You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : माझ्या आजारपणावरून झालेलं राजकारण केवळ प्रसिद्धीसाठी- अशोक चव्हाण
काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आता कोरोनामुक्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. उपचारानंतर ते आता मुंबईत त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत.
कोरोनातून बरे झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी बीबीसी मराठीला मुलाखत दिली.
कोरोना झाल्यानंतर मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, या म्हणीचा प्रत्यय आल्याचं त्यांनी सांगितलं, तर त्यांच्या मुंबईत उपचार घेण्यावरून एक व्यक्ती प्रसिद्धीसाठी राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी अशोक चव्हाण यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न - तुमची तब्येत कशी आहे?
उत्तर - माझी तब्येत चांगली आहे. मी सध्या घरी आहे. माझा कोव्हिड-19 चा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर मला डिस्चार्ज देण्यात आला. सध्या गेले 3-4 दिवस मी होम क्वारंटाईन आहे.
प्रश्न - तुम्हाला कोव्हिडची लक्षणं दिसत आहेत, हे केव्हा लक्षात आलं?
उत्तर - लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मी नांदेडमध्येच होतो. तिथे लोकांना मदत करण्याचं काम मी सुरू केलं होतं. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात भेटी देत होतो. स्थलांतरित मजुरांचे प्रश्न, जीवनावश्यक वस्तूंचं लोकांना वाटप यांसारख्या गोष्टींवर मी लक्ष देत होतो. तेवढ्यात विधानपरिषदेची निवडणूक होणार असल्याने मला मुंबईला जाव लागलं. ती निवडणूक बिनविरोध झाल्याने मी पुन्हा नांदेडला परतलो.
रेड झोनमधून आल्यामुळे मी नांदेडला चार-पाच दिवस घरी थांबलो. यावेळी माझ्या तपासण्या डॉक्टरांनी केल्या. पण मुंबईहून आल्याच्या पाचव्या दिवशी माझा एक्स-रे काढण्यात आला. त्यात कोव्हिडची लक्षणं दिसून आली. ते कळताच मी लगेच मुंबईला निघून आलो. मुंबईला आल्यावर सुदैवाने मला उपचार मिळाले आणि लवकर डिस्चार्ज मिळाला.
प्रश्न - जेव्हा तुम्हाला कोरोना झाल्याचं कळलं, तेव्हा तुमच्या मनात नेमकी काय भावना आली?
उत्तर - मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, या म्हणीप्रमाणेच माझी अवस्था झाली. कोरोनामुळे आजूबाजूला निर्माण झालेलं वातावरण आपण रोज पाहतोय. यामुळे मनात भीती निर्माण झाली. तसंच, मुंबईला आल्यावर कोरोनाग्रस्तांसाठी असलेल्या हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे शेजारील रुग्णाचा आपल्याला संसर्ग होईल ही भीती सुद्धा वाटत होती. हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर ही चिंता दोन-तीन दिवस मनात राहिली. मात्र, वेळेत उपचार झाले त्याने लवकर बरा झाला.
प्रश्न - तुमच्यावर कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट करण्यात आली?
उत्तर - जी ट्रीटमेंट सामान्यांवर करतात, तीच ट्रीटमेंट माझ्यावर करण्यात आली. इंट्राव्हेनस अँटीबायोटिक्स, हायड्रोक्लोरोक्वीनच्या गोळ्या देण्यात आल्या. कोणते विशेष उपचार केले नाहीत. जे उपचार इतरांवर केले तेच माझ्यावरही केले.
प्रश्न - आता तुम्ही यातून बाहेर पडण्यासाठी योगा किंवा व्यायाम करता आहात का? स्वतःसाठी वेळ द्यावं हे आता तुम्हाला वाटतं का?
उत्तर - स्वतःसाठी वेळ द्यावा, हे मला आता खरंच वाटायला लागलंय. मी तसा दररोज 18 तास काम करतो. राजकीय दौरे, लोकांच्या भेटीगाठी यामुळे स्वतःसाठी वेळ देणं एरवी अशक्य असतं. पण गेले 15 दिवस या आजारात काढल्यानंतर आता स्वतःसाठी वेळ द्यायला हवा, असं वाटतंय. त्यामुळे योगा करतो आहे आणि घरातल्या जीममध्ये व्यायमही करतोय.
प्रश्न - तुमच्या आजारपणाची बातमी गोपनीय राहायला हवी होती असं वाटतं का?
उत्तर - मी तसं माझं आजारपण अजिबात लपवलं नाही. ज्यादिवशी मला कोरोनाची लागण झाल्याचं मला समजलं. त्याच्या पुढच्या काही तासांतच संपूर्ण नांदेडमध्ये ही बातमी पसरली. राजकीय व्यक्तींच्या आरोग्याच्या बातम्या गोपनीय राहायला हव्यात असं मी मानत नाही. पण जेव्हा अशा बातम्या बाहेर कळतात, तेव्हा पाच - पन्नास फोन जास्त येतात. गेल्या 15 दिवसांत यामुळे अनेकांनी मला फोन करून लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातल्या अनेक चाहत्यांनी माझी फोनवरून विचारणा केली.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
प्रश्न - तुम्ही नांदेडमध्ये उपचार न घेता मुंबईला गेलात. मग नांदेडमध्ये चांगले उपचार होत नाहीत किंवा नांदेडमध्ये चांगल्या आरोग्य सुविधा नाहीत का? असे प्रश्न काहींनी उपस्थित केले आहेत.
उत्तर - काहींनी नाही, हा प्रश्न एकाने उपस्थित केला आहे. राजकारण सध्या एवढ्या खालच्या पातळीवर गेलं आहे की, चुकीचे मुद्दे उचलून प्रसिद्धी मिळवण्याचा काहींचा डाव आहे. माझ्या तब्येतीबद्दल नांदेडमधल्या माझ्या विरोधकांनीही विचारपूस केली.
इतकंच नव्हे तर राज्याचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनाही माझी तब्येत कशी आहे याची विचारपूस केली. कोणी कुठे उपचार घ्यावेत हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. माझं लहानपण, शिक्षण हे मुंबईत गेलंय. त्यामुळे मी इथे येऊन उपचार घेतले. याबद्दल कोणाला प्रश्न असण्याचं काहीच कारण नाही. केवळ प्रसिद्धी आणि चर्चेसाठी असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रश्न - नांदेडमधून गेलेल्या लोकांमुळे पंजाबमध्ये रुग्ण वाढले असा आरोप पंजाबमधून झाला होता. त्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल?
उत्तर - आपण असे एकमेकांवर दोषारोप करत राहिलो तर आता कसं चालेल? हा विषाणू अमेरिकेतून आला का चीनमधून की दुबईमधून अशा चर्चा करायला सध्या अर्थ नाही. नांदेडमध्ये त्यावेळी गुरुद्वारामध्ये दर्शन घेण्यासाठी सुमारे 2500 पर्यटक आले होते. ते लोक लॉकडाऊनमुळे इथेच अडकले होते. त्यांना नेण्यासाठी पंजाब, राजस्थान इथून बसेस आल्या. या बसेस कंटेनमेंट झोनमधून आल्या होत्या. त्यामुळे नांदेडमधून गेलेल्या लोकांमुळे रुग्ण वाढले की तिथून आलेले लोक पॉझिटिव्ह होते, हे अजून कळू शकलेलं नाही. या चर्चेला सध्या तरी काही अर्थ नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)