कोरोना: आंध्र प्रदेश सरकारकडून रिक्षा-टॅक्सी चालकांना मिळणार 10,000 रुपये सहायता निधी #5मोठ्या बातम्या

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

1) आंध्र प्रदेश: अडीच लाखांहून अधिक टॅक्सी चालकांना प्रत्येकी 10 हजार रुपये

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यात आलाय. मात्र, या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झालेत. रिक्षा आणि टॅक्सी वाहतुकीलाही मोठा फटका बसलाय.

मात्र, आंध्र प्रदेशातील वायएस जगनमोहन रेड्डी सरकारनं तब्बल 2 लाख 62 हजार 495 टॅक्सी आणि रिक्षा चालकांना प्रत्येक 10 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलाय. इंडिया टुडेनं ही बातमी दिली.

वायएस जगनमोहन रेड्डी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान वायएसआर वाहन मित्र योजनेचं आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर 4 ऑक्टोबर 2019 ला योजना प्रत्यक्षात आली होती.

काल आंध्र प्रदेशातील 13 जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वायएस जगनमोहन या योजनेबाबत माहिती दिली. यासाठी सरकारला 262 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

कोरोनाच्या काळात अशा प्रकारची मदत खूप उपयोगाची ठरणार असल्याची भावना रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यक्त केली.

2) अशोक चव्हाणांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोना व्हायरस आजारावर मात केलीय. त्यांना रुग्णालयातून घरीही सोडण्यात आलं आहे, मात्र, 14 दिवस त्यांना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आलाय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

अशोक चव्हाण यांना 25 मे रोजी कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांना नांदेडमधून मुंबईत उपचारासाठी आणण्यात आलं. त्यानंतर 10 दिवसांची अशोक चव्हाणांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली.

आता मुंबईतील निवासस्थानी अशोक चव्हाण 14 दिवस होम क्वारंटाईन झालेत.

दरम्यान, यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधीलच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही कोरोनावर मात केली होती.

3) किमती कमी करून फ्लॅट विका, पियुष गोयल यांचा बिल्डरांना सल्ला

किंमती कमी करून फ्लॅटची विक्री करण्याचा सल्ला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी बिल्डरांना दिलाय. मुंबई मिररनं ही बातमी दिली.

कोव्हिड-19 चं संकट संपल्यावर रेडी रेकनरचे दर कमी करण्याबाबतही विचार केला जाईल, असंही पियुष गोयल म्हणाले.

पियुष गोयल यांनी केंद्रीय वणिज्य मंत्र्याच्या नात्यानं देशातील काही निवडक बिल्डरांसोबत वेबिनार केला.

बाजाराची स्थिती सुधारण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा किंमती कमी करून फ्लॅट विकण्याचा सल्ला गोयल यांनी दिला.

4) परदेशातील तबलिगी जमातच्या 2,550 सदस्यांना भारतात येण्यास बंदी

परदेशातील तबलिगी जमातच्या 2,550 सदस्यांना भारतात येण्यास बंदी घालण्यात आलीय. कोरोना काळात जे तबलिगी जमातचे परदेशी सदस्य भारतात राहिले, त्यांना पुढील दहा वर्षांसाठी भारतात येता येणार नाहीय. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

केंद्रीय गृहमंत्रालयानं हा निर्णय जाहीर केला आणि भारतातील प्रत्येक राज्यांना बंदी घालण्यात आलेल्या तबलिगी जमातच्या सदस्यांची नावं आणि इतर माहिती पाठवण्यात आली.

तबलिगी जमातच्या आधी 2300 आणि आता 250 असे एकू 2550 सदस्यांना भारत प्रवेशास बंदी घालण्यात आलीय.

5) एक देश, एक राष्ट्रीयत्व, देशांतर्गत फिरणारे स्थलांतरित नाहीत: नितीश कुमार

कोरोना व्हायरसच्या नियंत्रणासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला आणि विविध राज्यातील स्थलांतरित मजूर आपापल्या राज्यांकडे परतू लागले. देशातील विविध राज्यातून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये परतणाऱ्यांची संख्या अधिक होती.

हाच धागा पकडत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणतात, “आपापल्या राज्यात परतणाऱ्यांना ‘स्थलांतरित’ म्हणून आपण त्यांना ‘आयडिया ऑफ नॅशनॅलिटी’पासून तोडत आहोत,” टाइम्स नाऊनं ही बातमी दिलीय.

“एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलेल्यांना आपण स्थलांतरित का म्हणतो? हा एक देश आणि एक राष्ट्रीयत्व आहे. आपल्या देशातून दुसऱ्या देशात गेलेल्यांना स्थलांतरित म्हणायला हवं,” असं नितीश कुमार म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)