You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: महाराष्ट्रापेक्षाही गुजरातमध्ये कोरोनाची परिस्थिती अधिक चिंताजनक आहे का?
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
सध्या देशभरात सर्वत्रच कोरोनामुळे भीती कायम आहे. त्यातच लॉकडाऊन शिथील केला जात असल्यामुळे तसंच रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी सातत्याने वाढत असल्यामुळे कोरोना व्हायरसला आळा घालण्यात राज्य सरकारांना यश येतंय की नाही, यावर शंका उपस्थित केल्या जात आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने देशभराचं लक्ष महाराष्ट्र सरकार हे संकट कसं हाताळत आहे, याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला टीकेचाही सामना करावा लागत आहे.
मात्र, महाराष्ट्राचं शेजारी राज्य गुजरातमध्येही कोरोनाग्रस्तांची परिस्थिती चांगली नाहीये. आकडेवारी सांगते की, देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं सर्वाधिक प्रमाण गुजरातमध्ये आहे.
दोन्ही राज्यांमधील सद्यस्थिती कशी आहे? (14 जून 2018 पर्यंत)
अर्थात, कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू यांचं प्रमाण हे त्या त्या राज्यांच्या लोकसंख्येनुसार कमी-जास्त असणं स्वाभाविक आहे. तसंच दोन्ही राज्यांमधील उपलब्ध सोयीसुविधा, आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि इतर अनेक निकषांमुळे दोन्ही राज्यांची थेट तुलना करणं शक्य नाही.
पण एकीकडे महाराष्ट्र सरकारवर टीका होत असताना, दुसरीकडे भाजपचंच सरकार असलेल्या गुजरातमधील आकडेवारीकडे दुर्लक्ष होतंय का, असा प्रश्न मात्र उपस्थित होत आहे. त्यामुळेच दोन्ही राज्यांमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष जाणून घेऊया.
1. मृत्यूदर
कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर मृत्यू होतोच असं नाही, हे आता तुम्हाला माहिती आहेच. काही दिवसांपूर्वीच भारतात पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अॅक्टिव्ह केसेसच्या संख्येला बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येनं मागे टाकलं.
14 जूनपर्यंतच्या आकडेवारीकडे पाहिलं तर महाराष्ट्रात आतापर्यंत 3,950 मृत्यू झाले आहेत तर गुजरातमध्ये हा आकडा 1,478 आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत एक लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे, तर गुजरातमध्ये हा आकडा सुमारे 23-24 हजारांमध्ये आहे.
महाराष्ट्रात आजच्या घडीला मृत्यूदर 3.65 टक्के आहे, तर गुजरातमध्ये 6.2 टक्के. गुजरातचा मृत्यूदराचा आकडा राष्ट्रीय सरासरी (2.8 टक्के) च्याही दुप्पट आहे.
2. चाचणीचं प्रमाण
भारत पुरेशा चाचण्या करतोय की नाही, हा प्रश्न अगदी सुरुवातीपासून विचारला जातोय, अगदी आजही. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOनेसुद्धा सुरुवातीपासून "टेस्ट, टेस्ट, टेस्ट!" म्हणत चाचणीचं प्रमाण वाढवण्यावर भर दिला आहे.
देशात कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला तेव्हा फक्त पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV)मध्ये चाचण्या व्हायच्या. तेव्हापासून आजवर देशात सातत्याने टेस्टिंगसाठी यंत्रणा उभी केली जातेय. देशात सध्या 646 सरकारी आणि 247 खाजगी लॅब्समध्ये टेस्टिंग सुरू आहे आणि 14 जूनपर्यंत 56 लाख 58 हजार 614 चाचण्या देशात झाल्या आहेत.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
महाराष्ट्रात आजवर सहा लाख 57 हजार 739 चाचण्या घेण्यात आल्या आहेत, तर गुजरातमध्ये दोन लाख 87 हजार 647 चाचण्या झाल्या आहेत.
'द हिंदू'ने संकलित केलेली 14 जूनपर्यंतची आकडेवारी पाहिली चाचणीचं प्रमाण महाराष्ट्रात 5,408 प्रतिदशलक्ष आहे, तर गुजरातमध्ये 4,438 प्रतिदशलक्ष.
3. चाचण्यांपैकी किती पॉझिटिव्ह?
प्रत्येक संशयित रुग्णाची कोव्हिड-19ची चाचणी होईलच असं नाही, कारण प्रत्येकाची चाचणी करणं ही किचकट, खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया तर आहेच, शिवाय त्याला लागणारी साधनसामुग्रीसुद्धा अपुरी असल्यामुळे यंत्रणेवर ताण येतो.
त्यामुळे चाचण्या अधिक टार्गेटेड पद्धतीने, परिस्थितीचं मूल्यमापन करूनच गरजेनुसार केल्या जातात आणि दर शंभर चाचण्यांपैकी कितींचे अहवाल पॉझिटिव्ह येतात, ही Test Positivity आकडेवारी प्रशासनाचं काम किती केंद्रित आहे आणि या रोगाचा प्रसार किती झाला आहे, या दोन्ही गोष्टींवर प्रकाश टाकते.
महाराष्ट्रात आजवर झालेल्या सहा लाख 57 हजार 739 चाचण्यांपैकी 1 लाख 7 हजार 958 चाचण्या पॉझिटिव्ह आढळल्या आहेत, म्हणजे महाराष्ट्राची Test Positivity 16.9 आहे तर गुजरातची टेस्ट पॉझिटिव्हिटी 8.2 टक्के आहे.
प्रतिदशलक्ष हा आकडा पाहिला तर सध्या देशातील सर्वाधिक पॉझिटिव्ह केसेस दिल्लीत आहेत. दिल्लीत हा आकडा आहे-1854. त्याखालोखाल महाराष्ट्रात दहा लाख चाचण्यांमागे 793 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तामिळनाडूत 497 आणि गुजरातमध्ये 345 रुग्ण दर दहा लाख चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत, असं ब्लूमबर्गच्या आकडेवारीतून दिसतं.
2020ची अंदाजे लोकसंख्या गृहित धरून ही आकडेवारी काढण्यात आलेली आहे. त्यात पॉझिटिव्ह चाचण्यांची राष्ट्रीय सरासरी 217 प्रतिदशलक्ष आहे.
4. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण
चाचण्या होतात, लोक पॉझिटिव्ह असल्याचं निदान होतं आणि मग त्यांच्यावर उपचार सुरू होतात. काही जणांचे उपचार सुरू झाल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येतो तर काही ठिकाणी असंही आढळून आलंय की, मृत्यू झाल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह येतो.
पण सध्याच्या या संकटात आशेचा किरण म्हणजे देशात कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांच्या बरे होण्याचं प्रमाण एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा जास्त झालं आहे.
सर्वांत ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा 47.2 टक्के आहे. म्हणजे आजवर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालेल्या दर शंभर जणांपैकी सुमारे 47 जण घरी परतले आहेत. गुजरातचा हा आकडा 69.33 टक्के आहे - 14 जूनपर्यंत राज्यातील 23 हजार 544 रुग्णांपैकी 16 हजार 325 बरे होऊन घरी परतले होते.
याबाबत राष्ट्रीय सरासरी सध्या 50.60 टक्के आहे.
5. डबलिंग रेट
एखाद्या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी किती दिवस लागतात, याला दुप्पटीकरण दर किंवा Doubling Rate म्हटलं जातं.
सरकारच्या माहितीनुसार, देशात जेव्हा कोरोना व्हायरसच्या केसेस वाढू लागल्या, तेव्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यावेळी देशात दर 3.4 दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत होती. दोन आठवड्यांपूर्वी हे प्रमाण 15.4 दिवस होते तर सध्या देशात रुग्णसंख्या दुप्पट होण्यासाठी 17.4 दिवसांचा कालावधी लागतो.
मात्र, कोरोना व्हायरसची भारतातील तसंच जगभरातील स्थितीचं सांख्यिक विश्लेषण करणाऱ्या ब्रुकिंग्स इंडियाच्या प्राध्यापक शमिका रवी यांच्यामते, सध्या देशात कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण दर 27 दिवसांनी दुप्पट होत आहेत.
त्यांच्या विश्लेषणानुसार देशातील सुमारे 75 टक्के रुग्णसंख्या ही महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीतून वाढतेय. मृतांचंही प्रमाण सर्वाधिक मुंबईतून आहे, त्याखालोखाल अहमदाबाद, पुणे, ठाणे आणि चेन्नईचा नंबर लागतो.
महाराष्ट्रात पहिला रुग्ण आढळल्यापासून साधारण महिन्याभराने रुग्णदुप्पटीचा दर पाच दिवसांवर होता. त्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी हा दर 21 दिवसांपेक्षा जास्त राहिला आहे.
तर गुजरातमध्ये पहिला रुग्ण आढळल्यापासून साधारण महिन्याभराने रुग्णदुप्पटीचा दर 3 दिवसांवर होता. त्यानंतर दोन महिन्यांनी हा दर 30 दिवसांवर पोहोचला होता.
मृत्यूंच्या बाबतीतही परिस्थिती काहीशी अशीच आहे - महाराष्ट्रात पहिल्या 125 रुग्णांच्या मृत्यूनंतर बरोबर 10 दिवसांनी 250 वा रुग्ण मरण पावला, तर सुमारे 12 दिवसांनी मृतांचा आकडा 500 वर पोहोचला, पुढे 13 दिवसांनी हा आकडा 1000 पार गेला आणि 15 दिवसांनी मृतांची संख्या 2000 पार गेली. म्हणजेच महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू होण्याची गती मंदावत गेली, पण याचा अर्थ असा नाही की, मृत्यू कमी झाले. देशात अजूनही सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत.
गुजरातमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर पहिला मृत्यू तिसऱ्या दिवशी झाला. तेव्हापासून महिनाभराने राज्यात 100वा मृत्यू झाला. त्यानंतर आठवडाभराने गुजरातमध्ये मृत्यूंचा आकडा 200 पार गेला, आणि आणखी एका आठवड्याने 400. तेव्हापासून आजवर हे मृत्यूंचं प्रमाण सातत्याने वाढत राहिलं आहे आणि आता 27 ते 29 दिवसांनी मृतांचं प्रमाण गुजरातमध्ये दुप्पट होतं. हा दर सात दिवसांचा रोलिंग अॅव्हरेज आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)