पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना जात का विचारली जात आहे?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पीक कर्ज देताना बँकेच्या फॉर्मवर जातीचा उल्लेख करावा लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

शेतकरी नामदेव पतंगे यांच्या आई संगीता लक्ष्मण पतंगे यांचं हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गोरेगाव शाखेत खातं आहे.

पीक कर्ज घ्यायचं असल्यानं नामदेव पतंगे गुरुवारी बँकेत गेले. तेव्हा त्यांना पीक कर्जाचा फॉर्म देण्यात आला.

तो भरताना फॉर्मवर जातीचा उल्लेख असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

या फॉर्मची प्रत बीबीसी मराठीला पाठवत त्यांनी सांगितलं, "शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना त्यांची जात विचारली आहे. पण, जात विचारायचं कारणंच काय? आता सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर किती जमीन आहे, ते बघून पीक कर्ज देणार, की त्यांची जात बघून पीक कर्ज देणार आहे?"

"मी यापूर्वी दोन-तीनदा पीक कर्ज घेतलं आहे. पण, तेव्हा काही असा जातीचा उल्लेख करावा लागला नाही. पण, आता जातीचा उल्लेख असल्यानं ते माझ्या लक्षात आलं," पतंगे पुढे सांगत होते.

पतंगे यांच्याशी बोलून झाल्यानंतर आम्ही बँकेशी संपर्क साधला.

तेथील अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, "कर्ज देताना जातीचा उल्लेख करणं ही standardize procedure आहे. आमच्याकडे होम लोन, कार लोन घेतानाही जातीचा उल्लेख करावा लागतो. पीक कर्जाच्या फॉर्म वर कशाचा उल्लेख असावा, हे स्थानिक शाखा ठरवत नाही."

जातीचा उल्लेख कशासाठी?

पीक कर्जावरील जातीच्या उल्लेखाविषयी आम्ही शेतकरी नेते अजित नवले यांना विचारलं.

त्यांनी सांगितलं, "पीक कर्ज आणि जातीचा काहीएक संबंध नसतो. कोणत्या शेतकऱ्याला किती पीक कर्ज द्यायचं हे त्याच्या जातीवरून ठरत नाही. त्यासाठी जात हा मुद्दा कोणत्याही पद्धतीनं ग्राह्य धरला जात नाही."

"पण, समजा उद्या एखादा विशिष्ट समुदायानं आरोप केला की, त्यांना पीक कर्ज मिळालं नाही, तर मग सरकारकडे कोणत्या समुदायाला किती पीक कर्ज दिलं, याची माहिती असावी, म्हणून कदाचित जात विचारली जात असावी."

जातीचा उल्लेख चुकीचा - कृषी मंत्री

पीक कर्जाच्या फॉर्मवर जातीचा उल्लेख करावा लागत असेल, तर ते चुकीचं आहे, असं मत राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

ते म्हणाले, "पीक कर्जाच्या फॉर्मवर जातीचा उल्लेख करण्यात आला असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. ज्या ठिकाणी ही बाब उघडकीस आली आहे, तिथली माहिती मी वैयक्तिकरित्या घेतो आणि पुढील कार्यवाही करतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)