नांदेड साधू हत्या: दरोड्यासाठी आलेल्या अनुयायावर संशय #5मोठ्याबातम्या

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

1) नांदेडमध्ये साधूची हत्या

नां

फोटो स्रोत, Twitter / Ashok Chavan

पालघर जिल्ह्यात साधूच्या हत्येचं प्रकरण ताजे असतानाच, नांदेड जिल्ह्यातही साधूची हत्या झाल्यानं खळबळ उडालीय.

नांदेडमधील पशुपती मठाचे स्वामी शिवाचार्य रुद्र (वय 33 वर्षं) यांची मठातच हत्या झालीय. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय. या मठापासून काही अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात भागवत शिंदे (वय 50 वर्षे) या व्यक्तीचाही मृतदेह आढळून आलाय.

रविवारी पहाटे तीन वाजता हत्येची घटना घडली. जिल्हा पोलिसांच्या माहितीनुसार, दरोड्याच्या उद्देशानं आलेल्या आरोपीनं या हत्या केल्या आहेत.

या हत्यांप्रकरणी पोलिसांना संशय असलेला 25 वर्षीय आरोपी साईनाथ लंगोटे हा स्थानिक रहिवाशी असून, स्वामी शिवाचार्य रुद्र यांचा अनुयायीही आहे. त्याच्यावर याआधीही हत्या आणि गैरवर्तन यांसारखे गुन्हे दाखल आहेत.

साईनाथ लंगोटे हा दरोड्याच्या उद्देशानं मठात गेला होता, अशी माहिती नांदेडचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली.

याप्रकरणी नांदेडचे पालकमंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे. "ष.ब्र.प्र. १०८ श्री बाल तपस्वी निर्वाण रूद्र पशुपती शिवाचार्य महाराज नागठाणकर यांची निर्घृण हत्या अतिशय संतापजनक आहे. या प्रकरणाचा छडा लावून मारेकऱ्यांच्या अटकेसाठी युद्धपातळीवर शोध घेण्याचे निर्देश मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

"निर्वाण रूद्र मठ संस्थान नागठाणा, ता. उमरी येथील ष.ब्र.प्र. १०८ श्री बाल तपस्वी निर्वाण रूद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांचे धार्मिक कार्य मोठे होते. गोशाळा उभारणीत त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली."

2) भारत-चीन सीमेवर तणाव

भारत आणि चिनी सैनिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारत आणि चिनी सैनिक

भारत-चीन सीमेवरील तणाव वाढला आहे. चिनी सैनिक गलवान खोऱ्याच्या दक्षिण पूर्व भागात तीन किलोमीटरपर्यंत भारताच्या हद्दीत आल्याची बातमी द प्रिंटने दिलीय.

या भागाला पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग्ज एरिया म्हटलं जातं.

पैंगाँग झीलच्या फिंगर एरियामध्ये चीननं आपले सैनिक उतरवले आहेत. नियंत्रण रेषेच्या पलिकडेही चीननं सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवलीय. भारतानंही आपल्या हद्दीत सैनिक तैनात (मिरर डिप्लॉयमेंट) केले असून, चीनच्या प्रत्येक पावलाकडे लक्ष ठेवले आहे.

3) आम्ही भर पुरात मदतीला धावलो, आज मुख्यमंत्री घरात बसून – गिरीश महाजन

गिरीश महाजन

फोटो स्रोत, Twitter

“केरळमध्ये पूर आला होता, त्यावेळी आम्ही मदतीला धावलो होतो. पण आताचे मुख्यमंत्री घरात बसूनच आहेत,” असा टोला महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. झी 24 तासनं ही बातमी दिलीय.

केरळमध्ये ज्यावेळी पुरानं थैमान घातलं होतं, त्यावेळी गिरीश महाजन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री होते. ते खास विमानानं औषधं आणि बचावकार्याचे इतर साहित्य घेऊन केरळमध्ये मदतीला गेले होते. या प्रसंगाचा उल्लेख करत गिरीश महाजन यांनी आताच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

राज्यातील जनता कोरोनामुळे हवालदिल झाली असताना मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री घाबरलेले आहेत. हे मंत्री जनतेला काय धीर देणार? असा खोचक सवालही महाजनांनी उपस्थित केलाय.

4) भाजप खासदाराच्या मुलाची कार्यकर्त्याला मारहाण

भाजपचे नवनियुक्त राज्यसभा खासदार भागवत कराड यांच्या दोन मुलांनी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केलीय. शनिवारी, 23 मे रोजी रात्री 10 वाजता ही घटना घडली.

महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

कुणाल मराठे असे या पीडित मदाधिकाऱ्याचे नाव आहे. औरंगाबादमधील कोटला कॉलनी परिसरात कुणाल मराठे राहतात.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

आपल्या कार्यक्षेत्रात कोरोनाबाबत मदतकार्य केल्यानं हर्षवर्धन भागवत कराड, वरुन भागवत कराड आणि पवन सोनवणे यांनी कुणाल मराठे यांना घरात घुसून मारहाण केली.

या मारहाणप्रकरणी खासदार भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांवर, तसंच पवन सोनवणे या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

5) अभिनेते किरण कुमार यांना कोरोनाची लागण

ज्येष्ठ अभिनेते किरण कुमार यांना कोरोना व्हायरसची लागण झालीय. 74 वर्षांच्या कुमार यांच्यात कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.

अभिनेते किरण कुमार यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं, “14 मे रोजी हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेलो असता, कोरोनाची चाचणी घेतली गेली. त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पण मला ताप किंवा खोकला अशी कोणतीच लक्षणं नव्हती आणि आताही नाहीत.”

किरण कुमार हे सध्या पूर्णपणे बरे असून, ते घराच विलगीकरण कक्षात आहेत.

हिंदी सिनेसृष्टीत अनेक सिनेमांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत.