्रेसने सर्वच्या सर्व चार जागा जिंकल्या आहेत.
राज्यसभेच्या 18 जागांवर निवडणूक होत आहे. ही निवडणूक कोरोना व्हायरसमुळे लांबणीवर पडली होती. अखेर या निवडणुका 19 जूनला घेण्याचा निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केला.
राज्यसभेच्या 55 जागांसाठी 26 मार्च रोजी निवडणुका पार पडणार होत्या. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. यापैकी 37 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहोत. त्यामुळे 18 जागांवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती.
आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या 4, मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या 3, झारखंडच्या 2, मणिपूर आणि मेघालयच्या प्रत्येकी एका जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 19 जून रोजी सकाळी 9 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली.
यंदाच्या वर्षी राज्यसभेच्या 73 जागांसाठी निवडणूक
2020 या एकाच वर्षांत राज्यसभेच्या 73 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. यातल्या 55 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होती. त्यातले 37 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. तर, 18 जागांसाठी 19 जूनला निवडणूक होईल. उर्वरित 18 जागांसाठी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल.
राज्यसभेचं स्वरूप
राज्यसभेला अप्पर हाऊस म्हणजेच वरीष्ठ सभागृह किंवा काऊन्सिल ऑफ स्टेट्स असंही संबोधलं जातं. पण वरीष्ठ सभागृह असं संबोधण्यात येत असलं तरी राज्यसभेच्या तुलनेत लोकसभेचे अधिकार थोडे जास्त आहेत.
राज्यसभेत जास्तीत जास्त 250 जागा असू शकतात. यापैकी 12 सदस्य राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केले जातात. तर 236 सदस्य देशातील सर्व राज्यांतून आणि 2 सदस्य केंद्रशासित प्रदेशांतून निवडले जातात.
सध्या राज्यसभेची सदस्य संख्या 245 इतकी आहे. यापैकी 233 सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. तर 12 सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात.
राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले उमेदवार प्रामुख्याने कला, विज्ञान, सामाजिक कार्य अशा क्षेत्रांशी निगडीत असतात. अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना राष्ट्रपतींनीच राज्यसभेकरिता नामनिर्देशित केलं होतं, हे आपल्याला आठवत असेल.
राज्यसभा हे स्थायी सभागृह
राज्यसभा स्थायी सभागृह आहे. हे कधीच भंग होत नाही. भारताचे उपराष्ट्रपती या सदनाचे सभापती असतात. इथल्या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येतो. त्यांच्या जागी नवे उमेदवार राज्यसभेवर निवडून जातात.
राज्यसभा सदस्य बनण्यासाठी पात्रता
भारतीय संविधानातील कलम 84 नुसार राज्यसभा सदस्यत्वासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
संबंधित उमेदवार देशाचा नागरिक असावा ही पहिली अट आहे. त्याने वयाची 30 वर्षं पूर्ण केलेली असावीत. तसंच संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी त्याने पूर्ण केल्या पाहिजेत.
कोणत्या राज्यात किती जागा?
राज्यसभेत कोणत्या राज्यातून किती जागा निवडून जातील हे त्या राज्याच्या लोकसंख्येवरून ठरवलं जातं.
राज्यसभेच्या सदस्यांची निवड विधानसभेत निवडून गेलेल्या आमदारांकडून केली जाते. प्रत्येक राज्यातील विधानसभा आमदारांची संख्या तिथल्या लोकसंख्येवर आधारित असते.
उदाहरणार्थ, महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा आहेत. उत्तर प्रदेशात त्या 31 आहेत. अरूणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, मेघालय, गोवा, मिझोरम, सिक्कीम, त्रिपुरा यांसारख्या लहान राज्यांमध्ये प्रत्येकी एक जागा आहे.
पण राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असते.
राज्यसभेत पोहोचण्यासाठी किती मत आवश्यक?
राज्यसभा निवडणूक विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला ठराविक मतं आवश्यक असतात. या मतांची संख्या जागेच्या संख्येवर अवलंबून असते. ही निवड प्रक्रिया आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊ.
महाराष्ट्रात 288 विधानसभा आमदार आहेत तर राज्यसभेच्या एकूण 19 जागा आपल्या राज्यात आहेत.
पण एकाच वेळी सर्वच्या सर्व जागांवर राज्यसभेच्या निवडणुका होत नसतात. ठराविक कालावधीनंतर ठराविक जागांसाठी निवडणूक होते.
राज्यसभा निवडणुकीसाठीच्या जागांच्या संख्येत 1 ही संख्या मिसळून विधानसभेच्या जागांच्या संख्येला या संख्येने विभाजित केल्यानंतर विजयासाठी आवश्यक ती मतसंख्या आपल्याला मिळते.
समजा यंदा राज्यातील 5 जागांवर निवडणूक होणार आहे.
म्हणजे 5 + 1 = 6 ही संख्या निवडणुकीसाठी गृहीत धरावी.
त्यामुळे विधानसभेच्या जागा 288 / 6 = 48
म्हणजेच या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला 48 मतांची आवश्यकता असेल.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
याशिवाय मत देणाऱ्या विधानसभा आमदाराला प्राधान्यक्रमातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारालाही मत द्यायचं असतं.
प्राधान्यक्रमातील पहिल्या क्रमांकाच्या मतांची पूर्तता होत नसल्यास दुसऱ्या क्रमांकाच्या मतांचा विचार केला जातो.
राज्यसभेतील सध्याचं चित्र
सध्या भारतीय जनता पक्ष राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यांच्याकडे 75 जागा आहेत. यानंतर काँग्रेसकडे 39 जागा आहेत. खालोखाल अण्णाद्रमुककडे 9, द्रमुक आणि तेलंगण राष्ट्र समितीकडे प्रत्येकी 7 जागा आहेत. बाकीच्या लहान-मोठ्या पक्षांकडे 1 ते 5 दरम्यान जागा आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)