महाराष्ट्र लॉकडाऊन : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना झालेल्या सेमिस्टरची सरासरी काढून गुण देणार- उद्धव ठाकरे

"लॉकडाऊन हा शब्द आता कचऱ्याच्या टोपलीत फेकायची वेळ आलीये. आता 'मिशन बिगीन अगेन' सोबत नवीन सुरूवात करायची आहे," असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र 'अनलॉक'च्या दिशेने पावलं टाकणार असल्याचं स्पष्ट केलं.

लोकमान्य टिळकांच्या गोष्टीचा दाखला देत आता 'पुनश्च हरि ओम' करण्याची म्हणजे नव्यानं सुरुवात करण्याची वेळ आहे, असं उद्धव यांनी म्हटलं.

तातडीने परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यापूर्वी- जेवढे सेमिस्टर झाले आहेत त्याची सरासरी काढून गुण देऊन त्यांना उत्तीर्ण करायचं ठरवलं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

ज्यांना असं वाटतं की मी अजून गुण मिळवू शकतो, परीक्षा द्यायची आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी साधारण ऑक्टोबरच्या सुमारास परीक्षा घेण्याची तयारी ठेवत असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 'मिशन बिगीन अगेन' असं म्हणत या नवीन लॉकडाऊनसंदर्भातील नियम आणि अटी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या नवीन नियमांमध्ये काही सवलती देण्यात आल्या आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.

लॉकडाऊन सायन्स आहे तर लॉकडाऊन उघडणं ही कला आहे, असं म्हणत उद्धव यांनी काळजीपूर्वक लॉकडाऊनचे नियम शिथील करण्याची गरज व्यक्त केली. 'मिशन बिगीन अगेन' च्या तीन टप्प्यांबद्दल उद्धव यांनी सरकारची भूमिकाही स्पष्ट केली.

उद्धव यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-

  • 3 जूनपासून आपण हातपाय हलवायला सुरुवात करू. अनेकजण सकाळी व्यायामाला जातात. तरुण मंडळी खुल्या जागेत व्यायाम करतात. बाहेर फिरताना अंतर ठेऊन फिरा. हे अंतर कोरोनापासून अंतर फिरायला मदत करेल. भेटल्यानंतर ठराविक अंतरावरून हाय हॅलो करा. गप्पाटप्पांमध्ये दंग होऊ नका. व्यायाम, जॉगिंग, सायकलिंगला परवानगी.
  • सगळी दुकानं बंद होती. पण 5 जूनपासून लहानमोठ्या शहरातील रस्त्याच्या दुतर्फा जी दुकानं आहे ती समविषम पद्धतीने खुली होतील.
  • गर्दी करायची नाहीये. आपण आधी प्रयोग केले होते, तेव्हा झुंबड उडाली होती. या गोष्टी टाळायला हव्यात. महाराष्ट्राचा आदर्श अन्य राज्यांनी घ्यायला हवा.
  • 8 तारखेपासून कार्यालयं सुरू करत आहोत. 10 टक्के उपस्थितीने सुरूवात करू.
  • आपण कोरोनाच्या सर्वोच्च बिंदूशी आलो आहोत किंवा सर्वोच्च बिंदूजवळ आहोत. केसेसची संख्या वरखाली होऊन कमी होऊ लागली आहे. आपण बंधनं पाळली तर संख्या कमी राहील. ज्यांना आवश्यकता नाही त्यांनी घराबाहेर पडू नये.
  • मधुमेह, रक्तदाब, हदयविकार असणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये. ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो घरातच राहावं. हाय रिस्क गटातील नागरिकांना कोरोना विषाणूचा धोका सर्वाधिक. 55 ते 60 आणि त्यापेक्षा वयाच्या नागरिकांनी घरीच राहावे.
  • मध्यमवयीन तसंच युवांनी घरी गेल्यावर आपल्या माध्यमातून विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घ्या. कपडे धुवा, हात धुवा. लक्षणं आढळली तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, तोंडाची चव जाणं, थकवा ही लक्षणं आढळली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • राज्यात 65,000 केसेस आहेत. पहिला रुग्णही यात आहे. 28,000 आसपास रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दुर्देवाने काहीजणांचा मृत्यू झाला आहे. अॅक्टिव्ह केसेस 34,000 आहे. यापैकी 24,000 रुग्ण ज्यांना कोणतीही लक्षणं नाहीत. ते क्वारंटीनमध्ये आहेत. काही आयसोलेशनमध्ये आहेत. 24,000 मध्येही मध्यम आणि तीव्र लक्षणं असलेल्यांची संख्या 9,000 आसपास आहे. 1200 जण गंभीर स्थितीत आहेत. यापैकी 200 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
  • आकडे बघून मुंबईत, महाराष्ट्रात गंभीर स्थिती आहे, लष्कराला पाचारण करा अशी टीका होते आहे. त्यांनी आकडेवारी नीट पाहावी
  • महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान आपलीच माणसं करतात, याचं दु:ख आहे.
  • पुढच्या रविवारपासून वृत्तपत्रं घरोघरी पोहचवली जातात. वृत्तपत्रं वितरण करणाऱ्या मुलांना मास्क, सॅनिटायझर दिलं जाईल. त्यांनी काळजी घ्यायला हवी.
  • राज्यात 77 चाचणी केंद्र आहेत. लवकरच चाचणी केंद्रांची संख्या शंभरापलीकडे जाईल. टेस्टिंग वाढवण्याची आवश्यकता कारण पावसात सर्दी, ताप, खोकला हे आजार होतात. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढवणं आवश्यक. चाचण्यांची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी प्रयत्न
  • राज्यात 2576 कोरोना हॉस्पिटलं. राज्यात एकूण अडीच लाख बेड्स. 25 हजार ऑक्सिजनची सुविधा देऊ शकणारे बेड्स
  • जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजन लागतो आहे. त्यासाठी व्यवस्था करत आहोत.
  • रुग्ण शेवटच्या टप्प्यात हॉस्पिटलमध्ये दाखल होतो आहे. माझा एक कार्यकर्ता शेवटच्या टप्प्यात हॉस्पिटलमध्ये आला. दुखणं अंगावर काढू नका. अनेक रुग्ण वेळेत आल्याने चांगले उपचार होऊ शकले आहेत.
  • मृत्यूदर खाली आणायचा असेल तर डॉक्टर सज्ज आहेत. डॉक्टरांना औषधं वेळेत मिळत आहेत, त्याचवेळी रुग्णही वेळेत त्यांच्यासमोर यायला हवा
  • 16 लाख मजुरांना रेल्वे, बसेसमधून परराज्यात सोडलं आहे
  • पीयुष गोएल यांना धन्यवाद देतो आहे. त्यांनी ट्रेन्स उपलब्ध करून दिल्या.
  • एसटीच्या माध्यमातून सव्वा पाच लाखांहून अधिक मजुरांना गावी सोडलं
  • यासाठी मुख्यमंत्री निधीतून 85 ते 90 कोटी रुपये खर्च
  • 1 ते 30 मे काळात 32 लाखापेक्षा लोकांना शिवभोजन थाळी
  • शाळा,कॉलेजेस कसं सुरू करायच्या याविषयी विचार सुरू आहे.
  • अनेक शाळांमध्ये क्वारंटीन केंद्र आहेत. निर्जुंतुकीकरण करून सुरू करता येईल. शाळा कधी सुरू होणार यापेक्षा शिक्षण केव्हा सुरू होणार हा प्रश्न विचारूया. ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण उपलब्ध होऊ शकत नाही. ऑनलाईन शिक्षण कसं देता येईल याविषयी चर्चा करत आहोत.
  • मोबाईल, टीव्ही, रेडिओ तसंच ई-लर्निंग अर्थात एसडी कार्डद्वारे शिक्षण देता येईल का, आठवड्यातून किती दिवस शाळेत मुलं येऊ शकतात यासंदर्भात काम सुरू आहे. थोडक्यात, जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे ऑनलाईन, जिथे प्रत्यक्ष शाळा सुरू करणं शक्य आहे तिथे शाळा सुरू करता येईल. त्यासंदर्भात लवकरच घोषणा होईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)