You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजू शेट्टी: शरद पवारांचे कट्टर विरोधक ते राष्ट्रवादीचे सहयोगी
राजू शेट्टी हे आता विधान परिषदेची पायरी चढण्याच्या तयारीत आहेत. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं राजू शेट्टींना संधी देण्याचा निर्णय घेतलाय आणि हाच मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा आलाय.
राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि दोनवेळा लोकसभेचे खासदार राहिलेत. त्याआधी ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार होते. त्यामुळे संसदीय सभागृहात जाणं हे त्यांच्यासाठी नवीन नाही. मात्र, या तिन्ही वेळा राजू शेट्टी स्वत:च्या पक्षातून संसदीय सभागृहात गेले होते, तर यावेळी ते राष्ट्रवादीच्या कोट्यातून जाणार आहेत.
2004 साली पहिल्यांदा आमदार होण्याच्या आधीपासून राजू शेट्टी शेतकरी आंदोलन आणि चळवळीत सक्रीय राहिलेत. आधी शरद जोशींच्या खांद्याला खांदा लावून, तर नंतर त्यांच्याशी फारकत घेतल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सक्रीय होते. मात्र, त्यांचा लढा हा कायम सत्तेविरोधात राहिला. शेतकऱ्यांसाठी लढत असल्यानं बऱ्याचदा त्यांचा संघर्ष शरद पवारांशीच राहिला.
मात्र, आता त्याच शरद पवारांच्या पाठिंब्यावर ते विधान परिषदेत जात असल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याला राजू शेट्टींचा य़ू-टर्नही म्हणता येत नाही, कारण गेल्या काही वर्षात त्यांनी वेगवेगळ्या युत्या-आघाड्यांच्या सोबत जाण्याचे प्रयोग केल्याचे दिसून येतात.
'या' दोनवेळा शेट्टींना सर्वांत आधी पवारांनी पाठिंबा दिला
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेत प्रवेशाबाबत राजू शेट्टी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी बैठकीत आम्हाला विधानपरिषद देण्याचं राष्ट्रवादीनं मान्य केलं होतं. मागच्या विधान परिषद निवडणुकीवेळी आम्ही त्या अनुषंगानं मागणीही केली होती. मात्र, तेव्हा शक्य झालं नाही, म्हणून आताच्या निवडणुकीत त्यांनी संधी दिलीय."
पण ज्या पवारांविरोधात कायम संघर्ष राहिला, त्यांच्यासोबत राजू शेट्टींनी जाण्याचा निर्णय का घेतला, असाही प्रश्न आम्ही त्यांना विचारला. तर राजू शेट्टींनी यावर त्यांचे गेल्या काही वर्षातील अनुभव सांगितले. शिवाय, सध्याचे त्यांचे प्राधान्यक्रमही सांगितले.
शेट्टी म्हणतात, "खासदार असताना संसदेत मी 'कर्जमुक्तीचा अधिकार विधेयक' आणि 'हमीभाव मिळण्याचा विधेयक' मांडले. त्यावेळी दोन्ही विधेयकांना सर्वांत आधी पाठिंबा शरद पवारांनी दिला होता. याच मुद्द्यांवर 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली, त्यावेळीही आघाडीनं पाठिंबा दिला होता."
'पवारांनी माझ्यावर टीका केली, मीही त्यांच्यावर केली'
मात्र, शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्या राजकीय संघर्षाचा इतिहास पाहिल्यास लक्षात येतं की, या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर प्रचंड टीका केलीय. शेट्टींच्या जातीवरूनही शरद पवारांनी टीका केल्याचे प्रसंग सापडतात.
त्यावर राजू शेट्टी म्हणतात, "तो काळ वेगळा होता. मीही त्यांच्यावर टीका केली होती. पण आता सगळं बदललंय. आता लोकशाहीच धोक्यात आहे. धर्मा-धर्मात तेढ निर्माण केला जातोय. देशाच्या राजकारणात विकृती प्रकारची संस्कृती स्थिरावू पाहतेय. अशा पार्श्वभूमीवर लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या लोकांनी एकत्रित येणं अपरिहार्यता आहे."
"शरद पवार किंवा आघाडीची मला सगळीच मतं पटतात असं नाही. तसं असतं तर एकाच पक्षात असतो," असं म्हणत शेट्टी सांगतात, "मी कुठल्याही आघाडीच्या मागे जाणारा माणूस नाही. शेतकरी आणि चळवळ यांच्याशीच मला घेणं-देणं आहे. त्यांच्याशीच मी बांधलेला आहे. शेती, शेतकरी, ग्रामीण भाग यावरच कायम बोलत राहीन. ही भाषा माझी बदलेल, तेव्हा माझ्यावर शंका घ्यायला वाव आहे."
'सरकारच्या सर्वच बाबींचं समर्थन करणार नाही'
राष्ट्रवादीकडून आमदारकीची संधी मिळाली, याचा अर्थ तुम्ही सरकारमध्ये सहभागी होत आहात का, असा राजू शेट्टींना प्रश्न विचारला असता, ते म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेसशी झालेल्या बोलणीनुसार विधान परिषदेत जात आहे. याचा अर्थ आपण सरकारमध्ये सहभागी आहोत असा नाही.
"सरकारमध्ये असेन की नाही माहीत नाही. कारण राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीबाबतचा करार आहे. सरकार स्थापन झालं, त्यावेळी आम्ही पाठिंबा दिला होता. पण याचा अर्थ, सरकारच्या सर्वच गोष्टींचं समर्थन करतोय, असं नाही. आमच्यासाठी चळवळ आणि शेतकरी महत्त्वाचे आहेत. आमचे प्राधान्य ठरलेले आहेत," असं राजू शेट्टींचं म्हणणं आहे.
राजू शेट्टी वारंवार यूटर्न घेतायत का?
राजू शेट्टींच्या या बदलत्या भूमिकेबाबत बीबीसी मराठीनं काही राजकीय विश्लेषकांशीही चर्चा केली.
महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे यांना राजू शेट्टींच्या भूमिकेत वावगं वाटत नाही. ते म्हणतात, "2014 नंतर एनडीएतून बाहेर पडल्यापासूनच राजू शेट्टी एकप्रकारे शरद पवार किंवा आघाडीच्या बाजूला सरकले होते. लोकसभा सोबतही लढले. विविध मुद्द्यांवर सोबत राहिले. त्यामुळे आता त्यांना राष्ट्रवादीकडून संधी मिळणं यात आश्चर्यकारक काहीच नाही."
राजू शेट्टी यांचं राजकारण सत्तेविरोधात राहिलंय. शरद पवार दीर्घकाळ सत्तेत होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात ते अनेकदा बोललेत, असं म्हणत विजय चोरमारे सांगतात, "राजू शेट्टी हे मुद्द्यांवर भूमिका घेत आले आहेत. यापुढेही त्यांना त्या त्या मुद्द्यांवर भूमिका घ्याव्याच लागतील. अन्यथा, अविश्वास निर्माण होईलच. अशा भूमिका त्यांनी आधीही घेतल्यात."
ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने सांगतात, "राजू शेट्टी एनडीएपासून दूर गेलेल्या आता काही वर्षे लोटली आहेत. लोकसभा, विधानसभा ते एनडीएपासून दूर राहिले आणि आघाडीच्या जवळ राहिलेत."
"आघाडीसोबत ते निवडणुकीपासून सोबत असल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संदेश गेलाय की, राजू शेट्टी केंद्र सरकारच्या विरोधात आहेत. कारण राजू शेट्टींचंही नेहमी हे मत राहिलंय की, कृषी क्षेत्रातील अनेक धोरणं केंद्रात ठरवलं जातं. आयात-निर्यातीचे निर्णय, धोरणात्मक निर्णय केंद्रात होतं," असं श्रीमंत माने सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)