कोरोनाः चेंडूला लाळ लावून गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना 'या' बातमीने बसलाय धक्का

    • Author, आदेश कुमार गुप्त
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

या आठवड्यात भारताचा वेगवान गोलंदाज आणि स्विंगचा बादशाह मोहम्मद शमी म्हणाला होता की चेंडूला लाळ लावण्यावर बंदी घालण्याचा नियम आखण्यात आलेला असला तरी तो बॉल स्विंग करू शकतो. अट फक्त एकच की बॉलची चमक कायम असायला हवी. मी लहानपणापासूनच बॉलला लाळ लावतो, तशी आपल्याला सवयच होती, असंही त्याने म्हटलं आहे. वेगवान गोलंदाज असेल तर तो बॉल चमकवण्यासाठी लाळ लावतोच. मात्र, कोरड्या बॉलची चमक कायम ठेवता आली तर बॉल निश्चितच स्विंग करेल, असं शमीला वाटतं.

मोहम्मद शमीची ही प्रतिक्रिया वर्तमानपत्राच्या एका कोपऱ्यात छापून आली असली तरी मंगळवारी आयसीसीने कोरोना संकटात सुरू होणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठी काही नवीन नियम आखल्याची बातमी मात्र हेडलाईन होती.

नव्या नियमानुसार यापुढे गोलंदाजांना कुठल्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये लाळेचा वापर चेंडूला लावण्यासाठी करता येणार नाही.

यापूर्वी भारताचे माजी कॅप्टन अनिल कुंबळे यांच्या नेतृत्त्वाखालील समितीने कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता बॉलला लाळ लावण्यावर बंदी आणण्याची शिफारस केली होती.

आयसीसीने लाळ लावण्यावर बंदी आणली असली तरी या नियमांचं उल्लंघन झाल्यास थोडी सूट देऊ केली आहे. एखाद्या खेळाडूने लाळेचा वापर केल्यास अम्पायर दोनवेळा इशारा देईल.

मात्र, त्यानंतरही असं घडल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच रन जास्त देण्यात येतील. बॉलवर लाळ लावण्याची क्रिया नकळत घडली का, हे देखील अम्पायरच ठरवतील.

जाणकार काय म्हणतात?

नवीन नियमानंतर बॉल सीम आणि स्विंग करणं अवघड होईल. मात्र, किती? हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने 1983 च्या विश्वविजेत्या भारतीय संघातले ऑलराऊंडर मदनलाल यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

मदन लाल म्हणाले, "कोरोना आजारामुळे हा नवीन नियम आला आहे. मात्र, तो चांगलाही आहे. कारण कधी काय घडेल सांगता येत नाही. त्यामुळे खबरदारी घेतलेली बरी. या निर्णयामुळे गोलंदाजीवर थोडाफार परिणाम नक्कीच होईल. लाळेच्या वापरामुळे बॉलवर चमक तर येतेच. शिवाय बॉलची एक बाजू जड होते. यामुळे वेगवान गोलंदाजाला बॉल स्विंग करण्यास मदत होते. इतकंच नाही तर रिव्हर्स स्विंग करण्यासही मदत होते. मात्र, परिस्थितीनुसार नियम बनवण्यात आला आहे. त्याला काहीच करता येत नाही."

बॉल पॅन्टवर जास्त घासल्याने बॉलवरील चमक कायम राहील का. यावर मदन लाल सांगतात की 10-15 ओव्हरपर्यंत असं करता येईल. मात्र, त्यामुळे खूप फरक पडणार नाही. बॉल रफ झाल्यावर किंवा जुना झाल्यावर त्यावरची चांगली चमक निघून जाते.

मदन लाल म्हणतात की हल्लीचे गोलंदाज समजूतदार आहेत. सर्वांनी बॉल एका बाजूनेच चमकवला तर चमक शाबूत राहील. बॉलची चमक किती ओव्हरपर्यंत टिकेल, हे यापुढे बघावं लागणार आाहे.

ते म्हणाले की 70-75 ओव्हरपर्यंत बॉलवरची चमक शाबूत असते. गोलंदाज लाळ किंवा घाम बॉलवर लावत असतो. याची बरीच मदत होते आणि रिव्हर्स स्विंग करता येतं.

नव्या नियमाविषयी बोलताना मदन लाल म्हणाले की वेगवान गोलंदाज जुन्या बॉलनेही गोलंदाजी करतात. त्यामुळे नवा नियम लागू झाल्यानंतरही बॉलवरची पकड कायम ठेवण्यात अडचण येणार नाही.

प्रश्न असा आहे की यापुढे वेगवान गोलंदाजांना काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील का? यावर मदन लाल म्हणतात की वेगवान गोलंदाजांना कटर म्हणजे बॉल कट कसा करतात, हे शिकावं लागेल. ऑफ कट कसा करतात, लेग कट कसा असतो, यावर मेहनत घ्यावी लागेल.

मदन लाल म्हणतात की आता नवीन नियम आखलाच आहे तेव्हा नव्या खेळाडूंनाही लाळेचा वापर न करता गोलंदाजी करण्याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. त्यामुळे यापुढे आपली क्षमता कशी सुधारायची हे गोलंदाजावर अवलंबून असणार आहे. वेगवान गोलंदाजांना विकेटची मदत मिळण्याच्या परिस्थितीचा फायदा घ्यायलाही शिकावं लागेल. अशा परिस्थितीत त्याच्या डोक्यात कुठला विचार आहे, तो काय करू इच्छितो, हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे.

यापुढे बॉलवर लाळ लावण्याची सवय किती महागात पडेल? आणि दुसरं म्हणजे इतर कुणी बॉलवर लाळ लावत तर नाही ना, यावर लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण मैदानावरच लक्ष ठेवावं लागणार नाही. त्यामुळे थर्ड अम्पायरचही काम यामुळे वाढणार नाही का?

यावर मदन लाल म्हणतात की कॅमेरा असल्यावर काहीच लपत नाही. बाकी खेळाडूवर अवलंबून आहे. त्यांनी काळजी घ्यायला हवी.

लाळेला पर्याय

नव्या नियमामुळे भारताचे माजी फलंदाज सचिन तेंडुलकरही चिंतेत आहेत. लाळेच्या पर्यायावर विचार व्हायला हवा, असं त्यांचं म्हणणं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 50 किंवा 55 ओव्हरनंतर नवा बॉल वापरला जावा. यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल, असं त्यांना वाटतं. सध्या टेस्ट क्रिकेटमध्ये 80 ओव्हरनंतर नवा बॉल घेतात.

सचिन तेंडुलकर यांच्या मताशी मदन लालही सहमत आहेत. ते म्हणाले की बरेचदा 70-75 ओव्हरपर्यंत बॉलवर चमक कायम असते.

लाळेसंबंधीच्या नवीन नियमाविषयी भारताचे माजी वेगवान गोलंदाज करसन घावरी यांनीही बीबीसीशी बातचीत केली. कसरन घावरी एकेकाळी कपिल देव यांचे जोडीदार होते. या जोडीने 25 टेस्ट मॅचमध्ये विरोधी संघाच्या सलामीच्या जोडीला 100 रन्सची भागीदारही करू दिली नाही.

नव्या नियमाविषयी कसरन घावरी म्हणतात की आयसीसी लवकरच यावर मार्ग काढेल. ते पुढे म्हणाले, "कपिलदेव स्विंग, यॉर्कर आणि बाऊन्सर टाकण्यात करण्यात तरबेज होते आणि ही कला आहे जी साधनेतून शिकता येते."

कपिलदेव यांच्या प्रमाणेच इमरान खान, डेनिसलिली, रिचर्ड हॅडली, वसीम अकरम आणि सध्या मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना ही कला अवगत आहे. मात्र, यापुढे लाळ न वापरता गोलंदाज गोलंदाजी कशी करतात, हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे.

नव्या नियमाचा फलंदाजाला फायदा होऊ शकतो, असं करसन घावरी यांना वाटतं. मात्र, या नियमाच्या बदल्यात नवीन नियम नक्की येईल आणि आयसीसी यावर नक्कीच विचार करेल, असंही ते म्हणतात.

लाळेव्यतिरिक्त बॉल चमकवण्यासाठी घामचाही वापर करतात आणि त्यावर सध्यातरी कुठलीही बंदी नाही. मात्र, हा पर्याय लाळेइतका प्रभावी नाही. शिवाय, थंडीच्या दिवसात किंवा ज्या देशांमध्ये कायमच थंड वातावरण असतं तिथे घामाचा पर्याय वापरता येत नाही.

नवीन नियम म्हणजे गोलंदाजांचे हात बांधण्यासारखं आहे, असं क्रिकेट समीक्षक अयाज मेमन यांना वाटतं.

लाळ

गेली 150 वर्ष वेगवान गोलंदाज लाळ वापरत आहेत. लाळ लावली नाही तर त्याचा परिणाम बॉलिंगवर तर होईलच. दुसरं म्हणजे स्विंग विशेषतः रिव्हर्स स्विंगवर याचा परिणाम होईल. इतकंच नाही तर या नियमाचा वेगवान गोलंदाजांच्या मानसिकतेवरही परिणामही होऊ शकतो.

अनेक वेगवान गोलंदाजांनी या नव्या नियमाला विरोध केल्याच अयाज मेमन सांगतात. या नियमामुळे क्रिकेट अधिक एकतर्फी होईल असं त्यांचं म्हणणं आहे. स्पिनर्सनेदेखील यावर आक्षेप घेतल्याचं ते म्हणतात.

हल्ली लेग स्पीनरही फास्ट बॉल टाकतात. त्यासाठी हातांचा वापर करतात. यामुळे अधिक स्विंग मिळतो.

दुसरीकडे कोव्हिड-19 मुळे मैदानावर कुठल्याच प्रकारची जोखीम घेता येत नाही. जागतिक आरोग्य संघटनेचंही असंच काहीसं म्हणणं आहे. क्रिकेट पुन्हा सुरू करायचं असेल तर जोखीम कमीत कमी करायला हवी. गोलंदाजांसाठी नवीन नियम त्रासदायक असला तरी क्रिकेट पुन्हा सुरू होतंय.

अयाज मेमन यांच्या मते लाळेमुळे इतका फरक पडणार असेल तर गोलंदाजांना कशाप्रकारे मदत करता येईल, याचा विचार आयसीसीनेही करायला हवा. लाळ नाही तर त्याचा काय पर्याय असू शकतो? वॅक्स किंवा वॅसलिन वापरायचं का? बरं जे काही वापरणार ते किती प्रमाणात वापरणार? शिवाय त्याचा निर्णय कोण घेणार? गोलंदाज आणि फिल्डिंग कॅप्टन हा निर्णय घेणार का?

8 जुलैपासून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात साउथम्पटनमध्ये टेस्ट सीरिज सुरू होतेय. या तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये लाळ न वापरता गोलंदाज कितपत यशस्वी होतात, हे बघावं लागणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)