टोळधाड : पाकिस्तानमार्गे आलेले किटक विदर्भात, असे लावा पळवून

पाकिस्तानातून राजस्थान आणि मध्यप्रदेश मार्गे आलेल्या टोळधाडींनी विदर्भातल्या नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात धडक दिली आहे. या भागात संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्याचं या किटकांनी मोठं नुकसान केलं आहे.

मध्यप्रदेशातून हे टोळ म्हणजेच नाकतोडे सातपुडाच्या पर्वतरांगांमधून नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात पोहोचले आहेत. नागपुरातले संत्रा उत्पादन तालुके असलेल्या काटोल आणि नरखेडमध्ये सोमवारपासून टोळधाड पडत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तर अमरावतीतल्या वरूड, मोर्शी आणि वर्धा जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे.

या जिल्ह्यांमध्ये सध्या पीक नसल्यामुळे हे किटक संत्र्यांच्या झाडांच्या पानांचा फडशा पाडत आहेत. सध्या पानगळीनंतर झाडांना नवी पालवी येत आहे. पण हे किटक कोट्यवधींच्या संख्येने आहेत आणि त्यामुळे नुकसान मोठं होतंय.

हे किटक एखाद्या तालुक्यात पोहोचल्यानंतर रात्रीतून पाच ते सहा किमी परिसरातल्या झाडांचं नुकसान करतात. एखाद्या झाडावर हल्ला केल्यानंतर त्या झाडाच्या फांद्याच शिल्लक राहतात. पानं पूर्णपणे खाऊन टाकतात. सध्या विदर्भात पीक नाहीत. पण भाजीपाला आणि संत्रा, मोसंबी, लिंबू या झाडांच्या बागा उभ्या आहेत. त्यांना टोळांनी लक्ष्य केलं आहे.

काटोलचे शेतकरी ईश्वर पुंड यांनी फोनवर बोलताना सांगितलं, "सोमवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला त्यांच्या शेतात टोळधाड शिरली. साधारण अंधार पडायला सुरुवात झाल्यावर त्यांनी शेतातल्या संत्रा झाडावर मुक्काम ठोकला आणि पानांचा फडशा पाडला. जनावरांसाठी लावलेल्या मक्याचेही टोळांनी नुकसान केले."

या टोळांना कसं हुसकावून लावायचं हा मोठा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडला आहे. याविषयी सांगताना ईश्वर पुंड म्हणाले, "कृषी विभागाने आधी आम्हाला पालापाचोळा विशेषतः कडुनिंबाच्या पानांचा जाळ करायला सांगितला. मात्र, टोळ लाखोंच्या संख्येत असल्याने अखेर अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या. फवारणी करण्यात आली."

विदर्भात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार,

  • एका टोळधाडीत कोट्यवधी किटक असतात.
  • टोळधाडीचा शेतावर प्रादुर्भाव झाल्यास आगीचा मोठ्या प्रमाणात धूर करावा.
  • शेतात मोठा आवाज करावा. डीजे, ट्रॅक्टरचे सायलेंसर काढून त्याचा आवाज, याचा उपयोग करता येईल.
  • अनेकांनी एकत्र येऊन भांडी वाजवल्यानेही टोळ पळून जाण्यात मदत होईल.
  • टोळधाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 1 लीटर पाण्यामध्ये क्लोरोपायरीफॉस 50%, साईपरमेथ्रीन 5% हे रसायन 3-4 मिली एवढ्या प्रमाणात मिसळून फवारणी करता येईल.
  • टोळधाड खूप मोठी असल्याने फवारणीसाठी अग्निशमन दलाची गाडी किंवा ड्रोनचा वापर करावा.

ही टोळधाड आता कळमेश्वरकडे पसार झाली आहे. नागपूर जिल्ह्याचे उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे सांगतात, "काटोल आणि नरखेड तालुक्यात संत्रा झाडांचं मोठं नुकसान झालं आहे. उन्हाळा असल्यामुळे शेतात सध्या काही नाही. पण पिक असताना टोळधाड आली असती तर मोठं नुकसान झालं असतं."

ते पुढे म्हणाले, "हे किटक सकाळी उडतात आणि संध्याकाळी मुक्काम करतात. मुक्काम करताना मिळेल त्या झाडांची पानं खाऊन फस्त करतात. तसंच अंडीही घालतात."

दरम्यान, पाकिस्तान मार्गे आलेल्या वाळवंटी टोळधाडी पश्चिम आणि मध्य भारतात पिकांचं मोठं नुकसान करत आहेत. जाणकारांच्या मते गेल्या तीन दशकातली ही सर्वांत मोठी टोळधाड आहे.

ड्रोन, ट्रॅक्टर आणि चारचाकी वाहनांच्या मदतीने हे टोळ कुठे थांबा घेत आहेत, याचा शोध घेतला जातोय आणि किटकनाशकांचा वापर करून त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

असं असलं तरी एवढ्या कमी कालावधीत या टोळांनी 50 हजार हेक्टरवरचं उभं पीक उद्ध्वस्त केलं आहे.

टोळधाड चेतावनी संस्था म्हणजेच लोकस्ट वॉर्निग ऑर्गनायझेशन या सरकारी संस्थेचे उपसंचालक के. एल. गुर्जर यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं, "प्रती चौरस फूट परिसरात पसरलेल्या आठ ते दहा टोळांचे समूह राजस्थान आणि मध्यप्रदेशातल्या काही भागांमध्ये सक्रीय आहेत."

टोळधाडीमुळे या दोन्ही राज्यात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे.

आणखी एका नैसर्गिक संकटाचा सामना

कोरोना संकटाचा सामना करत असताना आणखी एका नैसर्गिक संकटाचा आपल्याला सामना करावा लागतोय. राजस्थानात प्रवेश करण्याआधी या टोळधाडींनी शेजारच्या पाकिस्तानात मोठं नुकसान केलं आहे.

गुर्जर सांगतात, "काही छोट्या टोळधाडी भारतातल्या इतरही काही राज्यांमध्येही सक्रीय आहेत."

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनुसार चार कोटी टोळ असलेला किटकांची एक टोळी 35 हजार लोकांना पुरेल इतक्या धान्याची नासाडी करू शकते. राजस्थानची राजधानी जयपूरच्या काही रहिवासी भागांमध्येही टोळांनी हल्ला केला आहे.

टोळांना हुसकावून लावण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. काहींनी किटकनाशकांचा वापर केला तर काहींनी थाळ्या वाजवल्या. जूनमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या मते मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळ यामुळे गेल्या वर्षीच्या सुरुवातीला टोळांचं मोठ्या प्रमाणावर प्रजनन झालं आणि त्यामुळे अरब द्विपकल्पात टोळांची संख्या लक्षणीयरित्या वाढली. 1993 सालानंतर भारताने एवढी मोठी टोळधाड अनुभवलेली नाही.

पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थानातल्या काही भागामध्ये दरवर्षी टोळधाड पडते आणि त्यात पिकाचं नुकसान होतं. मात्र, यंदा या टोळधाडी राजस्थानमधून पुढे जात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भातही पोहोचल्या. हे सामान्य नाही.

लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे वाऱ्याचा वेग आणि दिशेमुळे या टोळधाडी दक्षिण-पश्चिमेकडे पुढे सरकत आहेत.

वाळवंटी टोळ

वाळवंटी टोळ ही टोळांची एक प्रजाती आहे. सामान्यपणे हे टोळ निर्मनुष्य भागात असतात. मात्र, हा वाळवंटी टोळ कधीकधी मोठं नुकसान करतो.

जेव्हा गवताळ मैदानांवर लाखोंच्या संख्येने वाळवंटी टोळ एकत्र येतात तेव्हा निर्मनुष्य भागात त्यांचा जो स्वभाव असतो तसा इथे राहत नाही. उलट एकत्र येत ते भयंकर रुप धारण करतात. या अवस्थेत ते रंग बदलून मोठ्या समूहात एकत्र येतात.

आकाशात उडणाऱ्या या झुंडीत 10 अब्ज टोळ असू शकतात. शेकडो किलोमीटर परिसरात ते पसरलेले असतात.

हे टोळ एका दिवसात 200 किमी अंतर कापू शकतात. खाणं आणि प्रजनन या दोन कारणांसाठी हे किटक एवढ्या मोठ्या क्षेत्रफळातलं पीक नष्ट करू शकतात.

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनुसार एक सामान्य आकाराची टोळी अडीच हजार लोकांचं पोट भरू शकेल एवढं धान्य फस्त करते. संयुक्त राष्ट्रांने दिलेल्या माहितीनुसार 2003 आणि 2005 या काळातही टोळांच्या संख्येत अशीच लक्षणीय वाढ झाली होती आणि त्यांनी पश्चिम आफ्रिकेतल्या शेतीचं अडीच अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं होतं. त्यापूर्वी 1930, 1940 आणि 1950 मध्येही टोळ्यांची संख्या वाढली होती.

काही टोळधाडी एवढ्या मोठ्या होत्या की शेकडो किलोमीटर परिसरात ते पसरले आणि त्यांच्या हल्ल्याला प्लेग म्हटलं गेलं.

दहापैकी एका व्यक्तीच्या आयुष्यावर होतो परिणाम

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनुसार वाळवंटी टोळ जगातल्या दहापैकी एका व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम करतात. याच कारणामुळे वाळवंटी टोळांना जगातल्या सर्वाधिक धोकादायक किटकाच्या श्रेणीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या दशकात जी सर्वांत मोठी टोळधाड होती ती सध्या हॉर्न ऑफ अफ्रिकेतली गवताळ मैदानं आणि पिकांना नष्ट करत आहे.

एक टोळ किती नुकसान करतो?

पूर्ण वाढ झालेला एक टोळ आपल्या वजनाएवढं म्हणजे 2 ग्राम धान्य फस्त करतो. यामुळे ओला किंवा कोरडा दुष्काळाचा सामना करणाऱ्या भागात मोठं अन्नधान्य संकट ओढावू शकतं.

मात्र, टोळांच्या धाडी एवढ्या मोठ्या प्रमाणावर का होत आहेत, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. यामागचं एक कारण 2018-19 साली आलेली मोठमोठी वादळं आणि मुसळधार पाऊस हेदेखील आहे.

पश्चिम आफ्रिका आणि भारत यांच्यातला 1.6 कोटी चौरस किलोमीटर परिसर वाळवंटी टोळांचं पारंपरिक स्थान आहे.

संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अरब द्विपकल्पात दोन वर्षांपूर्वीच्या ओल्या आणि अनुकूल वातावरणामुळे टोळांच्या तीन पिढ्या मोठ्या संख्येने विकसित होत राहिल्या आणि कुणाला याची कल्पनाही आली नाही.

2019च्या सुरुवातीला टोळांचा पहिला गट यमन, सौदी अरब मार्गे ईराण आणि मग पूर्व आफ्रिकेकडे गेला. गेल्या वर्षीच्या शेवटीशेवटी नवीन गट तयार झाले. हे गट केनिया, जिबूती आणि एरिट्रियापर्यंत पोहोचले. तिथून ते जगातल्या इतर भागात गेले.

टोळधाडींपासून बचाव कसा करावा?

हॉर्न ऑफ आफ्रिकेत या टोळांच्या आकारात मोठी वाढ झाल्याने काही देशांनी आता या संकटावर उपाय शोधायला सुरुवात केली आहे. योग्य प्रकारे नियंत्रण आणि मॉनिटरिंगच्या माध्यमातून टोळांची रोकथाम करता येते.

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे चालवल्या जाणाऱ्या डेजर्ट लोकस्ट इन्फॉर्मेशन सर्विस या टोळांचे अलर्ट, त्यांचं स्थान आणि प्रजनन अशी माहिती पुरवते.

मात्र, टोळांची संख्या हाताबाहेर गेल्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणावर उपाय योजना कराव्या लागतात. टोळांची संख्या कमी करणं आणि प्रजननाला आळा घालणं, यासारखे उपाय असतात. मात्र, टोळांचं नियंत्रण करताना पर्यावरणाचं नुकसान होणार नाही, असे उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

यात जैविक किटकनाशक आणि नैसर्गिक शिकारी प्राण्यांचा समावेश होतो. मात्र, किटकनाशकांची फवारणी हाच उपाय मोठ्या प्रमाणावर वापरात असल्याचं दिसतं. हँड पंप, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि विमानाच्या मदतीने फवारणी करून कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर टोळांचा नाश केला जाऊ शकतो.

ज्या देशांमध्ये गेल्या काही दशकांपासून टोळधाड पडलेली नाही त्या देशांना मात्र टोळ पळवून लावण्यात जास्त अडचणी येत आहेत. कारण त्यांच्याकडे टोळांसाठीच्या पायभूत सोयीच नाहीत.

भारतातली परिस्थिती कशी आहे?

पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थानातल्या काही भागात दरवर्षी टोळधाडीमुळे पिकांचं मोठं नुकसान होतं. मात्र, गेल्या तीन दशकात पहिल्यांदाच हे टोळ पुढे सरकत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रपर्यंत पोहोचले आहेत.

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानमार्गे आलेल्या एका मोठ्या टोळधाडीने गुजरातमधल्या शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान केलं होतं.

गुजरातमधल्या उत्तरेकडच्या बनासकांठा जिल्ह्यात टोळांनी मोहरी, एरंड, मेथी, गहू आणि जिऱ्याची शेती फस्त केली होती. मात्र, यावर्षी नुकसान जास्त आहे.

यावर्षी भारतात टोळांनी पहिला हल्ला चढवला 11 एप्रिल रोजी. त्या दिवशी राजस्थानातल्या गंगानगरमध्ये टोळधाड पडली. तिथून पुढे जात टोळांनी राजधानी जयपूर आणि आसपासच्या भागातही नुकसान केलं.

टोळधाडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तर अग्निशमन दलांचीही मोठ्या प्रमाणावर मदत घेतली जात आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)