पाकिस्तानचं उदाहरण ऑनलाईन शिकवताना दिल्याने शिक्षिका निलंबित

    • Author, समीरात्मज मिश्र
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दोन दिवसांपूर्वी गोरखपूरमधल्या एका शिक्षिकेने चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासदरम्यान Noun अर्थात नामाची काही उदाहरणं व्हॉट्सअॅपवर पाठवली.

जीएन पब्लिक स्कूलच्या शादाब खानम यांनी पाठवलेल्या या मेसेजमध्ये काही उदाहरणं अशी होती, जी बघून काही पालकांनी आक्षेप घेतला.

खानम यांनी पाठवलेलं उदाहरण याप्रकारचं होतं - 'Pakistan is our dear Motherland', 'I will join Pakistan Army', 'Rashid Minhaj was a brave soldier.'

या उदाहरणांवर फक्त पालकांनीच नव्हे, तर शाळेतील प्रबंधक समितीनं चिंता व्यक्त केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर जिल्ह्यातील या शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं आहे.

दरम्यान, हा प्रकार चुकून घडल्याचं सांगत या प्रकरणी आपण माफी मागितली असल्याचं संबंधित शिक्षिकेनं म्हटलं आहे.

'उदाहरणं गुगलवर सर्च करून'

शाळेचे प्रबंधक गोरक्ष प्रताप सिंह यांनी बीबीसीला सांगितलं, "या बाबीची माहिती मिळताच आम्ही शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि जोपर्यंत शिक्षिकेकडून उत्तर येत नाही, तोपर्यंत त्यांना वर्ग घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

"या प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही शाळेतल्या चार शिक्षकांची एक समिती बनवली आहे. तसंस याविषयी जिल्हा शिक्षण निरीक्षकांनाही माहिती दिली आहे."

तर आपण ही उदाहरणं गुगलवर सर्च करून दिली होती, पण काही पालकांनी आक्षेप घेतल्यानंतर ग्रूपवर माफी मागितली, असं शादाब खानम यांचं म्हणणं आहे.

बीबीसीला बोलताना शादाब म्हणाल्या, "Noun, Collective Noun आणि Proper Nounची काही उदाहरणं मला एकाच ठिकाणी सापडली आणि ती कॉपी करून मी ग्रूपवर पाठवली. काही पालकांनी आक्षेप घेतला तेव्हा पाकिस्तानऐवजी इंडिया लिहा, असं मी त्यांना सांगितलं.

"पण काही जणांनी त्यावर राग व्यक्त करायला सुरुवात केली, तर मी माझ्या चुकीची कबुली देत ग्रूपवरच माफी मागितली. त्यानंतर काही पालकांनी याविषयीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली."

शाळेच्या प्रबंधक कमिटीनं नोटीस पाठवली आहे, पण अद्याप उत्तर द्यायच्या मनस्थितीत नसल्याचं शादाब सांगतात.

त्या सांगतात, "मला एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. आता माझी मनःस्थिती नाही की, मी लगेच उत्तर देऊ शकेन. खरं तर मी माफीही मागितली आहे. एक-दोन दिवसांत मी शाळेला लेखी उत्तर पाठवून देईल."

शाळेचे प्रबंधक जीपी सिंह सांगतात, "शादाब आमच्या शाळेत जवळपास 10 वर्षांपासून शिकवत आहेत आणि त्यांच्याविषयी कधी काही तक्रार आलेली नाही."

स्थानिक माध्यमांत चर्चा आहे की, शाळेनं शादाब यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याविषयी विचारल्यावर जीपी सिंह चिडून म्हणतात, "तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं माझ्यासाठी बंधनकारक नाही. तुम्ही काही गोष्टी पोलिसांनाही विचारू शकता."

गोरखपूरचे पोलीस अधीक्षकचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र मिश्र सांगतात, "शाळेनं कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केलेली नाही. पोलिसांनी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार चौकशी सुरू केली आहे. शाळेकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे."

याप्रकरणी शाळेतील विद्यार्थ्यांचे काही पालक चिंतेत आहेत आणि त्यांनी शिक्षिकेच्या उद्देशावर चिंता व्यक्त केली आहे.

गुगलवर NOUN सर्च केल्यानंतर फक्त पाकिस्तानचे उदाहरणं समोर येत नाहीत, असं एका पालकांना नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.

असं असलं तरी ही एक मानवी चुकी आहे, असं म्हणत अनेक जण सोशल मीडियावर शिक्षिकेचा बचाव करत आहे. याप्रकरणानं अचानक मोठं रूप धारण केल्याने अनेकांचे फोन येऊ लागल्यानं शादाब खानम कुणाशी फारसं बोलत नाहीयेत.

सोशल मीडियावरील त्यांच्या पाकिस्तान प्रेमाच्या आरोपांना त्या फेटाळून लावतात.

"आमचं संपूर्ण कुटुंब देशभक्त आहे आणि याप्रकरच्या गोष्टींचा आम्ही विचारही करू शकत नाहीत," असं शादाब यांचे पती मोहम्मद हासिम सांगतात.

"शाळेत नुकतेच ऑनलाईन वर्ग भरायला सुरुवात झाली आहे, आणि शादाब फार तंत्रस्नेही नाही आहेत. ऑनलाईन शिकण्याचा अथवा शिकवण्याचा तिला अनुभव नाही. यामुळेच तिच्याकडून ही चूक झाली आहे," मोहम्मद हासिम सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)