टोळधाड : राजस्थान, मध्य प्रदेशमधील पीकं फस्त करून आता टोळधाड झाशीमध्ये

राजस्थान आणि मध्यप्रदेशातल्या अनेक जिल्ह्यात उभी पिकं फस्त केल्यानंतर टोळांनी आपला मोर्चा आता उत्तर प्रदेशमधल्या झाशीच्या दिशेने वळवला आहे.

याविषयी ANI या वृत्तसंस्थेला माहिती देताना झाशीचे जिल्हाधिकारी आंद्रा वामसी म्हणाले, "टोळधाड राजस्थानवरून झाशीला आली आहे. हे टोळ नदीलगतच्या परिसरात अधिक सक्रीय असल्याचं दिसून आलं आहे. हे टोळ सोयाबीन आणि भाज्यांच्या पिकांचं मोठं नुकसान करत आहेत."

केंद्र सरकारच्या लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनने आणखी एका टोळधाडीचा इशारा दिला आहे. यावर्षी भारतात टोळधाडीचा पहिला हल्ला 11 एप्रिल रोजी राजस्थानातल्या गंगानगरमध्ये झाला होता. हे टोळ पाकिस्तानातून भारतात दाखल झाले होते.

जयपूर आणि आसपासच्या परिसरातही या टोळधाडींनी पिकांचं मोठं नुकसान केलं. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (25 मे) जयपूर शहरातल्या काही रहिवासी भागातही ही टोळधाड दिसली.

सामान्यपणे राजस्थानातल्या पश्चिमेकडच्या भागांमध्ये टोळधाडी आढळतात. मात्र, यावर्षी ही टोळधाड जयपूर आणि त्याहीपुढे गेल्या.

एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं की, यंदा अजून पिकं उभी नाही. त्यामुळे या टोळांनी झाडांना लक्ष्य केलं आहे. जयपूरमधल्या मुरलीपुरा आणि विद्यासागर नगर परिसरात लोकांनी थाळ्या वाजवून भिंती आणि झाडांवर बसलेल्या टोळांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला.

ही टोळधाड रविवारी (24 मे) नागौरहून जयपूरला पोचली. त्यानंतर सोमवारी (25 मे) ही टोळधाड दौसाकडे रवाना झाली. सध्या ही टोळधाड झाशीच्या जवळ आहे.

राजस्थानचे कृषीमंत्री लालचंद कटारिया यांनी टोळांनी नुकसान केलेल्या भागाची पाहणी केली आणि पीडित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

टोळधाडीवर लक्ष ठेवण्यासाठी 200 पथकं नेमण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या संचालकांनी दिली आहे. टोळधाडविरोधी मोहिमेत अग्निशमन दलाचीही मदत घेतली जात आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)