You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : 36 दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर कोरोनावर कशी केली मात?
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"ते आजची रात्रही काढू शकणार नाहीत. सध्या त्यांची परिस्थिती एकदमच नाजूक झाली आहे," डॉ. सरस्वती सिन्हा एका रुग्णाच्या पत्नीला धीरगंभीर स्वरात फोनवरून हे सांगत होत्या.
हे ऐकताच त्या रुग्णाची पत्नी कोलकात्याच्या ओस पडलेल्या रस्त्यांवरून गाडी चालवत हॉस्पिटलमध्ये पोहोचली.
11 एप्रिलची ती रात्र होती. देशात त्यावेळी कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत कडक असं लॉकडाऊन सुरू होतं.
कोलकात्यातल्या AMRI हॉस्पिटलमध्ये निताईदास मुखर्जी दोन आठवड्यांपासून कोव्हिड-19 आजाराशी झुंज देत होते. डॉ. सिन्हा तिथे आयसीयूमध्ये क्रिटीकल केअर युनिट पाहत होत्या.
बेघर आणि भिकाऱ्यांसाठी सामाजिक संस्था चालवणारे 52 वर्षीय मुखर्जी व्हेंटिलेटरवर आपल्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी झगडत होते.
30 मार्चला संध्याकाळी अंगात प्रचंड ताप आणि श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं.
डॉक्टरांनी जेव्हा त्यांचा एक्स-रे पाहिल्यानंतर ते काळजीत पडले. मुखर्जींच्या एक्स-रेमध्ये त्यांचं फुप्फुसात काहीशी सूज आणि कफ साठल्याने तिथं पांढरा रंग दिसत होता. फुप्फुसात संपूर्ण कफ साठल्याने ऑक्सिजन शरीरात पोहोचायला अडथळा निर्माण होत होता.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
त्या रात्री डॉक्टरांनी हाय फ्लो मास्कच्या सहाय्याने त्यांचा ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांना मधुमेह असल्याने त्याचीही औषधं देत कोव्हिड-19 चाचणीसाठी त्यांच्या घशातून स्वॅब घेतला गेला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुखर्जी यांचे कोव्हिडचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तोपर्यंत मुखर्जींची अवस्था बिकट झाली होती. ऑक्सिजन शरीरात पोहोचणं अवघड झालं होतं. साधं पाणी पिण्यासाठीही ऑक्सिजन मास्क काढण्याची सोय नव्हती.
सामान्य माणसाच्या शरीरात ऑक्सिजन पोहोचण्याचं एरव्हीचं प्रमाण हे 94 टक्के ते 100 टक्क्यांच्या दरम्यान असतं. मात्र, मुखर्जी यांची ही पातळी 83 टक्क्यांवर पोहोचली होती. एका मिनिटांत 10 ते 20 वेळा श्वास घेणं हे तसं सामान्य असतं. मुखर्जींना मात्र एका मिनिटांत थेट 50 वेळा श्वास घेण्यासाठीचा प्रयत्न करावा लागत होता. त्यामुळे अखेरीस मुखर्जींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.
त्यानंतर त्यांना जाग आली ती थेट तीन आठवड्यांनंतरच. त्यानंतरही काही दिवसांनी त्यांचा जीव वाचवणारं व्हेंटिलेटर त्यांच्यापासून वेगळं झालं.
कोव्हिड-19 मुळे गंभीररित्या आजारी पडलेल्या अनेक रुग्णांचं नशीब एवढं बलवत्तर नसतं, मात्र मुखर्जी खूप नशीबवान निघाले. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या एक तृतीयांश रुग्णांची प्राणज्योत पहिल्याच आठवड्यांत मालवली आहे. तर ब्रिटनमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या दोन तृतीयांश रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तसंच, व्हेंटिलेटरचा कोव्हिड-19 ग्रस्त रुग्णांवर विशेष फरक पडत नसल्याचं काही उदाहरणांवरून स्पष्ट झालंय.
बेल्जियममधल्या इरेस्म युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधले इंटेन्सिव्ह केअर मेडिसीन विषयाचे प्राध्यापक जीन लुईस विन्सेंट व्हेंटिलेटरविषयी सांगतात, "काही प्रकरणांमध्ये व्हेंटिलेटरचे धक्कादायक निकाल आम्हाला पाहायला मिळाले आहेत. हलक्या प्रतीच्या किंवा कमी क्षमतेच्या व्हेंटिलेटरमुळे फुप्फुसाला हानी पोहचल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, बऱ्याचदा या घटना अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्टेरस सिंड्रोममुळेच (ARDS) घडल्याचं अनेकांना वाटतं."
'ते' तीन तास
मुखर्जी व्हेंटिलेटरवर असताना त्यांना स्नायूंची हालचाल मंद करणारी औषधंही दिली जात होती. या औषधांमुळे स्नायूंची हालचाल मंदावते आणि रुग्ण स्वतःहून श्वास घेण्याचा प्रयत्न करत नाही.
एप्रिलच्या त्या भयाण रात्री स्थिती अजूनच गंभीर झाली.
त्यांचा ताप अजूनच वाढला, हृदयगती मंदावली आणि रक्त दाबही कमी झाला. हे सगळे काहीतरी वाईट झाल्याचे किंवा नव्याने इन्फेक्शन झाल्याचे संकेत होते.
आता वेळ घालवण्यात अजिबात अर्थ नव्हता. डॉ. सिन्हा हॉस्पिटलमध्ये परतत असतानाच त्यांनी आयसीयूमधल्या आपल्या टीमला काय - काय करायचं त्याची माहिती दिली होती.
डॉक्टर जेव्हा आल्या त्याच्याआधीच मुखर्जींना वाचवण्याची तयारी वेगाने सुरू झाली होती.
शेवटचा उपाय म्हणून डॉ. सिन्हा आणि त्यांच्या टीमने नव्याने झालेलं इन्फेक्शन घालवण्यासाठी अँटिबायोटीक्सचा मोठा डोस त्यांच्या रक्तवाहिनीतच दिला. त्याच बरोबर रक्तदाब सामान्य करण्यासाठी स्नायूंची हालचाल मंद करणारी औषधंही त्यांना दिली गेली. अत्यंत युद्धपातळीवर मुखर्जींना वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते.
मुखर्जींच्या आयुष्यावर आलेलं वादळ घालवण्यासाठी डॉक्टर आणि त्यांच्या टीमला तीन तास लागले.
डॉ. सिन्हा गेली 21 वर्षं डॉक्टरी पेशात आहेत. यातली 16 वर्षं त्यांनी आयसीयूमध्येच डॉक्टर म्हणून काम पाहिलंय. त्यांनी सांगितलं, "माझ्या आजवरच्या आयुष्यातला हा खूप कसोटीचा काळ होता. सगळं सुरळीत होण्यासाठी आम्हाला वेगात काम करावं लागलं. यासाठी एकमेकांसोबतचं संयोजन नीट ठेवावं लागलं. अनेक आवरणं असलेल्या पीपीई किट्सच्या आत आम्हाला खूपंच घाम येत होता. घाम डोळ्यांवर येऊन मध्येच नजर धुरकट व्हायची. त्या रात्री आम्ही चारजण तीन तास अविरत मेहनत घेत होतो."
त्यांनी पुढे म्हटलं, "आम्ही समोरच्या मॉनिटर्सवर प्रत्येक मिनिटाला बघत होतो. त्यांची तब्येत सुधारतेय का हे आम्ही सतत पाहत होतो. हा माणूस जगला पाहिजे, असं मी सतत मनाला बजावत होते. ते काही पूर्वीपासूनच गंभीर आजारी नव्हते. कोव्हिड-19 मुळे त्यांना या इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये यावं लागलं होतं."
महिन्याभरानं उपचारांना प्रतिसाद
जेव्हा रात्री उशिरा मुखर्जींची तब्येत स्थिर झाली तेव्हा 2 वाजून गेले होते. डॉ. सिन्हांनी आपला मोबाईल तपासला तेव्हा त्यावर 15 मिस्ड कॉल त्यांना दिसले. मुखर्जींची पत्नी आणि मुखर्जींची न्यूजर्सीमधली रेस्पिरेटरी डिसीज या विषयात संशोधक असलेल्या मेहुणीचे ते मिस्ड कॉल होते.
व्यवसायाने ह्युमन रिसोर्स मॅनेजर असलेल्या अपराजति मुखर्जी सांगतात, "ती माझ्या आयुष्यातली भयाण रात्र होती. मी जवळपास माझ्या पतीला गमावलं होतं."
त्या घरी होत्या आणि विलगीकरणात होत्या. त्यांच्या 80 वर्षाच्या सासूबाईही अंथरुणाला खिळलेल्या होत्या. सोबत काहीशा अपंग असलेल्या काकूही तिथेच होत्या. यापैकी कोणाचीही कोव्हिड-19 ची चाचणी पॉझिटीव्ह निघालेली नव्हती.
एक मोठं गंडांतर टळलं होतं. पण, मुखर्जींची तब्येत गंभीर आणि अस्थिरच होती.
मुखर्जींचं वजन खूप जास्त होतं. वजन जास्त असलेल्या रुग्णांना श्वास घेण्यासाठी वळवणं आणि हाताळणं अवघड असतं. डॉक्टरांनी त्यांना मलेरियाच्या उपचारांसाठी वापरलं जाणारं हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध दिलं होतं आणि सोबत व्हिटॅमिन्स, अँटीबायोटीक्स आणि झोपेची औषधंही दिली होती. तरीही त्यांचा ताप काही केल्या कमी होत नव्हता.
मुखर्जींच्या बेडजवळ असलेला अलार्म बहुतेकदा प्रत्येक रात्रीच वाजायला लागायचा. कधी-कधी ऑक्सिजनचा पुरवठा कमी व्हायचा तर कधी फुप्फुसात कफ साठल्याचं एक्स-रेमध्ये दिसायचं.
डॉ. सिन्हा सांगातात, "त्यांच्या तब्येतीत खूप संथ गतीने सुधारणा होत होती. तब्येत बिघडली की काळजीची स्थिती निर्माण व्हायची."
एव्हाना मुखर्जींना हॉस्पिटलमध्ये भरती करून एक महिना झाला होता. महिनाभरातनंतर मुखर्जी उपचारांना दाद देऊ लागले होते.
औषधांद्वारे दिल्या गेलेल्या एकप्रकारच्या कोमातून मुखर्जी बाहेर आले होते. त्यादिवशी रविवार होता. त्यादिवशी त्यांच्या पत्नी आणि मेहुणीने त्यांना व्हीडिओ कॉल केला होता. चकाकणाऱ्या मोबाईलच्या स्क्रीनकडे ते एकटक बघत होते.
मुखर्जी याबद्दल बोलताना सांगतात, "मला तेव्हा काय चाललंय हे कळतंच नव्हतं. सगळं अंधुक दिसत होतं. माझ्याशेजारी निळ्या अॅप्रनमध्ये एक महिला उभी होती. नंतर मला कळलं की त्या माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर होत्या. मी तीन आठवडे निद्राधीन होतो. मी एका हॉस्पिटलमध्ये का झोपलोय हे मला कळतंच नव्हतं. माझी त्याआधीची स्मृतीच विरून गेली होती."
मुखर्जी पुढे सांगतात, "पण, मला काहीसं आठवतंय. मी कोमामध्ये असताना माझ्या बंद डोळ्यांपुढे काही दृश्यं चमकून गेली होती. मी एका जागी खिळलो होतो. मला दोरीने घट्ट बांधून ठेवलं होतं. मी आजारी असल्याचं लोक मला सांगत होते. ते माझ्या कुटुंबाकडून भरपूर पैसे घेत होते. मला कोणी सोडतच नव्हतं. मी तेव्हा लोकांकडे मदतीसाठी याचना करत होतो."
आता नव्या आयु्ष्याला सुरुवात
एप्रिलच्या अखेरीस डॉक्टरांनी मुखर्जींचं व्हेंटिलेटर अर्ध्यातासाठी काढलं होतं. त्यावेळी मुखर्जी महिन्यात पहिल्यांदाच नैसर्गिकरित्या श्वास घेत होते. मुखर्जींना सांभाळणं अवघड होतं. त्यांना वारंवार पॅनिट अटॅक यायचे. ते सारखे आपत्कालिन स्थिती ओढावल्यावर वाजवायची बेल दाबायचे. मशीनशिवाय त्यांना श्वास घेणं अवघड आहे असं त्यांना वाटायचं.
3 मे ला मात्र, त्यांना लावलेलं व्हेंटिलेटर कायमचं बंद करण्यात आलं आणि पाच दिवसांनी त्यांना घरीही सोडण्यात आलं.
डॉ. सिन्हा सांगतात, "या सगळ्याला खूप वेळ लागला. अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमच्या तडाख्यातून ते सहीसलामत सुटले. तब्बल चार आठवडे त्यांना भरपूर ताप होता. ते स्वतःहून श्वासच घेऊ शकत नसायचे. व्हायरसमुळे हे सगळं झालं होतं."
मुखर्जी आता घरी आहेत आणि त्यांचं नवं आयुष्य सुरू झालंय.
कोणाच्याही आधाराशिवाय ते आता चालू लागले आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना जुन्या गोष्टी आठवू लागल्या आहेत.
हॉस्पिटलमध्ये नेण्याआधी काही दिवस त्यांना खोकला झाला होता. तेव्हा स्थानिक डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांच्या घशाला इन्फेक्शन झाल्याचं निदान झालं होतं. तरीही ते कामासाठी मास्क लावून बाहेर पडायचे. रस्त्यावरच्या गरीब आणि भिकाऱ्यांची ते मदत करायचे. कामानिमित्त त्यांच्या हॉस्पिटल्स, पोलीस स्टेशन, शेल्टर होम्समध्ये फेऱ्या व्हायच्या. त्यांनी मधुमेहाची औषधं घेणंही बंद केलं होतं. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करताना त्यांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढलं होतं.
मुखर्जींच्या पत्नी सांगतात, "पण जेव्हा ते मला वारंवार तहान लागल्याचं सांगायला लागले आणि सलग काही तास झोपू लागले तेव्हा मला विचित्र वाटलं. ते खूपच थकल्यासारखे झाले होते. त्यानंतर त्यांना तो श्वास न घेता येण्याचा त्रास सुरू झाला. आम्ही त्यांना व्हिलचेअरवर बसवून हॉस्पिटलमध्ये आणलं."
सलग 82 दिवस आयसीयूमध्ये घालवल्यानंतर डॉ. सिन्हांनी शेवटच्या आठवड्यांत एक दिवसाची सुट्टी घेतली. त्यावेळी आयसीयूमधल्या प्रत्येक बेडवर कोव्हिड-19चे रुग्ण होते.
मुखर्जींवर उपचार सुरू असतानाच्या काळात त्यांच्या टीमने जवळपास 100 एक फोटो काढले होते. या लढ्याची आठवण ठेवण्यासाठी. दमून गेलेल्या आणि पीपीई किट्समध्ये बसलेल्या नर्सेस, मुखर्जींच्या बेडजवळ जागता पहारा, मुखर्जींचा उपचारातून बरं होत असतानाचा फोटो अशी दृश्यं मोबाईल कॅमेऱ्यांनी टिपली होती.
मुखर्जी खूपच नशिबवान आहेत. आता ते स्वतःहून श्वास घेत आहेत.
ते सांगतात, "मला माहिती आहे की, मी या आजाराशी लढा दिला आहे. पण खरा लढा हा मला बरं करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसचाच आहे. आजारातून वाचलेल्या प्रत्येकानेच त्याची कथा सांगायला हवी. तरच, हा व्हायरस कसा हरतोय हे जगाला कळेल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)